पौष्टिक सूप

अलका फोंडके
सोमवार, 7 डिसेंबर 2020

पाश्चात्य भोजनसंस्कृतीत तीन, पाच किंवा सात निरनिराळ्या पदार्थांच्या भोजनथाटाची नांदी सूपनेच केली जाते. आपल्या खाद्यसंस्कृतीत सूप पौष्टिक मानले जाते. म्हणूनच रुग्णाच्या परिचर्येत त्याची प्रकृती सुधारण्यासाठी व त्याला बळकटी देण्यासाठी सूपची योजना केली जाते. वाढत्या वयाच्या मुलांनाही सूप दिले जाते. अशाच सूपच्या या काही पाककृती...

थिक मसूर सूप
साहित्य : अर्धा कप लाल मसूर डाळ, २ कप पाणी, १ मध्यम आकाराचा कांदा, ३ लसूण पाकळ्या, अर्धे लिंबू, चवीनुसार मीठ आणि मिरपूड, चिली सॉस.
कृती : मसूर डाळ दोन कप पाण्यात अर्धा तास भिजत घालावी. त्यात कांदा आणि लसूण घालावे. सर्व मिश्रण प्रेशर कूकरमध्ये पाच शिट्या येईपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये घालून एकजीव करून घ्यावे. एकजीव झालेले मिश्रण परत मध्यम आचेवर ठेवून त्यात मीठ आणि मिरपूड घालावी. उकळल्यावर चिली सॉस आणि अर्ध्या लिंबाचा रस घालावा. फारच दाट वाटल्यास आणखी थोडे पाणी घालावे. पुदिन्याची पाने वर ठेवून गार्निश करावे. सूप वाढण्यासाठी तयार आहे. हे प्रमाण चार व्यक्तींना पुरेल.

गार्लिक आणि स्वीट पोटॅटो सूप
साहित्य : आठ लसणाच्या मोठ्या पाकळ्या, १ मध्यम आकाराचा कांदा, ३० ग्रॅम ऑलिव्ह तेल, २५० ग्रॅम रताळी, ८०० मिलिलिटर पाणी, २ चिकन क्यूब, १०० ग्रॅम किंवा एक कप काबुली चणे, १ टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल तिखट, अर्ध्या लिंबाचा रस, मीठ आणि मिरपूड.
कृती : लसणाच्या पाकळ्या सोलून चिरून घ्याव्यात. कांद्याचे तुकडे करावेत. एका पॅनमध्ये ऑलिव्ह तेल घालून ते गरम झाल्यावर त्यात लसूण आणि कांदा घालावा. पाण्यात चिकन क्यूब घालून विरघळून द्यावे. त्यातल्या थोड्याशा पाण्याबरोबर लसूण आणि कांदा मध्यम आचेवर ठेवून पॅनवर झाकण ठेवून शिजवत ठेवावा. पाण्याच्या वाफेमुळे लसूण अधिक नरम होतो. पाण्याला उकळी आल्यावर साधारण पाच मिनिटे हे सर्व शिजवून घ्यावे. काबुली चणे आदल्या दिवशी पाण्यात भिजवावे. निथळून घेऊन ते बुडतील एवढे चिकन क्यूबसहित पाणी घालून प्रेशर कूकरमध्ये पाच ते सहा शिट्या होईपर्यंत मध्यम आचेवर शिजवावे. रताळ्यांची साले काढून त्यांचे तुकडे करून घ्यावेत. थोड्या पाण्यात एक शिटी येईपर्यंत मध्यम आचेवर शिजवावे. शिजलेली रताळी, काबुली चणे, लसूण आणि कांदा एकत्र करून त्यात हळद आणि लाल तिखट घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. ते परत पॅनमध्ये घालून गरजेनुसार त्यात पाणी घालून मध्यम आचेवर ठेवावे. उकळी आल्यावर त्यात मीठ, मिरपूड आणि लिंबाचा रस घालावा. सूप तयार आहे. उकडलेले अख्खे काबुली चणे वर ठेवून सजवावे. हे सहा जणांना पुरेल.

गाझपाचो
सूप गरम असते. पण हे सूप थंडच असते. असे ते एकमेव सूप आहे.
साहित्य : एक मध्यम आकाराची लाल भोपळी मिरची, १ मध्यम आकाराची हिरवी भोपळी मिरची, १ साल काढलेली काकडी, अर्धा किलो टोमॅटो, ३ पावाचे तुकडे, ३ लसणाच्या पाकळ्या, अर्धा कप ऑलिव्ह तेल, अडीच ते ३ कप थंड पाणी, चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
कृती : भोपळी मिरच्यांचा मधला पांढरा भाग काढून टाकून मध्यम आकाराचे तुकडे करावे. काकडीचेही मध्यम आकाराचे तुकडे करावेत. टोमॅटो चिरून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावे. पावाचे स्लाईस पाण्यात भिजवून घट्ट पिळून घ्यावे. हे सर्व साहित्य, पावासहित, थोडे थंड पाणी व ऑलिव्ह तेल घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. ते बाहेर काढून त्यात उरलेले थंड पाणी घालून मिसळून घ्यावे. गरजेनुसार आणखी पाणी घालावयास हरकत नाही. त्यात मीठ आणि मिरपूड घालून व्यवस्थित मिसळावे. रेफ्रिजिरेटमध्ये ठेवून द्यावे. वाढायच्या वेळी बाहेर काढून, व्यवस्थित ढवळून वर भोपळी मिरच्यांचे उभे तुकडे घालून सजवावे. सूप तयार आहे. चार ते सहा व्यक्तींसाठी पुरेल.

गाजर सूप
साहित्य : तीन मध्यम आकाराची गाजरे, १ मध्यम आकाराचा बटाटा, १ कांदा, १ टेबलस्पून लोणी, अर्धा कप दूध, २ व्हेजिटेबल क्यूब, चवीनुसार मीठ आणि मिरपूड, पाणी.
कृती : गाजर आणि बटाटा यांचे तुकडे करून त्यात दीड ते दोन कप पाणी आणि व्हेजिटेबल क्यूब घालून प्रेशर कूकरमध्ये एक शिटी येईपर्यंत शिजवावे. थंड झाल्यावर मिक्सरमधून त्याची पेस्ट करून घ्यावी. कांदा बारीक चिरून घ्यावा. एका पॅनमध्ये लोणी घेऊन ते वितळल्यावर त्यात चिरलेला कांदा घालून तो गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यावा. त्यात गाजराची पेस्ट, दूध घालून मिसळावे. गरजेनुसार त्यात परत पाणी आणि व्हेजिटेबल क्यूब घालावेत. मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे. त्यात मीठ आणि मिरपूड घालावी. सूप तयार आहे. किसलेले गाजर घालून सजवावे. हे प्रमाण चार व्यक्तींना पुरेल.

पालक सूप
साहित्य : एक जुडी पालक, १ टेबलस्पून लोणी, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर किंवा मैदा, १ कप दूध, २ पाकळ्या लसूण, १ बारीक चिरलेला कांदा, चवीनुसार मीठ आणि मिरपूड, अर्धा ते पाऊण कप पाणी.
कृती : पालकाचे जून देठ काढून टाकावे. पालकाची पाने स्वच्छ धुऊन जाडसर चिरून घ्यावी. त्यात कांदा आणि लसूण घालून पाऊण कप पाण्यात शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटावे. तयार झालेली पालक प्युरी बाजूला ठेवावी. दुसरे पॅन मध्यम आचेवर ठेवावे. गरम झाल्यावर त्यात लोणी घालावे. ते विरघळल्यावर त्यात कॉर्नफ्लोअर घालून परतावे. त्यात थोडे थोडे दूध घालावे. कॉर्नफ्लोअरचे गोळे होणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. मिश्रण दाटसर होऊ द्यावे. हा व्हाईट सॉस तयार झाला. त्यात पालक प्युरी घालून उकळू द्यावे. पाणी घालून आवडीनुसार दाट किंवा पातळ करावे. मीठ आणि मिरपूड घालावी. सूप तयार आहे. त्यावर चमच्याने क्रीम घालून सजवावे. चार व्यक्तींना पुरेल.

ब्रोकोलीचे सूप 
साहित्य : दोनशे ग्रॅम ताजी ब्रोकोली, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम आकाराचा बटाटा, ३ लसणाच्या पाकळ्या, १ टेबलस्पून तेल, २ ब्रेड स्टीक, अडीच कप पाणी, मॅगीचे व्हेजिटेबल क्यूब, चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
कृती : कोवळ्या देठांसहित ब्रोकोलीचे तुरे कापून घ्यावे. ते पाण्यातून उकडून घ्यावे. बटाटा उकडून घ्यावा. पॅनमध्ये तेल गरम करून घ्यावे. त्यात लसूण परतावा. त्यानंतर त्यात कांदा घालून तो नरम होईपर्यंत परतावा. त्यात उकडलेला बटाटा आणि ब्रॉकोली घालून एक कप पाण्याबरोबर साधारण पाच ते सात मिनिटे शिजवावे. हे सर्व मिश्रण मिक्सरमधून वाटून घ्यावे. उरलेल्या पाण्यात क्यूब घालून त्यात वाटण मिसळून घ्यावे. गरजेनुसार अधिक पाणी घालावयास हरकत नाही. हे सर्व परत मध्यम आचेवर ठेवून एक उकळी आणावी. त्यात मीठ व मिरपूड घालावी. ब्रेड स्टीक ठेवून सजवावे. सूप तयार आहे. तीन ते चार व्यक्तींना पुरेल.

रोस्टेड रेड कॅप्सिकम सूप
साहित्य : दोन मध्यम आकाराच्या लाल भोपळी मिरच्या, २-३ लाल रसरशीत मध्यम आकाराचे टोमॅटो, १ मध्यम आकाराचा कांदा, २-३ लसणाच्या पाकळ्या, १ टेबलस्पून बटर, चवीनुसार मीठ आणि मिरपूड, २ कप पाणी, व्हेजिटेबल किंवा चिकन क्यूब, अर्धा कप क्रीम.
कृती : भरतासाठी वांगे ज्याप्रमाणे भाजतो त्याप्रमाणे लाल भोपळी मिरच्या गॅसवर काळपट होईपर्यंत भाजून घ्याव्यात. प्लॅस्टिक पिशवीत मिरच्या घालून पिशवी बंद करावी. थंड झाल्यानंतर मिरच्यांची साले काढून टाकावी. कांदा उभा चिरावा. एक पॅन गरम करून त्यात बटर घालावे. ते वितळल्यावर त्यात लसूण आणि चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. त्यात भोपळी मिरच्यांचे तुकडे घालून गॅस विझवावा. मिक्सरमध्ये टोमॅटोचे मोठे तुकडे आणि पॅनमधले भोपळी मिरचीचे मिश्रण घालून थोडे पाणी व व्हेजिटेबल क्यूब घालून वाटून घ्यावे. गरजेनुसार राहिलेले पाणी घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. ते गॅसवर ठेवून उकळावे. त्यात मीठ व मिरपूड घालून एकजीव करून घ्यावे. एक उकळी आल्यावर गॅसवरून उतरावे. वाढताना त्यात क्रीम मिसळावे. क्रीम नसल्यास व्हाईट सॉस घालावा. त्यावर गार्निशिंगसाठी क्रीमचे वर्तुळ काढावे. चार व्यक्तींना हे सूप पुरते.

लेमन कोरिॲन्डर सूप
साहित्य : दोन टेबलस्पून किसलेले गाजर, २ टेबलस्पून किसलेला फ्लॉवर, २ टेबलस्पून किसलेला कोबी (आपल्या आवडीच्या कोणत्याही भाज्या घालता येतील.), १ टेबलस्पून तेल, १ टेबलस्पून बारीक चिरलेला लसूण, १ ते दीड टेबलस्पून लिंबाचा रस, १ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, १-२ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, २-३ कप पाणी.
कृती : तेलात लसूण घालून परतून घ्यावा. त्यात गाजर, कोबी आणि फ्लॉवर घालून परतावे. या मिश्रणात एक कप पाणी घालून शिजवावे. कॉर्नफ्लोअर पाण्यात घालून त्याची पेस्ट तयार करावी. ती मिश्रणात मिसळावी. मीठ आणि मिरपूड घालून मध्यम आचेवर उकळावे. उतरताना लिंबाचा रस आणि कोथिंबीर घालावी. सूप पिण्यासाठी तयार आहे. साधारण तीन ते चार व्यक्तींना पुरेल.

शेवग्याच्या शेंगांचे सूप
साहित्य : दोन मध्यम आकाराच्या शेवग्याच्या शेंगा, १ हिरवी मिरची, २ लसूण पाकळ्या, अर्ध्या लिंबाचा रस, चवीनुसार मीठ, चवीनुसार मिरपूड, अंदाजे ५०० मिली (दोन ग्लास) पाणी.
कृती : शेवग्याच्या शेंगांची जून साले काढून टाकावी. त्यांचे साधारण दोन इंच लांबीचे तुकडे करावे. हे तुकडे मध्यम आचेवर ५०० मिली पाण्यामध्ये उकडावे. पाण्याला उकळी येऊन शेंगा नरम होईपर्यंत उकडावे, साधारण १० ते १२ मिनिटे. पाण्यातून शेंगा काढून घ्याव्या. त्यातल्याच थोड्याशा पाण्याबरोबर मिरची आणि लसूण घालून मिक्सरमधून वाटून घ्यावे. वाटण साधारण लापशीसारखे व्हायला हवे. उकडण्यासाठी वापरलेल्या उरलेल्या पाण्यात वाटण मिसळून गाळणीतून गाळावे. शेंगांचा गर गाळला जाऊन चोथा वर राहील. तो घट्ट पिळून चोथा टाकून द्यावा. गरज वाटल्यास गाळलेल्या रसात पाणी, मीठ आणि मिरपूड घालून उकळावे. त्यात लिंबाचा रस घालावा. गरमागरम सूप वाढण्यासाठी तयार होईल. तीन ते चार व्यक्तींसाठी हे पुरेसे आहे.

वांग्याचे सूप
साहित्य : दोन मध्यम आकाराची भरताची वांगी (साधारण अर्धा किलो), १ कांदा, २ लसणाच्या पाकळ्या, अर्धा टेबलस्पून चिरलेला पुदिना, १ कप अमूल क्रीम, ३ चिकन क्यूब, १ टेबलस्पून लोणी, अडीच कप पाणी, चवीनुसार मीठ आणि मिरपूड.
कृती : वांगी भरतासाठी भाजतात तशी गॅसवर खरपूस भाजून घ्यावी. थंड झाल्यावर वरची साल सोलून काढून टाकावी. हाताने वांग्याचा गर कुस्करून ठेवावा. मध्यम आचेवर पॅन ठेवून ते गरम झाल्यावर त्यात लोणी घालावे. ते वितळल्यावर त्यात बारीक चिरलेला कांदा व लसणाच्या पाकळ्या घालाव्या. त्यातच चिरलेला पुदिनाही घालावा. कांदा नरम झाल्यावर त्यात वांग्याचा कुस्करलेला गर घालावा. अडीच कप पाण्यात चिकन क्यूब घालून ते व्यवस्थित मिसळल्यावर ते पाणी त्यात घालावे. पॅनवर सैलसे झाकण ठेवून मंद आचेवर साधारण दहा ते पंधरा मिनिटे शिजवून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्सरमधून वाटून घ्यावे. ते परत गॅसवर ठेवून त्यात मीठ आणि मिरपूड घालावी. अर्धवट शिजल्यावर त्यात क्रीम घालावे. आपल्या आवडीनुसार ते दाट किंवा पातळ करावे. पुदिन्याच्या पानांनी सजवावे. सूप वाढायला तयार आहे. पाच ते सहा व्यक्तींना पुरेल.

संबंधित बातम्या