रुचकर दुधी

अनघा देसाई
सोमवार, 24 मे 2021

फूड पॉइंट

दुधी भोपळा आरोग्यासाठी अतिशय लाभदायक! पण त्याची भाजी फारशी कोणाला आवडत नाही. मग अशावेळी त्याची भाजी न करता इतर रुचकर पदार्थ केले तर...?

धोंडस
साहित्य : दोन मोठे चमचे तूप, १ कप बारीक लापशी रवा, १ कप साल काढून किसलेला दुधी भोपळा, अडीच कप गरम पाणी, पाव चमचा मीठ, १ कप किसलेला गूळ, पाव कप काजू, अर्धा चमचा जायफळ पूड, ६ हळदीची पाने (ऐच्छिक).
कृती : कढईमध्ये १ मोठा चमचा तूप साधारण गरम करून त्यात लापशी रवा भाजावा. दुसऱ्या भांड्यात १ मोठा चमचा तूप गरम करून त्यात किसलेला दुधी मध्यम आचेवर शिजवावा. दुधीचा कीस शिजल्यावर त्यात अडीच कप गरम पाणी घालून उकळावे. या उकळत्या मिश्रणात भाजलेला रवा घालून थोडा घट्ट होईपर्यंत ढवळत राहावे. नंतर झाकण ठेवून ५ मिनिटे शिजवावे. त्यानंतर त्यात मीठ आणि गूळ घालून ढवळून सारखे करावे. गूळ विरघळल्यावर मिश्रण पातळ होईल. त्यात खोबरे, काजू, वेलची पूड, जायफळ पूड घालून ढवळावे. एका ८ इंची केकच्या भांड्यात तूप लावून हळदीची पाने पसरावीत. त्यावर हे तयार मिश्रण ओतून उरलेली हळदीची पाने वर लावावीत. ओव्हनमध्ये १८० से.ला २० मिनिटे भाजावे. (हळदीच्या पानांचा सुगंध या पदार्थाची चव अधिक खुलवतो. हळदीची पाने जरूर वापरावीत. ही पाने फ्रीजमध्ये सुकवून टिकवता येतात.)

सार/सूप
साहित्य : एक चमचा तेल, पाव कप बारीक चिरलेला कांदा, १ कप दुधीचे तुकडे, पाव कप कैरीचे तुकडे (कैरीच्या आंबटपणाप्रमाणे कमी जास्त), १ हिरवी मिरची, पाव कप कोथिंबीर, १ कप पाणी, १ मोठा चमचा भाजलेले बेसन, अर्धा कप नारळाचे दूध, मीठ, काळे मिरे पूड चवीप्रमाणे, सजावटीसाठी चिरलेली कोथिंबीर.
कृती : लहान प्रेशर कुकरमध्ये १ चमचा तेलात बारीक चिरलेला कांदा मऊ होईपर्यंत परतावा. त्यात दुधी आणि कैरीचे तुकडे घालून २ मिनिटे परतावे. मग १ कप पाणी घालून २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे. कुकर थंड करून उघडावा. आतील मिश्रणात भाजलेले बेसन, कोथिंबीर आणि हिरवी मिरची घालून मिक्सरमध्ये बारीक करावे. हे मिश्रण मध्यम आचेवर उकळावे. उकळताना त्यात काळे मिरे पूड, मीठ आणि आवडीप्रमाणे साखर घालावी. नारळाचे दूध घालून सारखे करावे (नारळाचे दूध घातल्यावर उकळू नये. हलकेच गरम करावे). वाढताना वरून कोथिंबीर भुरभुरून वाढावे. 

मुटके
साहित्य : एक कप किसलेला दुधी, पाव कप गव्हाचे पीठ, अर्धा कप रवा, पाव कप बेसन, १ चमचा (किंवा चवीप्रमाणे) वाटलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा वाटलेले आले, पाव चमचा हळद पूड, अर्धा चमचा भरडलेले जिरे, अर्धा चमचा भरडलेली बडीशेप, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा किंवा चवीप्रमाणे साखर, २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, पाव चमचा खाण्याचा सोडा, पाव चमचा हिंग, मीठ चवीप्रमाणे, फोडणीसाठी २ मोठे चमचे तेल, अर्धा चमचा राई, १ चमचा तीळ, पाव चमचा हिंग.
कृती : दुधीचा कीस पिळून पाणी काढावे. फोडणीच्या साहित्याशिवाय बाकी सर्व साहित्य हलक्या हाताने एकत्र करून गोळा तयार करावा. पाणी कमी पडल्यास दुधीचे पाणी वापरावे. तयार पिठाचे लहान लिंबाएवढे गोळे करावेत. तळहाताला थोडेसे तेल लावून एकेक गोळा मुठीत घेऊन दाबावा. लांबट, बोटांचा ठसा असलेला लंबगोल तयार होईल. असे सर्व गोळे तयार झाल्यावर, वाफवून घ्यावेत. थंड करून अर्ध्या इंच जाडीच्या चकत्या कापाव्यात. तेल तापवून त्यात क्रमाने राई, तीळ, हिंग घालून या तयार चकत्यांवर फोडणी ओतावी.

भरलेला दुधी
साहित्य : पाचशे ग्रॅम लांबट दुधी, अर्धा कप चणा डाळ, १ चमचा जिरे, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, ३-४ हिरव्या मिरच्या (चवीप्रमाणे कमी जास्त), दीड इंच आले (बारीक चिरलेले), १० लसूण पाकळ्या (बारीक चिरलेल्या), अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, २ चमचे धणे पूड, अर्धा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, अर्धा चमचा साखर, २ मोठे चमचे तेल + आवश्यकतेप्रमाणे.
कृती : दुधी सोलून १ इंच जाडीच्या चकत्या कापाव्यात. प्रत्येक चकतीचा मऊ मध्य भाग पोखरून चकतीची ‘रिंग’ करावी. अशा तयार केलेल्या सर्व चकत्या मीठ घातलेल्या पाण्यात अर्धवट उकडून, निथळून थंड कराव्यात. बारीक चिरलेला कांदा चुरून घ्यावा आणि त्यात आले, लसूण, चिरलेल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, साखर आणि २ मोठे चमचे तेल एकत्र करावे. चणा डाळ आणि जिरे जाडेभरडे वाटून कांद्याच्या मिश्रणात मिसळावे. हे तयार पुरण उकडून थंड केलेल्या चकत्यांमध्ये भरावे. तांदळाच्या पिठात घोळवून नॉनस्टिक पॅनमध्ये मध्यम आचेवर तेलात तळाव्यात. स्टार्टर म्हणून चटणी बरोबर खायला द्याव्यात.

ठेपले
साहित्य : एक कप किसलेला दुधी, १ कप अधिक लागेल तसे गव्हाचे पीठ, १ (किंवा चवीप्रमाणे अधिक) बारीक चिरलेली हिरवी मिरची, अर्धा चमचा वाटलेले आले, २ मोठे चमचे चिरलेली कोथिंबीर, १ मोठा चमचा कसुरी मेथी, पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल मिरची पूड, अर्धा चमचा धणे पूड, मीठ चवीप्रमाणे, अर्धा चमचा साखर, १ मोठा चमचा + आवश्यकतेप्रमाणे तेल, १ मोठा चमचा दही.
कृती : दुधीचा कीस पिळून पाणी बाजूला ठेवावे. सर्व साहित्य एकत्र करून गोळा तयार करावा. लगेचच त्याचे लहान लिंबाएवढे गोळे करून हलक्या हाताने पोळ्या लाटाव्यात. तव्यावर तेल सोडून मध्यम आचेवर भाजून घ्यावे. ठेपले लोणचे किंवा दह्याबरोबर खाण्यास द्यावेत. 

ताकातला दुधी 
साहित्य : अडीचशे ग्रॅम दुधी, पाव चमचा हळद, २ मोठे चमचे चणा डाळ, अर्धा कप दही + अर्धा कप पाणी (एकत्र घुसळून), अर्धा चमचा किंवा चवीप्रमाणे साखर, 
वाटणासाठी : पाव कप ओले खोबरे, १ इंच आले, २ (किंवा चवीप्रमाणे कमी जास्त) हिरव्या मिरच्या, पाव चमचा राई, २ चमचे धणे जिरे पूड, २ चमचे बेसन, फोडणीचे साहित्य, २ मोठे चमचे तूप किंवा तेल, १ चमचा जिरे, पाव चमचा हिंग पूड, १०-१२ कढीलिंबाची पाने.
कृती : चणा डाळ २ तास पाण्यात भिजवावी. दुधी सोलून अर्ध्या इंचाचे तुकडे करावेत. दुधीचे तुकडे, भिजवलेली चणा डाळ कमीत कमी पाण्यात चवीपुरते मीठ आणि हळद घालून वाफवावी. डाळ बोटचेपी झाली पाहिजे. वाटण्याचे सर्व साहित्य एकत्र करून बारीक वाटावे. वाफवलेला दुधी, चणा डाळ त्यातील पाण्यासकट मध्यम आचेवर ठेवून त्यात वाटलेले मिश्रण मिसळावे. चांगली उकळी आल्यावर आच कमी करून हलक्या हाताने सतत ढवळत दही आणि पाण्याचे मिश्रण मिसळावे. आवडत असल्यास साखर घालावी. हलकी उकळी आल्यावर उतरवून ठेवावे. तूप/तेल गरम करून जिरे तडतडल्यावर हिंग आणि कढीलिंब घालून केलेली फोडणी मिश्रणावर ओतावी.

दुधी मटण कोरमा
साहित्य : अडीचशे ग्रॅम दुधी, २५० ग्रॅम मटण, २ हिरव्या मिरच्या, १ इंच आले, १० लसूण पाकळ्या, अर्धा कप चिरलेली कोथिंबीर, २ मोठे चमचे तेल, १०-१२ काळे मिरे, ५ लवंगा, १ चक्री फूल, २ इंच दालचिनी, १ मसाला वेलची, २ हिरव्या वेलच्या, २ तमालपत्र, २ मध्यम कांदे, २ चमचे मिरची पूड, १ मोठा चमचा धणे पूड, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद, मीठ चवीप्रमाणे, पाणी आवश्यकतेप्रमाणे.
कृती : मटण मध्यम आकाराचे तुकडे करून, धुऊन पूर्णपणे निथळून घ्यावे. आले, लसूण, हिरवी मिरची आणि कोथिंबीर एकत्र बारीक वाटावी. प्रेशर कुकरमध्ये तेल गरम करून त्यात काळे मिरे, लवंग, चक्री फूल, दालचिनी, दोन्ही वेलची आणि तमालपत्र घालून अर्धा मिनिट परतावे. त्यातच कांदा मऊ होईपर्यंत परतून मटण परतावे. मटण ४-५ मिनिटे परतल्यानंतर सर्व पावडर मसाले घालून एक मिनिट परतावे. अर्धा कप पाणी घालून प्रेशर कुकरमध्ये शिजवावे. कुकर थंड करून उघडल्यावर त्यात सोललेल्या दुधीचे मोठे तुकडे मिसळून कुकरमध्ये २ शिट्ट्या होईपर्यंत शिजवावे. चपाती, ब्रेड, भाकरी इत्यादींबरोबर आस्वाद घ्यावा.

दुधी करंदी रस्सा
साहित्य : अर्धा कप सुकी करंदी (साफ केलेली), २ कप दुधी सोलून लहान तुकडे केलेला, चवीप्रमाणे मीठ, अर्धा कप ओले खोबरे, ४-६ लाल सुक्या मिरच्या, ७-८ काळी मिरी दाणे, १ मोठा चमचा धणे, पाव कप चिरलेला कांदा, चिंच चवीप्रमाणे, पाव चमचा हळद पूड, १ मोठा चमचा तेल, पाव कप बारीक चिरलेला कांदा.
कृती : करंदी मध्यम आचेवर खमंग वास येईपर्यंत सुकी भाजून घ्यावी. दुधीचे तुकडे आणि करंदी, चवीपुरते मीठ घालून १ कप पाण्यात शिजवावे. १ चमचा तेलात लाल सुक्या मिरच्या, धणे आणि काळे मिरे भाजून घ्यावे. त्यात हळद, खोबरे, पाव कप कांदा आणि चिंच घालून बारीक वाटावे. दुधी शिजल्यावर त्यात वरील वाटप मिसळावे आणि एक उकळी आल्यावर तेलात उरलेला कांदा परतून त्याची फोडणी द्यावी. दुधी करंदी रश्‍शाचा गरम भाताबरोबर स्वाद घ्यावा.

 

संबंधित बातम्या