कोकणी भाज्यांचा मेनू

अंजली नेने, बार्शी
बुधवार, 21 मार्च 2018

फूड पॉइंट    
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

भाजीच्या फणसाची भाजी
साहित्य  : एक भाजीचा फणस, काळा मसाला, ओले खोबरे, चिंच, गूळ, आले, लसूण पेस्ट, मीठ व सोललेले वाल.
कृती : फणसाची काटेरी साले काढावी. काढताना फणसाचे चार तुकडे करावे. म्हणजे साल काढण्यास सोपे जाते. नंतर आतल्या गाभ्याचे तुकडे करावे. (बियांसकट) वाल व फोडी वाफळून घ्यावीत. पॅनमध्ये तेल टाकून फोडणी करावी. त्यांत बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. वाफवलेली भाजी व वाल तिखट, मीठ, चिंच, गूळ, मीठ टाकून चांगली परतावे. ही भाजी फारच चविष्ट लागते. तसेच ती पौष्टिकही आहे. ही भाजी पोळी-भाकरी बरोबर गरम गरम खावी.

कच्च्या केळ्यांची भाजी
साहित्य  : चार-पाच कच्ची केळी, आमसूल किंवा चिंच, गूळ, एक कांदा, ओले खोबरे, १ चमचा तिखट, मीठ, तेल.
कृती : केळी सालासकट स्वच्छ धुवावी. बटाट्याच्या फोडी करतो तशा किंवा गोल गोल चकत्या कराव्यात. भाजी चिरल्यावर वाफवून घ्यावी. पॅनमध्ये तेल टाकून फोडणी करावी. कांदा छान गुलाबी परतावा. त्यात वाफवलेली केळीच्या चकत्या टाकाव्या. त्यात तिखट, मीठ टाकून चांगली परतावे. झाकण ठेवावे. १० मिनिटाने पाण्याचा हबका मारून पुन्हा झाकण ठेवावे. आमसूल, गूळ घालावा. भाजी सर्व्ह करताना त्यावर खोबरे, कोथिंबीर घालावे. ही भाजी फारच रुचकर लागते.

उडदाचे पौष्टिक लाडू
साहित्य  : अर्धा किलो उडदाचे पीठ, अर्धा किलोपेक्षा कमी पिठीसाखर, दोन वाट्या चांगले तूप, विलायची पूड, किसमीस.
कृती : प्रथम अर्धी वाटी पीठ हलक्‍या हाताने मंद गॅसवर भाजावे. नंतर त्यात १ वाटी तूप टाकावे. चांगले खमंग भाजावे. गुलाबीसर भाजले पाहिजे. नंतर उरलेले पीठ सुद्धा तसेच भाजावे. एकत्र गार होऊ द्यावे. त्यात पिठी साखर चाळून घालावी. तसेच खिसमिस, विलायची घालून सर्व एकत्र छान चुरावे. थोडे हाताला तूप लावून लाडू वळावे. थंडीच्या दिवसात वृद्धांना व मुलांना खूप पौष्टिक असतात.

पिकल्या केळीचा हलवा
साहित्य  : पाच पिवळ्या सालीची केळी (सालीला शक्‍यतो डाग नको) अर्धी वाटी साजूक तूप, अर्धी वाटी साखर, १ वाटी खोवलेले ओले खोबरे, ड्रायफ्रुटचे बारीक तुकडे, विलायची पावडर.
कृती : प्रथम केळ्यांची साले काढावी. केळ्याच्या गोल गोल चकत्या (पातळ) कराव्या. निर्लेप पॅनमध्ये तूप टाकावे. तूप वितळल्यावर केळीचे काप टाकावेत. ते तुपात चांगले घोळवावेत. (अगदी हलक्‍या हाताने) नंतर त्यात साखर, ओले खोबरे व ड्रायफ्रुटस्‌ टाकावे. सर्व छान हलक्‍या हाताने वर खाली करावे. (गॅस मंद ठेवावा) झाकण ठेवावे. ५ मिनिटाने गॅस बंद करावा. गार झाल्यावर विलायची पूड भुरभुरावी. व सर्व्ह करावा. हा हलवा फरच पौष्टिक व रुचकर लागतो.

केळफुलाची भाजी
केळ फूल ः केळी झाडाला आल्यावर शेवटी केळफुल राहाते. पूर्ण केळीचा फणा तयार झाला की, पुढचे राहिलेले केळफूल काढावे. 
केळफुलाची भाजी ः त्याची पाने काढल्यावर आत तुरे असतात ते सर्व काढून घ्यावे. तुऱ्यात पिवळ्या रंगाचा धागा असतो. तो काढून टाकावा. सर्व तयार झाल्यावर ते तुरे बारीक चिरावेत. चिरल्यावर काळे पडतात. म्हणून आंबट ताकात घालावे. म्हणजे काळे पडत नाही. काळे वाटाणे आदल्या दिवशी भिजत घालावे. सकाळी स्वच्छ धुवून थोडा सोडा टाकून कुकरमध्ये शिजवून घ्यावे.
साहित्य  : केळफूल, १ वाटी काळे वाटाणे शिजवलेले, १ कांदा बारीक चिरलेला, चिंचेचा कोळ व थोडा गूळ, मीठ, काळा मसाला १ चमचा, १ चमचा तिखट, १ वाटी खोवलेला नारळ, कोथिंबीर, फोडणीचे साहित्य.
कृती : चिरलेले केळफूल ताकातून काढावे. वाफवून घ्यावे. निर्लेप पॅनमध्ये २ टेबल स्पून तेल टाकावे. व फोडणी करावी. कांदा परतून घ्यावा. त्यात वाफवलेले केळफूल व शिजलेला वाटाणा टाकावा. थोडे परतून घ्यावे. त्यात तिखट, मीठ, काळा मसाला टाकून झाकण ठेवावे. १० मिनिटाने त्यात चिंच, गूळ घालून वाफ आणावी. नंतर बाऊलमध्ये भाजी काढून त्यावर खोबरे व कोथिंबीर भुरभुरावी. ही भाजी भाकरी, पोळी बरोबर छान लागते. हा कोकणातील खास पदार्थ आहे.

मिक्‍स व्हेजिटेबल पुलाव
साहित्य  : बासमती राइस ३ कप पाण्यात ठेवावा. १ वाटी बटाटा, वाटाणे फ्रेंच बीन्स, गाजर, लांब चिरलेला कांदा, मीठ, गरम मसाला पूड, दालचिनी, तमालपत्र, मिरे, लवंगा, मोठी वेलची, ३-४ सुक्‍या लाल मिरच्या, १ वाटी तेल.
कृती : सर्व भाज्यांच्या फोडी वाफवून घ्याव्यात. चिरलेला कांदा तळून तांबूस रंगावर तळून घ्यावा. कुकरमध्ये तेल घालावे. गरम मसाल्याची फोडणी करावी. नंतर त्यांत सर्व वाफवलेल्या भाज्या हलकेच परताव्यात. नंतर बासमती तांदूळ निथळून भाज्यात टाकून तोही परतावा. चांगला परतून घेऊन त्यात लाल मिरच्या कुस्करून टाकाव्या. गरम मसाला पूड व मीठ टाकावे. सर्व एकजीव करावे. नंतर उकळलेले पाणी ३ कप घालावे. कुकरच्या कमी हीटवर तीन शिट्या कराव्या. खाली उतरून कांदा पसरावा. हवे तर ओला नारळाचा चव व कोथिंबीर सर्व्ह करताना भुरभुरावी. सर्व भाज्या असल्याने हा पुलाव खूपच पौष्टिक व लज्जतदार लागतो.

मसालेदार पोटॅटोज
साहित्य  : अर्धा किलो छोटे बटाटे उकडून साल काढलेले. एक मोठा कांदा बारीक चिरलेला, एक चमचा लसूण आले पेस्ट, एक वाटी टोमॅटो पुरी १ वाटी, ओला नारळाचा चव, ३ चमचे तिखट, गरम मसाला, जिरे, मीठ, गूळ, अर्धी वाटी तेल.
कृती : बटाटे सोलून तळून घ्यावेत. सर्व मसाला मिक्‍सरमध्ये घालून बारीक वाटावा. त्यात कांदा, गूळ, गरम मसाला, तिखट सर्व आले पाहिजे. नंतर बटाटे तळल्यावर बाजूला ठेवावेत. त्याच तेलात सर्व वाटलेला मसाला घालावा. चांगला परतून वरती तेल सुटले पाहिजे. पाहिजे तर १ चमचा तेल जादा घालावे. मसाला एकजीव झाल्यावर त्यांत अर्धा कप पाणी घालावे. नंतर सर्व बटाट्यांना टूथ पीकने टोचून त्यात घालावेत. चांगले रटरट झाले की झाकण ठेवावे. पाच मिनिटांनी तुमची मसालेदार चटकदार बटाटे झाले. भाकरी बरोबर, भाताबरोबर, पोळी बरोबर फारच टेस्टी लागतात. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या