न्याहारीचे पदार्थ

अरुंधती देसाई, गारगोटी, जि. कोल्हापूर
रविवार, 31 जानेवारी 2021

सकाळची न्याहारी सर्वांच्या आवडीची असेल, तर दिवस मजेत जातो. म्हणूनच जिभेचे चोचले पुरविणाऱ्या न्याहारीच्या पदार्थांच्या या काही रेसिपीज... 

कलमी वडे/हरभरा डाळीचे वडे
साहित्य : एक कप हरभरा डाळ, ४ हिरव्या मिरच्या, २-३ लसूण पाकळ्या, १ इंच आले, १ टीस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १ टीस्पून धने पूड, अर्धा टीस्पून हळद, अर्धा टीस्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून गरम मसाला, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, सजावटीसाठी कांदा व टोमॅटो (बारीक चिरून), शेव, टोमॅटो सॉस.
कृती : हरभरा डाळ पाण्यात रात्रभर भिजत ठेवावी. सकाळी डाळीतील पाणी काढून मिक्सरच्या भांड्यात डाळ उपसून घ्यावी. त्यात हिरव्या मिरच्यांचे तुकडे, आले, लसूण घालावे व पाणी न घालता जाडसर वाटून घ्यावे. वाटलेली डाळ एका बाऊलमध्ये काढावी. त्यामध्ये जिरे, हिंग, धने पूड, हळद, काश्मिरी लाल तिखट, गरम मसाला, मीठ, कोथिंबीर घालून सर्व एकत्र मिक्स करावे. कढईत तेल गरम करत ठेवावे. दोन्ही तळहातांना थोडे तेल लावून वरील मिश्रणाचे गोळे करून चपटे-चपटे वडे तयार करावेत. वडे एकेक करत गरम तेलात सोडावेत. वडे दोन्ही बाजूंनी हलका सोनेरी रंग येईपर्यंत तळून प्लेटमध्ये काढावेत. सुरीच्या साहाय्याने प्रत्येक वड्याचे चार-चार भाग करावेत व ते परत त्याच तेलात सोनेरी रंग येईपर्यंत खमंग तळून घ्यावेत. सर्व्हिंग प्लेटमध्ये वडे काढून त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक शेव, टोमॅटो सॉस घालून गरमागरम वडे सर्व्ह करावेत.
(टीप : वडे दोनदा तळावे लागतात. त्यामुळे पहिल्यांदा दोन्ही बाजूंनी हलक्या रंग येईपर्यंत तळावेत, नंतर सोनेरी रंग येईपर्यंत खमंग तळावेत.)

मसाला पाव
साहित्य : दोन कांदे, ३ टोमॅटो, २ सिमला मिरची, २ टेबलस्पून पावभाजी मसाला, २ टीस्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, १ टीस्पून आले-लसूण पेस्ट, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, अर्धा टीस्पून लिंबाचा रस, आवश्यकतेनुसार बटर. 
कृती : कांदे, टोमॅटो, सिमला मिरची बारीक चिरावे. एका पॅनमध्ये दोन टेबलस्पून बटर घालून त्यावर आले-लसूण पेस्ट कच्चेपणा जाईपर्यंत परतावी. त्यावर कांदा घालावा व तो गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. नंतर त्यात सिमला मिरची घालावी. तीही मऊ होईपर्यंत परतत राहावी. टोमॅटो घालून तो शिजू द्यावा. मग त्यामध्ये पावभाजी मसाला, काश्मिरी लाल तिखट, लिंबाचा रस, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, थोडे पाणी घालून मिक्स करावे. स्मॅशरच्या साहाय्याने मसाला स्मॅश करून एकजीव करावा. तयार मसाला त्याच पॅनच्या एका बाजूला घ्यावा. पॅनच्या दुसऱ्‍या बाजूला थोडे बटर घालावे. पाव मध्यभागी अर्धवट कापून बटरवर दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावेत. पावाच्या मध्यभागी तयार केलेला मसाला स्टफ करावा. वरूनही थोडा मसाला लावावा. सर्व्ह करताना एका प्लेटमध्ये मसाला पाव काढून त्यावर बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर घालावी.

भरलेली मटार पुरी 
साहित्य : पुऱ्‍यांसाठी : दोन कप गव्हाचे पीठ, पाव कप रवा, २ टेबलस्पून तेलाचे मोहन, चवीनुसार मीठ. हे सर्व एकत्र करून पाणी घालून पीठ मळून घ्यावे व थोडा वेळ पीठ भिजू द्यावे. 

सारणासाठी : एक कप मटार, अर्धा इंच आले, ४-५ लसूण पाकळ्या, २-३ हिरव्या मिरच्या. हे सर्व एकत्र करून पाणी न घालता मिक्सरमधून वाटून घ्यावे. 
     कोरड्या सारणासाठी : पाव कप किसलेले सुके खोबरे, १ टेबलस्पून तीळ, १ टीस्पून खसखस, अर्धा टीस्पून जिरे, १ टेबलस्पून धने, १ टीस्पून बडीशेप. हे सर्व कोरडेच खमंग भाजून पाणी न घालता वाटून घ्यावे. 
     इतर साहित्य : एक टीस्पून काश्मिरी लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, चिमूटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. 
कृती :  एका पॅनमध्ये तेल गरम करावे. त्यामध्ये मटारचे वाटण कोरडे होईपर्यंत सतत परतत राहावे. नंतर त्यात तयार केलेला वरील कोरडा मसाला घालावा व सर्व एकत्र करावे. त्यामध्ये काश्मिरी लाल तिखट, हळद, चिमूटभर साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करावे व गार करत ठेवावे. पुरीच्या पिठाचे छोटे-छोटे गोळे तयार करावेत. मोदकासाठी पारी करतो तशी खोलगट पारी करून तयार सारण त्यामध्ये भरावे. पुऱ्‍या लाटताना थोड्या तेलावर हलक्या हाताने लाटाव्यात. गरम तेलात सोनरी रंग येईपर्यंत तळाव्यात. सर्व्ह करताना पुऱ्‍या एका प्लेटमध्ये काढून मध्यभागी फोडाव्यात. त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालावी. टोमॅटो सॉस किंवा लाल चटणीबरोबर सर्व्ह करावी.

मिक्स कडधान्यांची पावभाजी 
साहित्य : दोन कप मिक्स मोड आलेली कडधान्ये, ३ बटाटे, ३ बारीक चिरलेले कांदे, ३ बारीक चिरलेले टोमॅटो, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ टेबलस्पून पावभाजी मसाला, २ टेबलस्पून काश्मिरी लाल तिखट, १ टीस्पून तेल, १०० ग्रॅम बटर, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, लिंबू, लादी पाव आवश्यकतेनुसार.
कृती : सर्व कडधान्ये दिवसभर पाण्यात भिजवून ठेवावीत. संध्याकाळी उपसून कापडात घालून झाकून ठेवावीत. दुसऱ्‍या दिवशी त्यांना छान मोड येतात. मोड आलेली कडधान्ये व बटाटे वेगवेगळे कुकरमध्ये तीन-चार शिट्या देऊन शिजवून घ्यावे. शिजवलेली कडधान्ये व उकडलेल्या बटाट्याची साले काढून घ्यावीत. स्मॅशरच्या साहाय्याने स्मॅश करावे. एका पसरट कढईत/पॅनमध्ये तेल, थोडसे बटर घालून त्यात आले-लसूण पेस्ट घालावी व तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतावी. त्यावर कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. टोमॅटो घालून तोही शिजू द्यावा. नंतर त्यामध्ये पावभाजी मसाला, काश्मिरी लाल तिखट, स्मॅश केलेले बटाटे व कडधान्यांचे मिश्रण, चवीनुसार मीठ, थोडे पाणी घालून भाजी एकत्र करून परत स्मॅश करावी व झाकण ठेवून शिजू द्यावी. भाजी शिजली की त्यावर बटर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. एका पॅनमध्ये थोडे बटर घालावे. त्यावर पावभाजी मसाला भुरभुरावा. बारीक चिरलेली कोथिंबीर घालून पाव दोन्ही बाजूंनी छान भाजून घ्यावेत. सर्व्ह करताना गरमागरम पावभाजीवर बटर, बारीक चिरलेला कांदा घालून, वरून लिंबू पिळावे. अप्रतिम चव लागते व मुलांच्या पोटात कडधान्येही जातात.

मिक्स कडधान्यांची भेळ
साहित्य : दोन कप मोड आणलेली कडधान्ये, १ टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, ७-८ पाने कढीपत्ता, २-३ बारीक चिरलेल्या ओल्या मिरच्या, पाव कप भिजवलेले शेंगदाणे, २ बारीक चिरलेले कांदे, २ बारीक चिरलेले टोमॅटो, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ, २ टेबलस्पून तेल, १ लिंबू, बारीक शेव आवडीनुसार. 
कृती : सर्व प्रकारची कडधान्ये एकत्र भिजत घालून त्यांना मोड आणावेत. कढईत तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, हिंग, कढीपत्ता, हळद, घालावी. नंतर बारीक चिरलेल्या मिरच्या, कांदा, टोमॅटो घालून त्यावर मोड आलेली कडधान्ये व शेंगदाणे घालावेत आणि मंद आचेवर भाजून घ्यावेत. मीठ घालून थोडे पाणी शिंपडावे व झाकण ठेवून वाफ येऊ द्यावी. सर्व्हिंग प्लेटमध्ये घेऊन त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, बारीक शेव, कोथिंबीर घालून लिंबू पिळावे.

ब्रेड रोल
साहित्य : आठ ते दहा ब्रेडच्या स्लाइस, ४-५ उकडलेले बटाटे, पाव कप वाफवलेले मटार, १ बारीक चिरलेला कांदा, ३-४ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, २ लसूण पाकळ्या, पाव टीस्पून धने पूड, अर्धा टीस्पून आमचूर पावडर, अर्धा टीस्पून चाट मसाला, अर्धा टीस्पून काश्मिरी लाल तिखट, १ टीस्पून तेल, बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार मीठ. 
कृती : बटाटे व मटार स्मॅश करून घ्यावेत. पॅनमध्ये तेल गरम करून त्यात आले, लसूण, मिरचीची पेस्ट परतवी. त्यावर कांदा घालून तो मऊ होऊ द्यावा व गॅस बंद करावा. त्यामध्ये बटाटा, मटार, धने पूड, आमचूर पावडर, काश्मिरी लाल तिखट, चाट मसाला, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून सर्व एकत्र करावे. तयार मिश्रणाचे लांबट आकाराचे गोळे तयार करावेत. ब्रेडच्या स्लाइसच्या कडा कापाव्यात. एका पसरट भांड्यात थोडे पाणी घ्यावे त्यामध्ये ब्रेडचा स्लाइस बुडवून तळहातावर हलकेसे दाबून त्यातील पाणी काढावे. त्यात तयार मिश्रणाचे गोळे भरून रोल तयार करावेत. गरम तेलात सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत. गरमागरम ब्रेड रोल टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

मेथी बटाटा वडा
साहित्य : एक मेथीची जुडी, ५-६ उकडलेले बटाटे, १ इंच आले, ५-६ लसूण पाकळ्या, ६-७ हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १०-१२ कढीपत्त्याची पाने, पाव टीस्पून हिंग, १ टीस्पून हळद, अर्धा टीस्पून धने पूड, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, १ कप बेसन, १ टेबलस्पून तांदळाचे पीठ, अर्धा टीस्पून ओवा, चिमूटभर खायचा सोडा, १ टीस्पून काश्मिरी लाल तिखट, १ टेबलस्पून तेलाचे मोहन.
कृती : मेथीची पाने स्वच्छ धुऊन, निथळून मोठी-मोठी चिरावीत. आले-लसूण, हिरव्या मिरच्या मिक्सरमधून जाडसर वाटाव्यात. कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करावी. त्यात आले-लसूण मिरचीची पेस्ट घालून तिचा कच्चेपणा जाईपर्यंत परतावी. नंतर त्यामध्ये चिरलेली मेथी, हळद घालावी व भाजी परतावी. स्मॅश केलेले बटाटे, बारीक चिरलेली कोथिंबीर, धने पूड, चवीनुसार मीठ घालून भाजी एकजीव करून गॅस बंद करावा व भाजी थोडी थंड होऊ द्यावी.  एका बाऊलमध्ये बेसन पीठ, तांदळाचे पीठ, ओवा, खायचा सोडा, काश्मिरी लाल तिखट, मीठ, गरम तेलाचे मोहन व थोडे पाणी घालून पीठ चांगले फेटून घ्यावे. तयार भाजीचे वडे करून ते बेसनाच्या पिठात घोळून एक-एक करत तेलात सोडावेत व सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत.

पालक कबाब
साहित्य : एक जुडी पालक, अर्धा कप वाफवलेले मटार, ४ उकडलेले बटाटे, २ टेबलस्पून आले-लसूण, हिरवी मिरची पेस्ट, ४-५ ब्रेड स्लाइस, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धने पूड, अर्धा कप ब्रेड क्रम्‍ब्स, पाव कप पनीर (किसलेले), चवीनुसार मीठ, तळण्याकरिता तेल.
कृती : पालक स्वच्छ धुऊन, बारीक चिरून थोड्या तेलावर परतून घ्यावा. मटार मिक्सरमधून जाडसर वाटून घ्यावेत. एका बाऊलमध्ये उकडलेले बटाटे कुस्करून त्यामध्ये पालक, मटारची पेस्ट, आले-लसूण, मिरचीची पेस्ट, गरम मसाला, धने पूड, पनीर, मीठ घालून एकत्र करावे. ब्रेडच्या स्लाइस थोड्या पाण्यात भिजवून त्यातले पूर्ण पाणी पिळून काढून वरील मिश्रणात घालावे. हे मिश्रण एकजीव करून आपल्याला हव्या त्या आकाराचे कबाब करावेत व ब्रेड क्रम्ब्समध्ये घोळवून तेलामध्ये तळून घ्यावेत. तयार कबाब टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

संबंधित बातम्या