समुद्री मेजवानी

भारती गुरव, नाशिक
गुरुवार, 8 मार्च 2018

फूड पॉइंट

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

शिंपल्यांचे ‘कालवण’
साहित्य ः समुद्री शिंपल्या ५०० ग्रॅम, किसलेले ओले खोबरे १ वाटी, कांदा १ (उभा चिरलेला), तेजपान, काळी मिरी, लवंग, खसखस, धने, दालचिनी, वेलदोडे, लसूण, आले, हळद, आमसूल, लाल सुकी मिरची, तेल, कोथिंबीर, मीठ

कृती ः प्रथम समुद्री शिंपल्या गरम पाण्यात पूर्ण बॉईल करून घ्याव्यात. पूर्ण बॉईल झाल्यानंतर पाण्यामधून शिंपल्या काढून घ्याव्यात.  थंड झाल्यानंतर शिंपल्यांतील आतील माष्टा (मांस) काढून घ्यावे. बॉईल केलेल्या शिंपल्याचे पाणी फेकून न देता गाळून घ्यावे. नंतर किसलेले ओले खोबरे, उभा चिरलेला कांदा, लाल सुक्‍या मिरच्या वरील दिलेला मसाला सर्व भाजून घ्यावा. त्यात लसूण - आले टाकून हे सर्व मिश्रण मिक्‍सरमध्ये बारीक करून घ्यावे. नंतर कढईत तेल टाकून मंद गॅसवर ठेवून त्यात वरील मिश्रण (वाटप) चांगले परतून घ्यावे. त्यात हळद, टोमॅटो टाकून पुन्हा परतून घ्यावे. हे मिश्रण गॅसवर ५ ते ६ मिनिटे ठेवावे. नंतर त्यात गाळून घेतलेले शिंपल्याचे पाणी मिश्रणात टाकावे. एक चांगली उकळ (बॉईल) येऊ द्यावी. या कालवणाला उकळ आल्यानंतर अंदाजानुसार गॅसवर ठेवावे. कालवणाच्या फिनीशिंगसाठी वरून मीठ कोथिंबीर टाकून सर्व्ह करून घ्यावे.

टीप ः ‘‘हे कालवण (सार) भाताबरोबर खाण्यात फारच छान!!’’

ओली काजू करी
साहित्य ः ओले काजू २५० ग्रॅम, एक उभा चिरलेला कांदा, एक वाटी खोबरे, आले-लसूण पेस्ट, कढीपत्ता, तेजपान, हळद, मिरची पावडर दीड चमचा, तेल, मीठ, कोथिंबीर, बटाटा (२) टोमॅटो प्युरी, लिंबू

कृती ः प्रथम ओल्या काजूचे दोन भाग (तुकडे) करून घ्यावेत. दुसरीकडे उभा चिरलेला कांदा, खोबरे बारीक वाटून घ्यावे. बटाट्याच्या बारीक खापा (तुकडे) करून घ्याव्यात. नंतर कढईत तेल टाकून त्यात कढीपत्ता, तेजपान, हळद मिरची पावडर व वरील मिश्रण (वाटप) सर्व परतून घ्यावे. हे मिश्रण मंद गॅसवर १० मिनिटे ठेवावे. नंतर त्यात टोमॅटो प्युरी टाकावी. हे मिश्रण२ मिनिटे ठेवावे. नंतर त्यात दीड ग्लास पाणी घालावे. या पाण्याला उकळ आल्यावर त्यात काजूचे तुकडे टाकावे. आपल्या अंदाजानुसार बॉईल होऊ द्यावे. चवीनुसार मीठ टाकावे. ही काजू भाजी २ मिनिटे मंद गॅसवर ठेवावी. नंतर त्यात लिंबू पिळून भाजी सर्व्ह करावी.

सुकी (व्हेज) फणस भाजी
साहित्य ः भाजीचा कच्चा फणस अर्धा किलो, खुरसणी १०० ग्रॅम, लसूण १०-१५ पाकळ्या, तेजपान १, कढीपत्ता ३ ते ४ पाने, मिरची पावडर २ चमचे, हळद १ ते २ टी स्पून, तेल ३ चमचे, मीठ जरुरीनुसार, कोथिंबीर

कृती ः प्रथम कच्च्या फणसाचा आतील भाग कापून त्याचे बारीक तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून घ्यावे. (३ शिट्ट्यांपर्यंत) शिजलेले काप कुकरमधून काढून घ्यावे. तुकडे स्मॅश करून घ्यावे. नंतर गॅसवर तवा ठेवून त्यावर खुरसणी भाजून घ्यावी. मंद वास आल्यावर काढून घ्यावी. यानंतर लसणाच्या ७ ते ८ पाकळ्या, आले, मिरची पावडर हे सर्व मिश्रण एकत्र मिक्‍सरमधून दळून घ्यावे. आता गॅसवर कढईत तेल टाकावे आणि मसाला, जिरे - मोहरी, हळद, तेजपान, कढीपत्ता, हे सर्व एकत्र परतावे. नंतर त्यात स्मॅश केलेला फणस घालावा व वरून चवीनुसार मीठ टाकावे व ५ ते ७ मिनिटांनी नंतर गॅस बंद करावा. जरा वरून कोथिंबीर टाकावी व सर्व्ह करावी.

टीप ः ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर खावी.

खेकडा करी
साहित्य ः खेकडे ३, कांदा १, आले-लसूण पेस्ट, आमसूल १-२, अख्खा खडा मसाला, ओले खोबरे १ वाटी, हळद, लाल मिरची सुकी ४, कढीपत्ता, तेजपान, तेल, कोथिंबीर

कृती ः प्रथम खेकड्याच्या नांग्या काढून घ्याव्यात. त्या स्वच्छ धुवून घ्याव्यात व पाट्यांवर किंवा मिक्‍सरमध्ये वाटून बारीक करून घ्याव्यात. त्यानंतर उभा चिरलेला कांदा, खडा मसाला, ओले खोबरे, लाल मिरची हे सर्व तव्यावर अर्धा चमचा तेलात भाजून घेणे. मिश्रण मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावे, आता गॅसवर कढईत तेल टाकून त्यात वरील वाटलेला मसाला तेजपान, कढीपत्ता, हळद, आले - लसूण - पेस्ट हे सर्व टाकावे व चांगले १० मिनिटे मंद गॅसवर परतून घेणे.
    आता दळलेल्या बारीक केलेल्या खेकड्याच्या नांग्या तीन वेळा पाणी टाकून गाळून घ्याव्यात. नांग्या काढलेल्या खेकड्याच्या आतील भाग काढून तोही स्वच्छ करावा. नांग्या व स्वच्छ धुवून घेतलेल्या खेकड्याचे पाणी फेकून न देता कढईच्या मिश्रणात टाकावे. गरजेनुसार आणखी एक ग्लास साधे पाणी कढईत  टाकावे. त्यात आमसूल टाकावे. चवीनुसार मीठ टाकावे. हे कालवण १० मिनिटे मंद गॅसवर चांगले शिजवावे व नंतर गॅस बंद करावा. त्यात नंतर कोथिंबीर टाकून सर्व्ह करावे.

टीप ः ही भाजी कोणत्याही भाकरीसोबत खावी. शक्‍यतो हिवाळा किंवा पावसाळा या दोन थंड मोसमात खेकड्याची भाजी खावी.

फणस भाजी व झिंगे
साहित्य ः कच्चा फणस ५०० ग्रॅम, झिंगे सुके एक वाटी, गरम मसाला एक चमचा, काळ्या तिळाचा कूट १ चमचा, मिरची पावडर १ किंवा दीड चमचा, हळद, कांदा - बारीक चिरलेला, टोमॅटो १ बारीक चिरलेला, जिरे चवीनुसार, तेजपान, मीठ, तेल, आमसूल २ ते ३

कृती ः प्रथम फणसाचा आतील भाग कापून त्याचे तुकडे करून ते कुकरमध्ये शिजवून घ्यावे (३ शिट्यापर्यंत). आता सुके झिंगे (जवळा) तव्यावर भाजून घ्यावेत व थोडे पाण्यात धुवून घ्यावेत. शिजवलेले फणसाचे खाप काढून ते स्मॅश करून घ्यावेत. आता कढईत तेल टाकून त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, जिरे, हळद, गरम मसाला, मिरची पावडर, तेजपान, हे सर्व पदार्थ टाकून मंद गॅसवर परतून घ्यावे. हे मिश्रण चांगले परतल्यानंतर त्यामध्ये स्मॅश केलेला फणस व झिंगे टाकून चांगले परतून घ्यावे व त्यावरून आमसूल आणि काळ्या तिळाचा कूट टाकावा व परत सर्व मिश्रण चांगले एकजीव करून घ्यावे व वरून मीठ घालावे. ही भाजी १० मिनिटे मंद गॅसवर ठेवावी व नंतर त्यात कोथिंबीर टाकून सर्व्ह करावी.

टीप ः ही भाजी गरम गरमच खावी, तांदळाच्या भाकरीबरोबर खाल्ली तर अति उत्तम !

आलू - कोळंबी (सोडे)
साहित्य ः कोळंबी पावशेर, बटाटे २, कांदे २, लसूण ५ ते ६ पाकळ्या, ओले खोबरे १ वाटी, गरजेनुसार मिरची मसाला, हळद, गरम मसाला, आमसूल (कोकम) २ ते ३, तेल, मीठ, कोथिंबीर

कृती ः प्रथम कांदे उभे चिरून घ्यावे. कढईत, जरुरीनुसार तेल टाकून त्यात चिरलेला कांदा, लसूण, टाकून थोडा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात किसलेले ओले खोबरे टाकून हे मिश्रण व्यवस्थित भाजून घ्यावे. नंतर हे सर्व मिश्रण मिक्‍सरमध्ये अगदी बारीक करून घ्यावे. नंतर कोळंबी साफ करून घ्यावी. नंतर बटाट्याच्या बारीक फोडी करून घ्याव्यात. आता गॅसवर कढईत तेल टाकून त्यात मिक्‍सरमधून काढलेले मिश्रण टाकावे. चांगले परतून घ्यावे. त्यात नंतर हळद - मिरची पावडर, गरम मसाला (घरी तयार केलेला चालेल) टाकून परतून घ्यावे. दोन मिनिटे मंद गॅसवर असू द्यावे. नंतर त्यामध्ये साफ केलेली कोळंबी - बटाट्याच्या फोडी टाकाव्यात. वरून त्यात आमसूल व मीठ टाकावे. ५ मिनिटे गॅसवर ठेवावे. चांगले बॉईल होऊ द्यावे. अंदाजानुसार गॅस बंद करून गरम - गरम सर्व्ह करावा.

टीप ः ही भाजी तांदळाच्या भाकरीबरोबर खाण्यात चविष्ट राहील!

 

फोटो फीचर

संबंधित बातम्या