शेंगोळ्या, उकडपेंडी, पॅटिस

छाया बोराटे, पुणे 
गुरुवार, 21 जून 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. 
या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत. 

रव्याची बालुशाही
साहित्य : दोन वाट्या अगदी बारीक रवा, अर्धी वाटी तुपाचे मोहन, अर्धी वाटी दही, खाण्याचा सोडा सव्वा चमचा, बेकिंग पावडर अर्धा चमचा, किंचित मीठ तळण्यासाठी तेल, पाकासाठी साखर ३ वाट्या, १ चमचा लिंबाचा रस.
कृती : प्रथम बारीक रव्यात कडकडीत तुपाचे मोहन घालून चांगले मिक्‍स करुण अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर त्यात मीठ, सोडा, बेकिंग पावडर व दही घालून फक्त अलगद बोटांनीच मळावे. फार जोरात मळू नये. त्याच्या लिंबा एवढ्या चपट्या गोळ्या करून मध्ये अंगठ्याने दाबावे व मंद आचेवर तळावे. साखरेचा एकतारी पाक करावा. त्यात लिंबू पिळावे. गरम पाकात बालूशाही बुडवून बाजूला काढून ठेवाव्यात. वरून केशर किंवा ड्रायफ्रूट आवडीनुसार लावावे. थंड झाल्यावर बालुशाही सर्व्ह करावी. खुसखुशीत होते.

नाचणीची उकडपेंडी
साहित्य : नाचणीचे जाडसर पीठ १ वाटी, ताक अर्धी वाटी, हिरवी मिरची २, १ कांदा, कढीपत्ता, कोथिंबीर, चिमूटभर हिंगस पाव चमचा धने पावडर, मीठ, चिमूटभर लाल तिखट, साखर, १ चमचा तेल, जिरे, मोहरी फोडणीसाठी, खोबऱ्याचा किस, लिंबाची फोड.
कृती : प्रथम नाचणीचे पीठ कोरडे भाजून घ्यावे. नंतर कढईत ४ चमचे तेलाची फोडणी करावी. फोडणीत सर्व साहित्य घालावे. कांदा लालसर भाजून खमंग फोडणी तयार झाली की त्यात नाचणीचे पीठ परतून त्याच ताक, पाणी, मीठ, साखर, लाल तिखट, धने पावडर सर्व घालून व्यवस्थित हलवून त्यावर झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. छान मोकळी व चविष्ट उकडपेंडी तयार. खोबरे किस, लिंबाची फोड, कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे. नाचणीत कॅल्शिअम भरपूर आहे व उन्हाळ्यात नाचणी अवश्‍य खावी. पौष्टिक व झटपट होणारी डिश आहे.

पोह्याचे पॅटिस
साहित्य : दोन वाट्या पोहे, ४ उकडलेले बटाटे, मीठ, हळद, लाल तिखट, धने, जिरेपूड, गरम मसाला चवीनुसार, अर्धा चमचा आमचूर पावडर, बारीक चिरलेली कोथिंबीर.
कृती : प्रथम पोहे भिजवून घ्यावे. उकडलेल्या बटाट्यांची साल काढून मॅश करावे. त्यात भिजवलेले पोहे व वरील सर्व मसाले घालून चांगले मळून घ्यावे. त्याचे लिंबाएवढे गोळे करून गोल चपटे पॅटीस बनवून घ्यावे. मंद गॅसवर एका पॅनमध्ये थोडे तेल टाकून शॅलोफ्राय करावे. हे पॅटीस टोमॅटो सॉस बरोबर किंवा तसेही छान लागतात.

बटाटा पुरी 
साहित्य : दोन उकडलेले बटाटे, १ वाटी गव्हाचे पीठ, २ चमचे मैदा, २ चमचे तेल मोहन, मीठ, लाल तिखट अंदाजे १ चमचा ओवा, कोथिंबीर बारीक चिरलेली, हिंग चिमूटभर, तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम उकडलेले बटाटे साल काढून किसून घ्यावे. त्यात कणीक, मैदा, तेल मोहन गरम करून सर्व मसाले घालून पीठ घट्ट मळून घ्यावे. लगेच त्याच्या पुऱ्या लाटून मंद आचेवर तळून घ्याव्यात. खमंग व खुसखुशीत होतात. प्रवासात नेण्यासाठी उत्तम व झटपट होतात.

भाजणीचे शेंगोळे
साहित्य : थालीपीठाची भाजणी (४ वाट्या तांदूळ, २ हरभरा डाळ, ज्वारी, मूगडाळ किंवा अख्खे मूग, बाजरी प्रत्येकी १ वाटी, उडीद डाळ, जाड पोहे, गहू प्रत्येकी अर्धी वाटी, धने व जिरे, मेथ्या आवडीनुसार) हे सर्व भाजून दळावे. २ वाट्या भाजणी पीठ, १ कांदा बारीक चिरून, कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूणचे वाटण आपल्या चवीनुसार १ चमचा दही, मीठ, हळद घालून पीठ मळावे.
कृती : मळलेल्या पीठाचे प्रथम थालीपीठ तव्यावर लावावे. उरलेल्या पीठाचे शेंगोळे वळावे. थालीपीठ भाजताना त्याच्यावरच शेंगोळे ठेवावे. कडेने तेल सोडून घट्ट झाकण ठेवावे. थालीपीठाबरोबरच शेंगोळे छान भाजले जातात. दही, सॉस, लोणचे कशाही बरोबर खावेत. खूप खमंग होतात.

खाजा करंजी
साहित्य : दोन वाट्या एकदम बारीक रवा, पाव वाटी तूप (मोहन) खोबरे किस १ वाटी, खसखस, वेलची पूड, १ वाटी पिठीसाखर, पाव वाटी कणीक, किंचित मीठ, खाण्याचा रंग चिमूटभर, निरसं दूध १ वाटी,  तूप व कॉर्न फ्लोअर, तेल.
कृती : प्रथम बारीक रवा चाळून घ्यावा. त्यात गरम तुपाचे मोहन व मीठ व रंग घालून हाताने चांगले रव्याला चोळावे. नंतर निरस दूध घालून घट्ट गोळा मळून २-३ तास ठेवून द्यावे. सारणासाठी खोबरे कीस, खसखस भाजून बारीक करावे. त्यात पिठीसाखर, वेलची पूड, ड्रायफ्रुटची पूड (आवडीनुसार) घालून मिक्‍स करावे. मळलेला गोळा मिक्‍सरवर किंवा पाट्यावर कुटून घ्यावा. साट्यासाठी तूप फेसून त्यात कॉर्नफ्लोअर घालून गोळा करून घ्यावा. प्रथम पोळी लाटून त्यावर साटा नंतर दुसरी पोळी त्यावर साटानंतर तिसरी पोळी त्यावर साटा अशा पद्धतीने घट्ट वळकटी करून त्याच्या लाट्या कराव्या व लाट्या अलगद दाबून त्याच्या पुऱ्या लाटून त्यात सारण भरावे व हलकेच दाबून करंजी तयार करावी. करंज्या कातणीने कापायच्या नाहीत. करंज्या करून झाल्यावर तेलात मंद आचेवर तळाव्यात. या करंज्या खूप अलवार होतात. खूप छान चविष्ट होतात.

गव्हाच्या पिठाचे शंकरपाळे
साहित्य : दोन वाट्या गव्हाचे पीठ, अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी तूप, अर्धी वाटी पाणी किंवा दूध, किंचित मीठ, वेलची पूड, तेल.
कृती : अर्धी वाटी तूप, साखर व पाणी किंवा दूध एकत्र करून गरम करावे. परातीत गहू पीठ किंचित मीठ घालून त्यावर वरील सर्व घालून घट्ट मळावे. १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर त्याच्या शंकरपाळ्या करून मंद आचेवर गुलाबीसर तळून घ्याव्या. सोडा न घालताही खूप खुसखुशीत होतात. मैदा पोटासाठी वाईट आहे. गव्हाच्या पौष्टिक होतात.

दामट्याचे लाडू
साहित्य : दोन वाट्या डाळीचे पीठ, किंचित मीठ व हळद, १ चमचा मोहन, पाणी, २ वाटी साखर, तळण्यासाठी तेल.
कृती : डाळीच्या पिठात मोहन, मीठ, हळद घालून पीठ घट्ट मळावे. त्याच्या छोट्या पुऱ्या करून त्या तळून घ्याव्यात पुऱ्या थंड झाल्यावर तुकडे करून मिक्‍सरवर रवाळ वाटून घ्याव्या. फार बारीक करू नये. साखरेचा एकतारी पाक करून त्यात तो रवा घालून बाजूला ठेवून घ्यावे. आवडीनुसार वेलची, बदाम  घालावेत. थंड झाल्यावर त्याचे लाडू वळावे. हे लाडू खूप चविष्ट होतात. ही खानदेशातील रेसिपी आहे. इतर लाडूपेक्षा या लाडूची चव अप्रतिम आहे.

मुगाची पौष्टिक धिरडी
साहित्य : एक वाटी भिजवलेले हिरवे मूग, हिरवी मिरची, लसूण, आलं, कोथिंबीर वाटून चवीनुसार मीठ, २ चमचे बेसन पीठ, २ चमचे तांदूळ पीठ, तेल.
कृती : प्रथम भिजवलेले मूग मिक्‍सरवर किंचित जाडसर वाटून घ्यावे. त्यात बेसन, तांदळाचे पीठ, मीठ, हिरवे वाटण घालून रसरशीत पीठ तयार करावे. (आवडत असल्यास अगदी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटोपण घालू शकतो) डोसा तवा गॅसवर ठेवून मुगाची धिरडी घालावी. बाजूने शेकावी. चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करावी. खमंग व पौष्टिक होतात.

कैरीचा भात 
साहित्य : एक वाटी कैरीचा किस सालासकट, २ वाट्या तयार भात, २-३ मिरच्या, कढीपत्ता, १ चमचा तीळ, १ चमचा उडीद डाळ, मोहरी, हिंग, मीठ व हळद चवीनुसार.
कृती : कैरी सालासकट किसून घ्यावी. हिरवी मिरची बारीक चिरावी. शिजलेला भात मोकळा करून घ्यावा. गॅसवर कढईत तेल गरम करावे. त्यात मोहरी, उडीद डाळ, हिंग, मिरची, कढीपत्ता, कैरीचा किस घालून परतावे. हळद अगदी किंचित घालावी. कैरी मऊ झाली, की त्यात मोकळा केलेला भात व मीठ घालून हलकेच परतावे. भाताची शिते शक्‍यतो मोडू न देता अलगद मिक्‍स करावे. खमंग कैरीचा भात तयार.

 

फोटो फीचर

संबंधित बातम्या