कर्नाटकी पदार्थ

छाया संगोराम, अहमदनगर
सोमवार, 21 सप्टेंबर 2020

रोजच्या जेवणातल्या पदार्थांमध्ये जरा ‘व्हरायटी’ असली, की जेवायला आणखी मजा येते. म्हणूनच हे कर्नाटकी पदार्थ जरा चवबदल म्हणून करून बघा...!

हयग्रीव पायस
साहित्य - एक वाटी हरभरा डाळ, १ वाटी गूळ, ३-४ वेलदोड्यांची पूड, २ टेबलस्पून खसखस, १०-१२ काजू, १०-१२ बेदाणे, पाव वाटी किसलेले सुके खोबरे, २ चमचे तूप.
कृती - हरभरा डाळ धुऊन अर्धा तास पाण्यात भिजत ठेवावी. दोन वाट्या पाणी कुकरमध्ये घालून उकळावे व त्यात भिजवलेली हरभरा डाळ पाण्यातून उपसून घालावी. त्यात हळद व तेल घालावे. तीन शिट्या करून कुकर खाली उतरवावा. कुकर गार झाल्यावर कुकरमध्ये जर जास्त पाणी असेल, तर ते बाजूला काढून ठेवावे. नंतर गॅसवर कुकर ठेऊन त्या डाळीत गूळ घालून ढवळावे. डाळ व गूळ हलक्या हाताने परतावे. नंतर त्यात २ चमचे तूप घालून पुन्हा परतावे. त्यातच खसखस, वेलदोडा पूड, काजू-बेदाणे, सुक्या खोबऱ्याचा कीस घालावा. सर्व एकत्र करून एका बोलमध्ये काढून घ्यावे. कर्नाटकातील सर्व देव-देवतांना आवडणारा नैवेद्य आहे. 

कर्नाटकी ठेचा
साहित्य - दोनशे ग्रॅम हिरवी मिरची, १ मोठी वाटी खोवलेल्या नारळाचा चव, छोटी अर्धी वाटी चिंचेचा कोळ, १ छोटी वाटी गूळ, हिंग, हळद, चवीनुसार मीठ, तेल.
कृती - मिरच्या मिक्सरमधून जाडसर वाटून घ्याव्यात. गॅसवर कढई ठेऊन त्यात ३ टेबलस्पून तेल घालावे. त्यात हिंग, हळद व मिरचीचे वाटण घालून परतावे. खमंग वास आला, की त्यात चिंचेचा कोळ, गूळ, मीठ, नारळाचा चव घालून छान परतावे. खमंग व रुचकर ठेचा तयार. ३-४ दिवस टिकतो.

ज्वारीच्या पिठाच्या पुऱ्या
साहित्य - दोन कप ज्वारी पीठ, अर्धा कप चण्याचे पीठ. 
मसाला साहित्य - प्रत्येकी १ चमचा धने, जिरे, तीळ, १५-२० लसूण पाकळ्या, अर्धी वाटी कोथिंबीर, थोडा कढीपत्ता, पाव वाटी भिजवलेली उडीद डाळ, ४-५ हिरव्या मिरच्या, पाव चमचा हिंग, अर्धा चमचा तिखट. 
कृती - तीळ सोडून मसाल्याचे सर्व पदार्थ पाणी न घालता बारीक वाटून घ्यावेत. ज्वारी, चणा पीठ व वाटलेला मसाला सर्व एकत्र मिसळावे. नंतर गरम पाण्याने पुऱ्यांकरिता थोडे थोडे पाणी पीठ मळून २० मिनिटे झाकून ठेवावे. नंतर तीळ लावून पुऱ्या लाटाव्यात व तळाव्यात. या खमंग व खुसखुशीत पुऱ्या दही, दाण्याची चटणी किंवा सॉसबरोबर खाता येतात. 

मसाला मिरची भजी आणि खारा
साहित्य - शंभर ग्रॅम मध्यम आकाराच्या जाड (पोपटी) मिरच्या, १ वाटी खोवलेला नारळ, अर्धी वाटी फुटाणे डाळ पीठ, १ टेबलस्पून धने-जिरे पावडर, अर्ध्या लिंबाचा रस, थोडी कोथिंबीर, चवीनुसार मीठ.
भजी पीठ साहित्य - दीड कप डाळीचे पीठ, अर्धा चमचा ओवा, १ चमचा तिखट, पाव चमचा खाण्याचा सोडा, तळण्यासाठी तेल. 
कृती - सर्व मिरच्या मध्यभागी चिरून थोडे मीठ लावून ठेवाव्यात. वरील सर्व मसाल्याचे पदार्थ एकत्र करून तो मसाला मिरचीत भरावा. नंतर वरील पिठाचे साहित्य घेऊन पीठ तयार करावे. कढईत तेल तापल्यावर मिरच्या पिठात बुडवून मंद आचेवर तळाव्यात. या मिरच्यांबरोबर खारा म्हणजेच साधे मुरमुरे व जाड शेव खाण्यास द्यावी. अशी ही चटपटीत मसाला मिरची भजी आणि खारा सर्वांना आवडतो.

अंबाड्याची भाजी
साहित्य - एक जुडी अंबाडा भाजी (फक्त पाने), अर्धी वाटी भिजवलेली हरभरा डाळ, ५-६ हिरव्या मिरच्या, १ चमचा जिरे, अर्धा चमचा मेथी दाणे, अर्धी वाटी लसूण पाकळ्या, अर्धी वाटी ज्वारीची कणी (किंवा इडली रवा), अर्धा चमचा हळद, चवीपुरते मीठ. 
कृती - भाजी धुऊन घ्यावी. गॅसवर पातेल्यात ३-४ वाट्या पाणी घालून गरम करावे. त्यात चिरलेली भाजी घालून २-३ मिनिटे  
उकळल्यावर भाजी चाळणीत काढावी. यामुळे भाजीचा आंबटपणा थोडा कमी होतो. परत पातेल्यात २ वाट्या पाणी उकळण्यास ठेवावे. त्यात निथळलेली भाजी, मेथी दाणे, भिजवलेली हरभरा डाळ, जिरे, हळद घालावी. त्यातच मिरची व वाटीतील निम्मा लसूण ठेचून घालावा. २-३ मिनिटे शिजल्यानंतर त्यात ज्वारीच्या कण्या धुऊन घालाव्यात. परत हे मिश्रण ४ मिनिटे शिजू द्यावे. 
आता छोट्या कढईत ५ चमचे तेल घ्यावे. त्यात मोहरी, उरलेल्या लसूण पाकळ्या व हळद घालून खमंग फोडणी करावी व ती भाजीवर घालावी. (येथे गूळ ऐच्छिक आहे) ही चटकदार भाजी ज्वारी, बाजरी, तांदूळ या भाकरीबरोबर छान लागते. तसेच भाताबरोबरही खाऊ शकता. 

कांदापातीची पचडी
साहित्य - एक जुडी ताजी कोवळी कांद्याची पात (कांदे नकोत), अर्धी वाटी फुटाणे डाळीची भरड, अर्धी वाटी खोवलेला नारळ, अर्ध्या लिंबाचा रस, २ चमचे कोथिंबीर, चवीपुरते मीठ, फोडणीकरिता ३ चमचे तेल, मोहरी, हिंग, २ वाळलेल्या सांडगे मिरच्या किंवा लाल ब्याडगी मिरच्या. 
कृती - कांदापात धुऊन कोरडी करून नंतर बारीक चिरावी. त्यात डाळीचा भरडा, नारळ, लिंबू रस, मीठ, कोथिंबीर घालून एकत्र मिसळावे. छोट्या कढईत ३ चमचे तेल घालून मोहरी, हिंग व मिरची घालून खमंग फोडणी करावी व वरील मिश्रणात घालावी. यात हळद घालू नये. (वरील प्रमाणे कोबी, पालक, मेथी, कोवळा घेवडा यांची पचडी करता येते. मात्र कोणतीही भाजी शिजवू नये.)

नारळी भात (तिखट)
साहित्य - एक वाटी तांदूळ (बासमती), १ मोठी वाटी खोवलेला नारळ, ५-६ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून उडीद डाळ, एक टीस्पून हरभरा डाळ, १०-१२ काजू, १५-२० कढीपत्ता पाने, अर्धी वाटी शेंगदाणे, मोहरी, चवीनुसार मीठ.
कृती - तांदूळ धुऊन घ्यावेत. दीड वाटी पाणी आणि एक चमचा तेल घालून कुकरमधून भात शिजवून घ्यावा. गॅसवर कढई ठेऊन तेल घालावे. त्यात हरभरा डाळ लालसर तळून घ्यावी. नंतर उडीद डाळ, दाणे लालसर परतून बाहेर काढावेत. त्याच तेलात उभा काप केलेली हिरवी मिरची, कढीपत्ता आणि मोहरी तळून घ्यावी. हे सर्व पदार्थ एका ताटलीत काढून ठेवावेत. कुकरमधील भात परातीत मोकळा करून ठेवावा. त्यावर नारळाचा चव, वरील परतलेले सर्व पदार्थ आणि मीठ घालून हलक्या हाताने मिसळावे. कांदा, लसूण न घातलेला हा चवदार नारळी भात नैवेद्यालाही चालतो. 

रसायन (पंचामृत-प्रसाद)
साहित्य - चार केळी, दीड वाटी जाड पोहे, १ वाटी गूळ, १ वाटी खोवलेला नारळ, ३ चमचे मध, २ चमचे तूप, डाळिंबाचे दाणे.
कृती - जाड पोहे धुऊन भिजत ठेवावेत. एका बोलमध्ये गूळ, नारळाचा चव, चिरलेली केळी एकत्र करावीत. केळी ऐनवेळी घालावीत. त्यात मध घालून कालवावे. हे मिश्रण केळीच्या पानावर सर्व्ह करावे आणि डाळिंबाच्या दाण्यांनी सजवावे.

संबंधित बातम्या