पपई स्पेशल रेसिपीज

दीपाली चांद्रायण, नागपूर
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

फूड पॉइंट
बाजारात सहज उपलब्ध होणारी पपई आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत बहुगुणी आहे. पपईत जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात. पपईमुळे भूक आणि शक्ती वाढायला मदत होते. त्वचेचे आरोग्य राखण्यासाठीही पपईचा खूप उपयोग होतो. अशा बहुगुणी पपईपासून केलेल्या स्पेशल रेसिपीज...

झुणका  
साहित्य : एक वाटी कच्च्या पपईचा कीस, १ वाटी बेसन, २-३ हिरव्या मिरचीचे तुकडे, थोडे किसलेले आले, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल आणि फोडणीचे साहित्य. 
कृती : प्रथम गॅसवर कढईत तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे, आले घालून फोडणी करावी. त्यावर पपईचा कीस घालून परतून घ्यावा. थोडे पाणी घालून वाफ येऊ द्यावी. हळद, चवीनुसार मीठ, तिखट घालून परतून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालावे. नंतर डाळीचे पीठ घालून एकसारखे हालवत राहावे. भोवताली थोडे थोडे तेल सोडून झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. सर्व्हिंग बाेलमध्ये काढून वरून कोथिंबीर घालावी.

पराठे 
साहित्य : एक वाटी कच्च्या पपईचा वाफवलेला कीस, २ वाट्या कणीक, तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, तीळ, ओवा, २ चमचे तेल, डाळीचे पीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, २-३ मिरच्यांचे बारीक तुकडे, आले-लसूण पेस्ट. 
कृती : एका मोठ्या बाेलमध्ये वरील सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. त्यात २ चमचे तेलाचे मोहन घालून कणीक मळून घ्यावी. छोटे छोटे गोळे करून पराठे करावेत व गरम तव्यावर थोडे थोडे तेल सोडून दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावेत. पराठे दही, सॉस, लोणचे किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावेत.
टीप : पराठ्यांऐवजी तळून पुऱ्याही करता येतात.

कोफ्ता करी  
साहित्य : दोन वाट्या कच्च्या पपईचा कीस, दीड वाटी बेसन, आले-लसूण-मिरची पेस्ट, तिखट, मीठ, तेल, फोडणीचे साहित्य, ८-१० काजू, १ वाटी चिरलेला कांदा, टोमॅटो, अर्धी वाटी भाजलेला कोरड्या खोबऱ्याचा कीस, खसखस, बारीक चिरलेली कोथिंबीर. 
कृती : प्रथम कोफ्ते तयार करून घ्यावेत. त्यासाठी एका भांड्यात पपईचा कीस, बेसन, मिरची-आले-लसूण पेस्ट, तिखट, मीठ, हळद, जिरे पावडर घालून मिश्रण एकजीव करावे. त्याचे छोटे लंबाकृती गोळे करून डीप फ्रॉय करावेत. आता करी करण्यासाठी प्रथम मिक्‍सरमध्ये काजू, कांदा, टोमॅटो, खोबरे, खसखस घालून वाटून घ्यावे. कढईत थोडे तेल टाकून त्यात आले-लसूण-मिरची पेस्ट घालावी. नंतर कांदा, टोमॅटो, खसखस, खोबऱ्याचे वाटण घालून परतून घ्यावे. गरजेनुसार पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून चांगले उकळून घ्यावे. सर्व्हिंग बाेलमध्ये काढून वरून कोथिंबीर घालावी. तयार कोफ्ते करीमध्ये घालून सर्व्ह करावे.

भाजी  
साहित्य : दोन वाट्या कच्च्या पपईच्या साल काढून मध्यम आकाराच्या कापलेल्या फोडी, पाव वाटी सुक्‍या खोबऱ्याचा भाजलेला कीस आणि खसखस, तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला, धने, जिरे, आमचूर पावडर, गूळ, कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव, कढीपत्ता, तेल आणि फोडणीचे साहित्य. 
कृती : गॅसवर कढईत २-३ चमचे तेल घालून गरम झाल्यावर मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करावी. त्यात पपईच्या फोडी धुऊन घालाव्यात व थोडे हालवून घ्यावे. नंतर हळद, तिखट, मीठ, धने, जिरे पावडर, आमचूर पावडर, खोबऱ्याचा कीस, खसखस घालून हालवावे. चवीनुसार थोडा गूळ घालावा. थोडे पाणी घालून झाकण ठेवावे. फोडी चांगल्या शिजल्यावर त्यावर गोडा मसाला घालून हालवावे. सर्व्हिंग बाेलमध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि नारळाचा चव घालावा.

उपवासाचे थालीपीठ   
साहित्य : एक वाटी कच्च्या पपईचा कीस, २ वाट्या उपवासाची भाजणी, जिरे, २ मिरचीचे तुकडे, शेंगदाण्याचा कूट, तेल किंवा तूप. 
कृती : एका मोठ्या बाेलमध्ये उपवासाची भाजणी घेऊन त्यात मीठ, जिरे, मिरचीचे तुकडे (आवडीनुसार तिखट) पपईचा कीस, शेंगदाण्याचा कूट घालून आवश्‍यकतेनुसार पाणी घालून मळून घ्यावे. नॉनस्टिक तव्यावर थोडे तेल सोडून थालीपीठ लावावे व दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्यावे. लिंबाचे गोड लोणचे, चटणीबरोबर रुचकर लागतात.

उपवासाचा खारा कीस 
साहित्य : एक वाटी कच्च्या पपईचा कीस, २-३ मिरचीचे तुकडे, अर्धी वाटी भिजलेला साबूदाणा, अर्धी वाटी दाण्याचा कूट, जिरे, मीठ, साखर, लिंबाचा रस, तेल किंवा तूप. 
कृती : प्रथम गॅसवर कढईत तेल टाकून जिरे, मिरची घालून फोडणी करावी. त्यात पपईचा कीस घालून परतून घ्यावा. नंतर साबूदाणा घालून पुन्हा परतावे. दाण्याचा कूट, मीठ, साखर व लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा परतून घ्यावे व झाकण ठेवून एक वाफ येऊ द्यावी. सर्व्हिंग प्लेटमध्ये काढून त्यावर नारळाचा चव घालावा. 
टीप : साबूदाणा न घालताही नुसता पपईचा खारा कीसही छान होतो. वरील कृतीत मीठ व दाण्याचा कूट, मिरची न घालता साखर, विलायची पावडर 
घालून गोड प्रकार तयार होतो.

खीर  
साहित्य : पपईचा वाफवलेला कीस (थोडी पिकलेली, अर्धी कच्ची), पाऊण वाटी साखर,२-३ कप दूध साईसकट, २ चमचे तूप, १ चमचा कॉर्नफ्लोअर, विलायची पावडर, काजू, बेदाणे, केशर. 
कृती : प्रथम गॅसवर कढईत २ चमचे तूप टाकून वाफवलेला कीस परतून घ्यावा. नंतर १ कप दूध आणि कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण एकजीव करून ढवळत राहावे. साखर व उरलेले दूध साईसकट घालून पुन्हा ढवळत राहावे. एक उकळी येऊ द्यावी. विलायची पावडर, केशर घालून थंड झाल्यावर सर्व्हिंग बाेलमध्ये काढावे. वरून काजू-बेदाणे घालावे. आवश्‍यकतेनुसार दूध घालावे. थोडासा खवा भाजून किंवा २-३ पेढे कुस्करून टाकले, तरी खीर आणखी चविष्ट होते. केशरी रंगाची दिसायला सुंदर, खायला चविष्ट अशी ही खीर उपवासालाही चालते.

बर्फी   
साहित्य : एक वाटी पपईचा कीस (थोडी पिकलेली, अर्धी कच्ची), अर्धी वाटी भाजलेला खवा, अर्धी वाटी पिठीसाखर, विलायची पावडर, पिस्त्याचे काप, प्रत्येकी अर्धी वाटी काजू व बदामाची पावडर, थोडेसे तूप. 
कृती : प्रथम गॅसवर कढईत पपईचा कीस झाकण ठेवून वाफवून घ्यावा. नंतर त्यात खवा घालून पुन्हा परतत राहावे. काजू, बदाम पावडर, विलायची पावडर घालून पुन्हा एकदा चांगले हालवून घ्यावे. मिश्रणाचा गोळा झाल्यावर एका ताटात तुपाचा हात लावून मिश्रण पसरून थापून घ्यावे. वरून पिस्त्याचे काप घालून वड्या कापाव्यात. केशरी रंगाच्या सुंदर, मोहक नि खायला स्वादिष्ट आणि पौष्टिकही.

सांडगे  
साहित्य : चार वाट्या कच्च्या पपईचा कीस, २-३ टोमॅटोच्या चिरलेल्या फोडी, ४-५ मिरच्या, जिरे, १ पाव भेंडी, अर्ध्या गाजराचा कीस. 
कृती : प्रथम मिक्‍सरमध्ये मिरच्या, मीठ, जिरे जाडसर वाटून घ्यावे. भेंडी चिरून मिक्‍सरमध्ये जाडसर वाटून घ्यावी. आता एका मोठ्या भांड्यात पपईचा कीस व गाजराचा कीस, भेंडी, मिरचीचे वाटण, टोमॅटो, आवश्‍यकतेनुसार मीठ, थोडे जिरे घालून मिश्रण कालवून घ्यावे. एका ताटात किंवा प्लॅस्टिक पेपरवर छोटे छोटे गोळे करून सांडगे घालावेत. उन्हात चांगले खडखडीत वाळवून घ्यावे. नंतर तेलात तळावेत. झाले खमंग कुरकुरीत सांडगे तयार.

दही रायता  
साहित्य : कच्च्या पपईची साल काढून बारीक चिरलेल्या साधारण वाफवलेल्या फोडी, १ वाटी गोड दही, २-३ मिरचीचे तुकडे, कढीपत्ता, कोथिंबीर, हिंग, जिरे, हळद, मीठ, साखर, तेल. 
कृती : पपईच्या वाफवलेल्या फोडी एका बाेलमध्ये घेऊन थोड्या स्मॅश करून घ्याव्या. त्यात दही, मीठ, साखर घालून मिश्रण हालवून घ्यावे. आता छोट्या कढईत तेल गरम करून जिरे, मिरचीचे तुकडे, हिंग, कढीपत्ता, हळद घालून फोडणी करावी. थोडे थंड झाल्यावर मिश्रणावर घालून हालवून घ्यावी. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. (वरील कृतीत हळद आणि हिंग वगळल्यास उपवासालाही चालते.) शिवाय दह्याऐवजी लिंबू रसाचा वापर केल्यासही उत्तम चव येते.

संबंधित बातम्या