दोडक्याचे वैविध्यपूर्ण पदार्थ

दीपाली चंद्रायण, नागपूर
सोमवार, 26 ऑगस्ट 2019

फूड पॉइंट
अनेकांना दोडक्याची भाजी फारशी आवडत नाही. पण ही भाजी न आवडण्याचे कारण दोडका नसून त्याची भाजी करण्याची पद्धतदेखील असू शकते... म्हणून दोडक्याची भाजी एकाच प्रकारे न करता, त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या रेसिपीज ट्राय केल्या, तर ती भाजी खाण्याचा कंटाळाही येणार नाही... दोडक्यापासून केलेल्या अशाच काही वेगळ्या रेसिपीज. 

भरलेली दोडकी 
साहित्य : एक पाव मध्यम आकाराचे दोडके, पाव वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी शेंगदाणा कूट, ३ चमचे तेल, ४-५ लसणाच्या पाकळ्या (जाडसर), धने, जिरे, आमचूर पावडर, गोडा मसाला, साखर प्रत्येकी १ चमचा, तिखट, मीठ, हळद, फोडणीसाठी हिंग, जिरे, मोहरी आणि बारीक चिरलेली कोथिंबीर. 
कृती : दोडक्‍याच्या शिरा काढून एक बोट लांबीचे काप करून त्याला मधे अर्धवट कापावे. जेणेकरून त्यात मसाला भरता येईल. एका भांड्यात बारीक चिरलेला कांदा, लसूण, शेंगदाण्याचा कूट, गोडा मसाला, तिखट, मीठ, हळद, धने, जिरे, आमचूर पावडर, साखर, कोथिंबीर घालून मिश्रण एकत्र करावे. आता हे मिश्रण दोडक्‍यात भरून बाजूला ठेवावे. नंतर कढईत तेल गरम झाल्यावर हिंग, जिरे, मोहरीची फोडणी करावी. थोडी हळद घालून यात मसाला भरलेल्या दोडक्‍याच्या फोडी अलगद सोडाव्यात. झाकण ठेवून चांगली वाफ येऊ द्यावी. छान शिजल्यावर सर्व्हिंग बाऊलमध्ये अलगद काढून कोथिंबीर घालून सर्व्ह करावी. 


मुठीया 
साहित्य : एक पाव दोडके, २ वाट्या रवाळ भाजलेली कणीक, ४-५ चमचे तेल, तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला, कढीपत्ता, धने, जिरे पावडर, तीळ, ओवा, कोथिंबीर, ओल्या नारळाचा चव. 
कृती : दोडक्‍याच्या शिरा न काढता मध्यम आकाराच्या फोडी करून घ्याव्यात. एका भांड्यात कणीक घेऊन त्यात १-२ चमचे तेलाचे मोहन घालावे. तिखट, हळद, मीठ, जिरे पावडर, तीळ, ओवा, थोडी कोथिंबीर घालून कणीक मळून घ्यावी. तेलाचा हात लावून छोटे छोटे गोळे करून मुठीया कराव्यात. आता गॅसवर कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्त्याची फोडणी करावी. दोडक्‍याच्या फोडी घालून परतून घ्याव्यात. थोडी हळद घालून पुन्हा एकदा परतावे. थोडे पाणी घालावे. एक उकळी आल्यावर त्यावर कणकेचे केलेले मुठीया सोडावेत. त्यावर झाकण ठेवून छान शिजू द्यावेत. वरून थोडे तेल सोडावे आणि एक वाफ येऊ द्यावी. त्याचे छोटे छोटे तुकडे करावेत व पुन्हा एकदा परतून घ्यावे. प्लेटमध्ये काढून त्यावर कोथिंबीर, नारळाचा चव घालून सर्व्ह करावे. 


रस्सा भाजी 
साहित्य : एक पाव दोडके, २-३ चमचे तेल, अर्धा चिरलेला कांदा, लसूण, कोथिंबीर, कढीपत्ता, तिखट, हळद, गोडा मसाला, मीठ, 
गूळ, आमचूर पावडर, धने पावडर, फोडणीसाठी हिंग, जिरे, मोहरी. 
कृती : दोडक्‍याच्या हलक्‍या हलक्‍या शिरा काढून मध्यम आकाराच्या फोडी करून धुऊन घ्याव्यात. गॅसवर कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लसूण घालून फोडणी करावी. चिरलेला कांदा घालून परतून घ्यावा. त्यावर दोडक्‍याच्या फोडी घालून परताव्यात. आता तिखट, हळद, गोडा मसाला, आमचूर व धने पावडर घालावी. पुन्हा थोडे परतून घ्यावे व झाकून एक वाफ आली, की चवीनुसार मीठ व आवश्‍यकतेनुसार गूळ घालावा. थोडेसे पाणी घालून छान शिजू द्यावे. नंतर बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर घालावी. 


दोडक्‍याच्या शिरांची चटणी 
साहित्य : भाजी करण्यापूर्वी काढलेल्या दोडक्‍याच्या शिरा १ वाटी, २-३ चमचे तीळ, खोबऱ्याचा कीस, २-३ मिरचीचे तुकडे, २ चमचे तेल, जिरे, लसूण, मीठ, साखर, आमचूर पावडर. 
कृती : प्रथम गॅसवर कढईत तेलावर जिरे घालून फोडणी करावी. मिरचीचे तुकडे, लसूण, दोडक्‍याच्या शिरा थोड्या कुस्करून टाकाव्यात आणि यातलं पाणी आटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर तीळ, खोबऱ्याचा कीस घालावा. आमचूर पावडर, (साखर आवडत असल्यास) आणि चवीनुसार मीठ घालावे व परतत राहावे. नंतर बाऊलमध्ये काढून घ्यावे. खमंग कुरकुरीत चटणी तयार. 


डाळ दोडका 
साहित्य : एक पाव दोडका (मध्यम आकाराच्या फोडी), अर्धी वाटी भिजलेली हरभरा डाळ, २-३ चमचे तेल, तिखट, मीठ, हळद, कांदा, लसूण, गोडा मसाला, कोथिंबीर, कढीपत्ता, नारळाचा चव, फोडणीचे साहित्य. 
कृती : प्रथम गॅसवर कढईत तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता, लसूण, कांदा घालून फोडणी करावी. त्यात डाळ घालून परतून घ्यावे. थोडी हळद घालून दोडक्‍याच्या फोडी घालाव्यात. थोडेसे पाणी घालून परतून घ्यावे. चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवावे व छान शिजू द्यावे. सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर, नारळाचा चव घालावा. 


भजी 
साहित्य : दोन-तीन मध्यम आकाराची दोडकी, बारीक चिरलेली कोथिंबीर, १ वाटी बेसन, तीळ, जिरे, ओवा, हळद, आवश्‍यकतेनुसार तिखट, मीठ, भजी तळण्यासाठी तेल. 
कृती : प्रथम दोडक्‍याच्या गोल गोल चकत्या करून घेणे. एका भांड्यात बेसन घेऊन त्यात २-३ चमचे तेलाचे मोहन घालावे. वरील सर्व साहित्य एकत्र करून रसरशीत भिजवावे. नंतर कढईत तेल गरम झाल्यावर दोडक्‍याचे काप बेसनात बुडवून तांबूस रंगावर भजी तळून घ्यावीत. प्लेटमध्ये काढून सॉसबरोबर गरमागरम सर्व्ह करावीत.  


कढी 
साहित्य : एक-दोन दोडक्‍याच्या गोल गोल कापलेल्या चकत्या, एक वाटी दही, २ चमचे बेसन, फोडणीसाठी तेल, हिंग, जिरे, मिरचीचे तुकडे, मेथीदाणे, कढीपत्ता, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, हळद, साखर. 
कृती : कढईत तेलावर हिंग, मेथीदाणे, जिरे, कढीपत्ता, मिरचीचे तुकडे घालून फोडणी करावी. किंचित हळद घालावी. त्यात दही घुसळून बेसन घालून एकजीव केलेले मिश्रण घालावे व आवश्‍यकतेनुसार पाणी घालावे. चवीनुसार मीठ, साखर घालून उकळून घ्यावे. दोडक्‍याच्या चकत्या घालून पुन्हा एकदा चांगले उकळून घ्यावे. चकत्या शिजल्या पाहिजेत. नंतर सर्व्हिंग बाऊलमध्ये काढून वरून कोथिंबीर घालावी. 


दोडका दाल फ्राय 
साहित्य : दोन वाट्या तुरीचे तयार वरण, २-३ दोडक्‍याच्या शिजलेल्या फोडी, चिरलेला कांदा, लसूण, २-३ मिरचीचे तुकडे, हिंग, तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला, कढीपत्ता, कोथिंबीर, तेल, फोडणीचे साहित्य. 
कृती : प्रथम एका भांड्यात तुरीचे वरण थोडे पाणी, मीठ, हळद घालून सरबरीत करून घ्यावे. दोडक्‍याच्या वाफवलेल्या फोडीही घालाव्यात. नंतर कढईत गरम तेलावर फोडणी करावी. मोहरी, हिंग, जिरे, कढीपत्ता, कांदा, लसूण घालून परतून घ्यावे. (आवडीनुसार टोमॅटो घालू शकता) आवडीनुसार वरणावर गोडा मसाला व तिखट घालावे. वरून तयार केलेली फोडणी घालावी. कोथिंबीर घालून ‘दोडका दाल फ्राय’ सर्व्ह करावा.   

संबंधित बातम्या