कारल्याच्या निवडक रेसिपीज

दीपाली चंद्रायण, नागपूर
गुरुवार, 21 फेब्रुवारी 2019

फूड पॉइंट
कारलं हे सहसा न आवडणाऱ्या भाज्यांमध्ये मोडतं. कारलं कडू असलं, तरी आरोग्यासाठी अतिशय लाभदायक. पित्त, मधुमेह, त्वचारोग या व इतर आजारांसाठी औषध म्हणून कारल्याचा वापर केला जातो. अशा या औषधी कारल्याच्या काही चवदार रेसिपीज...

मसाला भरली कारली 
साहित्य : एक पाव लहान आकाराची बिया काढून मध्यभागी काप देऊन चिरलेली कारली, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या खोबऱ्याचा कीस, जाडसर ठेचलेली लसूण-मिरची, तिखट, हळद, गोडा मसाला, धने, जिरे, आमचूर पावडर, मीठ, साखर, फोडणीचे साहित्य, ३-४ मोठे चमचे तेल, कोथिंबीर.
कृती : प्रथम एका भांड्यात मसाला तयार करून घेण्यासाठी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, दाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस, तिखट, हळद, मीठ, साखर, गोडा मसाला, धने, जिरे, आमचूर पावडर, लसूण-मिरची भरड हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यावे. हा मसाला कारल्यांमध्ये दाबून भरावा. आता एका कढईत तेल गरम करून हिंग, मोहरी, जिरे घालून फोडणी करावी. त्यात मसाला भरलेली कारली अलगद सोडावीत. उरलेला मसालाही वरून घालावा. झाकण ठेवून मंद आचेवर कारली शिजवावीत. नंतर सर्व्हिस बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर घालावी.

कुरकुरीत कारली 
साहित्य : एक पाव कारल्याच्या पातळ गोल गोल चकत्या, १ वाटी कांद्याचे पातळ काप, तिखट, मीठ, हळद, गोडा मसाला, आवश्‍यकतेनुसार तेल.
कृती : गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे. त्यात कारल्याच्या चकत्या घालून परतत राहावे. नंतर कांदा घालून पुन्हा परतावे. थोडेसे कोरडे होत आले, की तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला घालून पूर्ण कोरडे होईपर्यंत परतत राहावे. कुरकुरीत कारली चवीला खूप छान लागतात. (वरील कृतीत कांदा न घालता एका लिंबाचा रस आणि चवीनुसार साखर घातल्यास 
आंबट-गोड चवीची कुरकुरीत कारली रुचकर होतात.)

कारल्याचे चिप्स 
साहित्य : एक पाव कारल्याच्या पातळ गोल चकत्या, तिखट, मीठ, आमचूर पावडर, तळण्यासाठी तेल.
कृती : गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे. कारल्याच्या चकत्या मंद आचेवर डीप फ्राय कराव्यात. नंतर त्यावर तिखट, मीठ, आमचूर पावडर भुरभुरावी आणि सर्व्ह करावे.

कारल्याची भजी 
साहित्य : एक पाव कारल्याच्या बिया काढून पातळ गोल चकत्या, एक वाटी बेसन, तिखट, हळद, मीठ, ५-६ चमचे तीळ, तळण्यासाठी तेल, कोथिंबीर.
कृती : एका भांड्यात बेसन, तिखट, हळद, मीठ, तीळ, कोथिंबीर, दोन-तीन चमचे तेलाचे मोहन घालून सरबरीत भिजवून घ्यावे. कारल्याचे काप त्यात बुडवून गरम तेलात भजी तळून घ्यावीत आणि सर्व्हिस प्लेटमध्ये सर्व्ह करावीत. खमंग गरमागरम तिळाची चव असलेली भजी कारल्याची असूनही अजिबात कडू होत नाहीत.

कारल्याची रस्सा भाजी 
साहित्य : एक पाव कारल्याच्या बिया काढून उभ्या चिरलेल्या फोडी, १ वाटी बारीक चिरलेला कांदा, पाव वाटी खोबऱ्याचा कीस, दाण्याचा कूट, तिखट, हळद, मीठ, गोडा मसाला, धने, जिरेपूड, आले, लसूण, मिरची पेस्ट, चिंचेचा कोळ, अर्धी वाटी गूळ, कोंथिबीर, तेल आणि फोडणीचे साहित्य.
कृती : गॅसवर कढईत तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग घालून फोडणी करावी. आले-लसूण पेस्ट व कांदा घालून परतून घ्यावे. नंतर हळद, तिखट, मीठ, गोडा मसाला, धने, जिरेपूड, दाण्याचा कूट, खोबऱ्याचा कीस घालून परतून घ्यावे. कारल्याच्या फोडी घालून पुन्हा एकदा परतावे. गूळ व चिंचेचा कोळ घालून थोडे पाणी घालावे व झाकण ठेवून मंद आचेवर छान शिजवून घ्यावे. नंतर सर्व्हिस बाऊलमध्ये काढून सर्व्ह करावे

कारल्याचे लोणचे 
साहित्य : एक पाव कारल्याच्या बिया काढून फोडी, अर्धी वाटी लोणच्याचा तयार (कैरी लोणचे) मसाला, चवीनुसार मीठ, पाव वाटी साखर, थोडासा गूळ, २ लिंबांचा रस, तेल.
कृती : एका भांड्यात कारल्याच्या फोडी घ्याव्यात. त्यात लोणच्याचा तयार मसाला, मीठ, साखर, गूळ, लिंबाचा रस घालून मिश्रण हलवून घ्यावे आणि एका बरणीत भरावे. नंतर तेल गरम करावे व थंड झाल्यावर बरणीतील लोणचे बुडेपर्यंत घालावे. फ्रीजमध्ये पंधरा दिवस चांगले राहाते आणि अतिशय रुचकर लागते.

कारल्याची कुरकुरीत चटणी 
साहित्य : एक पाव कारल्याच्या बिया काढून एक-दीड इंचाचे उभे पातळ काप, अर्धी वाटी तीळ, खोबऱ्याचा कीस, चवीनुसार तिखट, मीठ, जिरे, आमचूर पावडर, साखर, तेल.
कृती : प्रथम गॅसवर कढईत तेल गरम करून घ्यावे. नंतर कारल्याचे काप घालून परतत राहावे. तेव्हाच साखर आणि मीठ घालावे, म्हणजे त्यात मिसळते. थोडे कोरडे होत आले, की तीळ, खोबऱ्याचा कीस घालून परतावे. तिखट, जिरे, आमचूर पावडर घालून पुन्हा कोरडे होईपर्यंत परतत राहावे. सर्व्हिस बाऊलमध्ये काढून घ्यावे. खमंग कुरकुरीत चटणी अजिबात कडू होत नाही.

संबंधित बातम्या