आवळ्याची तोंडीलावणी

डॉ. नेहा दीक्षित, पुणे
मंगळवार, 29 जानेवारी 2019

फूड पॉइंट
सध्या बाजारात छान रसरशीत हिरवेगार आवळे मिळत आहेत. आवळा हे अनेक गुण असलेले व पचनास अत्यंत उपयुक्त फळ! तोंडीलावणीसाठी आवळ्याच्या विविध पाककृती करता येतात. अशाच काही पाककृती...

आवळ्याचे लोणचे (अख्खा आवळा)
साहित्य : रसरशीत ताजे ८ ते १० आवळे. (मध्यम आकाराचे), वाटीभर तिळाचा कूट (तीळ खमंग भाजून कूट करावा), १०-१२ हिरव्या मिरच्या, १०-१५ लसणाच्या पाकळ्या, आल्याचे ३-४ तुकडे, चवीपुरते मीठ.
कृती : आधी आवळे धुऊन पुसून घ्यावेत. आले, लसूण व हिरव्या मिरच्यांची पेस्ट करावी. फोडणी करावी. त्यानंतर हिंग, जिरे व हळद टाकावी. त्यावर आले, लसूण, हिरव्या मिरचीची पेस्ट परतून घ्यावी. नंतर त्यामध्ये आवळे टाकावेत व आवळे साधारण भिजतील एवढे पाणी टाकावे आणि वरुन मीठ घालावे. झाकण ठेवून वाफेवर आवळे शिजवून घ्यावेत. १० ते १२ मिनिटात आवळे छान शिजतात. आता वरुन तिळाचा कूट घालावा. ज्यामुळे राहिलेले पाणी शोषले जाईल व आवळ्या भोवती एक छान कोटिंग तयार होईल. हे लोणचे साधारण दोन तीन दिवसच टिकते. त्यामुळे एका वेळेस थोडेसेच करावे.

आवळा पुदिना चटणी
साहित्य : हिरवे आवळे ५ ते ६, वाटीभर कोथिंबीर, वाटीभर ओले खोबरे, वाटीभर पुदिन्याची पाने, ७-८ हिरव्या मिरच्या, ५-६ पाकळ्या लसूण, एक इंच आल्याचा तुकडा, दोन चमचे जिरे, चवीपुरते मीठ व साखर.
कृती : आवळे, पुदिना, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या व आले स्वच्छ धुऊन घ्यावेत. आवळे चिरून घ्यावे म्हणजे आवळ्याची बी आपोआप बाहेर राहते. लसूण सोलून घ्यावा. आता हे सर्व साहित्य मिक्‍सरच्या भांड्यात घालावे. त्यातच ओले खोबरे, चवीपुरते मीठ, साखर व जिरे घालून बारीक वाटावे. ही चटणी साधारण २-३ दिवस टिकते. मुलांना सॅंडविच करताना ब्रेडलाही लावता येते व पोळी बरोबर तर छानच लागते.

ओली हळद व आवळ्याचे लोणचे
साहित्य : हळकुंडे (ओली) ३-४, आवळे ५-६ , ३ आल्याचे (एक इंची) तुकडे, बारीक वाटीभर तयार लोणच्याचा मसाला (बाजारात मिळतो), चवीपुरते मीठ.
कृती : प्रथम हळकुंडे, आवळे व आले स्वच्छ धुऊन पुसून घ्यावेत. त्यानंतर त्याचा किस करावा. आता हा किस व्यवस्थित एकत्र करुन घ्यावा. त्यात बाजारात मिळतो तो लोणच्याचा मसाला (साधारण बारीक वाटीभर) आणि चवीपुरते मीठ घालावे. ही सर्व तयारी करायच्या अगोदर कढईमध्ये वाटीभर तेलाची फोडणी फक्त मोहरी घालून करुन ठेवावी. म्हणजे ती पूर्णपणे गार होईल. आता या सर्व मिश्रणात गार झालेली फोडणी घालावी व बरणीत भरून ठेवावे. हे लोणचे रोज हलवावे लागते. फ्रीजमध्ये बरणी ठेवल्यास साधारण १ महिना टिकते. 

आवळ्याचे सूप
साहित्य : आवळे ५ ते ६, दोन हिरव्या मिरच्या, इंचभर आल्याचा तुकडा, चवीपुरते मीठ व साखर. 
कृती : प्रथम आवळे स्वच्छ धुऊन कुकरमधून उकडून घ्यावेत. कुकरच्या चार शिट्ट्या कराव्यात उकडलेल्या आवळ्यामधून  आवळ्याची बी सहज वेगळी करता येते. आता हे आवळे व दोन हिरव्या मिरच्या मिस्करमधून बारीक वाटून घ्यावेत. या मिश्रणामध्ये साधारण अडीच ग्लास पाणी घालावे. त्यामध्ये मीठ व साखर घालून व्यवस्थित हलवावे व वरुन आले किसून घालावे व गॅसवर मंद आचेवर छान उकळी आणावी. साधारणपणे १० मिनिटे उकळावे. या सुपमध्ये मिरची ऐच्छिक आहे. कोथिंबीर/पुदिना घालून गारनिश करावे व गरम गरम सर्व्ह करावे.

आवळ्याची सुपारी (उकडून केलेली)
साहित्य : १ किलो आवळे
कृती : एक किलो मोठ्ठे आवळे धुऊन घ्यावेत व कुकरमधून उकडून घ्यावेत. हे सर्व आवळे कुकरमध्ये ठेवताना एखाद्या स्टीलच्या भांड्यातच ठेवावेत व चार शिट्ट्या कराव्यात. गार झाल्यानंतर त्यातील बिया काढून टाकाव्यात. आवळ्याच्या फोडी वेगळ्या करुन घ्याव्यात. नंतर या फोडीवर मीठ व जिऱ्याची पूड टाकून उन्हात १५ दिवस वाळवावे. आवळे पूर्ण काळे झाले म्हणजे सुपारी वाळली असे समजावे. ती घट्ट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावी. ही सुपारी वर्षभर टिकते व सुपारीच्या निमित्ताने रोज आवळा सुद्धा खाल्ला जातो. (टीप ः या प्रकारे आवळ्याची सुपारी किसून सुद्धा करू शकतो. फक्त आवळे उकडायच्या ऐवजी किसावेत व मीठ आणि जिरेपूड लावून उन्हात वाळवावेत.)

आवळ्याचे लोणचे (चिरून केलेले)
साहित्य : मोठे डोंगरी आवळे ६-७, वाटीभर लोणचे मसाला, चवीपुरते मीठ, फोडणीसाठी वाटीभर 
तेल.
कृती : आधी आवळे स्वच्छ धुऊन व पुसून घ्यावेत. त्यानंतर त्याच्या बारीक बारीक फोडी चिरून घ्याव्यात. आता या चिरलेल्या फोडीत लोणच्याचा (तयार) मसाला मिसळावा. चवीपुरते मीठ घालून वरुन फोडणी घालावी. ही फोडणी अर्धा तास अगोदर करुन ठेवावी. पूर्णपणे गार झाल्यानंतरच लोणच्यावर घालावी व नंतर हे लोणचे बरणीत भरून ठेवावे. साधारण महिनाभर ते टिकते. दर दोन दिवसांनी लोणचे हलवावे. अन्यथा ते खराब होते.

आवळ्याची कोशिंबीर
साहित्य : मोठ्या आकाराचे आवळे ८-१०, वाटीभर गूळ (बारीक चिरलेला), ५-६ चमचे लाल तिखट (शक्‍यतो बेडगी मिरचीचे तिखट वापरावे. रंग छान येतो.) चवीपुरते मीठ.
कृती : आवळे स्वच्छ धुऊन पुसून घ्यावेत. आता या आवळ्यांचा किस करावा. त्या किसामध्येच तिखट, मीठ व बारीक चिरलेला गूळ घालून व्यवस्थित हलवून घ्यावे. त्यावर वरुन मोहरी, हिंग, हळद व जिरे घालून खमंग फोडणी घालावी व पुन्हा व्यवस्थित हलवून घ्यावे. फोडणी घातल्यानंतर कोशिंबिरीला थोडे पाणी सुटते. ही कोशिंबीर काचेच्या भांड्यात ठेवावी. फ्रीजमध्ये ठेवल्याने ३-४ दिवस खाता येते.    

फोटो फीचर

संबंधित बातम्या