आंबट चवीचे पौष्टिक पदार्थ

जयबाला परुळेकर
सोमवार, 20 मे 2019

फूड पॉइंट
उन्हाळ्याच्या दिवसांत आंबट चवीचे पदार्थ, म्हणजे चिंच, कैरी द्राक्षे, संत्री इत्यादी खावेत किंवा पेये करून प्यावेत. यामुळे अंगाचे तापमान संतुलित राहते. उष्णता वाढत नाही. त्वचेला दाह होत नाही. आइस्क्रीम किंवा कोल्ड्रिंक पिण्यापेक्षा या गोष्टींचा उपयोग शरीराला जास्त होतो. 

चिंचेचे सार 
साहित्य : अर्धा वाटी चिंचेचा कोळ, आवडीप्रमाणे गूळ, चवीनुसार मीठ, तूप, हिंग, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, २-३ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी आले-खोबरे (अर्धा नारळ).
कृती : एक ते दोन चमचे साजूक तूप तापवून त्यात हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता फोडणीला टाकावे. त्यावर चिंचेचा पातळ कोळ टाकावा. त्यात मीठ व गूळ घालून उकळत ठेवावे. अर्ध्या नारळाच्या खोबऱ्यात २-३ मिरच्या टाकून मिक्‍सरमध्ये वाटून छान रस काढावा. हा रस वरील मिश्रणात ओतावा. पाच मिनिटे ढवळत राहून गॅस बंद करावा. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. लसूण आवडत असल्यास फोडणी वरून द्यावी किंवा १-२ पाकळ्या खोबऱ्याचा रस काढताना घालाव्यात.

कैरीचे सार 
साहित्य : एक मोठी कैरी साल काढून बाठा काढून चार तुकडे, १ छोट्या नारळाचे खोबरे, अर्धा चमचा धने, ४-५ मिरी, अर्धा चमचा मोहरी, ५-६  मेथी दाणे, फोडणीसाठी तूप किंवा तेल, मीठ, गूळ, हळद, तिखट.
कृती : छोट्या फोडणीच्या कढईत मोहरी व मेथी दाणे भाजून (एक मिनीट फक्त) घ्यावे. ही भाजलेली मोहरी, मेथी, धने, मिरी, जेवढी आमटी करायची त्या अंदाजाने हळद, तिखट, मीठ सर्व थोडे पाणी घालून मिक्सरमधून वाटावे व हे मिश्रण कैरीच्या फोडींना लावावे. पातेल्यात तूप किंवा तेल (एक मोठी चमचा) तापवून त्यात हिंग व जराशी मोहरी टाकून मसाला लावलेल्या फोडी घालून लगेच पातेले हलवावे किंवा ढवळावे, नाहीतर मसाला जळेल. त्यात मिक्‍सर धुऊन पाणी घालावे. कैरीबरोबर बाठाही घालावा. काही जणांना तो बाठा चविष्ट लागतो, म्हणून आवडीने खातात. गूळ घालावा. कैरी शिजेपर्यंत अर्ध्या नारळाचे खोबरे मिक्‍सरमध्ये बारीक वाटावे. ते वाटण कैरीवर घालावे. थोडे उकळू द्यावे. दुसऱ्या अर्ध्या नारळाचा रस काढून तो घालून २ मिनिटे उकळावे. जास्त उकळल्यास आमटी फुटते. बिघडते. जेवायला उशीर होणार असल्यास चव घ्यावी. आंबट वाटल्यास कैऱ्या व बाठा बाहेर काढून वाटीत ठेवावा. काहीजण त्यात गूळ घालून कुस्करून खातात.

पनक 
साहित्य : सहा लिंबे, गूळ चवीप्रमाणे, मिरी पावडर, वेलची पावडर, आल्याचे २-३ छोटे तुकडे.
कृती : लिंबाचा रस काढावा. गूळ, मिरी पावडर, वेलची पावडर, आल्याचे तुकडे सर्व एकत्र वाटून ते मिश्रण एका बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. लागेल तेव्हा, हवे तेवढे पाणी घालून ढवळून सर्व्ह करावे.

कैरीची चटणी (प्रकार १) 
साहित्य : कैरीचे साल काढून बाठा काढून २-३ मोठे तुकडे बारीक चिरून घ्यावे. अर्ध्या नारळाचे ओले खोबरे, मीठ व साखर चवीप्रमाणे, ३-४ ओल्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर थोडी जास्त.
कृती : कैरीचे तुकडे, मीठ, साखर, मिरच्या, कोथिंबीर, सर्व एकत्र वाटावे. त्यात नंतर खोबरे घालून पुन्हा हवे तसे जाड किंवा बारीक वाटावे. याच चटणीत कोथिंबीर न घालता थोडे जिरे घालून वाटली, की उपवासासाठी होते.

कैरीची चटणी (प्रकार २)
साहित्य : कैरीची साल काढून २-३ मोठे तुकडे बारीक चिरून लाल मिरच्या किंवा तिखट, मीठ, साखर चवीप्रमाणे, अर्ध्या नारळाचे ओले खोबरे, लसूण २-३ पाकळ्या.
कृती : कैरीच्या फोडी, तिखट, मीठ, लसूण पाकळ्या, साखर सर्व एकत्र बारीक वाटावे. नंतर खोबऱ्याची जाड किंवा बारीक आवडीप्रमाणे चटणी वाटावी. कैरीची चटणी वाटून उरलेली कैरी डाळीच्या किंवा कोळंबीच्या किंवा करंदीच्या आमटीत घालून अधिक चव येते.

कैरीचा मिल्कशेक 
साहित्य : दोन-चार मोठा कैऱ्या साल काढून मऊ होईपर्यंत उकडाव्यात. २ वाट्या साखर किंवा चवीप्रमाणे कमी-जास्त, चवीनुसार मीठ, वेलची पावडर, केशर (ऐच्छिक), दूध लागले तेवढे.
कृती : उकडलेल्या कैऱ्यांचा गर, साखर व मीठ मिक्‍सरमध्ये एकजीव करून घ्यावा. वेलची पावडर व केशर घालावे. हे मिश्रण फ्रीजमध्ये काचेच्या बरणीत भरून ठेवावे. आयत्यावेळी हवे असेल, तेव्हा त्यातील ४-५ चमचे घेऊन त्यात थंड दूध घालून हाताने किंवा मिक्‍सरमध्ये एकजीव करून एखादा बर्फाचा खडा घालून द्यावे.

संत्र्याचा मिल्कशेक 
साहित्य : डझनभर संत्र्यांची साल व बी काढून नुसता गर घ्यावा. साखर, संत्री आंबट गोड कशी असतील त्याप्रमाणे, मीठ चवीप्रमाणे (१ चिमूटभर), वेलची पूड किंवा आवडीप्रमाणे मिरपूड, दूध लागेल तसे.
कृती : संत्र्याचा गर, साखर, मीठ, वेलची, मिरी पूड सर्व मिक्‍सरमध्ये एकजीव करावे. वरील सर्व मिश्रण काचेच्या बरणीत/बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवावे. आयत्यावेळी त्यात हवे असेल, तेव्हा व तेवढे दूध घालावे. हाताने किंवा मिक्‍सरमध्ये एकजीव करावे. बर्फाची एखादी क्‍यूब टाकून सर्व्ह करावे.

व्हर्जिन मोहितो
साहित्य : दोन मुठी पुदिन्याची पाने, २ लिंबाच्या फक्त साली, मीठ चवीनुसार, पातेलभर पाणी थंड, स्प्राईटची बाटली किंवा पिण्याचा सोडा.
कृती : पुदिन्याची पाने स्वच्छ धुऊन ठेचून घ्यावी व पातेल्यातील पाण्यात टाकावी. लिंबाच्या साली ठेचून पाण्यात टाकाव्यात. नंतर मीठ टाकावे. फ्रीजमध्ये ५-६ तास पातेले ठेवावे. त्यात पुदिना व लिंबाच्या सालीचा ॲरोमा उतरला पाहिजे. त्यानंतर दुसऱ्या पातेल्यात ते पाणी गाळून ओतावे. त्यात स्प्राईट घालावे, ढवळून लगेच सर्व्ह करावे. जेवढ्या माणसांना द्यायचे असेल, तेवढे पुदिना, लिंबाच्या साली व स्प्राईटचे प्रमाण कमी-अधिक करावे. फारशी खटपट न करता एक वेगळे पेय होते.

संबंधित बातम्या