बहुरंगी खीर, ज्वारीचा पिझ्झा

जयश्री कुळकर्णी, चाळीसगाव
सोमवार, 11 मार्च 2019

फूड पॉइंट
जेवणानंतर खाण्यासाठी काहीतरी गोड हवे असते. अशाच काही गोड पदार्थांच्या वेगळ्या रेसिपीज इथे देत आहोत. तसेच संध्याकाळी स्नॅक्‍स म्हणून खाता येतील अशाही काही पदार्थांच्या सहजसोप्या रेसिपीज देत आहोत.
 

बहुरंगी खीर
साहित्य : एक लिटर दूध, अर्धी वाटी बारीक रवा, २ चमचे मैदा, पाव वाटी खवा, दीड वाटी साखर, पाव वाटी ओले खोबरे, बेदाणे, बदाम, खाण्याचे निरनिराळे रंग, कॉर्नफ्लोअर.
कृती : रव्यात थोडे तूप घालून रवा व मैदा भाजावा. गरम असतानाच त्यात पाऊण वाटी साखर, खोवलेले खोबरे व खवा घालून अगदी मंद विस्तवावर गोळा होईपर्यंत परतावे. खाली उतरवून जितके रंग घालावयाचे असतील तितके शिजवलेल्या गोळ्याचे भाग करून त्या प्रत्येकात तो तो रंग घालावा. सर्व भाग चांगले मळून घ्यावेत. नंतर 
तुपाचा हात लावून प्रत्येक रंगाच्या गोळ्याच्या चण्याएवढ्या बारीक बारीक गोळ्या 
तयार करून त्या हाताने घट्ट वळून ठेवाव्यात. गोळ्या सैल झाल्यास त्या दुधात घातल्यावर फुटण्याचा संभव आहे. दूध आटवून ते पाऊण लिटर करावे. त्याला थोडे कॉर्नफ्लोअर लावून दाटपणा आणावा. नंतर राहिलेली साखर, बेदाणे, बदामाचे काप व वरील निरनिराळ्या रंगाच्या गोळ्या उकळत्या दुधात घालून उकळी आणावी व खाली उतरवून ठेवावे. 

गोकूळ पिठे
साहित्य :  एक वाटी ओले खोबरे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी खवा, ६ चमचे साखर, अर्धी वाटी मैदा, पाक करण्यासाठी १ वाटी साखर.
कृती : खवा, खोबरे व सहा चमचे साखर एकत्र करून मऊसर गोळा होण्याइतपत शिजवून घ्यावे. हे मिश्रण थंड झाल्यावर त्याचे पेढ्याच्या आकाराचे गोळे तयार करावेत. मैद्यात दोन चमचे गरम तूप घालून एकसारखे मिसळून दूध घालावे. भज्याच्या पिठाइतपत पातळ होईल या बेताने दूध घालून पीठ करावे. नंतर गॅसवर तूप तापवून घ्यावे. मैद्याच्या पिठात करून ठेवलेले गोळे बुडवावेत व तापत ठेवलेल्या वनस्पती तुपातून बदामी रंगावर तळून काढावेत. एक वाटी साखरेचा दोन तारी पाक करून त्यात तळलेले गोळे सोडावेत. काही वेळ थांबून पाकातून गोळे बाहेर काढून ठेवावेत. हे गोळे म्हणजेच गोकूळ पिठे. हा बंगाली पदार्थ आहे.

फळांचा तिरंगी शाही पुलाव
साहित्य : अर्धा किलो बासमती तांदूळ, १०० ग्रॅम खवा, वाटीभर मलई, १५० ग्रॅम साखर, संत्री, सफरचंद, अननस, आंबा व चिकूच्या प्रत्येकी १ वाटी फोडी, ४-४ चमचे बदाम, चारोळी, काजूचे तुकडे, केशरी, हिरवा रंग, वासाकरिता ८-१० केशर काड्या दुधात खलून, १ चमचा वेलदोडे पूड, २ चमचे तूप, ५-६ लवंगा.
कृती : तांदूळ साफ करून दोन तास धुऊन निथळत ठेवावे. फळांचे तुकडे करून ठेवावेत. खवा मंद आचेवर गुलाबी रंगावर भाजून घ्यावा. त्यात चवीप्रमाणे साखर घालून त्याचे बारीक गोळे बनवावेत. मलई व साखर फेटून घ्यावी. बदाम, काजू, चारोळी निवडून घ्यावे. बेताचे पाणी घालून भात मोकळा शिजवून घ्यावा. तयार झाला, की ताटात काढावा व थंड होऊ द्यावा. नंतर एक जाड बुडाचे पातेले गॅसवर ठेवून त्यात तूप घालून लवंग टाकावे. आच मंद ठेवावी. भातात साखर घालून भात सारखा करावा. त्याचे तीन भाग करावेत व एका भागात केशरी, एकात हिरवा रंग घालावा. एक तसाच पांढरा ठेवावा. नंतर पातेल्यात एक इंच भाताचा थर लावावा. एक इंच भाताच्या थरावर वेगवेगळ्या फळांच्या फोडी पसराव्यात. त्यावर चमच्याने मलई पसरावी. मधूनमधून खव्याचे गोळे, काजू, बदाम, चारोळी, बेदाणा, वेलची पूड टाकावी. याप्रमाणे सर्व भात रचावा व मंद आचेवर दणदणून वाफ काढावी.

जगन्नाथ
साहित्य : एक वाटी कच्चे पोहे, ३ वाट्या मैदा, अर्धी वाटी खवा, पाव वाटी खसखस, १ वाटी किसलेले सुके खोबरे, २ वाट्या पिठीसाखर, पाव चमचा जायफळ पूड किंवा वेलदोडे, तूप, मीठ.
कृती : पोहे तळून घ्यावेत. खोबरे भाजून व कुटून घ्यावे. खसखस भाजून कुटावी. खवा तांबूस रंगावर भाजावा. नंतर पोहे खसखस, खोबरे, खवा, जायफळ, वेलदोड्याची पूड एकत्र मिसळून सारण करावे. मैद्यात पाव वाटी तूप, चवीप्रमाणे मीठ आणि पुरेसे पाणी घालून मैदा घट्ट भिजवावा. मैद्याच्या पुऱ्या लाटून त्यावर तयार केलेले थोडे सारण घालावे. पुऱ्यांचे तोंड दाबून बंद करून गोळे करावेत. हे गोळे तुपातून तळून काढावेत.

ज्वारी-तांदूळ पिठीचा पिझ्झा
साहित्य : एक वाटी ज्वारीचे पीठ, १ वाटी तांदूळ पिठी, २ कांदे, २ टोमॅटो, २ काकड्या, आले, लसूण, हिरवी मिरची, अमूल बटर, ६ चीज क्‍युब्ज, कोथिंबीर, एक वाटी टोमॅटो सॉस, तेल.
कृती : कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. काकडीच्या गोल चकत्या करून घ्याव्यात. आले, लसूण, मिरची, कोथिंबीर वाटून घ्यावे. एक चमचा अमूल बटरमध्ये निम्मा कांदा, टोमॅटो परतून घ्यावा. बाकीचा कांदा, टोमॅटो कच्चा ठेवावा. परतलेल्या कांदा, टोमॅटोमध्ये वाटलेले आले, मिरची, लसूण व मीठ घालून परतावे. परतलेल्या मिश्रणामध्ये ज्वारीचे पीठ, तांदूळ पिठी घालावी. थोडे ओलसर भिजवून ठेवावे. डोशाच्या पिठाइतपत सैल करावे. फ्रायपॅनमध्ये बटर घालून पीठ पसरावे. धिरड्यासारखे घालावे. दुसरी बाजू उलटून पुन्हा बटर घालून भाजावे. भाजलेल्या बाजूवर सॉस घालावा. कांदा, टोमॅटो, काकडी पसरावी. थोडा चाट मसाला भुरभुरावा. वरून कोथिंबीर, चीज घालून सजवावे. चार तुकडे करून पिझ्झा गरम खायला द्यावा. ज्वारी, तांदूळ पिठीमुळे पिझ्झा कुरकुरीत होतो. टोमॅटो सॉसबरोबर पिझ्झा छान लागतो.

सांजोरी वडा
साहित्य : दोन वाट्या रवा, २ वाट्या चण्याचे पीठ, १ वाटी हिरव्या मटारचे दाणे, ३ चमचे तीळ, अर्धी वाटी सुके किसलेले किंवा ओले खोवलेले खोबरे, १ इंच आल्याचा तुकडा, ७-८ लसूण पाकळ्या, ६-७ हिरव्या मिरच्या, २० ते २५ विड्याची पाने, काजू किंवा चारोळी, कोथिंबीर, पापडखार, तेल.
कृती : रवा तेलात भाजून घ्यावा. नंतर नेहमीप्रमाणे फोडणी करून त्यामध्ये मटारचे दाणे घालावेत व चांगली वाफ आल्यावर त्यात रवा घालावा. तसेच त्यात तीळ, सुके किंवा ओले खोबरे, काजूचे तुकडे किंवा चारोळी (जरा भाजून) घालावी. मिरच्या, आले, लसूण वाटून घालावे. चवीपुरते मीठ व साखर घालून दोन वाट्या पाणी घालावे. चांगली वाफ आल्यावर हे रव्याचे शिजवलेले सारण विड्याच्या पानात भरून विड्याच्या पानाची दुमडून घडी करावी व त्याला लवंग टोचावी. डाळीच्या पिठात तिखट, मीठ, हळद, पाव चमचा पापडखार व दोन चमचे तेल घालून आणि पाणी घालून भज्याच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवावे. त्या पिठात विड्याच्या पानांचा वडा बुडवून तळावा.

बहुगुणी कटलेट
साहित्य : मध्यम आकाराचे ३ उकडलेले बटाटे, २ वाट्या मूग, मटकी, कोबी व गाजराच्या किसाचे मिश्रण, लसूण-मिरची-आले पेस्ट, नाचणी पीठ, ज्वारी पीठ, धने, जिरे पावडर, मीठ, चवीनुसार गूळ, बारीक रवा, तेल.
कृती : बटाटे सोलून परातीत त्याचा लगदा करावा. मूग, मटकी व गाजराचा कीस शिजवून घ्यावा. लगद्यात कीस, पेस्ट, नाचणी व ज्वारी पीठ, धने, जिरे पावडर, मीठ, गूळ घालून चांगले मळावे. बारीक रव्यावर या मिश्रणाचे कटलेट थापावेत. कटलेट फ्रायपॅनला तेल लावून खरपूस भाजावेत. टोमॅटो सॉसबरोबर छान लागतात.

पालक स्प्रिंगरोल
साहित्य : पालकाची १०-१२ मोठी पाने, १ कांदा, १ वाटी मटार दाणे, १ बटाटा, १ चमचा आले-लसूण वाटण, १ चमचा तिखट अगर ४-५ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी कॉर्नफ्लोअर, अर्धी वाटी मैदा, मिरपूड, मीठ, तेल.
कृती : पालकाची पाने उकळत्या पाण्यात अर्धा मिनिटे ठेवून लगेच काढावीत. बटाटा, कांदा बारीक चिरून घ्यावा. दोन चमचे तेलात मोहरी, हिंग, जिरे घालून फोडणी करून त्यात कांदा, बटाटा, मटार दाणे घालून चांगले मऊ शिजवून घ्यावे. आले-लसूण वाटण, तिखट, मीठ, हळद घालून सारण तयार करावे. सारण थंड झाल्यावर हाताने कुस्करून मऊ करून घ्यावे. कॉर्नफ्लोअर, मैदा एकत्र करून त्यात चवीपुरते तिखट, मीठ घालावे. नंतर हे मिश्रण भज्याच्या पिठाइतपत सैल भिजवावे. पालकाच्या पानावर कांदा, बटाटा, मटार मिश्रण पसरून त्याची गुंडाळी करावी. कॉर्नफ्लोअरच्या पिठात गुंडाळी बुडवून तेलात तळावी. खरपूस तळलेल्या गुंडाळीचे सुरीने दोन भाग करावेत. टोमॅटो सॉस अगर पुदिना चटणीबरोबर पालक स्प्रिंग रोल सर्व्ह करावेत. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या