चविष्ट आणि खमंग 

कल्याणी भातंबरेकर, हैदराबाद
सोमवार, 25 नोव्हेंबर 2019

फूड पॉइंट 
रोजच्या जेवणात तीच ती पोळी भाजी असेल, तर छोटी मुलेच काय पण घरातील मोठ्या व्यक्तीदेखील जेवणाची टाळाटाळ करतात. त्यामुळे नेहमीच्या भाज्यांपासूनच थोडे वेगळे काही करण्याची गरज असते. भाज्या कोणत्याही असोत त्यांना नेहमीपेक्षा जरा वेगळा तडका दिला, की मग मात्र सर्वजण ती चवीने खातात... अशाच काही चविष्ट आणि खमंग रेसिपीज...
कल्याणी भातंबरेकर, हैदराबाद

ओल्या अंबाडीची भाजी
साहित्य : अंबाडीची लहान जुडी, अर्धी वाटी ज्वारीच्या कण्या, पाव वाटी हरभरा डाळ, १०-१२ पाकळ्या लसूण, अर्धा इंच आले, ५-६ हिरव्या मिरच्या, २ चमचे धने, १ चमचा जिरे, मीठ 
कृती : अंबाडीची भाजी निवडून फक्त पाने घ्यावीत. धने, जिरे मिक्‍सरवर बारीक वाटून घ्यावेत. त्यातच आले, लसूण, मिरची घालून वाटावे. ज्वारीच्या कण्या व हरभरा डाळ अर्धा तास वेगवेगळी भिजत घालावी. एका पातेल्यात ज्वारीच्या कण्या, डाळ, २ वाट्या पाणी घालून शिजायला ठेवावे. डाळ शिजत आल्यावर त्यात चिरलेली अंबाडीची भाजी घालावी. नंतर वाटलेली पेस्ट घालावी व मीठ घालून झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. फोडणीच्या पळीमध्ये २ चमचे तेल घालून लसूण व जिरे घालून फोडणी करावी. फोडणी गरम असतानाच भाजीवर घालावी आणि गरम गरम भाकरीसोबत सर्व्ह करावी.


पालक छोले  
साहित्य : रात्रभर भिजवलेले १५० ग्रॅम छोले, अर्धी जुडी पालक, ३-४ टोमॅटो, २ कांदे, अर्धी वाटी कोथिंबीर, २ चमचे धने-जिरेपूड, मीठ, तेल. 
कृती : सर्वप्रथम कांदा, टोमॅटो आणि पालक चिरून घ्यावा. गॅसवर एका भांड्यात तेल गरम करून त्यात लसूण, कांदा, टोमॅटो परतून घ्यावे. नंतर तिखट, धने-जिरेपूड घालून चिरलेला पालक घालून पुन्हा परतावे. शेवटी छोले, मीठ, कोथिंबीर घालून थोडे पाणी घालून झाकण ठेवून मंद आचेवर शिजवून घ्यावे. तयार पालक छोले गरमगरम फुलक्‍याबरोबर सर्व्ह करावे.


शेंगदाणा भेळ  
साहित्य : एक वाटी शेंगदाणे(रात्रभर भिजवलेले), १ वाटी मटार दाणे, अर्धी वाटी स्वीट कॉर्न, चवीनुसार लिंबाचा रस, १ चमचा लसूण-मिरची पेस्ट, कोथिंबीर, किसलेली कैरी, मीठ, चाट मसाला(ऐच्छिक). 
कृती : शेंगदाणे, मटार, स्वीट कॉर्न एकत्र करून त्यात लिंबू रस व मीठ घालून कुकरमध्ये पाणी न घालता एकत्र वाफवून घ्यावे. नंतर एका बाऊलमध्ये काढून त्यात मिरची-लसूण पेस्ट आणि मीठ घालावे. सर्व्ह करताना वरून कैरीचा कीस, कोथिंबीर व चाट मसाला पेरावा.


झटपट मूग पालक  
साहित्य : एक जुडी चिरलेला पालक, अर्धी वाटी मुगाची डाळ, टोमॅटो, लाल सुकी मिरची, आले-लसूण पेस्ट, जिरे, हिंग, मीठ, बारीक चिरलेला कांदा आणि तेल 
कृती : गॅसवर कुकर ठेवून त्यामध्येच तेल गरम करून जिरे, हिंग, लाल सुकी मिरची, आले-लसूण पेस्ट, कांदा टाकून परतावे. त्यात कापलेला टोमॅटो टाकून परतावे व नंतर पालक टाकावा. नंतर मूगडाळ टाकून मीठ, गरम मसाला टाकावा आणि कुकरच्या दोन शिट्ट्या कराव्यात. आवश्‍यक असल्यास वरून लसणाची फोडणी द्यावी व गरमगरम भाताबरोबर सर्व्ह करावी.


हेल्दी पराठा  
साहित्य : दोन वाट्या गव्हाचे पीठ, पाव वाटी डाळीचे पीठ, १ वाटी पालक प्युरी, अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा तिखट. 
सारण : प्रत्येकी १ वाटी किसलेले गाजर, बीट, पनीर, १ चमचा धने-जिरेपूड, १ चमचा गरम मसाला, १ चमचा तिखट, अर्धी वाटी कोथिंबीर, मीठ, तेल. 
कृती : तेल गरम करून त्यात गाजर, बीट आणि पनीरचा कीस घालून परतावे. धने-जिरेपूड, मीठ, गरम मसाला, कोथिंबीर घालून कोरडे परतून घ्यावे. सारण थंड होण्यासाठी ठेवावे. पिठामध्ये मीठ, तिखट, ओवा, पालक प्युरी घालून सर्व एकत्र करून चांगले मळून घ्यावे. पोळीमध्ये सारण भरून ती लाटून घ्यावी. थोड्या तुपावर खरपूस भाजून घ्यावी. दही किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावी.


पौष्टिक मटार करंजी  
साहित्य : एक वाटी कणीक, पाव वाटी मैदा, पाव वाटी नाचणी सत्त्व, २ चमचे मक्‍याचे पीठ. 
सारण : एक वाटी वाफवलेले मटार, २ उकडलेले बटाटे, १ बारीक चिरलेला कांदा, १ चमचा आले-लसूण पेस्ट, १ चमचा हिरवी मिरची किंवा तिखट, धने-जिरेपूड. 
कृती : तेलाची फोडणी करून त्यात कांदा, आले-लसूण पेस्ट, मिरची घालून परतावे. बटाटे कुस्करून त्यात मटार घालावेत. त्यात इतर सर्व साहित्य घालून सारण थंड करून घ्यावे. पारीसाठी सर्व पिठे एकत्र करून त्यात तेलाचे मोहन घालून पीठ घट्ट भिजवावे. छोट्या पुऱ्या लाटून सारण भरून लहान करंज्या कराव्यात आणि मंद आचेवर खरपूस तळून घ्याव्यात.


पूड चटणी  
साहित्य : एक वाटी हरभरा डाळ, १ वाटी उडीद डाळ, सव्वा वाटी तीळ, पाऊण वाटी धने, पाव वाटी जिरे, ७० ग्रॅम अमसूल पावडर, १ सपाट वाटी गूळ, तिखट आणि मीठ. 
कृती : सगळ्या डाळी भाजून त्यांचा बारीक भरडा करून घ्यावा. एका भांड्यात गरम तेलात धने, तीळ, तिखट भाजून घ्यावे. तसेच भरडादेखील तेल टाकून चांगला भाजून घ्यावा. तीळ, धने, भरडा, गूळ, तिखट, अमसूल पावडर आणि मीठ एकत्र करून मिक्‍सरमधून बारीक करून व्यवस्थित हालवून घ्यावे. थंड झाल्यावर हवाबंद डब्यात भरून ठेवावे. ही चटणी कुठल्याही भाजीची चव वाढवायला मदत करते.

संबंधित बातम्या