चटपटीत रेसिपीज

मनाली पालकर, सातारा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

फूड पॉइंट
दिवाळीत गोडधोड, तिखट असा फराळ खाऊन कंटाळा आलाय का? आणि दिवाळीतला फराळ अजूनही उरला आहे का? मग, या चटपटीत रेसिपीज नक्की ट्राय करा...
 

अनारशाची साटोरी  
साहित्य : १) आवरणासाठी - एक मोठी वाटी बारीक रवा, १ चमचा मैदा, चिमूटभर मीठ व साखर, १ चमचा तूप (मोहनासाठी), १ चमचा दूध, १ चमचा पाणी व तेल तळण्यासाठी (२) सारणासाठी : सात-आठ अनारसे, ४-५ पेढे, १ चमचा तूप. 
कृती : प्रथम एका परातीमध्ये बारीक रवा, मैदा, मीठ व साखर एकत्र करून घ्यावे. आता त्यात तुपाचे मोहन घालावे. दूध-पाणी एकत्रित करून वरील मिश्रणात घालून मिश्रण घट्ट मळून घ्यावे. १ तास झाकून ठेवावे. आता सारण करण्यासाठी कढईमध्ये तूप गरम करून त्यात पेढे कुस्करून घालावेत व खमंग परतून घ्यावेत. नंतर त्यामध्ये अनारशांचा चुरा करून घालावा व मिश्रण एकजीव करून परतून घ्यावे (मिश्रण जास्त तुपकट वाटल्यास चमचाभर बारीक रवा घालून परतून घ्यावे). हे मिश्रण गार करून घ्यावे. आता मळलेले पीठ पुन्हा एकदा मळून घ्यावे व त्याच्या लाट्या करून घ्याव्यात. दोन लाट्या घेऊन त्या पुरी एवढ्या आकारात लाटून घ्याव्यात. एका लाटलेल्या पारीवर सारण व्यवस्थित पसरून घ्यावे. त्यावर दुसरी पारी ठेवून व्यवस्थित दाबून घट्ट बंद करून घ्यावी. (याला मुरड घातली तर छान दिसते) अशी ही साटोरी मध्यम आचेवर खमंग तळून घ्यावी. 


आलू-चकली टिक्की चाट  
साहित्य : दोन मोठे उकडलेले बटाटे, ८-१० चकल्या, १ कांदा, २ चमचे आले-लसूण-मिरची पेस्ट, १ चमचा चाट मसाला, १ चमचा काळे मीठ, १ चमचा धने-जिरेपूड, मूठभर कोथिंबीर, बारीक रवा, कॉर्नफ्लोअर गरजेनुसार, तळण्यासाठी तेल, मीठ चवीनुसार. 
कृती : प्रथम चकल्या मोडून छोटे तुकडे करावेत. त्यात उकडलेले बटाटे कुस्करून घालावेत. नंतर त्यामध्ये आले-लसूण-मिरची पेस्ट, बारीक चिरलेला कांदा, सर्व मसाले, चवीनुसार मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आता यामध्ये गरजेनुसार कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण नीट मळून घ्यावे. या मिश्रणाच्या गोल टिक्की करून घ्याव्यात. या टिक्की रव्यामध्ये घोळवून खमंग तळू घ्याव्यात व टोमॅटो सॉस अथवा पुदिना चटणीबरोबर सर्व्ह कराव्यात.


फराळी मिक्‍स भेळ  
साहित्य : दोन वाट्या चिवडा, १ वाटी शेव, ५-६ चकल्यांचे तुकडे, अर्धी वाटी खारी शंकरपाळी, १ मोठा कांदा, १ टोमॅटो, १ लहान उकडलेला बटाटा, मूठभर कोथिंबीर, २ चमचे चिंच-खजुराची चटणी, अर्धा चमचा लसूण-मिरची पेस्ट, १ चमचा पुदिना चटणी, १ चमचा चाट मसाला, अर्धा चमचा काळे मीठ, तिखट चवीनुसार. 
कृती : एका भांड्यात चिवडा, चकली, खारी शंकरपाळी व थोडी शेव घेऊन त्यात चाट मसाला, काळे मीठ व तिखट घालून व्यवस्थित मिक्‍स करून घ्यावे. आता त्यात कांदा, टोमॅटो बारीक चिरून घालावा. उकडलेला बटाटा कुस्करून घालावा व लसूण-मिरची पेस्ट घालून मिश्रण नीट कालवून घ्यावे. नंतर त्यामध्ये चिंचेची चटणी व पुदिना चटणी घालून एकजीव करून घ्यावे. आता डिशमध्ये वरील मिक्स भेळ घेऊन त्यावर कोथिंबीर व शेव भुरभुरून डिश सर्व्ह करावी.


खस्ता चाट  
साहित्य : दोन वाट्या खारी शंकरपाळी, १ मोठा कांदा, १ मोठा टोमॅटो, १ उकडलेला बटाटा, मूठभर कोथिंबीर, अर्धी वाटी शेव, १ चमचा धने-जिरेपूड, १ चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ, अर्धा चमचा मिरची-लसूण पेस्ट, गोड दही, तिखट गरजेनुसार. 
कृती : प्रथम कांदा व टोमॅटो बारीक चिरून घ्यावे. उकडलेला बटाटा कुस्करून घ्यावा. आता खारी शंकरपाळी थोडीशी मोडून घ्यावी व त्यात चिरलेला कांदा, टोमॅटो, बटाटा, लसूण-मिरचीची पेस्ट, धने-जिरेपूड व चाट मसाला घालून मिश्रण व्यवस्थित कालवून घ्यावे. आता हे मिश्रण एका डिशमध्ये काढून त्यावर दही घालावे. नंतर तिखट, मीठ, कोथिंबीर भुरभुरावी. वरून शेव घालून सर्व्ह करावे. बरोबर चिंचेची गोड चटणी सर्व्ह करू शकता. 


कॉर्न भेळ  
साहित्य : तीन वाट्या वाफवलेले कॉर्नचे दाणे, १ मोठा कांदा, १ टोमॅटो, दीड वाटी फरसाण, गरजेनुसार शेव, मूठभर कोथिंबीर, १ चमचा चाट मसाला, १ चमचा धने-जिरेपूड, मीठ व तिखट चवीनुसार, अर्धा चमचा आमचूर पावडर, २-३ चमचे चिंच-खजुराची चटणी, १ चमचा पुदिना चटणी. 
कृती : एका भांड्यात वाफवलेले कॉर्नचे दाणे घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो घालावा. नंतर त्यात सर्व मसाले आणि तिखट-मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आता त्यात फरसाण, चिंचेची व पुदिन्याची चटणी घालून भेळ व्यवस्थित कालवून घ्यावी. नंतर एका डिशमध्ये भेळ घेऊन त्यावर शेव, कोथिंबीर व थोडासा कांदा घालून कॉर्न भेळ सर्व्ह करावी.


स्प्राऊट्‌स भेळ (प्रोटिन भेळ)  
साहित्य : प्रत्येकी १ वाटी मोड आलेले मूग व हरभरे, अर्धी वाटी भाजलेले शेंगदाणे, १ मोठा कांदा, १ टोमॅटो, १ उकडलेला बटाटा, मूठभर कोथिंबीर, अर्धा चमचा मिरपूड, प्रत्येकी १ चमचा, आमचूर पावडर, काळे मीठ, चाट मसाला, १ लिंबाचा रस, चवीनुसार तिखट. 
कृती : एका भांड्यात मूग व हरभरे घेऊन त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व बटाटा घालावा. यामध्ये सर्व मसाले व तिखट घालून मिश्रण नीट कालवून घ्यावे. यामध्ये लिंबाचा रस, शेंगदाणे व कोथिंबीर घालून भेळ सर्व्ह करावी.


चायनीज भेळ  
साहित्य : दोन पॅकेट हाक्का नूडल्स, एक वाटी कांदा, १ वाटी बारीक चिरलेला कोबी, १ मिरची, थोडीशी चिरलेली कांद्याची पात, २ चमचे आले-लसूण पेस्ट, २ चमचे शेजवान सॉस, २ चमचे टोमॅटो सॉस, १ चमचा सोया सॉस, १ चमचा रेड चिली सॉस, १ चमचा व्हिनेगर, मीठ चवीनुसार, अर्धा चमचा काळी मिरपूड 
कृती : प्रथम एका पातेल्यात ५ वाट्या पाणी व एक चमचा तेल घालून पाणी उकळून घ्यावे. त्यात चिमूटभर मीठ घालावे. नंतर त्यात नूडल्स घालून शिजवून घ्यावे. शिजवलेले नूडल्स चाळणीत काढून त्यावर थंड पाणी ओतावे. नंतर कढईत तेल गरम करून थंड झालेल्या नूडल्स कुरकुरीत तळून घ्याव्यात. आता एका कढईत २ चमचे तेल घालून त्यावर आले-लसूण पेस्ट व बारीक चिरलेली मिरची घालावी. नंतर कांदा घालून नीट परतून घ्यावा. आता गॅस मोठा करून बाकीच्या भाज्या घालून परतावे. यामध्ये सर्व प्रकारचे सॉस, व्हिनेगर व मीठ घालून मिश्रण एकजीव करून परतून घ्यावे. नंतर एका बाऊलमध्ये तळलेल्या नूडल्स मोडून घ्याव्यात. त्यावर वरील ग्रेव्ही व मिरेपूड घालून मिश्रण एकजीव करावे. वरून चिरलेली कांद्याची पात घालून डिश सर्व्ह करावी.


बनाना फिंगर चिप्स  
साहित्य : दोन कच्ची केळी, १ चमचा मीठ, थंड पाणी, १ चमचा हळद, १ चमचा चाट मसाला, १ चमचा तिखट, तळण्यासाठी तेल. 
कृती : प्रथम केळ्यांना चिरा देऊन त्याची साले काढून घ्यावीत. नंतर फिंगर चिप्सच्या आकारात केळी कापून घ्यावीत व लगेचच ती थंड पाण्यात घालावीत. यामध्ये मीठ व हळद घालून पाणी ढवळून घ्यावे. आता चाळणीमध्ये केळ्याचे काप निथळून घेऊन, गरम तेलात तळून घ्यावेत. नंतर तिखट व चाट मसाला एकत्र कालवून तो वरील कापांवर भुरभुरून घ्यावा. तयार बनाना फिंगर चिप्स टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.


बॉबी आलू चाट  
साहित्य : उभ्या बॉबी (नळ्या), ३ मोठे उकडलेले बटाटे, १ मोठा कांदा, अर्धा टोमॅटो, मूठभर कोथिंबीर, २ चमचे चाट मसाला, १ चमचा धने-जिरेपूड, १ हिरवी मिरची, मीठ व तिखट चवीनुसार, शेव (बारीक), २ चमचे चिंच-खजुराची चटणी, १ चमचा पुदिना चटणी, तेल तळण्यासाठी. 
कृती : प्रथम उकडलेले बटाटे कुस्करून घ्यावेत. नंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो व कोथिंबीर घालून चिंचेची व पुदिन्याची चटणी घालावी. नंतर यामध्ये तिखट, मीठ व मसाले घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आता एका कढईत तेल गरम करून नळ्या तळून घ्याव्यात. या नळ्यांमध्ये वरील मिश्रण भरावे व दोन्हीकडून शेवेमध्ये घोळवून घ्यावे. डिशमध्ये सर्व स्टफ केलेल्या नळ्या ठेवून वरून शेव, कोथिंबीर घालून डिश सर्व्ह करावी.    
 

संबंधित बातम्या