स्नॅक्स टाइम!

मंगला गांधी
गुरुवार, 25 मार्च 2021

फूडपॉइंट

संध्याकाळी लागणारी थोडीशी भूक भागविण्यासाठी रोज रोज नवीन काय करणार? त्यासाठीच या काही स्नॅक्स रेसिपीज... 

पौष्टिक कटलेट
साहित्य ः एक वाटी नाचणीचे पीठ, पाऊण वाटी कणीक, अर्धी वाटी ज्वारीचे पीठ, प्रत्येकी अर्धी वाटी दुधी भोपळा, कोबी, काकडी, धने-जिरे पूड, चवीनुसार मीठ, कटलेट घोळवण्यासाठी बारीक रवा, थोडी साखर. 
कृती ः प्रथम दुधी भोपळा, कोबी आणि काकडी किसून किंवा बारीक चिरून त्याला मीठ लावावे, त्यामुळे पाणी सुटेल. त्याच पाण्यात कणीक, ज्वारीचे व नाचणीचे पीठ घालून चांगले मळून घ्यावे. त्यामध्ये धने-जिरे पूड, अर्धा चमचा साखर व चवीनुसार मीठ घालावे. या मिश्रणाचे हव्या त्या आकाराचे कटलेट करून रव्यात घोळवावेत व तव्यावर तेल घालून शॅलोफ्राय करावेत. दोन्ही बाजूंनी तांबूस रंग यायला हवा. टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावे.
टीप ः भाज्यांच्या चवीकरिता तिखट घातलेले नाही, त्यामुळे चटणी थोडी तिखट करावी.

दम मिसळ
साहित्य ः एक वाटी मोड आलेली मटकी, २ बारीक चिरलेले कांदे, २ टोमॅटो, १ वाटी फरसाण, आले - लसूण - हिरवी मिरची - ओले खोबरे - कोथिंबीर याचे वाटण, कांदा-लसूण मिसळ मसाला, १ उकडलेला बटाटा, फोडणीचे साहित्य, तेल.
कृती ः पॅनमध्ये तेल नेहमीपेक्षा थोडे जास्त घ्यावे. फोडणीसाठी तमालपत्र, मोहरी, जिरे, हिंग घ्यावे. कांदा व टोमॅटो बारीक चिरून घालावा. वाटण घालून परतावे. त्यावर मोडाची मटकी घालून पुन्हा परतावे. कांदा-लसूण मिसळ मसाला घालावा व थोडे पाणी घालावे. चवीनुसार मीठ घालून झाकण ठेवावे व वाफ आणावी. सर्व्ह करताना प्रथम उसळ घालावी, मग बटाट्याच्या बारीक फोडी घालाव्यात, शेवटी फरसाण घालावे आणि सर्व्ह करावे. पुऱ्या, पाव, पोळी कशाबरोबरही छान लागते.

मधूरवडा
साहित्य ः एक वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, १ मोठा किसलेला कांदा, १ टेबलस्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, ७-८ कढीपत्ता पाने, २ हिरव्या मिरच्या, एक टीस्पून काश्‍मिरी लाल तिखट, पाव टीस्पून हिंग, मीठ, मोहनासाठी ४-५ टीस्पून गरम तेल.
कृती ः परातीत एक वाटी तांदळाचे पीठ, अर्धी वाटी बारीक रवा, किसलेला कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली कढीपत्त्याची पाने, बारीक चिरलेली हिरवी मिरची, तिखट, हिंग, मीठ घालावे. तेलाचे मोहन घालावे. कोमट पाण्यात पीठ मळून १५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर छोटे छोटे गोळे घेऊन पातळ थापावेत व तळावेत. हे वडे खुसखुशीत होतात. (पुऱ्या पोळपाटावर लाटल्या तरी चालेल.)

ज्वारीच्या खमंग वड्या
साहित्य ः दोन वाट्या ज्वारीचा रवा, १ वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, पाव वाटी खसखस, पाव वाटी चारोळी, १ टीस्पून सुंठ पूड, १ टीस्पून हिरव्या मिरच्यांचा ठेचा, १ वाटी आंबट ताक, चवीनुसार मीठ.
कृती ः ज्वारीला पाण्याचा हात लावून गिरणीतून रवा काढून आणावा. दोन वाट्या ज्वारीचा रवा एक वाटी ताकात भिजवावा. दोन वाट्या पाणी उकळत ठेवावे. पाण्याला उकळी आली की गाठी होऊ न देता भिजवलेला रवा त्यात घालावा. सुंठ पूड, हिरव्या मिरच्यांचा ठेचा, चारोळी, खसखस, खोबऱ्याचा कीस घालून छान हलवावे. त्यावर झाकण ठेवून एक वाफ आणावी. तेल लावलेल्या ताटामध्ये मिश्रण थापावे. थंड झाल्यावर पाहिजे त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात.

पपईचे सांदणे

साहित्य : एक वाटी जाड रवा, १ वाटी गूळ, अर्धी वाटी पपईच्या फोडी, १ वाटी पपईचा पल्प, केशरी रंग, १ टेबलस्पून ओल्या नारळाचा चव, १ टेबलस्पून भाजून साल काढलेले शेंगदाणे.
कृती : रवा एक टेबलस्पून तुपावर भाजून घ्यावा आणि ताटलीमध्ये काढून ठेवावा. कढईमध्ये दोन वाट्या पाणी उकळावे. त्यात एक वाटी गूळ घालावा. तो विरघळला की त्यामध्ये रवा, पपईचा पल्प आणि फोडी, केशरी रंग, थोडे शेंगदाणे आणि खोबऱ्याचा चव घालावा. हे मिश्रण घट्ट 
झाले की तूप लावलेल्या ताटामध्ये ओतावे. त्याला १० मिनिटे पुन्हा वाफ आणावी. थंड झाल्यावर हव्या त्या आकाराच्या वड्या पाडाव्यात.

मेथी मसाला पुरी

साहित्य : दीड वाटी कणीक, अर्धी वाटी मेथी, १ टेबलस्पून दही, चवीनुसार लाल तिखट, अर्धा टीस्पून हळद, मीठ, २ टेबलस्पून मोहनासाठी तेल.
कृती :  परातीमध्ये कणीक घेऊन त्यामध्ये मेथी बारीक चिरून घालावी. त्यामध्ये दही घालावे. चवीनुसार तिखट, मीठ, हळद घालावी. त्यामध्ये दोन टेबलस्पून तेल कडकडीत गरम करून घालावे. पाणी घालून पीठ मळावे व अर्धा तास झाकून ठेवावे. नंतर पिठाच्या पुऱ्या लाटाव्यात व तळाव्यात.

संबंधित बातम्या