व्हेजिटेरियन कबाब

मनाली पालकर, सातारा
सोमवार, 30 सप्टेंबर 2019

फूड पॉइंट
कबाबचे मूळ हे मध्य पूर्व देशांमधले टर्की, पर्शिया इथले; परंतु भारतामध्ये कबाब दाखल झाले ते अफगाणी टोळ्यांमुळे आणि त्यांना शाही स्वरूप प्राप्त झाले ते मुघलांमुळे. आता मात्र जगभरात याचे हजारो प्रकार पाहायला मिळतात. पण कबाब म्हटले, की आपल्या डोळ्यांसमोर मुख्यत्वेकरून नॉनव्हेजच येते. म्हणून व्हेजिटेरियन कबाबच्या सोप्या आणि खास रेसिपीज इथे देत आहोत...

उपवासाचे कबाब
साहित्य : एक उकडलेले कच्चे केळे, १ उकडलेले रताळे, ४ उकडलेले बटाटे, १ वाटी भिजलेला साबुदाणा, ३ चमचे आले-मिरची पेस्ट, प्रत्येकी २ चमचे राजगिरा-शिंगाडा-साबुदाणा पीठ, मूठभर कोथिंबीर, खसखस, जिरेपूड, आमचूर पावडर - प्रत्येकी १ चमचा, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी.
कृती : उकडलेले बटाटे, केळे आणि रताळे मॅश करून घ्यावे. त्यात आले-मिरचीची पेस्ट, चिरलेली कोथिंबीर, सर्व पिठे, जिरेपूड, आमचूर पावडर, मीठ घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे आणि त्याच्या गोलाकार टिक्की करून घ्याव्यात. या टिक्की खसखशीत घोळवून तळून घ्याव्यात आणि खोबऱ्याच्या चटणी बरोबर सर्व्ह कराव्यात.


हराभरा कबाब
साहित्य : तीन वाट्या मटार, ३ उकडलेले बटाटे, १० पालकाची पाने, मूठभर कोथिंबीर, ३ चमचे आले-हिरवी मिरची पेस्ट, कॉर्नफ्लोअर गरजेनुसार, काळी मिरी पावडर, चाट मसाला, आमचूर पावडर, काळे मीठ, धणे-जिरेपूड (प्रत्येकी एक चमचा), चवीनुसार मीठ, तेल तळण्यासाठी.
कृती : प्रथम पाणी उकळून गॅस बंद करून त्यात पालक घालून ४-५ मिनिटे झाकून ठेवावे. नंतर तो बाहेर काढून लगेच थंड पाण्यात घालून ठेवावा. आता मटार वाफवून घ्यावेत. मटार, पालक आणि बटाटा मॅश करून त्यात कोथिंबीर, आले-मिरची पेस्ट, मीठ आणि बाकीचे मसाले घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. त्यात कॉर्नफ्लोअर घालून मिश्रण मळून घ्यावे आणि त्याच्या गोलाकार टिक्की करून घ्याव्यात. सर्व टिक्की तळून घ्याव्यात आणि पुदिना चटणी अथवा टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह कराव्यात.


आलू पोहे कबाब
साहित्य : चार उकडलेले बटाटे, अर्धी वाटी जाड पोहे, १ मध्यम आकाराचा कांदा, मूठभर कोथिंबीर, १ चमचा आले-मिरची पेस्ट, चाट मसाला, आमचूर पावडर, काळे मीठ, धणे-जिरेपूड - प्रत्येकी १ लहान चमचा, २ चमचे मैदा, पाणी, तेल आणि मीठ गरजेनुसार.
कृती : उकडलेले बटाटे मॅश करून त्यात थोडेसे पोहे, चिरलेली कोथिंबीर, आले-मिरची पेस्ट आणि मीठ व बाकीचे मसाले घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. नंतर मैदा आणि पाणी एकत्र करून त्याची पातळ पेस्ट करून घ्यावी. आता वरील मिश्रणाचे लंबगोलाकार कबाब करून ते मैद्याच्या पेस्टमध्ये बुडवून उरलेल्या थोड्याशा पोह्यांमध्ये घोळवून तळून घ्यावेत.


तंदूर पोटॅटो
साहित्य : आठ-दहा बाळ बटाटे (जे दम आलूमध्ये वापरतात), ३ चमचे दही, २ छोटे चमचे क्रीम, २ चमचे आले-लसूण-मिरची पेस्ट, अर्धा चमचा पुदिना पेस्ट, गरम मसाला, धणे-जिरेपूड, हळद - प्रत्येकी अर्धा चमचा, १ चमचा कसुरी मेथी, मीठ, तेल गरजेनुसार.
कृती : बटाटे घट्ट उकडून त्याला टोचे मारून घ्यावेत. आता दही आणि क्रीम एकत्र फेटून घेऊन त्यात मीठ आणि वरील सर्व मसाले व पेस्ट घालून एकजीव करून घ्यावे. या दह्यात टोचे मारलेले बटाटे घालून अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवावेत. बटाटे सेट झालेत का ते बघावे नाहीतर अजून थोडावेळ तसेच ठेवावेत. नंतर सेट झालेल्या बटाट्यांना ब्रशने तेल लावून ओव्हनमध्ये १०० डिग्रीवर १५ मिनिटे ग्रील करून घ्यावेत.


तंदुरी शेजवान पनीर
साहित्य : एक कांदा, १ सिमला मिरची, १ टोमॅटो, २५० ग्रॅम पनीर, १ चमचा शेजवान सॉस, २ चमचे आले-लसूण-मिरची पेस्ट, १ चमचा पुदिना पेस्ट, गरम मसाला, धणेे-जिरेपूड, हळद - प्रत्येकी अर्धा चमचा, ४ चमचे दही, कसुरी मेथी, मीठ चवीनुसार.
कृती : प्रथम सर्व भाज्या आणि पनीर यांचे चौकोनी तुकडे करून घ्यावेत. आता दही फेटून घ्यावे व त्यात शेझवान सॉस, सर्व मसाले, मीठ आणि कसुरी मेथी घालून ते एकजीव करून घ्यावे. नंतर या मिश्रणात पनीर व भाज्या घालून ते नीट मिक्स करून घ्यावे. आता हे मिश्रण मॅरिनेट होण्यासाठी अर्धा ते एक तास झाकून ठेवावे. त्यानंतर पनीर आणि भाजीचे काप शॅलो फ्राय करून घ्यावेत अथवा तंदूर स्टिकमध्ये भाजी व पनीरचे काप लावून ते कोळशाच्या शेगडीवर अथवा गॅसवर धरून भाजून घ्यावेत.


स्वीट कॉर्न कबाब
साहित्य : तीन वाट्या स्वीट कॉर्नचे दाणे, २ बटाटे, १ मोठा कांदा, ४ ब्रेड स्लाइस, ३ चमचे आले-लसूण-मिरची पेस्ट, २ चमचे चाट मसाला, अर्धा चमचा तिखट, मीठ, मूठभर कोथिंबीर, बारीक रवा, कॉर्न फ्लोअर गरजेनुसार, तेल तळण्यासाठी.
कृती : बटाटे आणि स्वीट कॉर्न वाफवून घ्यावेत. हे स्वीट कॉर्न भरडीसारखे वाटून घ्यावेत. आता उकडलेले बटाटे मॅश करून त्यात वाटलेले स्वीट कॉर्न, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चाट मसाला, मीठ व तिखट घालून मिश्रण एकजीव करून घ्यावे. आता ब्रेडचे स्लाइस पाण्यातून घट्ट पिळून घेऊन वरील मिश्रणात घालून त्यात मावेल एवढे कॉर्न फ्लोअर घालून मिश्रण मळून घ्यावे. या मिश्रणाचे कबाब करून ते रव्यामध्ये घोळवून खमंग तळून घ्यावेत.   

 

संबंधित बातम्या