अळूची देठी, अमृत खंड

मीना काळे
सोमवार, 31 मे 2021


फूड पॉइंट

वेगळे पदार्थ करण्यासाठी वेगळे जिन्नस लागतात असे नाही. नेहमीच्याच भाज्यांपासून तयार केलेले हे काही हटके पदार्थ.

दुधी भोपळ्याचे सूप
साहित्य : पाव किलो दुधी भोपळा, १ कांदा, १ चमचा कणीक, १ कप दूध, मीठ, मिरपूड, थोडे किसलेले चीज.
कृती : दुधी भोपळ्याची साले काढून मोठ्या फोडी कराव्यात. कांद्याच्या मोठ्या फोडी करून त्या दुधी भोपळ्याच्या फोडींबरोबर वाफवून घ्याव्यात. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्याव्यात. कणीक कोरडी परतून घ्यावी. पातेल्यात वाटलेला दुधी भोपळा व कणीक अर्धा कप पाणी घालून उकळून घ्यावी. यात १ कप दूध घालून गरम करावे. नंतर सर्व करताना मीठ मिरपूड व चीज घालावे (हे सूप उकळताना घातल्यास दूध नासते म्हणून ते सर्व्ह करताना घालावे).

चीज पोटॅटो कप
साहित्य : चार उकडलेले बटाटे, १ सिमला मिरची, १ टोमॅटो, पाव वाटी स्वीट कॉर्नचे दाणे, १ मिरची, मीठ, मिरपूड आणि चीज.
कृती : उकडलेले बटाटे किसून त्यात मीठ व मिरची वाटून घालावी. चांगले मळून नंतर त्याच्या छोट्या आकाराच्या वाट्या करून घ्याव्यात. सिमला मिरची बारीक चिरून घ्यावी. टोमॅटो बारीक चिरावा. स्वीट कॉर्नचे दाणे वाफवून घ्यावेत. चिरलेली सिमला मिरची, टोमॅटो आणि स्वीट कॉर्नचे दाणे एकत्र करून त्यात मीठ मिरपूड घालावे. हे सारण बटाट्याच्या वाट्यांमध्ये भरून वरून किसलेले चीज घालावे. तेल लावलेल्या काचेच्या डिशमध्ये ठेवून १८० डिग्री सेंटिग्रेडला २० मिनिटे बेक करावे. चीज पोटॅटो कप स्टार्टर म्हणून सर्व्ह करावे.

अळूची देठी
साहित्य : वडीच्या अळूचे देठ, दाण्याचे कूट, खवलेला नारळ, मिरची, कोथिंबीर, मीठ, साखर, दही आणि फोडणीसाठी तेल.
कृती : अळूच्या देठाची साले काढून ती बारीक चिरून वाफवून घ्यावीत. थंड झाल्यावर फोडी हाताने कुस्करून घ्याव्यात. त्यात दाण्याचे कूट, साखर, मीठ व नारळ घालावा. थोड्या जास्त तेलाची फोडणी करून जिरे, हिंग व मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. ही फोडणी त्यावर घालून नंतर त्यात दही व कोथिंबीर घालावी. देठी कोशिंबिरीसारखी लागते. अळूची पाने वडीसाठी घेतल्यावर देठांचा असा चांगला वापर करता येतो.

अमृत खंड
साहित्य : दोन लिटर दूध, २ कैऱ्या, २ वाट्या साखर, केशर, जायफळ, काजू पाकळ्या आणि पिस्त्याचे काप.
कृती : दूध जाड बुडाच्या पातेलीत घेऊन आटवावे. साधारण निम्मे  
झाल्यावर साखर घालून, ढवळून थंड करायला ठेवावे. गार झाल्यावर फ्रीजमध्ये ठेवावे. कैऱ्या उकडून घेऊन पन्ह्याप्रमाणे त्यांचा गर काढावा. गरात साखर घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा आणि फ्रीजमध्ये ठेवावा. चांगले थंड झाल्यावर हा गर आटवलेल्या दुधात एकत्र करावा. दोन्ही खूप थंड असल्यामुळे दूध नासत नाही. नंतर त्यात जायफळ व केशर घालावे. चांगले ढवळून नंतर त्यात काजू पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घालावेत. उन्हाळ्यात हे वेगळ्या चवीचे पक्वान्न सगळ्यांना नक्की आवडेल. 

भरली कारली
साहित्य : पाव किलो कारली, अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस, १ चमचा तीळ, १ कांदा, ४ लसूण पाकळ्या, १ चमचा लाल तिखट, १ चमचा कांदा लसूण मसाला, मीठ, कोथिंबीर, थोडी साखर, तेल.
कृती : कारल्याचे साल खरवडून घ्यावे. २-२ इंचाचे गोल तुकडे करून बिया काढून टाकाव्यात. हे कारल्याचे तुकडे वाफवून घ्यावेत. मसाल्याचे सर्व साहित्य थोड्या तेलावर भाजून व वाटून घ्यावे. नंतर हा मसाला कार्ल्याच्या तुकड्यांमध्ये भरून त्या फोडी थोड्या तेलावर परताव्यात. लोखंडी कढईत परतल्यास जास्त खमंग लागतात.  

भिंडी पहाडी
साहित्य : पाव किलो भेंडी, १०० ग्रॅम पनीर, १ कांदा, १ टोमॅटो, ४ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, तेल, गरम मसाला, मीठ आणि साखर.  
कृती : भेंड्या धुऊन पुसून मध्यम आकाराच्या चिरून घ्याव्यात. १ कांदा उभा चिरून घ्यावा. टोमॅटो मध्यम आकारात चिरावा. तेलाची फोडणी करून त्यात कांदा गुलाबी रंग येईपर्यंत परतावा. त्यात लसूण पाकळ्या बारीक चिरून व मिरच्या उभ्या चिरून घालाव्यात. त्यात भेंडी घालून परतावे. भेंडी शिजल्यावर मीठ, साखर, गरम मसाला आणि लाल तिखट घालावे. नंतर पनीरचे लहान तुकडे करून घालावेत. वेगळ्या चवीची ही भाजी सुरेख लागते.

पियुष
साहित्य : एक वाटी चक्का, ४ कप दूध, १ वाटी साखर, किसलेले जायफळ, केशर आणि पिस्त्याचे काप.
कृती : चक्का, दूध आणि साखर मिक्सरमध्ये चांगले एकत्र करून घ्यावे. त्यात जायफळ पूड व केशराच्या काड्या घालाव्यात. फ्रीजमध्ये थंड करण्यास ठेवावे. पिण्यासाठी देताना उंच ग्लासमध्ये ओतून वर पिस्त्याचे काप घालावेत. वेगळ्या चवीचे हे मधुर पेय छानच लागते. घरी श्रीखंड उरलेले असल्यास त्यात दूध घालूनही पियुष तयार करता येते. अर्थातच ते जास्त चांगले लागते.

संबंधित बातम्या