पेरूचा सुधारस, मटकीच्या वड्या

मीनाक्षी केळकर
सोमवार, 29 नोव्हेंबर 2021

फूड पॉइंट

नेहमीच्याच पदार्थांपासून केलेल्या काही वेगळ्या पाककृती...

सीताफळाचे लाडू
साहित्य : एक नारळ, नारळाच्या चवाएवढी साखर, ३ ते ४ मध्यम आकाराची पिकलेली सीताफळे.
कृती : प्रथम नारळ खवून घ्यावा. त्याच्या चवाएवढी साखर घालावी. नारळ व साखर एकत्र करावे व मिक्सरमधून काढावे. मिश्रणाचा गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. सीताफळे सोलून बिया काढून टाकाव्यात. गर मिक्सरमधून काढावा. गोळा झालेल्या साखर खोबऱ्यात तो मिसळून घ्यावा. परत ते मिश्रण चांगला गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. गार झाल्यावर आपल्याला हव्या त्या आकाराचे लाडू वळावेत व सर्व्ह करावेत.

आलुबुखार बड्या
साहित्य : एक नारळ, नारळाच्या चवाएवढी साखर, ७-८ आलुबुखार, १ चमचा तूप.
कृती : प्रथम नारळ खवून घ्यावा. नारळाच्या चवाएवढी साखर घेऊन खोबऱ्यामध्ये मिसळावी. हे मिश्रण शिजवावे. गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे. आलुबुखारचे तुकडे करून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात व गर मिक्सरमधून काढून घ्यावा. खोबरे, सारखेच्या गोळ्यात आलुबुखारचा रस मिसळून परत ते मिश्रण गोळा होईपर्यंत शिजवून घ्यावे व नंतर खाली उतरवून ढवळावे. ताटाला तूप लावून घ्यावे. हाताने गोळा सारखा करून मग वड्या थापाव्यात. नंतर सारख्या आकाराच्या चौकोनी वड्या कापाव्यात. काजुकंदाच्या वडीसारखा रंग येतो.

कोथिंबिरीचे पराठे
साहित्य : अर्धी गड्डी कोथिंबीर, ४ वाट्या कणीक, १ टेबलस्पून गोडे तेल, १ टीस्पून मीठ, ४-५ हिरव्या मिरच्या, आल्याचा छोटा तुकडा, ४-५ लसूण पाकळ्या, १ छोटा चमचा हळद, हिंग, जिरे पूड.
कृती : कोथिंबीर निवडून चिरून धुऊन घ्यावी. मिरच्या, आल्याचा तुकडा, लसूण पाकळ्या व चिमूटभर मीठ हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून वाटून घ्यावे. एका पातेल्यात कणीक घेऊन त्यात हे वाटण घालावे. तेल, हळद, मीठ, जिरे पूड घालून ती सर्व कणीक कालवून घ्यावी. सर्व कोथिंबीर घालून कणीक घट्ट भिजवावी. थोडे तेल लावून मळून घ्यावी व १५-२० मिनिटे कणीक मुरू द्यावी. तवा तापायला ठेवावा. कणकेचे गोळे करून पोळ्या लाटाव्यात. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून वर तूप लावून खाण्यास द्यावेत.

रायआवळ्याच्या पोळ्या
साहित्य : दोन वाट्या बारीक रवा, २ वाट्या मैदा, १ नारळ, २ पळ्या गोडे तेल, २५-३० रायआवळे, नारळाच्या चवाएवढी साखर, १ चिमूठ मीठ, १ वाटी तांदळाची पिठी, १ मांडभर पाणी.
कृती : प्रथम नारळ खवून घ्यावा. त्याच्या चवाएवढी साखर घालून ते मिश्रण हलवून घ्यावे व मिक्सरमधून काढावे. हे मिश्रण गोळा होईपर्यंत आटवून घ्यावे. रायआवळे चिरून बिया काढून टाकाव्यात. नंतर ते मिक्सरमधून फिरवून घ्यावेत. तो रस शिजवलेल्या सारणात घालून परत ते सारण गोळा होईपर्यंत शिजवावे. पुरणाएवढे घट्ट करावे. हे सारण आदल्यादिवशीच शिजवून ठेवावे. पोळीसाठी रवा, मैदा न चिमूटभर मीठ घालून चांगले कालवावे. तेल चांगले गरम करून रवा-मैद्यावर घालावे व कालवावे. नंतर पाणी घालून ते मिश्रण घट्ट भिजवावे व अर्धा-पाऊण तास मुरू द्यावे. मग पोळ्या लाटाव्यात. गुळाच्या पोळ्यांना जशा दोन पाऱ्या घेतो, तशा घेऊन दोन्ही पाऱ्यांच्या मधे सारण भरावे. तांदळाच्या पोटीवर पिठीवर पोळी लाटावी. तवा तापला की पोळी बारीक आचेवर दोन्ही बाजूंनी खरपूस भाजावी. पोळी झाली की ती कागदावर टाकावी. पोळ्या गार झाल्या की डब्यात ठेवाव्यात व साजूक तुपाबरोबर खाण्यास द्याव्यात.

पेरूचा सुधारस

साहित्य : दोन छोटे पिकलेले पेरू, १ भांडे साखर, १ छोटा लिंबू, साखर भिजेल एवढे पाणी.
कृती : प्रथम साखरेमध्ये पाणी घालून एक तारी पाक तयार करून घ्यावा. पिकलेले पेरू मिक्सरमधून काढून घ्यावेत. तो रस पाकात घालून ढवळावे. लिंबाचा रस काढून तोही पाकात घालावा व चांगले ढवळावे आणि नंतर खाली उतरवावे.

मटकीच्या वड्या
साहित्य : अदपाव मोड आलेली मटकी, १ टीस्पून मीठ, १ टीस्पून तिखट, १ छोटा चमचा हळद, हिंग व जिरे पूड, थोडासा श्रीखंडाचा रंग, १ मोठी वाटी तेल, २ वाट्या भाजणीचे पीठ.
कृती : प्रथम मटकी मिक्सरमधून काढून घ्यावी. त्यात एक छोटा चमचा तेल, मीठ, तिखट, हळद, हिंग, जिरे पूड व रंग घालावा. पाण्याने सर्व भज्याच्या पिठासारखे कालवून कुकरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर त्यात भाजणीचे पीठ घालावे. ताटाला नेल लावून तो गोळा थापून घ्यावा. मग चौकोनी वड्या पाडून तळाव्यात. 

जांभळाचे मोदक
साहित्य : अर्धा नारळ, पावशेर जांभळे, नारळाच्या चवाएवढी साखर, १०० ग्रॅम खवा.
कृती : नारळ खवून त्यात साखर घालावी. ते मिश्रण मिक्सरमधून काढावे. जांभळे चिरून बिया काढून टाकाव्यात व मिक्सरमधून काढावीत. खवा परतून गार करायला ठेवावा. नारळ साखरेचे मिश्रण शिजवून घ्यावे. मिश्रणाचा गोळा झाला की त्यात जांभळाचा रस घालून गोळा करावा. तो गार झाला की त्यात खवा मिसळावा व त्याचे मोदक वळावेत.

मक्याच्या पुऱ्या

साहित्य : एक वाटी मक्याचे दाणे, ४ वाट्या कणीक, १ टीस्पून मीठ, १ टीस्पून तिखट, १ छोटा चमचा हळद, हिंग व जिरे पूड, तळणीसाठी २ वाट्या तेल.
कृती : मक्याचे दाणे कुकरमध्ये शिजवून घ्यावेत. शिजवलेले दाणे मिक्सरमधून काढावेत. त्यात मीठ, तिखट, हळद, हिंग, जिरे पूड घालून कालवावे. मिश्रणात मावेल एवढी कणीक घालून तेलाचा हात लावावा व घट्ट मळून घ्यावे. पुऱ्या लाटून घ्याव्यात. तेल तापवून त्यात पुऱ्या तळून घ्याव्यात. पुऱ्या छान फुगतात. दोन्ही बाजूंनी तळून घ्याव्यात आणि गरम गरम सर्व्ह कराव्यात.

संबंधित बातम्या