एग स्पेशल...

मेघा ऋषिकेश  मारणे
बुधवार, 24 जून 2020

प्रोटीनयुक्त अंडी आणि चिकन आरोग्यासाठी चांगली असतात, शिवाय चवीलाही उत्कृष्ट लागतात. नॉनव्हेजच्या चाहत्यांसाठी जिभेचे चोचले पुरविणाऱ्या खास रेसिपीज...

स्पॅनिश ऑम्लेट
साहित्य : सहा अंडी, २ कांदे, ५ बटाटे, कोबी, काळी मिरपूड, मीठ, तेल, चीज.
कृती : प्रथम कांदे, बटाटे आणि कोबी बारीक चिरून घ्यावे. नंतर एका पॅनमध्ये तेल घालून कांदा, बटाटा व कोबी मध्यम आचेवर परतून घ्यावे. बटाटा नरम होईपर्यंत शिजवून घ्यावे. हे मिश्रण गार झाल्यावर एका भांड्यात काढून घ्यावे. आता त्यात अंडी फोडून घ्यावीत. नंतर त्यात मिरपूड व मीठ चवीनुसार घालून मिश्रण चांगले मिसळून घ्यावे. नंतर एका पॅनमध्ये तेल घालून वरील मिश्रण पॅनवर पसरवून घ्यावे. आता त्यावर किसलेले चीज टाकून, त्यावर पुन्हा मिश्रण पसरून टाकावे. ऑम्लेट सेट झाले, की २ मिनिटे झाकण ठेवून दोन्ही बाजूने वाफवावे. ऑम्लेट तयार झाले, की गरम-गरम वाढावे. हे ऑम्लेट थंड झाल्यावरदेखील तितकेच चविष्ट लागते. हीच खासियत आहे या  ऑम्लेटची!

 बटर चिकन
साहित्य : चारशे ग्रॅम चिकन, कांदा, टोमॅटो, काजू पावडर, दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, हळद, गरम मसाला, चिकन तंदुरी मसाला, काळी मिरपूड, वेलची, दालचिनी, काळी मिरी, लवंग, जिरे, मध, मीठ, तेल.
कृती : प्रथम चिकन धुऊन घ्यावे. नंतर त्याचे मध्यम आकाराचे तुकडे करावेत. चिकनला दही, आले-लसूण पेस्ट, तिखट, गरम मसाला, हळद, मिरपूड, चिकन तंदुरी मसाला व मीठ घालून अर्धा-एक तास भिजत ठेवावे. नंतर हे चिकन ग्रिल करून घ्यावे. आता पॅनमध्ये तेल टाकून वरील अख्खा गरम मसाला परतून घेऊन त्यात चिरलेला कांदा व आले-लसूण पेस्ट टाकावी. हे झाल्यावर त्यात हळद, गरम मसाला, मिरपूड टाकून मिक्स करून घ्यावे. आता मसाल्याला तेल सुटले, की त्यात टोमॅटो, काजू पावडर व चवीनुसार मीठ टाकावे व मिक्स करून घ्यावे. आता या तयार केलेल्या मसाल्याला मिक्सरमध्ये बारीक वाटून नंतर ते गाळणीमधून गाळून घ्यावे. पॅनमध्ये गाळलेली प्युरी टाकून त्याला उकळी आली, की वरील ग्रिल केलेले चिकनचे पिस त्यात टाकावेत व झाकण ठेवून ५-१० मिनिटे शिजवावे. सर्वात शेवटी त्यात मध टाकावा. तयार झालेले बटर चिकन गरमगरम सर्व्ह करावे.

 मोमोज
साहित्य : मैदा, मीठ, चिकन, काळी मिरपूड, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, अंडी, तेल.
कृती : मैद्यात मीठ टाकून गरम पाण्यात मळून घेऊन तो १० मिनिटे भिजत ठेवावा. नंतर त्याचे बारीक गोळे करून पुरीप्रमाणे लाटून घ्यावे. आता त्यातील सारण तयार करण्यासाठी बोनलेस चिकन मिक्सरमधून बारीक करून त्यात मीठ, काळी मिरपूड, आले-लसूण पेस्ट, सोया सॉस, अंडे व गरम तेल घालून हे सारण एकजीव करून घ्यावे. मैद्याच्या पुऱ्यांमध्ये हे सारण मोदकाप्रमाणे भरावे व उकडून गरम तेलात तळून घ्यावेत. 

 अंड्याची भजी
साहित्य : चार अंडी, बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, हळद, धनेपूड, मीठ, तेल.
कृती : प्रथम अंडी उकडून घेऊन त्यांचे बारीक तुकडे करून घ्यावेत. बेसन पीठ, तांदळाचे पीठ, तिखट, धनेपूड, हळद व मीठ एकत्र करून त्यात थोडे थोडे पाणी घालून नेहमीप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे. आता अंड्याचा १-१ तुकडा घेऊन, पिठात बुडवून गरम तेलात तळून घ्यावा. तयार भजी टोमॅटो सॉसबरोबर खायला द्यावीत.

 एग 65
साहित्य : सहा उकडलेली अंडी, १ कच्चे अंडे, २ चमचे मैदा/कॉर्नफ्लोअर, आले, लसूण, मिरची, तिखट, हळद, गरम मसाला, काळी मिरपूड, मीठ, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस, तेल.
कृती : प्रथम उकडलेल्या अंड्यातील पिवळा बलक काढून पांढऱ्या भागाचे बारीक तुकडे करून घ्यावेत. त्यात काळी मिरपूड, तिखट, मैदा/कॉर्नफ्लोअर व कच्चे अंडे फोडून फेटून घालावे व हे मिश्रण एकजीव करून घ्यावे. आता गरम तेलात भज्याप्रमाणे तळून घ्यावेत. पॅनमध्ये तेल घालून बारीक चिरलेले आले, लसूण व मिरची परतून घ्यावे. नंतर त्यात तिखट, रेड चिली सॉस, टोमॅटो सॉस, सोया सॉस व मीठ घालून थोडे पाणी घालावे. पाणी उकळले, की त्यात वरील अंड्याची भजी सोडावीत. अशा प्रकारे तुमचे एग 65 तयार झाले.

 बैठं अंडं 
साहित्य : अंडी, कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, आले-लसूण पेस्ट, मिरची पावडर, हळद, मीठ, तेल.
कृती : प्रथम पॅनमध्ये तेल घालून कांदा, टोमॅटो लालसर परतून घ्यावे. त्यात आले-लसूण पेस्ट टाकून छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. नंतर त्यात मिरची पावडर, हळद व मीठ घालणे. हे मिश्रण संपूर्ण पॅनमध्ये पसरून त्यावर अंडी
फोडून घालावीत. आता त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे. हे बैठे अंडे असेच नुसते खाले तरी चालते. मस्त चविष्ट लागते.

 अंडा बिर्याणी
साहित्य : चार-सहा अंडी, २५० ग्रॅम तांदूळ, प्रत्येकी १ बारीक चिरलेला कांदा-टोमॅटो व बारीक चौकोनी कापलेला बटाटा, १ बारीक चिरलेली ढोबळी मिरची, हिरवी मिरची, गरम मसाला, आल्याची पेस्ट, जिरेपूड, हळद, तिखट, धनेपूड, मीठ, तेल.
कृती : तांदूळ धुऊन थोडा वेळ भिजत ठेवावेत. अंडी उकडून काही पांढऱ्या भागांवर हळद व मीठ टाकावे व ही अंडी तळून घ्यावीत. आता पॅनमध्ये तेल घालून कापलेला कांदा व मिरची टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यावा. नंतर त्यात कापलेले टोमॅटो, ढोबळी मिरची आणि बटाटा टाकून वरील सर्व मसाले टाकून मिश्रण परतून घ्यावे. आता त्यात धुतलेले तांदूळ त्याचबरोबर थोडे मीठ टाकून मिश्रण व्यवस्थित एकत्र करावे. शेवटी मिश्रणामध्ये आधी तयार केलेली अंडी टाकावीत. नंतर पुरेसे पाणी टाकून पॅनवर झाकण ठेवून २० मिनिटे शिजवून घ्यावे.

 चिकन टिक्का मसाला
साहित्य : बोनलेस चिकन, दही, आले-लसूण पेस्ट, कांदा, कोथिंबीर, काश्मिरी तिखट, मिक्स मसाला, काजू पावडर, किचन किंग मसाला, मीठ, ऑरेंज-रेड तंदूर कलर.
कृती : एका भांड्यात बोनलेस चिकन घेऊन त्यावर दही, 
तंदूर कलर, तिखट, मिक्स मसाला, आले-लसूण पेस्ट आणि मीठ टाकून मिश्रण नीट मिक्स करून घ्यावे. हे मिश्रण पॅनमध्ये तेल/तूप न घालता १० मिनिटे शिजवावे. नंतर पॅनमध्ये तेल टाकून आले-लसूण पेस्ट, वाटलेला कांदा, लाल तिखट, मिक्स मसाला, काजू पावडर व मीठ घालून एकजीव करून घ्यावे. नंतर त्यात थोडे पाणी घालून किचन किंग मसाला व तंदूर कलर टाकावा व उकळून घ्यावे. शिजवलेल्या चिकनचे पिस ग्रिल करून वरील ग्रेव्हीमध्ये घालावेत. पुन्हा थोडे पाणी घालून १० मिनिटे झाकण ठेवावे. झाला चिकन टिक्का मसाला तयार.

 अंडा तवा मसाला
साहित्य : सहा उकडलेली अंडी, २ बारीक चिरलेले कांदे, ४-५ बारीक चिरलेल्या मिरच्या, लसूण, आले, जिरे, कोथिंबीर, धने पावडर, लाल मिरची पावडर, हळद, मीठ, तेल.
कृती : कोथिंबीर, मिरची, आले, लसूण बारीक वाटून पेस्ट तयार करावी. पॅनमध्ये तेल घालून जिरे, मिरचीचा तडका देऊन त्यात अंडी दोन भाग करून घालावीत. त्यावर मिरची पावडर, हळद, मीठ घालून अंडी दोन्ही बाजूंनी परतून घ्यावीत. नंतर पॅनमध्ये तेल घालून कांदा लालसर परतून घ्यावा व त्यात मिरची पावडर, धने पावडर, हळद, मीठ व वरील पेस्ट घालून मिश्रणाला तेल सुटेपर्यंत वाट पाहावी. नंतर त्यात थोडे पाणी घालून उकळावे व फ्राय केलेली अंडी त्यात सोडून थोडी शिजवून घ्यावी. तयार झालेले अंडा तवा मसाला ज्वारीच्या भाकरीबरोबर गरमगरम वाढावे.   

संबंधित बातम्या