खमंग, रुचकर, गरमागरम

नंदिनी गोडबोले
मंगळवार, 17 जुलै 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

शाही (तिखट) चहा
साहित्य ः दूध, साखर, चहा, गवती चहा, लवंग, आलं, दालचिनी, तुळस.
कृती : एक कप पाणी, २ चमचे साखर, २ चमचे चहापत्ती, दालचिनी, आलं किसून २ लवंगा व गवती चहाचे एक पान (चिरून), २ तुळशीची पानं एकत्र करून उकळून घ्यावी. पाण्याचा रंग बदलल्यावर त्यात २ कप दूध घालावे. पुन्हा मंद आचेवर चहा उकळून द्यावा. गाळून गरम गरम पिण्यास द्यावा.

खेकडा कांदाभाजी 
साहित्य ः दोन मोठे लाल कांदे, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तेल तळायला.
कृती : कांद्याचे उभे काप करून चिरावा. सर्व काप हाताने चुरून वेगळे करावे. त्यात थोडे मीठ टाकून ५ मिनिटे बाजूला ठेवावे. कांद्याला पाणी सुटल्यावर त्यात तिखट, हळद, ओवा व मावेल एवढेच बेसन घालावे. पाणी अजिबात घालू नये. गरम तेलाचे १ मोठा डाव मोहन घालून गरम तेलात भजी तळावीत. लाल होईपर्यंत खमंग तळून सॉसबरोबर खायला द्यावी.

ब्रेडचे पकोडे
साहित्य ः ब्रेडचे स्लाईस ४, १ मोठा कांदा, २ डाव मैदा, १ चमचा तांदळाची पिठी, मिरची, मीठ, १ छोटी सिमला मिरची, १ टोमॅटो, तळायला तेल.
कृती : ब्रेडच्या स्लाईस थोड्या पाण्यात डीप करून कुस्करा करावा. त्याच बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेली सिमला मिरची, हिरवी मिरची, मीठ, तांदूळपिठी व मैदा बारीक चिरलेला टोमॅटो घालून कालवून घ्यावे. गरम तेलात हाताने कुरकुरीत होईपर्यंत पकोडे तळून घ्यावे.
टीप : शिळी ब्रेड उरली असल्यास हा पदार्थ उत्तम.

बटाटा भजी
साहित्य ः दोन बटाटे, बेसन, तिखट, हळद, मीठ, ओवा, तांदळाची पिठी.
कृती : बटाट्याची सालं काढून उभे काप करावे. दुसऱ्या बाऊलमध्ये २ वाट्या बेसन, १ वाटी पिठी, तिखट, मीठ, ओवा, हळद व पाणी घालून सरसरीत मिश्रण भिजवावे. गरम तेलाचे मोहन घालून एक-एक बटाटा काप टाकून तेलात भजी तळून काढावीत.
टीप : डीप म्हणून मेयोनिज सोबत ही भजी छान लागतात.

पेसरट्टा
साहित्य ः दोन वाट्या हिरवे अख्खे मूग, १ मोठा कांदा, आलं-लसूण पेस्ट, मीठ, मिरची पेस्ट, १ चमचा तांदूळ पिठी.
कृती : आदल्या रात्री हिरवे मूग भिजत टाकावे व दुसऱ्या दिवशी सकाळी मिक्‍सरमधून मिरची टाकून बारीक वाटून घ्यावे. त्यात मीठ, आलं, लसूण पेस्ट, थोडी पिठी, कांदा घालून एकजीव करावे. तव्यावर थोडं तेल टाकून मिश्रणाचा डोसासारखा थर टाकावा. थोडं जाड टाकलं तरी चालेल. झाकण ठेवून शिजू द्यावे. पलटवून दुसऱ्या बाजूने खमंग परतावे. पेसरट्टा मुलांच्या दृष्टीने (डब्यात) खूप पौष्टिक आहार आहे.

मेथीचा पराठा
साहित्य ः एक वाटी मेथी बारीक चिरलेली, हिरवी मिरची, मीठ, कणीक, तेल, तीळ, लसूण पेस्ट, १ उकडलेला बटाटा.
कृती : बारीक चिरलेली मेथी १ चमचा तेलात फ्राय पॅनवर क्रिस्पी होईपर्यंत परतावे. मेथीचा रंग थोडा काळपट होतो. त्यात मावेल तेवढी कणीक, मीठ, लसूण पेस्ट, तीळ, हिरवी मिरची पेस्ट व एक उकडलेला बटाटा मऊ करून भिजवावी व तेल लावून लाटून पराठे करावे. मेथी परतल्याने अतिशय खमंग पराठे होतात.

तर्री पोहा
साहित्य ः दोन वाट्या जाड पोहे, १ मोठा कांदा, मिरची, मीठ, साखर, थोडी शोप.  तर्रीसाठी : एक वाटी काळे चणे, कांदा, आलं, लसूण पेस्ट, काळा/ गोडा मसाला, तिखट, मीठ.
कृती : जाड पोहे धुऊन, उपसून कढईत फोडणी करून मीठ, साखर, त्यात कांदा, मिरची, शोप व पोहे घालून एक वाफ आणून तयार करावे. वरून कोथिंबीर घालावी.
तर्रीची कृती : आठ-दहा तास चणे भिजवून घ्यावेत. कुकरमध्ये फोडणीत कांदा, आलं, लसूण पेस्ट, तिखट व चणे घालावे. त्यात काळा मसाला व थोडं मीठ घालून पाणी घालावे. झाकण लावून ४-५ शिट्ट्या कराव्यात. प्लेटमध्ये पोहे घेऊन पातळ तर्री व चणे घालून गरम गरम खायला द्यावे.

कांद्याचे थालिपीठ (चकलीच्या भाजणीचे)
साहित्य ः दोन मोठे कांदे बारीक चिरलेले, चकलीची भाजणी, तीळ, मिरची, मीठ, तेल, कोथिंबीर.
कृती : कांदे बारीक चिरून ३ वाट्या चकलीच्या भाजणीत (चकलीची नसेल तर थालिपीठ भाजणी पण चालेल). तिखट, मिरची, मीठ, कोथिंबीर, तीळ व २ डाव तेल टाकावे. (तेल थोडं जास्त टाकलं तर थालिपीठ खुसखुशीत होतं.) तव्यावर तेल टाकून भाजणीचा गोळा हाताने थापावा. त्यावर बोटाने पाच ठिकाणी खड्डा करून त्यात तेल टाकावे व झाकण ठेवून मंद आचेवर भाजावे. तव्यावरून सुटल्यावर दुसरी बाजू परतावे.
टीप : कांद्याच्या थालिपिठासोबत घरचं लोणी व भाजलेले दाणे खाण्याची पद्धत आहे.

काकडीची धिरडी
साहित्य ः एक मोठी काकडी, बेसन, तिखट, मीठ, ओवा, कोथिंबीर, १ चमचा साबुदाणा पीठ.
कृती : काकडीची साल काढून किसून घ्यावी. त्यात बेसन, तिखट, मीठ, ओवा, कोथिंबीर व साबुदाणा पीठ टाकून पाण्याने सरसरीत भिजवावे. तव्यावर थोडे तेल टाकून डावाने मिश्रण टाकावे. खरपूस झाल्यावर दुसऱ्या बाजूने पलटवून पुन्हा धिरडे खरपूस भाजावे. काकडीची धिरडी, कैरीच्या लोणच्यासोबत छान लागतात. 

फोटो फीचर

संबंधित बातम्या