वडे, कबाब, पुरी

नेहा भोपटकर, पुणे
शुक्रवार, 16 फेब्रुवारी 2018

फूड पॉइंट

‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

बेसन पोळी
साहित्य ः दोन वाट्या डाळीचे पीठ, १ वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी दूध, १ चमचा वेलची पूड, पाऊण वाटी साजूक तूप. 
पारीसाठी- तीन वाट्या कणीक, १ चमचा रवा, १ चमचा डाळीचे पीठ, मीठ चिमूटभर, तेल पाव वाटी, पाणी व तांदूळ पिठी
कृती ः प्रथम जाड बुडाच्या कढईत पाऊण वाटी तूप घेऊन मध्यम आचेवर ठेवावे. तूप गरम झाल्यावर डाळीचे पीठ भाजून घ्यावे. जसे पीठ भाजून होईल होईल तसे सैल पडते व हाताला हलके लागते. पीठ कोरडे वाटले तर थोडे तूप वरून सोडावे. खमंग झाले की त्यावर अर्धी वाटी दूध घालावे. बेसन फसफसून वर येईल पण पुन्हा एकजीव ५ मिनिटे परतावे. आता एका ताटात उतरवावे. पीठ गार झाल्यावर त्यात पिठीसाखर मिसळावी. वेलदोडा पूड घालावी. कणीक, रवा, डाळीचे पीठ, तेल, मोहन घालून घट्ट भिजवावी. अर्ध्या तासाने मळून घ्यावे. कणकेच्या दोन पाऱ्या घेऊन पुऱ्या लाटून घ्याव्यात. त्यात बेसनपारी भरून उंडा तयार करून घ्यावा व त्याची तांदूळ पिठीवर पोळी लाटावी. अतिशय खमंग सुंदर चवीची पोळी तुपाबरोबर खावी. आवडत असल्यास सारणात ३-४ पेढे बारीक करून मिसळावे.

उडीद - बेसन पुरी
साहित्य ः एक वाटी उडीद डाळ, दोन वाट्या बेसन, कणीक, ओवा - जिरे पावडर, तिखट, मीठ, आमचूर, हिंग
कृती ः एक वाटी उडीद डाळ भिजवून वाटावी. त्यात २ वाट्या बेसन पुरेशी कणीक, ओवा-जिरे पावडर तिखट मीठ हिंग आमचूर घालून (चवीप्रमाणे) पुऱ्या कराव्यात. प्रवासात नेण्यास या पुऱ्या उत्तम आहेत.

मसालेदार पराठा
साहित्य ः कणीक, पंजाबी लोणचे मसाला, बटाटा, हळद, तिखट, मीठ
कृती ः प्रथम नेहमीप्रमाणे कणीक भिजवावी. चार बटाटे सोलून किसून घ्यावेत. नंतर पंजाबी किंवा कोणताही लोणचे मसाला घालावा. चवीप्रमाणे तिखट, मीठ, हळद आवडत असल्यास बारीक कोथिंबीर घालावी आणि सारण बनवावे. पारीत भरून पराठे बनवावेत. हे पराठे अत्यंत खमंग लागतात.

मसाले वडा
साहित्य ः एक वाटी हरभरा डाळ, एक टीस्पून गरम मसाला, पाव वाटी मूग डाळ, वाटलेले आलं, मिरची, पाव वाटी उडीद डाळ, पाव वाटी तांदूळ, चवीपुरते मीठ
कृती ः सर्व डाळी व तांदूळ मिक्‍स करून चार तास पाण्यात भिजत ठेवावे. नंतर मिक्‍सरवर काढून त्यात आलं, गरम मसाला, मीठ, वाटलेले मिरची लसूण घालून तळावेत व चिंच सॉसबरोबर द्यावेत.

गाजराचे पुडिंग
साहित्य ः चार मध्यम गाजर, एक कप दूध, पाव टीस्पून बेकिंग पावडर, पाव वाटी पिठीसाखर, २ टीस्पून लोणी
कृती ः प्रथम गाजर किसून तुपावर शिजवून घ्यावे. लोणी फेसून त्यात गाजर दूध साखर, बेकिंग पावडर घालावी. २० मिनिटे कुकरमध्ये शिजवावे. गार झाल्यावर सेट करायला ठेवावे.

चीज रोल
साहित्य ः एक मध्यम बटाटा, चीज २ क्‍यूब, एक कांदा बारीक चिरून, कोथिंबीर चिरलेली, कॉर्नफ्लॉवर, मीठ ब्रेडक्रम्स
कृती ः बटाटा उकडून कुस्करावा. त्यात मीठ कॉर्नफ्लॉवर घालून मळावे व लांबट गोल आकार करावेत.
सारणासाठी : बारीक कांदा, किसलेले चीज, बारीक कोथिंबीर, मिरची चिरून, मीठ हे सारण रोलमध्ये भरावे. ब्रेडक्रम्समध्ये घोळून मग तळावेत.

पालक कबाब
साहित्य ः एक जुडी पालक, दोन वाटी भिजवलेली मुगाची डाळ, आलं-लसूण-हिरवी मिरची पेस्ट ३ टीस्पून, बेसन पीठ जरुरीप्रमाणे, हळद, मीठ, लाल तिखट अर्धा टीस्पून, धने-जिरे पावडर एक टीस्पून.
कृती ः पालक धुवून बारीक चिरून घ्यावा. मूग डाळ भिजवून वाटून घ्यावी. त्यात वरील सर्व साहित्य एकत्र करून मळून घ्यावे. त्याचे गुलाबजामसारखे लांब गोल करून तेलामध्ये डीपफ्राय करावेत.

पापड रोल्स
साहित्य ः उकडलेले बटाटे, हिरवी मिरची, कांदा, मीठ, कोथिंबीर, लिंबू रस, पापड (उडीद, मूग) कमी छिद्रे असणारा पापड
कृती ः पापडाला पाण्याचा हात लावून मऊ करावा. नंतर उकडलेल्या बटाट्यात कोथिंबीर, कांदा, मिरची, लिंबूरस, मीठ घालून मिश्रण करावे व ओलसर पापडात भरून रोल करावा. अर्धा इंच रुंदीचे गोल तुकडे कापून गरम तेलात तळावेत.

फोटो फीचर

संबंधित बातम्या