बाजरीची मिसळ, गव्हाचे पुडिंग

निर्मला आपटे
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

फूड पॉइंट
झटपट भूक भागवण्याच्या नादात आपण इन्स्टंट पदार्थांना प्राधान्य देतो. त्यामुळे जीवनसत्त्वांनी परिपूर्ण अशी कडधान्ये आणि भाज्यांकडे दुर्लक्ष होते. पण आहारात बाजरी, गव्हासारखी धान्ये, मोड आलेली कडधान्ये इत्यादींचा समावेश असणे चांगले असते. अशाच काही पौष्टिक पदार्थांच्या  रेसिपीज...

बाजरीची मिसळ 
साहित्य : एक वाटी बाजरी, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग, हळद, तिखट, मीठ, मसाला, चिंच, गूळ, कोथिंबीर, बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, फरसाण, खजुराची गोड चटणी व कोथिंबीर मिरचीची तिखट चटणी.
कृती : बाजरी सकाळी पाण्यात भिजत घालावी. रात्री त्यातील पाणी काढून टाकून ती कापडात बांधून ठेवावी. दुसऱ्या दिवशी बाजरीला मोड येतील. मोड आलेली बाजरी पुरेसे पाणी घालून कुकरमध्ये शिजवावी. नंतर कढईत तेल, मोहरी, हिंग, हळद घालून फोडणी करावी. त्यात शिजलेली बाजरी घालावी. तिखट, मीठ, मसाला, गूळ, चिंचेचा कोळ व रस राहील एवढे पाणी घालून शिजू द्यावी. एका बाऊलमध्ये थोडी उसळ घालून त्यावर बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, कोथिंबीर, फरसाण, तिखट चटणी व खजुराची गोड चटणी घालून मिसळ खावयास द्यावी. थंडीच्या दिवसांत खाण्यासाठी हा उत्तम पदार्थ आहे.


मूग-बिटाचे पौष्टिक उंडे  
साहित्य : एक वाटी मुगाची डाळ, २ वाट्या खोवलेला नारळ, ४ उकडलेले बीट, १ वाटी साखर, तूप, मीठ, काजू, बेदाणे.  
कृती : मुगाची डाळ ४ तास भिजवून नंतर त्यातले पाणी काढून वाटून घ्यावी. २ उकडलेल्या बिटाचा कीस व चिमूटभर मीठ वाटताना डाळीबरोबर घालावे. नारळाचा चव, साखर व किसलेले २ बीट मिळून शिजवावे. या मिश्रणाचा गोळा होत आला, की त्यात काजू व बेदाणे घालावे. नंतर हे मिश्रण गार करून घ्यावे. आप्पे पात्र गॅसवर गरम करायला ठेवावे व त्यात थोडे तूप घालावे. नारळ आणि बिटाच्या मिश्रणाचे छोट्या लिंबाएवढे गोळे करावे. हे गोळे मुगाच्या मिश्रणात बुडवून अप्पे पात्रात घालावे. त्यावर झाकण ठेवावे. २-३ मिनिटांनी हे गोळे उलटावेत. नंतर २ मिनिटांनी तयार उंडे काढावेत. हे मूग-बिटाचे लाल पौष्टिक उंडे दिसायलाही छान दिसतात व सर्वजण आवडीनेही खातात.


गव्हाचे पुडिंग 
साहित्य : एक वाटी गहू, १ वाटी ओला नारळ, २ वाट्या दूध, दीड वाटी गूळ, अर्धी वाटी बिया काढलेला खजूर, वेलचीपूड, जायफळपूड आणि काजू.
कृती : गहू रात्री गरम पाण्यात भिजत घालावेत. सकाळी उपसून मिक्सरमध्ये वाटावेत. नंतर त्यात दूध घालून परत एकदा फिरवावे व मैद्याच्या चाळणीतून गाळून घ्यावे. खजूर व नारळ मिक्सरमधून वाटून घ्यावा. तो गाळलेल्या गव्हाच्या सत्त्वात मिसळावा. नंतर त्यात गूळ, वेलची व जायफळपूड घालून ढवळावे. एका नक्षीच्या बाऊलमध्ये मिश्रण घालून कुकरमध्ये शिटी न लावता १५ मिनिटे उकडून घ्यावे. १५ मिनिटांनी खाली उतरवावे. पौष्टिकतेने परिपूर्ण असे हे पुडिंग तयार. गार झाल्यावर काजूने सजवून सर्व्ह करावे.  


उपवासाचे दहीवडे 
साहित्य : चार कच्ची केळी, २ मध्यम आकाराचे बटाटे, अर्धी वाटी साबूदाणा पीठ, दही, जिरेपूड, साखर, कोथिंबीर, मिरची पेस्ट, आले, मीठ, तेल. 
कृती : प्रथम केळी व बटाटे उकडून घ्यावेत. थोडे गरम असतानाच दोन्ही कुस्करून घ्यावे. त्यात मिरची पेस्ट व मीठ घालावे. तसेच साबूदाण्याचे पीठ घालून मळावे. छोटे छोटे वडे करून तेलात तळावेत. दही थोडे घुसळून त्यात आले-मिरची पेस्ट, मीठ व साखर घालावी. या दह्यात वडे घालावे. डिश सर्व्ह करताना वडे बाऊलमध्ये घालून त्यावर जिरेपूड, तिखट व कोथिंबीर घालावी.


कडधान्यांचे लोणचे
साहित्य : एक वाटी मूग, मटकी, मसूर, वाटाणे अशी मिळून कडधान्ये, अर्धी वाटी कैरीचा कीस, लोणचे मसाला, मीठ, फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, हिंग. 
कृती : सर्व कडधान्ये सकाळी भिजत घालावीत. संध्याकाळी 
व्यवस्थित भिजल्यावर पाण्यातून काढून मोड येण्याकरता बांधून ठेवावीत. दुसऱ्या दिवशी मोड आलेल्या कडधान्यांत ५-६ चमचे लोणच्याचा मसाला, कैरीचा कीस, मीठ असे सर्व साहित्य घालावे. मोहरी, हळद व हिंग यांची फोडणी करावी. ती थंड झाल्यावर कडधान्यात मिसळावी. दोन दिवसांत लोणचे मुरते. हे मिश्र कडधान्यांचे लोणचे पौष्टिक असून ते फ्रिजमध्ये साधारण १०-१५ दिवस चांगले टिकते. 


कैरी-कांदा चटणी   
साहित्य : एक कैरी, २ वाट्या सुक्या खोबऱ्याचा कीस, २ कांदे, १ चमचा मेथी, तिखट, मीठ, गूळ.  
कृती : प्रथम खोबऱ्याचा कीस भाजून घ्यावा. मेथी व चिरलेला कांदा तेलावर चांगला परतून घ्यावा. गार झाल्यावर खोबरे, कांदा व कैरीचा कीस मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. नंतर त्यात तिखट, मीठ, गूळ घालून परत वाटावे. ही चटणी १०-१२ दिवस टिकते.


कैरीचे श्रीखंड  
साहित्य : एक कैरी, १ वाटी साय, १ उकडलेला बटाटा, १ वाटी साखर, वेलदोडा, केशर.  
कृती : प्रथम कैरी उकडून गर काढून घ्यावा. बटाटा उकडून साल काढून घ्यावे. मिक्सरमध्ये कैरीचा गर, बटाटा, साय, साखर, वेलदोडा, केशर घालून सर्व फिरवावे. झाले कैरीचे श्रीखंड तयार!


दणगेलं
साहित्य : एक वाटी तांदूळ, प्रत्येकी अर्धी वाटी हरभरा डाळ, मूगडाळ, उडीद डाळ, प्रत्येकी १ चमचा आले, लसूण, मिरची पेस्ट, मीठ, पाव चमचा तिखट, १ चमचा धने-जिरे पावडर, पाव वाटी दही, पाव चमचा खायचा सोडा, १ वाटी गाजर कीस, पाव चमचा हळद, फोडणीसाठी तेल, मोहरी, हळद, ओवा, तीळ व कढीपत्ता.
कृती : तांदूळ व सर्व डाळी भिजत घालाव्यात. नंतर वाटून ५-६ तास तशाच ठेवाव्या. नंतर त्यात आले, लसूण, मीठ, मिरची पेस्ट, हळद, तिखट, धने-जिरेपूड, किसलेले गाजर, दही, सोडा, घालून चांगले ढवळावे आणि सर्व मिश्रण सारखे करावे. तेलात मोहरी, हळद, ओवा, तीळ व कढीपत्ता घालून फोडणी करून घ्यावी. एका पसरट कढईमध्ये २ चमचे तेल घालावे. गरम झाल्यावर मिश्रणाचा जाडसर थर कढईत घालावा आणि झाकण ठेवावे. ५ मिनिटांनी झाकण काढून त्यावर थोडी फोडणी घालून उलटावे. नंतर ५ मिनिटांनी दोन्ही बाजू तांबूस झाल्यावर काढावे. झाले दणगेलं तयार!

संबंधित बातम्या