बहुगुणी आवळा

निर्मला देशपांडे
शुक्रवार, 31 डिसेंबर 2021

फूड पॉइंट

सध्या आवळ्यांचा सीझन सुरू आहे. छान पक्व झालेले पिवळसर आवळे बाजारातून आणून वर्षभराकरिता व रोज खाण्याकरिता त्यांचे निरनिराळे पदार्थ केले पाहिजेत, कारण आवळ्याचे आरोग्यासाठीही फायदे आहेत. 

आवळ्याचे लोणचे (प्रकार १) 

साहित्य : वाटीभर आवळ्याच्या उकडलेल्या फोडी (अंदाजे पाव किलो), १ ते दीड चमचा कैरी लोणचे मसाला, मीठ, गूळ, चमचाभर तेल मोहरी, हिंग. 
कृती : आवळे उकडून घ्यावेत. बिया काढून टाकाव्यात. छोट्या फोडी कराव्यात. हिंदालियमच्या कढईत तेल घालून गरम करावे. त्यात मोहरी, हिंग घालून फोडणी करावी. गॅस मंद करून फोडणीत आवळ्याच्या फोडी, लोणचे मसाला, मीठ घालून दोन मिनिटे परतावे. दोन वाट्या गरम पाणी घालून लोणचे शिजत ठेवावे. उकळी आल्यावर आपल्या आवडीप्रमाणे गूळ घालावा. आवळे तुरट असल्याने गूळ जरा जास्त घालावा लागतो. मग लोणचे मंद गॅसवर छान शिजवावे. हे लोणचे फ्रीजमध्ये ठेवल्यास सहा महिनेसुद्धा टिकते. आंबटगोड चवीचे हे रसदार लोणचे जेवणाची लज्जत वाढवते.

आवळा लोणचे (प्रकार २) 
साहित्य : पाव किलो आवळे, अर्धी वाटी मोहरीची डाळ, प्रत्येकी १ चमचा हळद व तिखट, २ चमचे साखर, अर्धा चमचा मेथी दाणे, पाव वाटी तेल, छोटा चमचा हिंग. 
कृती : आवळे उकडून बिया काढून त्याच्या छोट्या फोडी कराव्यात. मिक्सरमध्ये मोहरीच्या डाळीची पावडर करावी. मग त्यात थोडे थोडे करत एक वाटी पाणी घालावे आणि खूप फेटावे. मग त्यात तिखट, मीठ, साखर घालावी. एका स्टीलच्या तसराळ्यात हे मिश्रण घालावे. त्यात आवळ्याच्या फोडी घालून कालवाव्यात. कढईत तेल गरम करून गॅस बंद करावा. त्यात हिंग, मेथी घालावी. ही फोडणी गार झाल्यावर आवळ्यावर घालावी व सगळे एकत्र हलकेच कालवावे. हे लोणचे महिनाभर टिकते.

आवळा सरबत
साहित्य : अर्धा किलो चांगले रसरशीत, ताजे आवळे, ३०० ग्रॅम साखर, २५ ग्रॅम आले.
कृती : आले स्वच्छ धुऊन किसावे. थोडे पाणी घालून मिक्सरवर बारीक वाटावे. रस काढून गाळून घ्यावा. आवळे किसून त्यांचाही असाच रस काढून गाळून घ्यावा. साखरेमध्ये साखरेच्या निम्मे पाणी घालून पक्का पाक करावा. त्यात आल्याचा व आवळ्याचा रस घालावा. हलके हलवून दोन उकळ्या आणाव्यात. नंतर भांडे खाली उतरवावे. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावे.
हे सरबत करताना त्यात चवीप्रमाणे मीठ, थोडा पुदिन्याचा रस, आवडत असल्यास मिठाऐवजी शेंदेलोण, पादेलोण घालावे.

आवळा चटणी (प्रकार १)

साहित्य : वाटीभर पक्व आवळ्याचा कीस, चमचाभर आल्याचा कीस, एका हिरव्या मिरचीचे तुकडे, मीठ, साखर, अर्धा चमचा लिंबाचा रस. 
कृती : वर दिलेले सर्व जिन्नस एकत्र कालवावे. वरून लिंबाचा रस घालावा व पुन्हा कालवावे. ही चटणी चविष्ट लागते.

आवळा चटणी (प्रकार २) 

साहित्य : अर्धी वाटी आवळा कीस, एका हिरव्या मिरचीचे तुकडे, कोथिंबीर बारीक चिरून, अर्धा चमचा आल्याचा कीस, पाव वाटी ओले खोबरे, मीठ, साखर. 
कृती : वर दिलेले सर्व जिन्नस एकत्र करून वाटावेत. वरून सुक्या लाल मिरच्यांची फोडणी द्यावी.

मोरावळा

साहित्य : एक किलो चांगले पिकलेले ताजे रसरशीत आवळे, २ किलो साखर, अर्धा कप आल्याचा रस, अर्धा चमचा लवंग पावडर, थोडे केशर, वेलची पूड. 
कृती : आवळे स्वच्छ धुवावेत. चाळणीवर ठेवून वाफवावेत. बिया काढून फोडी कराव्यात किंवा आवळे किसावेत. साखरेत साखरेच्या निम्मे पाणी घालून पाक करायला ठेवावा. पाक गोळीबंद करावा. त्यात आल्याचा रस घालून डावाने हलवावे. पूर्ण पाककृती मंद गॅसवर करावी. आवळ्याच्या फोडी घालाव्यात. लवंग पावडर घालून ढवळावे. दहा  मिनिटे उकळावे. शेवटी केशर, वेलची पूड घालून हलवावे. मोरावळा खाली उतरवावा. थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या बरणीत भरून ठेवावा. असा मोरावळा तीन वर्षेसुद्धा टिकतो. जसजसा जुना होईल तसतसे त्याचे औषधी गुणधर्म वाढतात. त्याची साखर होऊ लागते, याचे अनेक औषधी उपयोग आहेत. पित्तावर याचा चांगला उपयोग होतो.

आवळा आल्याचा जॅम
साहित्य : पाव किलो चांगले रसरशीत आवळे, १ किलो साखर, पाव किलो आले, लिंबू.
कृती : आवळे स्वच्छ धुवावेत. त्यांना काट्याने टोचे मारावेत. ते तीन दिवस पाण्यात बुडवून ठेवावेत. रोज पाणी बदलावे. तीन दिवसांनी आवळे काढून पुसून कोरडे करावेत. नंतर स्टीलच्या किसणीने किसावेत. त्या किसात पाव किलो साखर मिसळून काचेच्या बरणीत घालावे व बरणी उन्हात ठेवावी. आले स्वच्छ धुऊन, किसून वाफवून घ्यावे. या किसात पाव किलो साखर घालून मिसळावी. हे मिश्रण एक दिवस तसेच ठेवावे. नंतर आवळा आणि आल्याचे मिश्रण एकत्र करून शिजायला ठेवावे. एक चटका आल्यावर उरलेली साखर घालावी. दोन लिंबाचा रस घालून मंद गॅसवर शिजत ठेवावे. मिश्रण घट्टसर झाल्यावर खाली उतरवावे. कोमट असतानाच उरलेल्या लिंबाचा रस घालून हलवावे.

आवळा सुपारी

प्रकार १ : किसलेले कच्चे आवळे, जिरे पूड, शेंदेलोण, पादेलोण लावून हलवावे व उन्हात कडकडीत वाळवावे. घट झाकणाच्या बाटलीत भरून ठेवावे. 
प्रकार २ : आवळे मऊसर उकडून घ्यावेत. त्याच्या बिया काढून ते कुस्करावेत. त्यात जिरे पूड, शेंदेलोण, पादेलोण व थोडी हिंग पूड घालून एकत्र करावे. त्याच्या छोट्या दामट्या अगर वड्या करून कडक उन्हात कडकडीत वाळवाव्यात.
प्रकार ३ : आवळे चाळणीवर उकडावेत. त्यातल्या बिया काढून फोडी करून त्याला जिरे पूड, शेंदेलोण, पादेलोण लावावे. कडक उन्हात फोडी छान कडकडीत वाळवाव्यात.

संबंधित बातम्या