बाजरीची खिचडी, सुरवड्या

निर्मला दिलीप साळुंखे, शहापूर, जि.ठाणे
सोमवार, 13 सप्टेंबर 2021

फूड पॉइंट

संध्याकाळी चहाबरोबर खाता येतील किंवा डब्यामध्येसुद्धा नेता येतील अशा वड्या आणि जेवणात करता येतील असे काही पदार्थ...

सातपुड्याच्या पातोड्या (मासवड्या)
साहित्य : पाव किलो कांदे, १ वाटी किसलेले खोबरे, ८-१० पाकळ्या लसूण, ३-४ चमचे गरम मसाला, १ चमचा खसखस किंवा तीळ, मीठ, कोथिंबीर, हिंग, हळद, पातोडीसाठी १ वाटी चणा डाळ पीठ. 
कृती : कांदे किसून पाणी पिळून घ्यावे. कांदे कढईत थोडे लालसर होईपर्यंत थोडे तेल घालून भाजावे. त्यात हिंग, गरम मसाला, खसखस, खोबरे, हळद, मीठ घालून ३-४ मिनिटे भाजावेत. जास्त काळपट होऊ देऊ नये. अशाप्रकारे सारण तयार करावे. जाड बुडाच्या पातेल्यात किंवा कढईत जेवढे पीठ तेवढे पाणी घ्यावे. पाण्याला उकळी आल्यावर थोडे तेल, मीठ, हिंग, हळद घालावे. नंतर पीठ घालून ढवळावे. गाठी पडू देऊ नये. चांगले घोटावे. एक वाफ येऊ द्यावी. कच्चे लागणार नाही व जळणार नाही अशाप्रकारे कमी गॅसवर वाफवावे. परात उलटी करून त्यावर प्लॅस्टिक कागदावर पीठ चोळून पातळ पोळीसारखे थापावे. पीठ गरम असते. म्हणून वरूनही प्लॅस्टिक कागद घालून लाटावे. लाटल्यावर तयार केलेले सारण पसरावे. त्यावर कोथिंबीर, सुके खोबरे पसरावे व पातोडी वळवावी आणि कापावी. छान चविष्ट, पौष्टिक सातपुड्याच्या पातोड्या तयार. मसाल्याच्या आमटी बरोबर छान लागतात.

अंबाडी भाजीच्या दशम्या

साहित्य : अंबाडी भाजी, १ वाटी ज्वारी पीठ, १ वाटी डाळीचे पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, अर्धी वाटी मका पीठ किंवा तांदळाचे पीठ, आले - लसूण - जिरे पेस्ट, हळद, हिंग, मीठ, साखर, तीळ.
कृती : अंबाडीची भाजी स्वच्छ धुऊन वाफवून मिक्सरमध्ये पेस्ट करावी. त्यात वरील पीठ, पेस्ट (आले, लसूण, जिरे), हिंग, तीळ, थोडी साखर, चवीला मीठ घालून पीठ मळून घ्यावे. लहान लहान पराठे किंवा दशम्या लाटून थोड्या तेलावर खमंग भाजावेत. चिंचेची, खोबऱ्‍याची चटणी, टोमॅटो सॉसबरोबर खाण्यास छान लागते.

बाजरीची खिचडी

साहित्य : दोन वाटी बाजरी, १ वाटी तूर डाळ, १ वाटी तांदूळ, कांदा, लसूण, जिरे, आले, ३ चमचे तिखट, २ चमचे गरम मसाला, हिंग, कोथिंबीर, मीठ, आवडत असल्यास अर्धी वाटी शेंगदाणे, बटाटे, वाटाणा घातला तरी चालेल.
कृती : बाजरी १० मिनिटे पाण्यात भिजवून चाळणीत घालून निथळून ठेवावी. पूर्वी खलबत्त्यात कुटायचे, पण आता मिक्सरमध्ये बाजरी फिरवून घ्यावी. थोडावेळ पातळ कापडावर पसरून सुकू द्यावी. नंतर ती चाळणीने गाळावी. कोंडा काढून टाकावा. प्रथम कांदा परतून आले, लसूण, जिरे, कोथिंबीर काड्या टाकून पेस्ट करावी. हिंग घालून फोडणी द्यावी. तिखट, गरम मसाला घालून पाणी घालावे. पाण्याला उकळी आल्यावर बाजरी शिजायला टाकावी. ५ ते ७ मिनिटे बाजरी शिजल्यावर तूर डाळ, तांदूळ घालावे. कुकरच्या ४-५ शिट्या घ्याव्यात. जेवताना हिंग, मोहरी, जिरे, कढीपत्ता, लाल मिरची, फोडणीचे तेल करावे. गरमागरम खिचडीवर फोडणीचे तेल घालून खावे. खिचडीबरोबर लोणचे, पापड, कढी असे छान जेवण होते. ही पौष्टिक खिचडी शरीराला चांगली असते.    

हरभरा डाळीचा झुणका (पिठले)

साहित्य : एक वाटी हरभरा डाळ, आले, लसूण, जिरे, कांदा, लाल मिरची, हिंग, मोहरी, कढीपत्ता.
कृती : डाळ ३ तास भिजत घालून जाडसर वाटावी. आले, लसूण, जिरे, कोथिंबिरीच्या काड्या यांची एकत्र पेस्ट करावी. तेलावर फोडणी  
करून त्यात पेस्ट, कांदा, लाल मिरची, हिंग, मोहरी, कढीपत्ता घालून पाणी घालावे. १ वाटी डाळीत १ वाटी पाणी घालावे. उकळी आल्यावर त्यात वाटलेली डाळ घालावी. फोडणीत थोडे जास्त तेल घालावे. चांगले ढवळावे. गाठी पडू द्यायच्या नाहीत. हळद, मीठ घालून मंद गॅसवर शिजू द्यावे. खाली वर हलवत राहावे. छान खमंग रवेदार पिठले होते. भाकरीबरोबर, लोणचे, पापड, कांदा असे छान लज्जतदार जेवण होते.

मिक्स डाळीची भजी
साहित्य : एक वाटी चणा डाळ, अर्धी वाटी मूग डाळ, अर्धी वाटी तूर डाळ, अर्धी वाटी चवळी डाळ, आले, लसूण, जिरे, हिंग, मीठ, कांदा, कोथिंबीर, हिरवी मिरची.
कृती : वरील सर्व डाळी वेगवेगळ्या ३ तास भिजत ठेवाव्यात. नंतर त्या वाटून त्यात आले, लसूण, जिरे, हिरवी मिरची अशी पेस्ट करून पिठात मिक्स करावी. हिरव्या मिरचीऐवजी लाल तिखट घातले तरी चालते. कांदा लांबट कापून घालावा. हिंग, हळद, चवीला मीठ घालून पीठ चांगले फेटावे. थोडा ईनो किंवा खाण्याचा सोडा घालावा. छान कुरकुरीत भजी होतात. चिंचेची चटणी, सॉसबरोबर किंवा तळलेल्या मिरचीबरोबर छान, चविष्ट लागतात.

ओल्या नारळाच्या सुरवड्या

साहित्य : एक वाटी चणा डाळीचे पीठ, २ वाट्या ताक, १ वाटी किसलेले ओले खोबरे, हिंग, मोहरी, कोथिंबीर, मीठ, तीळ इत्यादी.
कृती : चणा डाळीचे पीठ ताकात चांगले मिक्स करावे. गाठी पडू देऊ नयेत. हे मिश्रण कढईमध्ये घेऊन गॅसवर ठेवावे. पीठ सारखे हलवावे नाही तर गाठी होतील. चांगला गोळा होत आला की ताटाच्या उलट्या बाजूला उलथण्याने पातळसर पसरावे. त्यावर ओले खोबरे, हिंग, मोहरी, तीळ, कढीपत्ता यांची फोडणी ओतावी. वरून कोथिंबीर घालावी. पोळीच्या पट्ट्या कापून गुंडाळी करावी. या वड्या खूपच चविष्ट लागतात. काळ्या मसाल्याच्या आमटीबरोबर छान जेवण होते. 

गव्हाच्या पिठाचे दिवे

साहित्य : दोन वाट्या गव्हाचे पीठ, पाव किलो गूळ, वेलची पूड किंवा जायफळ पूड, तेल, मीठ.
कृती : दोन वाट्या गव्हाच्या पिठात तेलाचे मोहन व किंचित मीठ, वेलची पूड घालून गुळाचे कोमट पाणी करून त्यात मळावे. अर्धा तास पीठ तसेच ठेवून नंतर दिवे तयार करावेत व वाफवावेत. दिवे, दही तांदळाच्या खिरीबरोबर तूप घालून खावेत. गरम गरम छान चविष्ट लागतात. अशाच प्रकारे बाजरीच्या पिठाचेही दिवे करतात. हे दिवे दीपपूजनाच्या दिवशी करण्याची प्रथा आहे. पण एरवीही खाता येतील.

गव्हाची खीर
साहित्य : दोन वाट्या गहू, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे तुकडे, वेलची, काजू, बदाम, चारोळी, मनुके आवडीनुसार, अर्धा किलो गूळ (गोड किती हवे त्याप्रमाणे गूळ घालावा), साजूक तूप, मीठ.
कृती : गहू १ तास पाण्यात भिजवून खलबत्त्यात किंवा मिक्सरमध्ये थोडे बारीक करावेत. गहू गाळून स्वच्छ धुऊन कुकरमध्ये घालून ५-६ शिट्ट्या कराव्यात. नंतर गूळ पाण्यात घालून पाण्याला उकळी आल्यावर शिजलेला गहू घालून घालून घोटावी. त्यात थोडे मीठही घालावे. चांगली शिजल्यावर त्यात वेलची, काजू, बदाम, चारोळी, मनुके, खोबऱ्‍याचे तुकडे घालावेत. जेवताना खिरीत दूध घालावे लागत नाहीत. गुळामुळे दूध शिजताना घातले तर खीर फाटते व बेचव लागते. वरून साजूक तूप घालून पुरी, पोळीबरोबर खावी, किंवा नुसतीच खाल्ली तरी छान पौष्टिक खीर शरीराला पोषक असते. 

संबंधित बातम्या