खासमखास गोडाचे पदार्थ

निशा गणपुले-लिमये
सोमवार, 29 जुलै 2019

फूड पॉइंट
नागपंचमीला तळणे, कापणे, चिरणे अशा गोष्टी करायच्या नसतात, कारण नागदेवाला त्या बाधा आणतात असे मानले जाते. पण देवाला नैवेद्य तर करायलाच हवा. त्यासाठी आदल्या दिवशी करून ठेवता येतील असे काही गोडाचे पदार्थ... 

पुरणाचे दिंडे 
साहित्य : दोन वाट्या हरभऱ्याची डाळ, २ वाट्या बारीक चिरलेला गूळ, ५-६ वेलदोड्यांची पूड, २ मोठ्या वाट्या कणीक, तेल व मीठ
कृती : हरभऱ्याची डाळ चांगली धुऊन अर्धा तास तशीच झाकून ठेवावी. नंतर ती चांगली मऊ शिजवून घ्यावी. शिजल्यावर त्यातले पाणी गाळून बाजूला काढावे व त्यात गूळ घालून पुरण शिजवून घ्यावे. आपण नेहमी पुरणपोळीसाठी पुरण शिजवतो त्याप्रमाणे. पुरण गरम गरम आहे तोवरच डावाने चांगले घोटून घ्यावे. पुरण चांगले घट्ट असावे. नंतर त्यात वेलदोड्याची पूड घालावी. कणीक, चवीप्रमाणे मीठ व डावभर कडकडीत तेलाचे मोहन घालून ते सर्व कणकेला चोळावे व जरा घट्टच पीठ भिजवावे. तयार पीठ अर्धा तास झाकून ठेवावे. या पिठाच्या जरा मोठ्या पुऱ्या लाटून घ्याव्यात. पुरीच्या मध्यभागी थोडे पुरण घालावे. मग त्यावर पुरीच्या कडा चारी बाजूंनी घालून हाताने दाबून चौकोनी करावे. सर्व दिंडे चौकोनी आकाराचीच करावीत. पुरण बाहेर नाही आले पाहिजे. ही पुरणाची दिंडे मोदकपात्रातील चाळणीवर तेलाचा हात फिरवून ठेवावीत व २० मिनिटे उकडून घ्यावीत. खास करून अशी पुरणदिंडे नागपंचमीला करण्याची पद्धत आहे.
टीप : हरभरा डाळ शिजवताना त्यात एक चमचा तेल व अगदी पाव चमचा हळद घातली असता पुरणाला छान रंग येतो. तसेच २ चिमटी हळद कणीक भिजवताना घातली म्हणजे दिंडे सुरेख दिसतात. दिंडे वाढताना त्यावर तूप वाढावे.

पातोळे
साहित्य : दोन वाट्या मावळ काकडी किंवा नेहमीच्या खिरे काकडीचा कीस, ६ वाट्या तांदुळाचे पीठ, दीड वाटी ओले खोबरे, अडीच वाट्या चिरलेला गूळ, १ चमचा मीठ (अंदाजे), हळदीची पाने किंवा केळीची पाने, अगदी नाही तर कर्दळीची पाने. पण हळदीच्या पानांवर वास छान येतो. 
कृती : काकडीची साले काढून काकडी किसून घ्यावी. नंतर तो कीस पिळून पाणी काढावे व ते बाजूला ठेवावे. काकडीचा कीस, खोबरे, गूळ व मीठ एकत्र करून कालवावे. त्यात तांदूळ पीठ मिसळावे. सर्व ओलसरपणात पीठ भिजते. जरूर पडल्यास थोडे काकडीचे काढलेले पाणी वापरावे. नंतर एका पातेल्यात हे मिश्रण घालून ते गॅसवर ठेवून जरा शिजवून घ्यावे. नंतर खाली उतरवून कालवावे. जरा चांगले मळून घ्यावे. हळदीच्या पानाला थोडा पातळ तुपाचा हात फिरवावा. मग हळदीच्या पानावर लहान गोळा घेऊन थापावा. उरलेले पान दुमडून झाकण द्यावे. अशी थोडीशी पाने तयार करून घ्यावीत. मोदकपात्रात पाणी घालून उकळायला ठेवावे. त्यावरील चाळणीवर एखादे भांडे पालथे घालावे. त्याच्या बाजूने ही तयार केलेली पाने नीट लावावीत. १० मिनिटे वाफवून नंतर पानातून सोडवून साजूक तुपाबरोबर खायला द्यावे. बरोबर चटणी वा लिंबाचे लोणचे छान लागते.

छेना पुडिंग 
साहित्य : एक वाटी छेना (पनीर), १ कंडेन्स्ड मिल्कचा डबा, ५ बदाम, ५ काजू (पिस्ते हवे असल्यास), २ चमचे चारोळ्या, ४ वेलदोड्यांची पूड, अर्धा चमचा जायफळ पूड, पाव चमचा केशर, १ गुलाबी गुलाबाचे फूल (देशी गुलाब), गुलाबपाणी (असल्यास), दूध.
कृती : प्रथम पनीर हाताने चांगले कुस्करून घ्यावे. केशर खलून थोड्या दुधात भिजवावे. काजू-बदामाचे पातळ काप करावेत. कंडेन्स्ड दूध एका पातेल्यात घ्यावे. त्यात पनीर व मेवा घालावा. आवडत असल्यास गुलाबपाणी घालावे. घट्ट वाटल्यास वाटी-दीड वाटी दूध घालावे व एकजीव होईतो ढवळावे-फेटावे. आता एका सुबक भांड्यात (शक्‍यतो वर पांढरा नसल्यास चांगले. कारण पांढरे, पिवळसर पुडिंग रंगीत काचेच्या भांड्यात जास्त चांगले दिसते) ओतावे. वरून चारोळ्या व गुलाबाच्या पाकळ्या घालून सजवावे.

कणिका भोग 
साहित्य : दीड वाटी बासमती किंवा उंची तांदूळ, अर्धी वाटी मुगाची डाळ, १ तमालपत्र, २ मसाल्याचे वेलदोडे, ३ लवंगा, ३ चमचे साखर, १ चमचा मीठ, ४ चमचे बेदाणे, २ मोठे चमचे साजूक तूप.
कृती : डाळ व तांदूळ मिसळून १ तासभर भिजत ठेवावेत. नंतर चाळणीवर निथळत ठेवावेत. तुपावर तमालपत्र, वेलदोडे, लवंगा टाकून डाळ-तांदूळ १० मिनिटे परतावेत. साखर, मीठ, बेदाणे घालून डाळ-तांदळाच्या दुप्पट उकळते पाणी घालावे. भात आचेवर शिजू द्यावा. शिजल्यावर खाली उतरवून अर्धा चमचा तूप वरून सोडावे म्हणजे दाणे मोकळे दिसतात.

खांडवी 
साहित्य : दोन वाट्या तांदुळाचा रवा, १ मोठी वाटी नारळाचा चव, २ वाट्या बारीक चिरलेला गूळ, अर्धा चमचा मीठ (थोडे कमी चालेल), ४-५ वेलदोड्यांची पूड, थोडेसे वाटलेले आले व तूप,
कृती : तांदूळ धुऊन कपड्यावर पसरून सावलीत वाळवावेत. नंतर त्याचा रवा काढावा. हा रवा तुपावर चांगला भाजून घ्यावा. एका पातेल्यात ४ वाट्या पाणी उकळायला ठेवावे. त्यात गूळ व आले वाटून घालावे. चांगली उकळी आली, की त्यात खमंग भाजलेला रवा घालावा. ढवळून झाकण ठेवावे. मंद आचेवर चांगली वाफ येऊ द्यावी. मिश्रण शिजले, की उतरवावे. नंतर मिश्रण ट्रेमध्ये ओतावे. हाताने एकसारखे थापून वरून थोडे थोडे ओले खोबरे पसरवून हलक्‍या हाताने पुन्हा थापावे. गार झाल्यावर वड्या पाडाव्यात. साजूक तुपाबरोबर ‘खांडवी’ अगदी मस्त लागतात. बरोबर कोणतेही लोणचे द्यावे.

पनीर बर्फी 
साहित्य : शंभर ग्रॅम पनीर, ४०० ग्रॅम गोड दही, १ कंडेन्स्ड मिल्कचा डबा, अर्धा चमचा वेलचीची पूड, बदाम-काजूचे काप.
कृती : प्रथम पनीर खूप मळून घ्यावे. एका बाऊलमध्ये सर्व कंडेन्स्ड मिल्क घ्यावे. त्यात दही, वेलची पूड व मळलेले पनीर घालावे. हे मिश्रण खूप फेटावे. एका उथळ अथवा पसरट डब्यात घालून कुकरमध्ये खरवसासारखे २० ते २५ मिनिटे वाफवावे, उकडावे. वरून मेव्याचे काप घालावेत. गार झाल्यावर बर्फीच्या वड्या योग्य आकारात कापाव्यात. ही बर्फी खूप छान लागते.

शेवयांचे पुडिंग (पारसी पद्धत) 
साहित्य : दोन वाट्या शेवयांचा बारीक चुरा, दीड वाटी साखर, अर्धी वाटी साजूक तूप, २ मोठे चमचे चारोळ्या, १ मोठा चमचा बेदाणे (ऐच्छिक), अर्धा चमचा वेलदोड्याची पूड, अर्धा चमचा जायफळ पूड, १ कप दूध.
कृती : जाड बुडाच्या पातेल्यात शेवया तुपावर बदामी रंगावर परताव्यात. मंद आचेवर परतून त्यात दीड वाटी गरम पाणी व कपभर गरम दूध घालावे. शेवया शिजल्या, की त्यात साखर घालून ढवळावे. बेदाणे, चारोळ्या, जायफळ व वेलची पूड घालून झाकावे. एक दणकून वाफ आली, की उतरावे व अर्धवट झाकावे. १०-१५ मिनिटांनी जरा घट्ट होईल (शिऱ्यासारखेच). कोरडे वाटल्यास वरून थोडे तूप सोडावे. दुधाबरोबर थोडी घोटलेली सायही घालावी. वाढतेवेळी आवडीप्रमाणे काजू-बदाम-पिस्त्याचे पातळ काप घालावेत. गार-गरम दोन्ही प्रकारे छान लागते. आंबट-गोड ज्यांना आवडते ती मंडळी या शेवई पुडिंगवर थोडे गोड दही घालून खातात.

बुंदीची खीर
साहित्य : दोन लिटर दूध, १५० ग्रॅम गोड बुंदी किंवा मोतीचुराचे २ लाडू, अर्धी वाटी साखर, पाव चमचा वेलची पूड, पाव चमचा जायफळाची पूड.
कृती : दूध २ लिटरचे १ लिटर होईस्तोवर आटवावे. त्यात साखर घालून पुन्हा उकळी आणावी. बुंदीचा लाडू असल्यास कुस्करून बुंदी मोकळ्या कराव्यात. आटीव दुधात बंुदी घालून एक उकळी आली, की खीर खाली उतरवावी व गार होऊ द्यावी. त्यात वेलची पूड व जायफळ पूड घालावी. ही खीर पोळी, पुरीबरोबर छान लागते. फ्रीजमध्ये गार करून पुडिंगसारखा उपयोग करता येतो. पुडिंग करायचे असल्यास साखर थोडी कमी घालून क्रीम घालावे.
टीप : बुंदी किंवा मोतीचूर लाडू ताजेच असावेत.

कच्च्या केळ्याची पानगी 
साहित्य : दोन-तीन कच्ची केळी, १ वाटी शिंगाड्याचे पीठ, १ चिमटी मीठ, २ मोठे चमचे नारळाचा चव, अर्धी वाटी पिठीसाखर, १ मोठा चमचा शेंगदाण्याचा बारीक कूट, पाव वाटी साजूक तूप, २ मोठे चमचे साबुदाणा किंवा वरीचे पीठ, लागेल तसे दूध.
कृती : प्रथम केळी चांगली तासून किसून त्याचा लगदा घ्यावा. त्यात शिंगाडा पीठ, नारळ चव, दाणेकूट, वरीलपैकी एकच पीठ, पिठीसाखर हे सर्व मिश्रण चांगले मळून घ्यावे. त्याचा गोळा तयार करावा. आता लिंबाएवढे त्याचे गोळे करून केळीच्या किंवा कर्दळीच्या अथवा हळदीच्या पानावर गोळे थापून पानगी करावी. ती पाने पानगीसह मंद आचेवर एका बाजूने शेकावीत. पान काळे करपले, की दुसऱ्या पानावर दुसरी बाजू शेकावी. सर्व्ह करताना बरोबर लोणचे द्यावे. ही केळ्यांची पानगी उपवासालाही चालतील अशी आहेत.

चिनी बादाम टिक्की
साहित्य : एक वाटी शेंगदाण्याचे मऊ कूट, १ वाटी आयसिंग शुगर, एक वाटी दूध पावडर.
कृती : प्रथम शेंगदाणे चांगले भाजून, सोलून त्याचे अगदी बारीक व मऊ कूट करून घ्यावे. एका तसराळ्यात तयार कूट, आयसिंग शुगर व दूध पावडर हे सर्व एकत्र करून छान एकजीव करावे. एका वाटीत पाणी घेऊन चमच्याने ते पाणी थोडे थोडे वरील मिश्रणात घालावे. मिश्रणाचा हळूहळू मऊ गोळा करून घ्यावा व तो गोळा प्लॅस्टिकच्या पिशवीवर थापावा. पाहिजे त्या आकारात कापून टिक्‍क्‍या कराव्यात.
(बिहारमध्ये शेंगदाण्यांना चिनी बादाम म्हणतात.)

संबंधित बातम्या