भाताचे चविष्ट प्रकार...

प्रीती सुगंधी, औरंगाबाद
सोमवार, 18 मार्च 2019

फूड पॉइंट
घरी केलेला किंवा हॉटेलमधून आणलेला राइस किंवा पुलाव कधीकधी शिल्लक राहतो. दुसऱ्या दिवशी हा शिळा भात खायला नको वाटतो. अशा वेळी त्या भातापासून विविध पदार्थ घडू शकतात. शिल्लक राहिलेल्या भाताच्या या काही भन्नाट रेसिपीज...

भाताचे पराठे
साहित्य : एक वाटी शिल्लक राहिलेला किंवा ताजा भात, अर्धी वाटी बेसन पीठ, अर्धी वाटी गव्हाचे पीठ, १ चमचा लसूण पेस्ट, १ चमचा गरम मसाला, १ चमचा तिखट, अर्धा चमचा हळद, पराठे भाजण्यासाठी आणि मोहनासाठी ४ ते ५ चमचे तेल, चवीनुसार मीठ, १ चमचा जिरे पावडर, पीठ मळण्यासाठी पाणी.
कृती : एका परातीत भात चांगला एकजीव करून घ्यावा. नंतर त्यात बेसन पीठ, गव्हाचे पीठ, लसूण पेस्ट, गरम मसाला, तिखट, हळद, जिरे पावडर, १ चमचा तेल आणि चवीनुसार मीठ घालावे. त्यामध्ये आवश्‍यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घ्यावे. पुरीसारखे पीठ मळून घ्यावे व दहा मिनिटे बाजूला ठेवावे. दहा मिनिटांनंतर पीठ पुन्हा चांगले मळून गोळे करावेत. पराठे गोल किंवा हव्या त्या आकाराचे लाटावेत व तव्यावर चांगले भाजून घ्यावेत. दही किंवा चटणीबरोबर गरमागरम सर्व्ह करावेत. हे पराठे मुलांना दुपारच्या डब्यात देता येतात.

पुलावाचे धिरडे
साहित्य : एक कप शिल्लक राहिलेला पुलाव, १ कप गव्हाचे पीठ, २ चमचे हिरवी मिरची व लसणाची पेस्ट, १ चमचा तिखट, चवीनुसार मीठ, अर्धा कप बेसन पीठ, २ चमचे रवा, तव्यावर लावण्यासाठी ३ चमचे तेल किंवा बटर, पाणी आवश्‍यकतेनुसार.
कृती : प्रथम पुलाव मोकळा करून घ्यावा आणि थोडा गरम करून थंड करावा. नंतर एका भांड्यात गव्हाचे पीठ, बेसन पीठ, रवा, तिखट, हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून चांगले एकजीव करावे. पाणी घालून दहा मिनिटे बाजूला ठेवावे. दहा मिनिटांनंतर त्यात पुलाव, मीठ आणि तेल मिसळून चांगले एकजीव करून पुन्हा पाच मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर तव्यावर तेल घालून हव्या त्या आकाराचे धिरडे करावे. दोन्ही बाजूंनी सोनेरी खरपूस भाजून घ्यावे. गरमागरम धिरडे दह्याबरोबर सर्व्ह करावे. ही धिरडी जेवणाला उत्तम पर्याय ठरू शकतात.

राइस आप्पे
साहित्य : एक कप शिल्लक राहिलेला भात, १ कप रवा, १ कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा चमचा हिरवी मिरची व लसणाची पेस्ट, १ चमचा गरम मसाला, अर्धा कप बारीक चिरलेली सिमला मिरची, चवीनुसार मीठ, अर्धा कप दही, १ चमचा बारीक तीळ, आप्पे पात्रावर लावण्यासाठी तेल, आवश्‍यकतेनुसार पाणी, आप्पे पात्र.
कृती : प्रथम भात मिक्‍सरमध्ये घालून चांगला बारीक करून घ्यावा. गरजेनुसार थोडे पाणी घालून बारीक करावा. त्यात रवा आणि दही घालून चांगले एकजीव करून वीस मिनिटे बाजूला ठेवावे. नंतर त्यात कांदा, हिरवी मिरची-लसणाची पेस्ट, गरम मसाला, सिमला मिरची, मीठ आणि तीळ घालून पुन्हा चांगले एकजीव करावे. आवश्‍यकता असेल तर पाणी घालावे. पीठ थोडे सैलसर असावे. आता गॅसवर आप्पे पात्र गरम करावे. त्यामध्ये चमच्याच्या साह्याने थोडे तेल व तयार केलेले मिश्रण घालावे. दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत गॅसवर ठेवावेत. हे आप्पे खूप कमी तेलात तयार होतात. चटणीबरोबर गरमागरम खायला द्यावेत.

पुलाव पकोडा
साहित्य : अर्धा कप शिल्लक राहिलेला पुलाव, अर्धा कप राहिलेला जिरा राइस, १ कप तांदळाचे पीठ, २ चमचे रवा, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, बारीक किसलेल्या प्रोसेस्ड चीजच्या २ क्‍युब्ज, १ चमचा तीळ, २ चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर, तळण्यासाठी तेल, चवीनुसार मीठ, २ चमचे पावभाजी मसाला.
कृती : प्रथम पुलाव आणि जिरा राइस मोकळा करून घ्यावा. हवा असल्यास मिक्‍सरमध्ये बारीक करावा, नाही केला तरी छान लागतो. नंतर एका भांड्यात पुलाव आणि जिरा राइस घेऊन त्यात बेसन पीठ, तांदळाचे पीठ, रवा, कांदा, चीज, तीळ, कोथिंबीर, मीठ आणि पावभाजी मसाला घालून चांगले एकजीव करावे आणि दहा मिनिटे बाजूला ठेवावे. गरज असल्यास पाणी घालावे. आता कढईत तेल तापवून घ्यावे. तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून तापलेल्या तेलातून पकोडे तळून घ्यावेत. सोनेरी रंग येईपर्यंत तळावेत. गरमागरम पकोडे चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

पुलाव सॅंडविच
साहित्य : एक कप शिल्लक राहिलेला पुलाव, अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो, १ कप बारीक शेव, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ, एक चमचा चाट मसाला, दोन चमचे बटर, ८ ते १० कडा कापलेले ब्रेड स्लाईस, अर्धा कप दही.
कृती : प्रथम एका भांड्यात राहिलेला पुलाव घेऊन त्यात कांदा, टोमॅटो, गरम मसाला, तिखट, चाट मसाला घालून चांगले एकजीव करावे. नंतर त्यात दही, मीठ आणि शेव घालून मिश्रण करावे. आता ब्रेडला बटर लावून त्यावर मिश्रण ठेवावे. त्यावर बटर लावलेला ब्रेडचा दुसरा स्लाईस ठेवावा. आता ग्रिल तव्यावर सॅंडविच ठेवून चांगले खरपूस भाजून घ्यावे. सॅंडविच सॉसबरोबर खायला द्यावे. मुलांना डब्यातसुद्धा देता येतात.

पुलाव थालीपीठ
साहित्य : एक कप शिल्लक राहिलेला पुलाव, अर्धा कप ज्वारीचे पीठ, अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप बेसन पीठ, आवश्‍यकतेनुसार पाणी आणि मीठ, १ कप बारीक चिरलेला टोमॅटो किंवा टोमॅटो प्युरी, १ चमचा गरम मसाला, १ चमचा सांबर मसाला, १ चमचा लसणाची पेस्ट, १ चमचा तिखट.
कृती : प्रथम ज्वारीचे पीठ, गव्हाचे पीठ, बेसन, टोमॅटो, गरम मसाला, सांबर मसाला, तिखट, लसणाची पेस्ट, पुलाव आणि आवश्‍यकतेनुसार मीठ घालून चांगले एकजीव करून घ्यावे. कणकेसारखे पीठ मळून घ्यावे. नंतर पाच मिनिटे बाजूला ठेवावे. तवा गरम करायला ठेवावा आणि मलमल कपडा ओला करून घ्यावा. त्यावर पीठाचे गोळे ठेवून हाताने थापावेत व मध्यभागी एक गोल छिद्र करावे. थालीपीठ तव्यावर मलमल कपड्याच्या साहाय्याने उलटे करावे. तेलावर भाजून घ्यावे व दह्याबरोबर सर्व्ह करावे. मी बारीक चिरलेला टोमॅटोच वापरते. तुम्ही टोमॅटो प्युरी वापरू शकता.

पुलाव पनीर रोल
साहित्य : दीड कप शिल्लक राहिलेला पुलाव, १ कप किसलेले पनीर, अर्धा कप उकडलेला बटाटा बारीक कुस्करून, १ चमचा गरम मसाला, अर्धी वाटी कांद्याच्या चकत्या, १ चमचा तिखट, चवीनुसार मीठ, तळण्यासाठी तेल, चवीनुसार सांबर मसाला.
कृती : एका भांड्यात पुलाव, किसलेले पनीर, बटाटा, गरम मसाला, कांद्याच्या चकत्या, लाल तिखट, मीठ आणि सांबर मसाला घालावा. थोडेसे पाणी घालून चांगले एकजीव करून घ्यावे. नंतर लांबट आकाराचे रोल करून दहा मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावे. एका कढईत मंद आचेवर तेल तापण्यासाठी ठेवावे. कढईत पुलाव पनीर रोल सोनेरी होईपर्यंत तळून घ्यावेत. रोल नुसतेसुद्धा छान लागतात, पण तुम्हाला हवे असल्यास सॉस, चटणी घेऊ शकता. यामध्ये तुमच्या आवडीच्या इतर भाज्याही घालू शकता.

राइस उत्तपम
साहित्य : दीड कप शिल्लक राहिलेला भात, १ कप दही, २ चमचे उडीद डाळीचे पीठ, १ चमचा जिरे आणि हिरवी मिरची पेस्ट, २ चमचे तांदळाचे पीठ.
टॅपिंगसाठी : अर्धा कप बारीक चिरलेला कांदा, १ कप शिजलेले कॉर्न, अर्धा कप बारीक चिरलेला टोमॅटो, १ चमचा चाट मसाला, १ चमचा गरम मसाला, १ चमचा पावभाजी मसाला, चवीनुसार मीठ, तेल.
कृती : प्रथम टॉपिंगसाठी एका भांड्यात कांदा, टोमॅटो, कॉर्न, चाट मसाला, गरम मसाला, पावभाजी मसाला आणि थोडेसे तेल घालून हे मिश्रण दहा मिनिटे बाजूला ठेवावे. दुसऱ्या भांड्यात राहिलेला भात, दही, उडीद डाळीचे पीठ, तांदळाचे पीठ, जिरे-लसणाची पेस्ट, चवीनुसार मीठ आणि थोडेसे पाणी घालून मिक्‍सरमध्ये बारीक पेस्ट करावी. ही पेस्ट २५ मिनिटे बाजूला ठेवावी. तोपर्यंत टॉपिंगच्या मिश्रणात मीठ घालून पुन्हा चांगले एकजीव करावे. नंतर पिठात थोडेसे पाणी घालून चांगले ढवळून घ्यावे आणि तव्यावर उत्तपम तयार करावेत व वरून टॉपिंग घालावे. गरजेनुसार बाजूने थोडेसे तेल सोडावे. एका उत्तपमला साधारण २ टेबलस्पून टॉपिंग लागेल.

संबंधित बातम्या