बारा महिन्यांच्या बारा पाककृती

राजश्री बिनायकिया
गुरुवार, 11 जानेवारी 2018

जानेवारी : ‘संक्रांत’ - तिळाचा डिंक लाडू
साहित्य ः खमंग भाजलेले तीळ २ वाटी, तळलेला डिंक पाव वाटी, खोबऱ्याचा किस अर्धी वाटी, गूळ २ वाटी.
कृती ः तिळाचा कूट करून घ्यावा. गूळ किसून घ्यावा. डिंक बारीक करून घ्यावा. तिळाचा कूट, डिंक, गूळ, खोबऱ्याचा किस सर्व व्यवस्थित मिक्‍स करून घ्यावा. छोटे-छोटे लाडू वळावे.

जानेवारी : ‘संक्रांत’ - तिळाचा डिंक लाडू
साहित्य ः खमंग भाजलेले तीळ २ वाटी, तळलेला डिंक पाव वाटी, खोबऱ्याचा किस अर्धी वाटी, गूळ २ वाटी.
कृती ः तिळाचा कूट करून घ्यावा. गूळ किसून घ्यावा. डिंक बारीक करून घ्यावा. तिळाचा कूट, डिंक, गूळ, खोबऱ्याचा किस सर्व व्यवस्थित मिक्‍स करून घ्यावा. छोटे-छोटे लाडू वळावे.
टीप : आवडत असल्यास त्या मिश्रणात १ टीस्पून सुंठ पावडर टाकावी व तूप ३ टीस्पून घालावे. पौष्टिक तसेच वेगळ्या चवीचा लाडू संक्रांतीसाठी जरूर बनवावा.

फेब्रुवारी : ‘व्हॅलेन्टाइन डे’ - क्विक स्वीट सरप्राइज
साहित्य ः
अर्धी वाटी क्रीम, अर्धी वाटी आवडीची बारीक चिरलेली फळे, चार केकचे स्लाईस, दोन टेबल स्पून साखर, दोन-तीन थेंब व्हॅनिला इसेन्स, एक टेबल स्पून बिस्किटाचा चुरा व एक मोठा टेबल स्पून सुक्‍या मेव्याचे तुकडे, एक टेबल स्पून चॉकलेट सॉस, सजावटीसाठी सिल्व्हर बॉल.
कृती ः प्रथम एका बाऊलमध्ये साखर व व्हॅनिला इसेन्ससह क्रीम हलकं होईपर्यंत फेटून घ्यावे. सर्व्हिंग डिश घ्यावी. त्यामध्ये एक केक स्लाईस ठेवावा. त्यावर कापलेल्या फळांचा थर लावावा. (थोडीच फळे घ्यावी), त्यावर बिस्किटाचा चुरा टाकावा. नंतर क्रीमचा थर लावावा. त्यावर सुकामेवा टाकावा. अशाच पद्धतीने परत एकावर एक थर लावावा. थर जास्त जाड नसावा. सर्वांत वर उरलेलं क्रीम लावावे. त्यावर चॉकलेट सॉसने आकार काढावा. त्यामध्ये सिलव्हर वॉलने सजवावे. हे थंड करण्यास फ्रीजमध्ये ठेवावे. हे स्वीट सरप्राइज तुमच्या व्हॅलेन्टाइनला नक्की आवडेल.

मार्च : होळी - कच्छी पुरणपोळी
साहित्य ः दीड वाटी तुरीची डाळ, दीड वाटी साखर, अडीच वाटी कणीक, १ टीस्पून जायफळ, वेलची पूड, १ वाटी तूप.
कृती ः तुरीची डाळ शिजवावी. नंतर त्यात साखर घालावी. हॅन्ड मिक्‍सीने फिरवून घ्यावे. नंतर पुरण घट्ट शिजवावे. नंतर त्यात वेलदोडे, जायफळ पूड घालावी. नंतर भिजवलेल्या कणकेचा उंडा करून त्यामध्ये पुरण भरावे. लहान आकाराच्या पुरणपोळ्या लाटाव्यात. तव्यावर तूप सोडून दोन्हीकडून खरपूस शेकून घ्यावे. आयत्या वेळी तूप लावून सर्व्ह करावे.

एप्रिल : गुढीपाडवा - नारळाची रबडी
साहित्य ः दोन नारळ, १ टीस्पून वेलची पूड, अर्धा लिटर दूध, २ टेबल स्पून सुक्‍या मेव्याचे काप, २ ते ३ टेबल स्पून साखर (आवडीनुसार).
कृती ः नारळ फोडून त्यातील खोबऱ्याचे तुकडे काढून घ्यावे. खोबऱ्याचे तुकडे व पाणी मिक्‍सरमध्ये घालावे. एकजीव करून दूध तयार करून घ्यावे. हे नारळाचे दूध भांड्यात टाकून उकळावे. त्यात साधं दूध घालावे. दूध आटवून त्याची रबडी बनवावी. साखर व वेलची पूड घालून परत उकळी आणावी. मोठ्या बाऊलमध्ये रबडी काढून घ्यावी व त्यात सुकामेवा मिक्‍स करून थंड झाल्यावर सर्व्ह करावे.

मे : इन्स्टंट कुल्फी - (मावा कुल्फी)
साहित्य ः अर्धा लिटर गरम केलेले दूध, पाऊण कप साखर, ५ ते ६ केशरी पेठे, २ मारी बिस्किटे, ३ ते ४ ब्रेडस्लाईस, २ टीस्पून वेलदोडे पूड, १ टेबल स्पून बदाम काप.
कृती ः साखर, पेढे, ब्रेड स्लाईस, बिस्किटे मिक्‍सरमधून बारीक करून घ्यावे. दुधामध्ये सर्व मिश्रण मिक्‍स करावे. गॅसवर दुधाला एक उकळी आणावी. दूध सारखे चमच्याने हलवत राहावे. उकळी आल्यावर गॅस बंद करावा. गार करण्यास ठेवावे. गार झाल्यावर कुल्फी कोनमध्ये भरावा. २ ते ३ तास सेट करावे.
टीप : फ्रीजर हायपर सेट करून घ्यावा. उन्हाळ्यात इन्स्टंट कुल्फी सर्व्ह करावी.

जून : मॉन्सून स्पेशल - ‘ग्रीन पकोडे’
साहित्य ः मोड आलेले मूग १ वाटी, १ वाटी मटार, १ वाटी कॉर्न, १ वाटी बारीक चिरलेला पालक, अर्धी वाटी कोथिंबीर, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट प्रत्येकी २ टीस्पून, चवीनुसार मीठ, १ वाटी बेसनपीठ, तेल, चिमूटभर सोडा.
कृती ः मूग, मटार, कॉर्न मिक्‍सरमधून ओबड-धोबड वाटून घ्यावे. नंतर त्यामध्ये कोथिंबीर, पालक, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट मिक्‍स करावे. मीठ, बेसनपीठ, सोडा मिक्‍स करावे. मिश्रण एकसारखे करून घ्यावे. कढईत तेल गरम करावे. त्यामध्ये मिश्रणाचे छोटे-छोटे पकोडे तळावे. गरमागरम सॉसबरोबर सर्व्ह करावे.

जुलै : आषाढी एकादशी उपवासाचा - पिझ्झा (गोड)
साहित्य ः दोन वाटी भिजवलेला साबुदाणा (हा जरा मोकळाच असावा), १ वाटी ओल्या खोबऱ्याचा किस, पाऊण वाटी ते अर्धी वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी दाण्याचे कूट, हवी असल्यास वेलदोड्याची पूड.
कृती ः प्रथम ओले खोबरे, साखर, दाण्याचे कूट, वेलची पूड हे सर्व एकत्र मिक्‍स करून सारण तयार करून घ्यावे. मंद गॅसवर तवा किंवा पॅन तापत ठेवावा. तवा तापल्यानंतर त्यावर तूप घालावे. नंतर भिजलेला साबुदाणा घेऊन तो तव्यावर हाताने पसरावा. साधारणतः मध्यम गोल आकार करावा. त्यावर झाकण ठेवावे. जाडी बेताचीच करावी. एक चांगली वाफ झाली, की झाकण काढावे. खालून तांबूस झाला असेल व सर्व साबुदाणा एकमेकांना चिकटलेला असला तर पिझ्झा झाला असे समजावे. नंतर तयार केलेले सारण पिझ्झावर थोडे पसरावे. गरम गरम गोड पिझ्झा सर्व्ह करावा.

ऑगस्ट : नारळीपौर्णिमा रक्षाबंधन कोकोनट संदेश
साहित्य ः अडीचशे ग्रॅम पनीर, दोन वाटी ओल्या नारळाचा चव, अर्धी वाटी मावा, साखर दोन वाटी, गुलकंद दोन टेबल स्पून, वेलची पूड.
कृती ः पनीर किसून घ्यावे. कढईत नारळाचा चव व साखर घालून परतावे. सारखे हलवत राहावे. नंतर थोडे घट्ट झाल्यावर त्यामध्ये खवा व पनीर घालावे. परत मिश्रण घट्ट शिजू द्यावे. वेलची पूड मिक्‍स करावी. मिश्रण घट्ट झाल्यावर गॅस बंद करावा. मिश्रण गार होऊ द्यावे. लहान-लहान वाट्या बनवून त्यात गुलकंद भरावे. वाटी बंद करून रोल बनवून फ्रीजमध्ये गार करावे. सर्व्ह करताना मधून कापून सर्व्ह करावे.

सप्टेंबर : गणेशोत्सव केशरी - खजूर मोदक
साहित्य ः सीडलेस खजूर बारीक चिरलेला, पिठी साखर पाऊण वाटी, मध २ टीस्पून, जायफळ पूड अर्धा टीस्पून, साजूक तूप २ टीस्पून, केशरी रंग, डेसिकेटेड खोबरे.
कृती ः खजूर मिक्‍सरमधून बारीक करावा. पिठीसाखर, तूप, जायफळ पूड घालून मिश्रण एकजीव करावे. मोदक साच्यातून मोदक करावेत. मोदकाच्या टोकाला थोडा मध लावावा. खोबरे केशरी रंगात मिसळून घ्यावे. मोदकाचा मध लावलेला भाग केशरी खोबऱ्यात घोळवावा किंवा हाताने चिमूटभर केशरी खोबरे लावावे. सजावट करून बाप्पाला प्रसाद दाखवावा.

ऑक्‍टोबर : दिवाळी बुंदी - माव्याचे लाडू
साहित्य ः दीड वाटी साधी बुंदी, मावा दीड वाटी, १ वाटी पिठीसाखर, अर्धी वाटी दूध, सजावटीसाठी थोडीशी चेरी.
कृती ः मावा हाताने कुस्करून घ्यावा. नंतर कढईत मावा टाकावा. पाच मिनिटापर्यंत मंद आचेवर परतून घ्यावा. आता त्यात पिठीसाखर टाकून व्यवस्थित मिसळावी. बुंदी टाकावी. आणि त्यावर दुधाचे थेंब सतत शिंपडावे. मिश्रण चांगले मिसळल्यावर आच बंद करावी. थंड झाल्यावर लाडू बनवावा. सजावटीसाठी प्रत्येक लाडुवर चेरीचा तुकडा ठेवावा.

नोव्हेंबर : सुकामेवा वडी
साहित्य ः एक वाटी उडदाची डाळ, अर्धी वाटी तूप, १ वाटी साखर, १ वाटी बारीक चिरलेले बदाम, अर्धी वाटी चिरलेले पिस्ते, १ टीस्पून वेलची पूड, अर्धी वाटी मावा, पाऊण वाटी पाणी.
कृती ः उडदाची डाळ कापडाने स्वच्छ पुसून घ्यावी. नंतर मिक्‍सरमध्ये वाटून त्याचा रवा काढून घ्यावा. पॅनमध्ये तूप टाकून गरम करून घ्यावे. त्यामध्ये डाळीचा रवा तांबूस रंगावर भाजावा. साखरेचा दोनतारी पाक करून घ्यावा. किसलेला मावा, डाळीचा रवा, चिरलेले बदाम, पिस्ते, वेलची पूड टाकून मिश्रण परतावे. मिश्रण पॅनच्या कडा सोडून लागलं की तुपाच्या हात फिरवलेल्या थाळीत ओतावा. सेट झाल्यावर वड्या कापाव्यात.पौष्टिक वड्या सर्वांना खाण्यासाठी उपयुक्त.

डिसेंबर : ख्रिसमस झटपट केक
साहित्य ः ब्राऊन ब्रेडच्या स्लाईस, चॉकलेट मिश्रण पातळ केलेले किंवा बोर्नव्हिटा, आवडीनुसार जॅम, पातळ केलेला साखरेचा पाक.
कृती ः प्रथम ब्रेड स्लाईसच्या कडा व्यवस्थित कापून त्यांना गोल आकार द्यावा. प्रथम एका स्लाईसवर आवडीनुसार जॅम लावावा. याप्रकारे तीन स्लाईस तयार करून घ्यावे. त्या एकावर एक ठेवावे. सर्वांत वर जॅम न लावलेली स्लाईस ठेवावे. त्यावर मेल्ट केलेले चॉकलेट किंवा बोर्नव्हिटा साखरेच्या पाकात मिक्‍स करून जॅमप्रमाणे स्लाईसवर लावावी व थोडा वेळ फ्रीजमध्ये सेट करावे. सेट झाल्यावर त्यावर रंगीत चेरी, जेम्स, ड्रायफ्रूट लावून सजवावे.
टीप : संपूर्ण स्लाईसही मेल्ट चॉकलेटनी कव्हर करू शकता.

फोटो फीचर

संबंधित बातम्या