न्यारी न्याहारी 

रेखा विनायक नाबर
सोमवार, 3 फेब्रुवारी 2020

फूड पॉइंट
दिवसाची सुरुवात स्पेशल पण पौष्टिक अशा नाश्त्याने झाली, तर पोट भरते... त्यासाठीच आहेत या नाश्त्याच्या खासमखास रेसिपीज...

मकई मोमोज 
साहित्य : अर्धी वाटी मैदा, अर्धी वाटी नाचणी पीठ, अर्धी वाटी बारीक चिरलेला कांदा, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, १ वाटी मक्‍याचे दाणे, तेल, मीठ, हळद पावडर, गरम मसाला, कोथिंबीर, किंचित गूळ 
कृती : मक्‍याचे दाणे वाफवून खसखशीत वाटावे. मैदा, नाचणी पीठ व्यवस्थित मिक्‍स करून त्यात तेल व मीठ घालून मळून ठेवावे. एक चमचा तेलात मोहरीची फोडणी करावी. आले-लसूण पेस्ट घालून कांदा परतावा. तो मऊ झाल्यावर मक्‍याचे दाणे घालावे. हळद, गरम मसाला, किंचित गूळ घालून चांगले ढवळून अंगाबरोबर पाणी घालावे. शिजल्यावर मीठ व चिरलेली कोथिंबीर घालावी. पाणी राहू देऊ नये. भिजवलेल्या पिठाच्या लहान लहान गोळ्या करून पुऱ्या लाटाव्या. प्रत्येक पुरीत मक्‍याचे सारण भरून पुरीला चुण्या देऊन हवा तसा आकार देऊन मोमोज तयार करावे. कुकरमध्ये तेल लावलेल्या चाळणीत ठेवून वजन न लावता वीस मिनिटे वाफवावे. हिरवी मिरची, आले, लसूण, पुदिना, कोथिंबीर चटणीबरोबर लाजवाब लागतात. 


मूगडाळ-मका आप्पे  
साहित्य : सालाची मूगडाळ, मक्‍याचे दाणे, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, मीठ, गूळ, पोहे, तेल. 
कृती : मूगडाळ भिजत घालावी. भिजल्यावर त्यात हिरव्या मिरच्यांचे व आल्याचे तुकडे घालून रवाळ वाटावे. पोहे भिजवून त्यातील पाणी काढून मऊ करून मिश्रणात घालावे. नंतर मक्‍याचे दाणे हलकेसे ठेचून घालावे. कोथिंबीर, किंचित गूळ व चवीनुसार मीठ घालून मिश्रण तयार करावे. आप्पे पात्रास तेल लावून गरम करत ठेवावे. गरम झाल्यावर प्रत्येक खोलगट भागात एक मोठा चमचा मिश्रण घालावे. चॉकलेटी रंगावर भाजले की आप्पे उलटावे. दोन थेंब तेल घालावे. खरपूस भाजल्यावर बाहेर काढावे. खजूर, लाल मिरची, चिंच या चटणीबरोबर चविष्ट, पौष्टिक नाश्‍ता होतो. अत्यल्प तेलामुळे आबालवृद्धांसाठी उत्तम आहे.


पूर्णान्न पिझ्झा  
साहित्य : ज्वारी, तांदूळ, नाचणी, सोयाबीन पिठे मिक्‍स करून, आले-मिरची पेस्ट, मीठ, चीज. 
भाजीकरिता ः आले-लसूण पेस्ट, गरम मसाला, तेल, हळद, बारीक चिरलेला कांदा, सिमला मिरची, फ्लॉवर, गाजर, कोबी, टोमॅटो, तेल, मटार दाणे, मीठ, साखर, कोथिंबीर. 
कृती : पॅनमध्ये तेल तापवून त्यात आले-लसूण पेस्ट घालून टोमॅटो व कांदा चांगले परतून घ्यावे. हळद, मसाला पावडर घालून व्यवस्थित ढवळून वाफ आणावी. उरलेल्या भाज्या घालून चांगल्या मिसळाव्या. पाण्याचा हबका मारून झाकण ठेवून भाजी मऊ होऊ द्यावी. नंतर मीठ, साखर, बारीक चिरलेली कोथिंबीर घालून गॅस बंद करावा. सर्व पिठे आले-मिरची पेस्ट, मीठ घालून सरसरीत भिजवावी. नॉनस्टिक पॅनला तेल लावून त्यावर पिठाच्या मिश्रणाचे लहान धिरडे घालावे. हा झाला पिझ्झा बेस. एका बाजूने खरपूस भाजल्यावर उलटावा. वरच्या बाजूला चीज किसून घालावे. त्यावर भाजी पसरावी व झाकण ठेवावे. वाफ आल्यावर झाकण काढून वर हॉट अँड स्वीट सॉस घालावा. पूर्णान्नाच्या तोडीचा, बच्चे कंपनीला आवडणारा नाश्ता तयार.


पापलेटचे कटलेट 
साहित्य : मोठ्या आकाराचे पापलेट, १ चमचा आले-लसूण-मिरची पेस्ट, १ चमचा जिरेपूड, अर्धा चमचा हळद, २ चमचे गरम मसाला, १ चमचा कॉर्नफ्लोअर, २ ब्रेड स्लाइस, बारीक रवा, तळण्यासाठी तेल. 
कृती : पापलेट स्वच्छ करून कुकरमध्ये ठेवावा. पाणी न घालता एक शिट्टी करून घ्यावी. पापलेटचा मधला काटा काढून टाकून, मांसल भाग कुस्करून घ्यावा. उकडलेला बटाटा साल काढून कुस्करावा. पापलेट, बटाटा, आले-लसूण-मिरची पेस्ट, जिरेपूड, मीठ, हळद, गरम मसाला, कॉर्नफ्लोअर एकत्र करावे. ब्रेड पाण्यात भिजवून, पाणी काढून टाकून, त्या मिश्रणात घालावा. मिश्रण व्यवस्थित मळून घ्यावे. मिश्रणाचे लहान गोळे करावे. त्यांना हवा तो आकार देऊन बारीक रव्यात घोळवून फ्रायपॅनमध्ये गुलाबी रंगावर खरपूस तळून घ्यावे. सॉसबरोबर चटपटीत नाश्‍ता तयार.


मूगडाळ सोया फ्रॅंकी  
साहित्य : तीन वाट्या मूगडाळ, १ वाटी नाचणी, हिरवी मिरची, आले, मीठ, फ्लॉवर, मटार, सिमला मिरची, सोया चंक्स, कांदा, मोहरी, तेल, हळद, गरम मसाला, कोथिंबीर, मीठ, किंचित गूळ. 
कृती : मूगडाळ व नाचणी भिजत घालून दोन तासांनी मिरच्या व आले घालून वाटावे. त्यात मीठ घालावे. सोया चंक्स कोरडे भाजून मिक्‍सरमध्ये रवाळ वाटावे. भाज्या व कांदा बारीक कापून घ्यावा. गरम तेलात मोहरीच्या फोडणीवर कांदा घालावा. हळद व मसाला घालून तळावा. भाज्या, सोया चंक्स घालावे. बेताचे पाणी घालून शिजवावे. कोरडे व्हायला हवे. मीठ व कोथिंबीर घालावी. मूगडाळ वाटणाचे नॉनस्टिक पॅनवर पातळ घावन काढावे. त्यावर भाजी पसरून रोल करावे. दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून तुकडे करावे. खजुराच्या चटणीबरोबर लज्जतदार, पौष्टिक असा पोटभरीचा नाश्‍ता.


खिमा अळूवडी  
साहित्य : सारणासाठी बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, चवीनुसार मीठ, अळू, किंचित साखर, जाडसर दळलेले बेसन, खिमा, आले-मिरची पेस्ट, चिंच. 
कृती : कांदा, आले-मिरची पेस्ट, कोथिंबीर, मीठ, साखर, खिमा, चिंचेचा कोळ, बेसन, मसाला घालून सैलसर पीठ भिजवावे. अळूची पाने धुऊन त्यांच्या शिरांवरून लाटणे फिरवून ती व्यवस्थित करून घ्यावी. उलट्या बाजूला खिम्याचे मिश्रण सगळीकडे सारखे पसरावे. एकावर एक पान ठेवून मिश्रण लावून घट्ट वळकटी तयार करून, कुकरमध्ये शिट्टी न लावता वाफवून घ्यावी. थंड झाल्यावर वड्या पाडून शॅलो फ्राय कराव्या. झाली खिम्याची अळूवडी तयार.


खिमा बटाटेवडा  
साहित्य : उकडलेले बटाटे, चिकन खिमा, लसूण-मिरची-आले-कोथिंबीर पेस्ट, मीठ, लिंबू, किंचित साखर, बेसन, तेल, मसाला. 
कृती : उकडलेले बटाटे सोलून लगदा करावा. त्याच्या निम्मा खिमा घ्यावा. कोरडा शिजवून लगद्यात घालावा. त्याचबरोबर पेस्ट, मीठ, किंचित साखर घालून व्यवस्थित मळावे. बेसन पिठामध्ये पाणी, मीठ, गरम मसाला घालून सैलसर पीठ तयार करावे. गुठळ्या राहू देऊ नये. लगद्याचे लहान लहान गोळे करून बेसनामध्ये बुडवून गरम तेलात तळावे. पुदिन्याच्या चटणीबरोबर छान लागतात.


खिमा कटलेट 
साहित्य : पाव किलो चिकन खिमा, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, १ मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा, २ ब्रेड स्लाइस, कोथिंबीर व पुदिना बारीक चिरून, १ टेबलस्पून गरम मसाला, हळद, १ टेबलस्पून लिंबाचा रस, १ अंडे, ब्रेड क्रम्स, तेल, तिखट. 
कृती : खिमा स्वच्छ करून कोरडा करावा. पेस्ट, हळद, मसाला, मीठ, कांदा घालावा. पुदिना, कोथिंबीर घालावी. लिंबाचा रस घालावा. ब्रेडच्या स्लाइस पाण्यात बुडवून घट्ट पिळून त्यात घालाव्या. एकत्र करून व्यवस्थित मळून घ्यावे. एक अंडे फोडून फेटून घ्यावे. चवीपुरते मीठ व तिखट घालावे. पुन्हा फेटावे. खिम्याचे चपटे लांबट आकाराचे कटलेट करून घ्यावे. ते अंड्यात बुडवून, ब्रेड क्रम्समध्ये घोळवून, तव्यावर गरम तेलात शॅलो फ्राय करून घ्यावे. पुदिना चटणी किंवा सॉसबरोबर छान लागतात.


मसाला खिमा नूडल्स  
साहित्य : चार कांदे बारीक चिरून, १ किलो खिमा, ४ वाट्या नूडल्स, आले, लसूण, टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस, चीज, मीठ, तेल. 
कृती : नूडल्स उकळत्या पाण्यात घालून निथळून घ्यावे. गरम तेलात कांदा परतून घ्यावा. त्यात खिमा परतून घ्यावा. नंतर आले-लसूण पेस्ट, टोमॅटो सॉस, चिली सॉस, सोया सॉस आवडीप्रमाणे घालावा. झाकून ठेवून मंद गॅसवर शिजवावे. नंतर किसलेले चीज घालून ते वितळेपर्यंत परतावे. पुन्हा नूडल्स घालून परतावे. एक वाफ येऊ द्यावी. मसालेदार, यम्मी नूडल्स तयार.

संबंधित बातम्या