कढी गोळे, वडे, पराठे

संध्या प्रभुणे, यवतमाळ    
शुक्रवार, 11 मे 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

ब्रेडची कोथिंबीर वडी
साहित्य : अडीचशे ग्रॅम कोथिंबीर, २ मोठे कांदे, लसूण, आले, हिरव्या मिरच्या, जिरे, तिखट, मीठ हळद, काळा मसाला, साखर, लिंबू, सॅंडविच ब्रेड
कृती : प्रथम कोथिंबीर निवडून स्वच्छ धुवून चाळणीत निथळत ठेवावी. पाणी निघून गेल्यावर पेपरवर पसरवून ठेवावी. कांदे बारीक चिरावे. हिरव्या मिरच्या, लसूण, आले, जिरे हे मिक्‍सरवर बारीक वाटून घ्यावे  खोबरे किसून लालसर परतावे. खसखस पाव वाटी चांगली भाजून घ्यावी. या वड्यांना चारोळी लागतेच. एक पेला बेसन, अर्धा पेला मैदा घेऊन त्यात हळद, मीठ, तीळ घालावे. तेलाचे कडकडीत मोहन घालावे व भज्याच्या पिठाप्रमाणे पीठ भिजवून ठेवावे. नंतर कोथिंबीर बारीक चिरावी. कढईत थोडे तेल घालावे. त्यात मोहरी घालून ती तडतडल्यावर त्यात हिंग व हळद घालून हिरवी मिरची, लसणाचे बारीक केलेला गोळा घालावा. तो परतल्यावर त्यात कांदा घालून परतावे. त्यात भाजलेला खोबऱ्याचा किस, खसखस, चारोळी घालावी. नंतर कढई खाली उतरून त्यात बारीक चिरलेली कोथिंबीर घालावी. त्यात मीठ साखर घालून लिंबू पिळावे व सारण पसरट भांड्यात काढून गार होऊ द्यावे. बेडचे त्रिकोणी तुकडे करावे. प्रथम एका तुकड्याला गरम मसाला थोडा पाण्यात भिजवून लावावा. त्या तुकड्यावर कोथिंबिरीचे सारण चमच्याने पसरवून दुसरा त्रिकोणी तुकडा त्यावर दाबून बसवावा. तुकडा ठेवण्याआधी मैद्याच्या पेस्टनी तो पक्का बसवावा. नंतर सारण भरलेला ब्रेडचा तुकडा बेसनाच्या पिठात बुडवून मंद आचेवर गरम तेलात तळावे आणि चाळणीत उबे काढून ठेवावे. अशा वड्या तयार कराव्यात. गार झाल्यावर सॉस किंवा डाळ्यांच्या चटणीबरोबर खाण्यास द्याव्या.
चटणी : फुटाण्याच्या डाळ्या, दाण्याचा कूट, हिरव्या मिरच्या, जिरे, मीठ, साखर घालावे. नंतर थोडे पाणी घालून मिक्‍सरने बारीक वाटावे. त्यात दही घालून चटणी एकजीव करावी. वरून तेल, हिंग, मोहरी, उडदाची डाळ हळद घालून फोडणी करून चटणीवर घालावी. वरून कोथिंबीर घालावी. खूपच चविष्ट चटणी होते.

भाजणीचे वडे
साहित्य : थालीपिठाची भाजणी, तिखट, हळद, मीठ, तीळ, तेल, ओवा
कृती : प्रथम भाजणीचे बारीक पीठ घ्यावे. साधारण दोन पेले पीठ घ्यावे. त्यात तिखट मीठ, हळद, तीळ, ओवा घालावे. नंतर त्यात तेलाचे कडकडीत मोहन घालावे व पीठ एक तास आधी घट्ट भिजवून ठेवावे. नंतर एका प्लॅस्टिक कागदावर वडे थापावे. पुरी करतो तसा गोल घ्यावा. कढईत तेल गरम करण्यास ठेवावे. एक-एक वडा मंद आचेवर तळून काढावा. वडे चाळणीत ठेवत जावे. म्हणजे त्यातील तेल निथळून जाईल. हे वडे आपण कुणाला फराळाला बोलवल्यास आधी करून ठेवू शकतो. दह्यात मीठ, साखर, तिखट व जिरेपूड घालावी. दही चमच्याने व्यवस्थित हलवून घ्यावे व ते वड्यांसोबत खाण्यास द्यावे.
भाजणी तयार करण्याची पद्धत : अर्धा किलो बाजरी, अर्धा किलो ज्वारी, १ पाव मुगाची डाळ, १ पाव सालाची उडदाची डाळ, १ पाव चना डाळ, १ पाव चना डाळ, १ पेला तांदूळ, थोडे गहू, थोडे जाड पोहे, धने, जिरे हे सर्व भाजून घ्यावे व चक्कीतून दळून आणावे. हिवाळ्यात हे सर्व पौष्टिक धान्याचे मिश्रण असते. खमंग असल्यामुळे मुलांना सर्वांना खूप आवडते. पोटभर खाणे असते.

गुरगुट्या भात
साहित्य : दोन वाट्या वासाचे तांदूळ (चिनोर) मेतकूट, मीठ, साजूक तूप
कृती : प्रथम तांदूळ धुवून ठेवावे. नंतर हा भात गंजात शिजवावा. पाणी गंजात टाकून त्यात मीठ टाकावे. नंतर शेवटी त्यात साजूक तूप व दोन चमचे मेतकूट टाकावे. चांगले भातवाढणीने हलवून त्यावर झाकण ठेवावे. खूपच सुंदर वास येतो. थंडीच्या दिवसात सर्वांना हा गरम भात आवडतो. रात्रीच्या वेळी हा भात मुलांना गरम गरम वाढावा. त्यावर पुन्हा साजूक तूप वाढावे. त्यामुळे भाताची लज्जत आणखी वाढते.

छोट्या वांग्यांचे लोणचे
साहित्य : अडीचशे ग्रॅम छोटी वांगी (मसाल्याची) तिखट, हळद, मीठ, गूळ, काळा मसाला, मेथी पावडर, तेल, हिंग, कांदे, भाकरीचे पीठ
कृती : प्रथम वांग्यांची मागील देठे थोडी थोडी काढून घ्यावीत. नंतर वांग्यांना चार चिऱ्या कराव्यात व वांगी पाण्यात टाकावी. नंतर ताटलीत काळा मसाला, तिखट, हळद मीठ, मेथी पावडर (मेथ्या) थोड्या तेलावर परतून घ्याव्यात. नंतर त्याची बारीक पूड करून घ्यावी. ती पूड व थोडा गूळ हे एकत्र करावे. त्या मसाल्यात थोडे तेल टाकावे. तो मसाला वांग्यात भरावा. नंतर जाड बुडाच्या पातेल्यात तेल गरम करावे. त्यात मोहरी टाकावी. मोहरी तडतडली की त्यात हिंग टाकावा व मसाला भरलेली वांगी त्यात टाकावी. नंतर चमच्याने वांगी खाली-वर करावीत. त्यावर पाण्याचे झाकण ठेवावे. अगदी मंद आचेवर वांगी शिजू द्यावी. पाण्याच्या झाकणाने वाफेवर वांगी छान मऊ शिजतात त्यात नंतर कांदा जरा जाडसर चिरून त्यात टाकावे. कांदादेखील मंद आचेवर शिजतो. नंतर वांग्याचे लोणचे तयार होईल. त्यात कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. खूपच खमंग वांगी होतात. हे लोणचे दोन दिवस चांगले टिकते. 
कळण्याच्या भाकरीबरोबर छान लागते. 
कळणा तयार करण्यासाठी : ज्वारी १ किलो, सालाची उडदाची डाळ, थोडी सालाची मुगाची डाळ व भाजलेला मेथी दाणा त्यात टाकून ते दळून आणायचे व भाकरी करायची. थंडीच्या दिवसात खूपच छान असते.

ओल्या खोबऱ्याच्या मिरच्या
साहित्य : आठ ते दहा भज्यांच्या लांब मिरच्या, नारळाचे ओले खोबरे, दाण्याचा कूट, लिंबू, साखर, जिरे, लसूण, मीठ, हळद, कोथिंबीर
कृती : प्रथम मिरच्या धुवून घ्याव्यात. त्यांचे थोडे थोडे देठ काढून मिरचीला मधोमध चिरा द्याव्यात. नंतर ओल्या खोबऱ्याचा चव, दाण्याचा कूट, लसूण, मीठ, हळद, थोडी साखर, थोडे पाणी घालून मिक्‍सरवर फिरवून घ्यावे. त्याचा गोळा तयार होईल. तो गोल एका ताटलीत काढून घ्यावा. नंतर प्रत्येक मिरचीत थोडा थोडा दाबून गोळा भरावा. जाड बुडाच्या कढईत तेल घालून त्यात मोहरी, हिंग टाकून मोहरी तडतडल्यावर एक-एक मिरची त्यात हळूहळू ठेवावी. मंद आचेवर मिरच्या व्यवस्थित होऊ द्याव्यात. कढईवर झाकणे ठेवावे. त्यावर थोडे पाणी ठेवावे. म्हणजे वाफेवर मिरच्या खमंग होतील. तोंडी लावणेकरिता हा प्रकार खूप छान आहे.

कढी गोळे
साहित्य : ताजे ताक, चना डाळ, हिरव्या मिरच्या, जिरे, कोथिंबीर, मेथी दाणा, कढीपत्ता, साखर, मीठ
कृती : प्रथम ताजे ताक घ्यावे. त्यात थोडे बेसन घालावे. रवीने घुसळावे. त्यात थोडी साखर, मीठ, कढीपत्ता व मिरची चिरून टाकावी. दोन वाट्या चना डाळ ५-६ तास भिजत घालावी. नंतर डाळ भिजल्यावर ती चाळणीत उपसून घ्यावी. त्यात जिरे, हिरव्या मिरच्या टाकून मिक्‍सरवर ती डाळ बारीक वाटून घ्यावी. नंतर वाटलेली डाळ एका बाऊलमध्ये काढून घ्यावी. त्यात थोडे तिखट, हळद, कोथिंबीर, मीठ व साखर घालून सर्व एकजीव करावे. कढीला एका कढईत तूप टाकून जिरे, मेथीदाणा, मिरची व थोडी हळद टाकून फोडणी टाकावी. कढी जरा पातळ असावी. ती छान उकळ द्यावी. कढी उकळल्यानंतर त्यात वाटलेल्या डाळीचे थोडे लांब आकाराचे गोळे करावे. ते उकळलेल्या कढीत टाकावे. कढी उकळली की त्यात गोळे टाकल्यास ते कढईत फुटत नाहीत. गोळे मंद आचेवर कढीत शिजू द्यावे. नंतर कढईत व कोथिंबीर बारीक चिरून टाकावी. जेवायला बसल्यावर गोळे ताटात वाढून घ्यावे. ते फोडावे म्हणजे बारीक करावे. त्यावर छान लसणाची फोडणी चमच्याने घ्यावी. हे गोळे भाकरीबरोबर व भातावरदेखील चांगले लागतात. गरम गरम कढी वाटीने प्यावी. थंडीच्या दिवसात छान लागते. ज्वारीची भाकरी करावी.

गुळपापडीच्या कणकेच्या वड्या
साहित्य व कृती : प्रथम कढईत साजूक तूप टाकून त्यात कणीक चांगली खमंग बाजून घ्यावी. २ वाट्या कणीक, दीड वाटी बारीक चिरलेला गूळ, वेलची, जायफळाची पूड. हे सर्व साहित्य खमंग भाजलेल्या कणकेत टाकावे. कणीक गरम असतानाच त्यात बारीक केलेला गूळ, वेलची पावडर, जायफळ पूड टाकावी व नीट एकत्र करून गरम गरम तूप लावलेल्या ताटात थापावी. त्यावर काजू, बेदाणा दाबून बसवावा व गरम असतानाच. त्याच्या वड्या पाडाव्या. या वड्या पौष्टिक असतात. मुलांना डब्यात देण्यास चांगल्या असतात.

बटाट्याचे पराठे
साहित्य : अर्धा किलो बटाटे, हिरवी मिरची, जिरे, कोथिंबीर, तिखट, हळद, मीठ, साखर, कणीक, तेल, लिंबू, आले
कृती : प्रथम बटाटे चांगले उकडून घ्यावे. नंतर ते उकडल्यावर बाहेर काढावे. बटाटे सोलून ते चांगले किसून घ्यावे. हिरव्या मिरच्या, जिरे, मिक्‍सरवर वाटून त्यात आले बारीक करावे. तो गोळा किसलेल्या बटाट्यात घालावा. त्यात तिखट, हळद, मीठ, साखर, कोथिंबीर घालावी. चांगले सर्व मिक्‍स करावे. तो गोळा बाजूला ठेवावा. नंतर कणकेत तेल व मीठ टाकून कणीक छान भिजवून ठेवावी. कणीक मुरल्यावर गॅसवर तवा तापत ठेवावा. कणकेच्या गोळा घेऊन त्यात बटाट्याचे सारणाचा गोळा ठेवावा. पूर्ण कणकेच्या गोळ्याचे तोंड बंद करून अगदी नाजूक हाताने गोळा लाटून पराठा करावा. नंतर तव्यावर टाकून प्रथम शेकून घ्यावा. दोन्ही बाजूला तेल सोडून गरम खरपूस पराठा तयार करावा. दह्यात मीठ, साखर, तिखट, जिरेपूड टाकून हलवून घ्यावे. त्याबरोबर पराठा घ्यावा. पोटभर खाणे होते. नंतर गरम आटवलेले दूध प्यावे. थंडीत चांगले वाटते.

फोटो फीचर

संबंधित बातम्या