सहज सोप्या रेसिपीज 

सविता माळगे
शुक्रवार, 19 जून 2020

फूड पॉइंट
अनेकदा रोजच्या पदार्थांचा कंटाळा येतो. शिवाय मधल्या वेळच्या  खाण्यात  काहीतरी नवीन पदार्थ खायला मिळावा, अशी घरातल्या प्रत्येकाची इच्छा असते. त्यासाठी नवनवीन रेसिपीजही माहिती  असायला हव्यात. अशाच काही नवीन पदार्थांच्या रेसिपीज इथे देत आहोत, ज्या तुम्हाला अगदी सहज करता येतील...   

स्वीट मावा टोस्ट
साहित्य : बाजारातील रेडिमेट टोस्ट, ३ वाट्या साखर, आवश्यकतेनुसार मावा, इलायची, तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम  एका पातेल्यात साखर टाकून गरम करायला ठेवावी.  त्यात थोडे पाणी घालून  चाचणी करायला ठेवावी.  नंतर एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवावे.  तेल गरम झाल्यावर त्यात टोस्ट टाकावेत.  मंद आचेवर लालसर तळून घ्यावे.  नंतर तळलेल्या टोस्टला दोन्ही बाजूने मावा लावून घ्यावा.  नंतर तयार झालेल्या साखरेच्या चाचणीमध्ये  बुडवून घ्यावे. त्याआधी  तयार चाचणीमध्ये  इलायची टाकावी.  बुडवून घेतलेल्या टोस्टवर चाचणी ओतून  रात्रभर भिजत ठेवावी. खूप  जास्त ओतू  नये.  सकाळी खाण्यासाठी रेडी स्वीट मावा डिश तयार आहे. 

रवा पकोडे
साहित्य : एक वाटी रवा, २ बारीक चिरलेले  कांदे, ३-४ बारीक चिरलेल्या  मिरच्या, चिमूटभर खायचा सोडा, चवीनुसार मीठ, १ चमचा ओवा, १ चमचा  जिरेपूड,  तळण्यासाठी तेल.
कृती : प्रथम एका काचेच्या  बोलमध्ये चिरलेला कांदा व  चिरलेली मिरची घालावी. त्यात १ चिमटी  सोडा घालावा. आता त्यात  रवा, ओवा,  जिरेपूड  व  चवीनुसार मीठ टाकावे.   आता आवश्यकतेनुसार  पाणी घालून पकोड्यासाठी  तयार करून घ्यावे.  नंतर गॅसवर कढई ठेवून त्यात तेल गरम करायला ठेवावे. तयार मिश्रणाचे पकोडे गरम तेलात सोडून गुलाबीसर रंगावर तळावेत.  गरमागरम पकोडे हिरवी चटणी किंवा दहीबरोबर  छान लागतात. 

खिचडी पराठा
साहित्य :  एक कप  कणीक, १ कप मक्याचे पीठ, अर्धा कप खिचडी, अर्धा चमचा  लसूण-मिरची पेस्ट, चवीनुसार मीठ, १ चमचा चिरलेली कोथिंबीर, १ चमचा दही, १ चमचा तीळ.
कृती : मक्याचे पीठ व कणीक, खिचडी, लसूण-मिरची पेस्ट, कोथिंबीर,  दही, तीळ व चवीपुरते मीठ घालून पिठाचा लगदा तयार करावा.  या  पिठाचे  लहान लहान आकाराचे गोळे करून घ्यावे. नंतर एक एक  गोळा घेऊन  नेहमीप्रमाणे  पराठे करावेत. पराठा  लाटताना  चिटकत असल्यास कोरड्या पिठाचा वापर करावा. पराठा  दोन्ही बाजूंनी तांबूस भाजून घ्यावा आणि गरमागरम सर्व्ह करावा. 

डाळिंब भात
साहित्य : चार वाट्या तांदूळ, ३ वाट्या डाळिंबाचे दाणे, २ चमचे  कांदा मसाला, १ चमचा काळा मसाला, २ चमचे तिखट, १ चमचा मीठ, २ चमचे चिरलेला गूळ, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे किसून भाजलेले  खोबरे, १ चमचा जिरेपूड, ४ चमचे तेल, ७ वाट्या पाणी, अर्धा चमचा हिंग, मोहरी, हळद, १ चमचा साजूक तूप, आवश्यकतेनुसार मिरचीचे तुकडे.
कृती : तांदूळ धुऊन १५-२०  मिनिटे तसेच ठेवावे.  तेलाची फोडणी करावी.  फोडणीत प्रथम डाळिंबाचे  दाणे घालावे  व थोडे परतून घ्यावे.  नंतर त्यात धुतलेले  तांदूळ घालावेत. आता तिखट, मीठ, मसाला, गूळ, जिरेपूड, खोबरे, मिरचीचे  तुकडे घालून परतून घ्यावे. त्यात गरम केलेले  पाणी घालावे  व  मऊ -मोकळा झालेला भात खाली उतरवावा. आता त्यात १  चमचा तूप वरून सोडून झाकून ठेवावे.  या भाताबरोबर लिंबाचे लोणचे द्यावे.

ईवाना खीर 
साहित्य : दोन मध्यम आकाराचे फ्लॉवर, १ लिटर दूध, अर्धा किलो रवा, अर्धा किलो साखर, दीडशे ग्रॅम तूप, १ चमचा हिरवा रंग, अर्धा चमचा वेलचीपूड, २ चमचे रोझ  इसेन्स, २ वाट्या पाणी, १ चमचा चारोळी व पिस्त्याचे काप. 
कृती : प्रथम फ्लॉवरच्या वरचा फुलाचा  भाग किसून  घ्यावा. कढईत तूप घालून कीस  परतून घ्यावा. पातेल्यात दूध, रवा, भाजलेला फ्लॉवरचा कीस एकत्र करून गॅसवर ठेवून  गॅस सुरू  करावा. उकळी येताच त्यात साखर घालावी. वरील मिश्रण घट्ट होईपर्यंत गॅसवर ठेवावे  व सतत ढवळत रहावे. हे  मिश्रण नेहमीच्या खिरीप्रमाणे  घट्ट होऊ द्यावे. खिरीसारखे  होताच  ते खाली उतरवावे. मिश्रण थंड झाल्यावर  त्यात रोझ  इसेन्स,  वेलचीपूड, चारोळी, पिस्त्याचे काप पेरून खीर सर्व्ह करावी. 

रबडी मालपुवा
साहित्य : एक लिटर दूध, १२५ ग्रॅम मैदा, २०० ग्रॅम साखर, बदाम-पिस्ता काप सजावटीसाठी, तळण्यासाठी तूप.
कृती : प्रथम दूध आटवून  १ लिटरचे अर्धा लिटर करावे. दूध  थंड झाल्यावर त्यात मैदा मिक्स करावा  (तयार घोळ कढीसारखा  झाला पाहिजे). नंतर  साखरेचा दीड तारी पाक करावा. फ्राइंग पॅनमध्ये तूप तापवून त्यात मोठा चमचाभर मिश्रण टाकावे. म्हणजे ते मळण  तेवढेच पसरेल. आता  मालपुवा दोन्ही बाजूंनी  बदामी रंगावर तळून घ्यावा. नंतर  बाहेर काढून निथळून घ्यावा व  पाकात बुडवून काढावा.  तयार मालपुवावर बदाम-पिस्त्याचे  काप टाकून गरमागरम सर्व्ह करावा.

पालक सूप
साहित्य : दोन वाट्या चिरलेला हिरवा  कोवळा  पालक,  २ दालचिनीचे तुकडे, ४  कप दूध, किसलेले चीज, आवडीप्रमाणे मिरेपूड  व मीठ.
कृती : प्रथम पालकामध्ये  दालचिनी तुकडे व  मीठ टाकून तो शिजवून घ्यावा. गार झाल्यावर पालक मिक्सरमधून  फिरवून घ्यावा. नंतर त्यात  थोडे-थोडे दूध घालून हे मिश्रण  परत मिक्सरमधून काढून एकजीव करावे व मंद गॅसवर ठेवावे.  चव पाहून थोडे मीठ व मिरेपूड घालावी. झाले झटपट पालक सूप तयार!  सर्व्ह  करताना सूप बोलमध्ये  घेऊन वरून किसलेले  चीज घालून द्यावे.

दुधी भोपळ्याचा झुणका
साहित्य : अडीचशे ग्रॅम दुधी भोपळा, अर्धी वाटी बेसन, १ चमचा तिखट, पाव चमचा हळद, तेल, मोहरी, हिंग, जिरे, १ चमचा धनेपूड, चिरलेली कोथिंबीर, लिंबू व  मीठ.
कृती : दुधी भोपळा किसून  घ्यावा.  कढईत तेल गरम करून त्यात फोडणीचे साहित्य टाकावे. नंतर भोपळ्याचा कीस टाकून  चांगला परतावा. आता वरून बेसन घालून चांगले एकजीव करावे. ५ मिनिटांनी  त्यात इतर सर्व साहित्य घालून झाकण ठेवावे. आवश्यक तेवढे  पाणी घालून शिजवावे. वाढताना कोथिंबीर घालून,  लिंबू पिळून द्यावे. झाला दुधी भोपळ्याचा झुणका तयार.

संबंधित बातम्या