अपूप अन्‌ लोबिया

सविता माळगे, सोलापूर
सोमवार, 22 एप्रिल 2019

फूड पॉइंट
बाजारात सहज उपलब्ध होणाऱ्या भाज्या, फळे आणि कडधान्यांपासून तयार करता येतील अशा आणि खवय्यांना नक्कीच आवडतील अशा काही निवडक रेसिपीज इथे दिल्या आहेत... 

अननसाचा भात 
साहित्य : एक पिकलेला अननस, २ वाट्या बासमती तांदूळ, ३ वाट्या साखर, ५-६ वेलदोडे, ४ चमचे तूप, मीठ, सजावटीसाठी २ टेबलस्पून पिस्ते, ४ वाट्या पाणी, अर्ध्या लिंबाचा रस.
कृती : तांदूळ भिजवून दोन तास निथळत ठेवावे. अननस मधला दांडा, साल, काटे काढून चिरून लहान लहान फोडी कराव्यात. थोड्या पाण्यात वाफवून घ्याव्यात. तुपावर वेलचीची फोडणी करून त्यावर अननसाच्या वाफवलेल्या फोडी घालून परताव्यात. गरम पाणी घालून भात मोकळा शिजवावा. भातात मीठ घालावे. अननसात उकळलेले पाणी घालून साखरेचा पक्का पाक करावा. त्यात लिंबाचा रस घालून पाक भातात घालावा. नीट ढवळून पाक भातात मिसळेपर्यंत पातेले चुलीवर ठेवावे. नंतर भिजवलेल्या पिस्त्याचे काप घालून शिजवावे.

दाल खिमा 
साहित्य : एक कप चण्याची किंवा मुगाची डाळ, १ कप दूध, ४ टेबलस्पून तूप, ३ मध्यम आकाराचे कांदे, ४-५ लवंगा, ५-६ मिरी, २ इंच दालचिनी, २ तमालपत्र, १ चमचा गरम मसाला, १ चमचा हळद, २ टोमॅटो, २ टेबलस्पून साय, १ टेबलस्पून बेदाणे, १ टेबलस्पून काजू, अर्धी वाटी कोथिंबीर, ४ टेबलस्पून तेल, चिमूटभर हिंग, मीठ, २ चमचे आले-लसूण पेस्ट.
कृती : डाळ स्वच्छ धुऊन रात्री दुधात भिजत घालावी व सकाळी उपसून, कोरडी झाल्यावर जाड वाटावी. दूध उरले असेल, तर बाजूला ठेवावे. जाड बुडाच्या कढईत तूप तापवून त्यात ही डाळ वाटलेल्या डाळीप्रमाणे खमंग तांबूस परतावी व बाजूला ठेवावी. थंड झाल्यावर त्यात चिरलेली कोथिंबीर घालून सारखी करावी. तेलावर हिंग घालून त्यात गरम मसाल्याची फोडणी करावी. गरम मसाला, मिरची पूड घालून कांदा लाल करावा. कांद्यात आले, लसणाची पेस्ट व साय घालावी. साय एकजीव झाली, की चिरलेले टोमॅटो घालून मिश्रण शिजवावे. तेल सुटले, की त्यात वाटलेली डाळ परतावी व मीठ घालून पुन्हा थोडे परतावे. वरून तळलेले काजू घालावेत.

मुळीन खट्टू 
साहित्य : एक वाटी मुगाची डाळ, १ चमचा मिरचीपूड, अर्धा चमचा हळद, ३-४ कोवळे मुळे, १ चमचा जिरे, चिंच, मीठ, तेल, हिंग.
कृती : डाळ गरम पाण्याने धुवावी. मुळ्याचे तुकडे करावेत. डाळ शिजत ठेवावी. अर्धवट शिजल्यावर त्यात चिंचेचा अर्धा कप कोळ, मिरचीपूड, मिरेपूड आणि मीठ घालावे. मुळ्याच्या फोडी घालून सर्व शिजवावे. तेल तापवून त्यात हिंग, हळदीची फोडणी करून डाळीत ओतावी. तिखट व आंबट मुगाची डाळ भाताबरोबर वाढावी.

अपूप 
साहित्य : धुतलेल्या आंबेमोहोर तांदळाची १ वाटी पिठी, अर्धी वाटी निरसे दूध, १ चमचा साजूक तूप मोहनासाठी, ४ वाट्या तळणासाठी तूप, अर्धी वाटी पिठी साखर, अर्धा चमचा मीठ इत्यादी.
कृती : चाळणीने तांदळाची पिठी चाळून घ्यावी. दुधामध्ये पिठी घट्ट भिजवावी. नंतर त्याची मुटकुळी वळावी. दोन तास झाकून ठेवावी. परातीत तूप व मीठ घ्यावे. दोन्ही एकत्र चांगले फेसावे. परत दुधाचा हात लावून सर्व मिश्रण मळावे. एक स्वच्छ मलमलच्या कापडाचा रुमालाच्या आकाराचा तुकडा घ्यावा. तो पाण्यात भिजवावा व नंतर वाटीवर ठेवावा. त्याची टोके खाली येऊ द्यावीत. ही खाली आलेली टोके डाव्या हाताने घट्ट पकडून ठेवावीत. भिजवलेल्या पिठाची पुरीच्या गोळी एवढी गोळी करावी. त्याची व्यवस्थित गोल पुरी रुमालावर थापावी. डाव्या हाताने रुमालाची टोके आवळावीत, म्हणजे थापलेला अपूप सुटून येईल. कढईत तूप टाकावे. अपूप कढईत मंद आचेवर तळून काढावा. तळताना झाऱ्याने त्यावर तूप उडवावे. त्यामुळे अपूप जाळीदार होईल. तळलेले अपूप ताटलीत ठेवावेत. ५-१० मिनिटांनी त्यावर पिठी साखर भुरभुरावी. खाताना अतिशय खुमासदार लागतात. 

मेथी सिंग कबाब 
साहित्य : अडीचशे ग्रॅम बटाटे, २५० ग्रॅम ताजी बारीक चिरलेली कोथिंबीर, १०० ग्रॅम ब्रेडचा चुरा, १ चमचा गरम मसाला, अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा तिखट, चवीनुसार मीठ आणि मेथी.
कृती : बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. मेथीमध्ये मीठ टाकून १५ मिनिटे तसेच ठेवावे. कुस्करलेल्या बटाट्यामध्ये मेथीची पाने, गरम मसाला, काळी मिरी पावडर, तिखट, ब्रेडचा चुरा हे सर्व मिसळावे. नंतर ते कबाबप्रमाणे गोल बनवून मधोमध सिंक लावावे.

मधुरान्न (केरळी पदार्थ) 
साहित्य : एक वाटी मुगाच्या डाळीचे पीठ, १ वाटी बेसन पीठ, १ वाटी उडीद डाळीचे पीठ, अडीच वाट्या साखर, दीड वाटी तूप, ५-६ वेलदोडे, ४ चमचे दूध, ५ पिस्ते, ४ बदाम, ४ काजू, १ चमचा पिवळा रंग, ५ चमचे तूप.
कृती : मुगाच्या डाळीचे पीठ, बेसन पीठ, आणि उडीद डाळीचे पीठ एकत्र करावे. त्यावर गरम तूप ५ चमचे टाकावे. त्यावर दूध घालावे. पिठाची कणी पाडावी. कढईत तूप घालावे. कढत तुपात हे मिश्रण गुलाबी रंग येईपर्यंत भाजावे. एका भांड्यात साखर घ्यावी. त्यात पाऊण वाटी पाणी घालावे. त्याचा दोन तारी पाक करावा. पाकात वेलदोडे पूड टाकावी. भाजलेल्या पीठावर हा पाक ओतावा. ताटाला तूप लावावे. लगेच त्यावर मिश्रण थापावे. वरून काजू, बदाम पिस्त्याचे काप लावावेत. थंड झाल्यावर वड्या कापाव्यात. आवडत असल्यास पिवळा रंग पाकात टाकावा.

दाल मखनी 
साहित्य : दोन वाट्या उडीद डाळ, २ मोठे चमचे राजमा (५-६ तास भिजवून), ३ मोठे चमचे चणाडाळ, २ मोठे चमचे साजूक तूप, २ चमचे आले, लसूण पेस्ट, मीठ, ३ वाट्या पाणी, ४ टोमॅटो (साल काढून बारीक तुकडे केलेले) अर्धा चमचा गरम मसाला, अर्धी वाटी दही, अर्धी वाटी ताजी मलई, १०० ग्रॅम लोणी, ४ हिरव्या मिरच्या, हळद, १ चमचा तिखट.
कृती : प्रेशर कुकरमध्ये साजूक तुपावर भिजवलेल्या डाळी व राजमा, मीठ, आले लसूण पेस्ट घालून २०-२५ मिनिटे शिजवावे. मऊ शिजल्यावर रवीने घुसळावे. दही घुसळून त्यात घालावे. पुन्हा १५-२० मिनिटे गॅसवर ठेवावे. पातेल्यात लोणी घालून गरम मिरच्या व आले फोडणीत घालावे. परतून घ्यावे. त्यावर टोमॅटोचे तुकडे घालावे. शिजवलेल्या डाळीत राजमा घालावा. अर्धी वाटी ताजी मलई घालावी व खाली उतरावी. गरमागरम सर्व्ह करावी. 

मसालेदार लोबिया (चवळी)
साहित्य : दीड मोठा चमचा छोले मसाला, १५० ग्रॅम चवळी, बारीक कापलेले आले, ३० ग्रॅम लसूण, १५० ग्रॅम चिरलेला कांदा, १०० ग्रॅम चिरलेले टोमॅटो, ६० ग्रॅम दही, १ छोटा चमचा चिरलेली कोथिंबीर, ४० ग्रॅम तूप.
कृती ः चवळी रात्रभर भिजवावी. पातेल्यात तूप गरम करून कांदा टाकून बदामी रंगावर परतावा. चिरलेले आले, लसूण टाकून ३-४ मिनिटे परतावे. मदर रेसिपी छोटे मसाला आणि चिरलेले टोमॅटो टाकून ५ मिनिटे शिजवावे. दही, चवळी आणि ५०० मिली पाणी टाकून उकळून घ्यावे. पातेल्यावर झाकण ठेवून मंदाग्निवर चवळी नरम होईपर्यंत शिजवावी. चिरलेली कोथिंबीर टाकून गरमागरम वाढावी.

मटार रोल्स
साहित्य : दोन वाटी ओले मटारदाणे, अर्धी वाटी नारळाचा चव, अर्धी वाटी साय, अर्धा चमचा वेलची पूड, १ वाटी साखर, ब्रेडच्या स्लाईस, तळण्यासाठी तूप, १ टेबलस्पून खसखस, १ टीस्पून चारोळ्या.
कृती : मटार दाणे मिक्‍सरमधून जाडसर बारीक करून घेऊन थोड्या तुपावर परतावे. थोडे परतल्यावर त्यात नारळाचा चव, साखर, खसखस, चारोळी, वेलची पूड, साय घालून चांगले परतून घ्यावे. हे मिश्रण एका डिशमध्ये काढावे. ब्रेडच्या स्लाईसची कड काढून स्लाईस पाण्यात भिजवून हाताने दाबून घ्यावेत. नंतर त्या स्लाईसमध्ये गोड सारण भरावे व रोल तयार करावेत. याप्रमाणे सर्व स्लाईसचे रोल तयार करावेत. यानंतर सर्व रोल्स तुपात तळून घ्यावे. साखरेचा दोन तारी पाक करून त्यातून सर्व रोल्स भिजवून काढावेत. डेसिकेटेड खोबऱ्यातून हे सर्व रोल्स घोळून एका आकर्षक डिशमध्ये ठेवावेत.

मक्‍याच्या कणसाचा कबाब
साहित्य : सहा मक्‍याची कणसे, अर्धा नारळ, अर्धी वाटी भरड चण्याचे पीठ, १ वाटी कोथिंबीर, १ चमचा जिरे, अर्धा चमचा गरम मसाला, मीठ.
कृती : मक्‍याची कणसे किसून घ्यावीत. त्यात बाकी सर्व साहित्य मिसळावे. या मिश्रणाचे कबाब तळून काढावेत.

बिसी बेल्ला भात
साहित्य : तीनशे ग्रॅम बासमती तांदूळ, १५० ग्रॅम तूरडाळ, ५० ग्रॅम ताजे हिरवे वाटाणे(मटार), ५० ग्रॅम फ्लॉवर, ३० ग्रॅम चिरलेले टोमॅटो, २ मोठे चमचे चिंचेचा घट्ट कोळ, ८-१० कढीपत्त्याची पाने. सजावटीसाठी ५० ग्रॅम काजू, २० ग्रॅम किसमिस, तळण्यासाठी तेल.
मसाला साहित्य : २ मोठे चमचे मदर्स रेसिपी सांबर मसाला, ५० ग्रॅम चणाडाळ, ५० ग्रॅम उडीद डाळ. 
कृती : दोन्ही डाळी तव्यावर भाजून घ्याव्यात. ग्राईंडरमध्ये सांबर मसाल्याबरोबर टाकून पावडर बनवावी. एका पातेल्यात अडीच लिटर पाणी टाकून तुरीची डाळ शिजवावी. शिजल्यानंतर तांदूळ, मटार, फ्लॉवरचे तुकडे टाकून १० मिनिटे शिजवावे. नंतर त्यात चिरलेले टोमॅटो, चिंचेचा कोळ, कढीपत्त्याची पाने आणि भात मसाला टाकून डाळ व तांदूळ याचे मिश्रण खिरीसारखे होईपर्यंत शिजवावे. तेल गरम करून काजू व किसमीस गुलाबी रंगावर तळून शिजलेल्या भातावर टाकावी आणि गरम गरम वाढावे.

संबंधित बातम्या