पारंपरिक गोडाचे पदार्थ

सायली जोशी फाटक, सिडनी, ऑस्ट्रेलिया
सोमवार, 17 मे 2021

फूड पॉइंट

काळाच्या ओघात काही पदार्थ विस्मृतीत जातात किंवा अगदीच क्वचित केले जातात. असे काही हटके नावांचे पण रसना तृप्ती करणारे आपले पारंपरिक गोडाचे पदार्थ

रसावल (लखनवी रेसिपी)
साहित्य : एक वाटी तांदूळ, ३ लिटर उसाचा रस, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी ओल्या खोबऱ्याचे काप, ४ चमचे तूप, २ ते ३ लवंग, काजूचे काप. 
कृती : प्रथम तांदूळ १५ मिनिटे भिजवून घ्यावेत. उसाचा रस एका भांड्यात घेऊन तो उकळण्यासाठी गॅस वर ठेवावा. रस उकळत असताना त्यात हळूहळू दूध घालावे व ढवळत राहावे आणि वर आलेला साका काढून टाकावा. हा रस निम्मा होईपर्यंत उकळावा. आता त्यात भिजवलेले तांदूळ घालून झाकण ठेवावे व बारीक आचेवर अर्धा तास शिजवून घ्यावा. आता एका कढल्यात तूप गरम करून त्यात लवंग, खोबऱ्याचे काप, काजू तुकडे घालून हलका गुलाबी रंग येईपर्यंत तळावे आणि तयार झालेल्या रसामध्ये घालून घ्यावे. आता सर्व मिश्रण एकजीव करून तयार रसावल सर्व्ह करावे.

मनगणं (गोवन रेसिपी) 
साहित्य :अर्धी वाटी साबुदाणा, एक वाटी चणा डाळ, ४ ते ५ वाट्या नारळाचे दूध, १ कप गूळ (चवीनुसार थोडा कमी/जास्त), काजू बदामाचे काप, कुटलेल्या ४ ते ५ वेलची. 
कृती : साबुदाणा धुऊन अर्धा तास भिजवून घ्यावा. चणा डाळ १ तास भिजवून घ्यावी. आता डाळ २ ते ३ वाट्या पाणी घालून शिजवावी (खूप मऊ शिजवायची नाही, फक्त बोटचेपी करायची). शिजल्यावर ती पूर्णपणे निथळून घ्यावी. आता एका जाड बुडाच्या पातेल्यात ही डाळ, भिजलेला साबुदाणा, आणि नारळाचे दूध घालून एकदम मंद आचेवर २० ते २५ मिनिटे एकत्र शिजवून घ्यावे (साबुदाणा पारदर्शक होईपर्यंत). आता त्यात गूळ घालून एकजीव करावे. त्यात कुटलेल्या वेलची व काजू बदामाचे काप घालून थोडेसे शिजवून घ्यावे. आता वरून तूप सोडून सर्व्ह करावे. 

धोंडस (कोकणी रेसिपी)
साहित्य : दोन वाट्या कापा फणसाचे गरे, दीड वाटी तांदळाचा रवा, दीड वाटी चिरलेला गूळ (फणसाच्या गोडीनुसार कमी/जास्त), १ वाटी खवलेला ओला नारळ, अर्धा चमचा वेलची पूड, २ चमचे तूप, पाव चमचा मीठ, चिमटीभर सोडा.
कृती : एक चमचा साजूक तूप घालून तांदुळाचा रवा मंद आचेवर गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यावा. नंतर यातला १ चमचा रवा व फणसाचे गरे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावेत. आता यातच खवलेला नारळ आणि चिरलेला गूळ घालून परत एकदा मिश्रण फिरवून घ्यावे. आता हे मिश्रण रव्यामध्ये घालून त्यात मीठ, वेलची पूड घालून अर्धा तास झाकून ठेवावे. अर्ध्या तासाने त्यात चिमटीभर सोडा घालून मिश्रण चांगले ढवळून घ्यावे. (इडलीच्या पिठाएवढेच पातळ ठेवावे) आता एका ताटलीला तूप लावून हे मिश्रण त्यात पसरवून इडलीच्या कुकरमध्ये १५ ते २० मिनिटे शिजवून घ्यावे. आता याच्या वड्या पाडून वरून तूप सोडून सर्व्ह करावे. 

हुग्गी (कर्नाटकी रेसिपी)
साहित्य : एक वाटी खपली गहू, १ वाटी गूळ, १ वाटी खवलेला ओला नारळ, २ वाट्या दूध, ३ ते ४ चमचे तूप, आवडीनुसार काजू बदामाचे काप, १ चमचा जायफळ पूड, १ चमचा वेलची पूड, ३ ते ४ लवंग.
कृती : गहू मिक्सरवर फिरवून भरडसर वाटून घ्यावेत व रात्रभर  भिजवून ठेवावेत. कुकरमध्ये भिजवलेला गहू ३ ते ४ वाट्या पाणी घालून मध्यम आचेवर १० ते १२ शिट्ट्या करून शिजवून घ्यावा. आता एका कढईत तूप गरम करून त्यात लवंग घालून शिजवलेला गहू व खोबरे एकत्र थोडेसे परतावे. त्यात गूळ घालून मिसळून घ्यावा. यात शिजवलेल्या गव्हाचे पाणी घालून १० ते १५ मिनिटे मंद आचेवर शिजवावे. त्यात दूध घालून मिसळावे. वरून तळलेले काजू बदामाचे काप व तूप घालून सर्व्ह करावे. 

रताळ्याची फेणी (खानदेशी रेसिपी)
साहित्य : दोन रताळी, तूप, पिठीसाखर, वेलची पूड.
कृती : रताळी किसून घ्यावीत व पाण्यातून घट्ट पिळून घ्यावी. आता एक तवा गरम करून त्याला तूप लावावे. त्यावर रताळ्याचा कीस गोलाकार पसरावा आणि मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत ठेवावा. आता वरच्या बाजूवर तूप सोडून ही बाजू पलटून घ्यावी व पुन्हा मध्यम आचेवर खरपूस होईपर्यंत ठेवावी. दोन्ही बाजू छान ब्राऊन झाल्या की ही फेणी ताटलीत काढून घ्यावी. गरम असतानाच त्यावर आपल्या आवडीनुसार पिठीसाखर आणि वेलची पूड भुरभुरावी की फेणी खाण्यास तयार.

संबंधित बातम्या