भाजी-भाकरीचा फक्कड मेन्यू

स्मिता तत्त्ववादी, पुणे
गुरुवार, 4 ऑक्टोबर 2018

फूड पॉइंट

पोपटीचा भात
साहित्य : एक वाटी तांदूळ, एक वाटी पोपटीचे दाणे(पावटा), एक बारीक चिरलेला कांदा, आलं-लसूण पेस्ट, हळद एक चमचा, तिखट दीड चमचा, काळा मसाला एक चमचा, एक हिरवी मिरची उभी चिरून, १ तेजपान, एक छोटा तुकडा दालचिनी, चार मिरे, दोन लवंगा, कोथिंबीर, किसलेले खोबरे.
कृती : प्रथम एक वाटी तांदूळ धुवून ठेवावा. गॅसवर कढई ठेवून फोडणी तयार करावी. अडीच वाट्या पाणी उकळायला ठेवावे. फोडणीत तेल, मोहरी, जिरे, हिंग टाकावे. कांदा परतून घ्यावा. आलं लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे, हळद तिखट, तेजपान दालचिनी, मिरे, लवंग घालून परतावे व त्यात पोपटीचे दाणे घालावेत. नंतर तांदूळ घालून छान परतावे. आता काळा मसाला घालावा. दोन चमचे घट्ट दही घालावे (आवडीनुसार). चवीप्रमाणे मीठ घालावे. उकळते पाणी घालून भात शिजायला ठेवावा. छान शिजल्यावर खाली उतरवून कोथिंबीर व खोबऱ्याचा किस घालून सजवावे. स्वादिष्ट पोपटीचा भात तयार. सोबतीला चविष्ट ताक द्यावे.

डाएट लाडू
साहित्य : एक वाटी बारीक रवा, एक वाटी बारीक खोबरं किस, एक वाटी पिठीसाखर, वेलदोडा पूड स्वादानुसार, केसर घातलेले दूध पाव वाटी
कृती : सर्व प्रथम अगदी मंद आचेवर खोबऱ्याचा किस हलका भाजून घ्यावा. त्यानंतर रवापण मंद आचेवर 
हलका भाजून घ्यावा. दोन्ही थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर घालून मिश्रण थंड करावयाला ठेवावे. त्यामध्ये वेलदोडा पूड घालावी. केशर दूध शिंपडून थोडा वेळ मुरत ठेवावे. त्यानंतर मिश्रण चांगले मळून त्याचे लाडू वळावेत. लाडू खोबरे किसात घोळावेत. डाएट लाडू तयार. नक्की करून पहा.

वांग्याची भाजी
साहित्य : छोटी हिरवी वांगी एक पाव, एक छोटा चमचा शेंगदाणे, एक छोटा चमचा तीळ, एक चमचा खोबरे किस, अर्धा चमचा खसखस, धणे, जिरे, एक चमचा गोडा मसाला, हळद एक चमचा, तिखट दोन चमचे, आवडीनुसार आलं - लसूण, चिंच एक बुटुक, चवीला गूळ, फोडणीसाठी तेल, मोहरी, हिंग.
कृती : प्रथम वांगी स्वच्छ धुवून घ्यावीत. उभा आडवा काप द्यावा. मोहरी व हिंग घालून तेलाची फोडणी करावी. त्यात वांगी सोडून छान वाफवून घ्यावीत. तोपर्यंत मिक्‍सरच्या चटणी जारमध्ये वरील सर्व पदार्थ घालून जाडसर वाटून घ्यावे. हा मसाला वांग्यामध्ये छान मिसळून घ्यावा. थोडे पाणी गरम करून घालावे. रस्सा हवा तेवढा ठेवावा. झाकणी ठेवून वाफ काढून घ्यावी. गरम गरम भाकरी वा पोळी सोबत ही भाजी खावी.

फोडणीचे वरण
साहित्य : एक वाटी तूरडाळ, एक कांदा, एक टोमॅटो, ३-४ लसणाच्या पाकळ्या, २ ते ३ लाल मिरच्या, कढीपत्ता,  चमचा तेल, मोहरी, हिंग, हळद अर्धा चमचा, तिखट एक चमचा, गरम मसाला चिमूटभर, चवीपुरते गूळ, कोथिंबीर.
कृती : तुरीची डाळ धुवून ठेवावी. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावेत. लसूण पाकळ्या कापून घ्याव्यात. गॅसवर फोडणी तयार करून त्यात हिंग टाकावा. नंतर त्यात कापलेल्या लसूण पाकळ्या, चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल मिरच्या, कढीपत्ता, हळद, तिखट, गरम मसाला टाकून मिसळावे. नंतर त्यात तुरीची डाळ, मीठ, गूळ, घालावे. डाळ व्यवस्थित परतावे. त्यामध्ये तीन वाट्या पाणी टाकून थेट कुकरमध्ये शिजवावे. त्यानंतर भांड्यात काढून वरून कोथिंबीर पेरावी. फोडणीचे वरण तयार.

कळण्याच्या भाकरी
साहित्य : ज्वारी आणि काळे उडीद हे एक वाटी ज्वारीला पाव वाटी काळे उडीद या प्रमाणात दळून आणावेत. चवीनुसार मीठ, दोन चमचे पांढरे तीळ.
कृती : दोन वाट्या पीठ घेऊन त्यात चवीनुसार मीठ घालावे. थोडे कोमट पाणी घालून भिजवावे. छान मळून पोळ पाटावर थापावे, थापतांना तीळ पसरावे. गोल भाकरी तयार करावी. पिठाचा भाग वर ठेवून तव्यावर टाकावी. थोडे पाणी लावावे. एका बाजूने भाजल्यावर उलटून त्या बाजूने भाजावी. छान फुगून येईल. गरम गरम वाढावी. सोबत हिरव्या मिरचीचा ठेचा द्यावा.

मुळा मूगडाळ कोशिंबीर
साहित्य : एक मुळा, दोन चमचे मूग डाळ, चिरलेली कोथिंबीर, एक चमचा लिंबाचा रस, एक चमचा जिरे, पाव चमचा हिंग, २ चमचे तूप.
कृती : मुगाची डाळ धुवून तीन चार तास पाण्यात भिजत घालावी. नंतर निथळून घ्यावी. मुळा धुवून, सोलून आणि नंतर जाडसर किसून घ्यावा. हा कीस, मुगाची डाळ व कोथिंबीर एकत्र करावी. तूप, जिरे, हिंग, लाल सुक्‍या मिरच्या यांची खमंग फोडणी करून मिश्रणावर टाकावे. लिंबाचा रस, मीठ, साखर घालून नीट मिसळावे. पौष्टिक कोशिंबीर खाण्यासाठी तयार!

मकाणे आणि अक्रोडचा शाही रायता
साहित्य : एक वाटी मकाणे, दीड वाटी अक्रोड, पाव वाटी काजू, पाव वाटी बदाम, पाव वाटी किसमिस, दीड वाटी गोड व घट्ट दही, पाव चमचा जिरेपूड, दोन चिमूट मिरेपूड (चवीपुरती), साजूक तूप अर्धी वाटी, चवीनुसार मीठ आणि पिठीसाखर.
कृती : प्रथम साजूक तुपात तुकडे केलेले अक्रोड खरपूस परतून घ्यावेत. त्यातच काजू व बदाम यांचे तुकडे करून खमंग परतून घ्यावेत. किसमिसपण परतून घ्यावे. त्याच तुपात मकाणे खमंग होईपर्यंत परतावे. हे सर्व एकत्र करून त्यावर जिरेपूड, मिरेपूड, मीठ, पिठीसाखर घालून ठेवावे. दुसऱ्या भांड्यात दही फेटून तयार ठेवावे. खाण्यास घेण्याआधी दही मिसळून घ्यावे.

माणिक-पैंजण
साहित्य : रात्रीच्या उरलेल्या पोळ्या चार,  रात्रीचा उरलेला भात एक वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, चिरलेल्या लसूणाच्या दोन ते तीन पाकळ्या, हिरवी मिरची, हळद पाव चमचा, तिखट अर्धा चमचा, सात ते आठ कढीपत्त्याची पाने, चिरलेली कोथिंबीर अर्धी वाटी, अर्धी मूठ शेंगदाणे, अर्धे लिंबू, चवीनुसार मीठ आणि साखर.
कृती : प्रथम पोळ्या बारीक कुस्करून घ्याव्यात. भात मोकळा करावा. कढईत दोन चमचे तेल घ्यावे. गरम झाल्यावर त्यात मोहरी, हिंग घालावा. लसूण तुकडे, हिरवी मिरची, कढीपत्ता, शेंगदाणे, चिरलेला कांदा, हळद, तिखट घालून छान परतावे. त्यानंतर त्यात वरील पोळ्यांचे तुकडे व भात घालावा. मीठ व साखर घालून व्यवस्थित मिसळावे. झाकण ठेवून मस्त वाफ काढावी. गॅस बंद करून भरपूर कोथिंबीर पेरावी. तयार माणिक पैंजण गरम गरम खाण्यास द्यावे.

कांदा चिंच चटणी
साहित्य : पाच सहा सुक्‍या लाल मिरच्या, १ छोटा कांदा, ४ लसूण कळ्या, पाव चमचा बडीशेप, चिंच गूळ चवीनुसार, कोथिंबीर, मीठ.
कृती : सुक्‍या मिरच्या कोरड्या भाजाव्यात. बडीशेप भाजून घ्यावी. मिक्‍सर भांड्यात मिरच्या, बडीशेप, लसूण, कांदा चिरून चिंच, गूळ, कोथिंबीर, मीठ व थोडे पाणी घालून एकत्र वाटावे.तयार चटणी बाऊलमध्ये काढून एक चमचा तेलाची फोडणी तयार करावी त्यात फक्त मोहरी आणि हिंग घालावे आणि चटणीवर ओतावी. झणझणीत चटणी भाकरीबरोबर सर्व्ह करावी.

मसाला सुपारी
साहित्य : एक वाटी बडीशेप, एक वाटी सुका खोबरे किस, लवंग ४-५, १०-१२ वेलदोडे , ओवा दोन चमचे, सुंठ पूड एक चमचा, गुंज पाला अर्धी वाटी, ज्येष्ठमध पूड दोन चमचे, आवळा पूड एक चमचा, चिमूटभर जायफळ पूड, एक चमचा खडीसाखर, दोन चमचे धनेडाळ, अस्मानतारा दोन काड्या,
कृती : बडीशेप, हळद, मीठ आणि लिंबाचा रस लावून खरपूस भाजून घ्यावी. खोबरे कीस आणि ओवा भाजून घ्यावा. मिक्‍सरच्या मोठ्या भांड्यात ओवा, बडीशेप, खोबऱ्याचा कीस आणि खडीसाखर जाडसर फिरवून घ्यावे. मग त्यात आवळा पूड, जायफळ पूड, लवंग वेलदोडा पूड, धनेडाळ, गुंजपाला, अस्मानतारा, सुंठपूड एकत्र करून बारीक करावे. एकदम पावडर करू नये. बरणीत भरताना रंगीत सोपेच्या गोळ्या घालाव्यात. बिना सुपारीची ही सुपारी अत्यंत चविष्ट व पाचक आहे.  

फोटो फीचर

संबंधित बातम्या