झणझणीत मत्स्याहार!

स्मिता वळंजू, कोल्हापूर
बुधवार, 21 मार्च 2018

फूड पॉइंट   
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

पापलेट फिश करी
साहित्य ः एक नारळ किसलेला, १०-१२ सुक्‍या मिरच्या, धने २ चमचे, चिंच लिंबाएवढी, हळद अर्धा चमचा, लसूण ७-८ पाकळ्या, एक कांदा, अर्धा किलो पापलेटचे तुकडे, मीठ
कृती ः प्रथम माशांना मीठ व हळद लावून ठेवावे. ओले खोबरे, मिरच्या, धने, चिंच, हळद, लसूण, अर्धा कांदा, मीठ हे सर्व एकत्र करून बारीक वाटून घेणे. अर्धा कांदा बारीक चिरून तेलात लालसर परतून घ्यावा. त्यात वाटण, मासे व थोडे पाणी घालून अलगद ढवळावे. चांगली उकळी आल्यावर गॅस बंद करून कोथिंबीर पेरावी. गरम भाताबरोबर सर्व्ह करावी.

कोळंबी पुलाव
साहित्य ः अर्धा किलो कोळंबी साफ करून मीठ व हळद लावून ठेवावी, ४ चमचे आलं-लसूण- कोथिंबीर-मिरची पेस्ट, २ चमचे भाजका मसाला, अर्धा किलो बासमती तांदूळ, २ कांदे, अर्धी वाटी तूप, खोबरे व कोथिंबीर सजावटीसाठी, खडा मसाला.
कृती ः प्रथम कढईत तूप घालून त्यात खडा मसाला घालावा. नंतर त्यात कांदा लाल होईपर्यंत परतावे. मीठ व कोळंबी घालून परतावे व २ चमचे भाजका मसाला व आलं लसूण पेस्ट घालून परतावे. नंतर तांदळाच्या दुप्पट गरम पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्यावा. वरून तळलेला कांदा, खोबरं, कोथिंबीर व काजूने सजावट करावी.

कारवारी बांगड्याचा धोडक
साहित्य ः एक नारळ, १०-१२ सुक्‍या मिरच्या, अर्धा चमचा हळद, चिंच, मीठ, २ चमचे धने, ७-८ तिरफळ, हळदीचे पान, खोबरेल तेल २ चमचे, ८-१० बांगड्यांचे तुकडे
कृती ः कढईत खोबरेल तेलात ओली मिरची व तिरफळ घालावी. त्यात खोबरं, मिरच्या, मीठ, चिंच, हळद यांचे मिश्रण बारीक करून घालावे. कढ आल्यावर त्यात अलगद बांगडे सोडावे. मंद आचेवर शिजू द्यावे. हे धोडक जास्त ढवळू नये. वरून हळदीचे पान तुकडे करून टाकावे. हे धोडक भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

खेकडा फ्राय
साहित्य ः समुद्री ७-८ छोटे खेकडे, अर्धा चमचा हळद, २ चमचे मिरची पावडर, तेल व तांदळाचे पीठ
कृती ः खेकडे साफ करून, हळद, मिरची पावडर व मीठ लावून मॅरिनेट करून ठेवावे. (अर्धा तास) तवा किंवा पॅनवर तेल सोडावे. खेकडे पिठात घोळवून तेलावर मंद आचेवर भाजावेत. कोथिंबीर सजावट करून सर्व्ह करावे.

बोंबील भुजण
साहित्य ः दहा-बारा बोंबीलचे तुकडे, खोबरे, हळद, मीठ, तेल, आलं-लसूण-कोथिंबीर, आले-मिरची पेस्ट, धने
कृती ः कढईत तेल घालून कांदा परतून घेणे. लालसर झाल्यावर त्यात आलं, लसूण पेस्ट खोबरं, हळद, धने वाटण घालून एक उकळी आणावी. त्यात आमसूल (कोकम) व बोंबील घालून उकळी आल्यावर गॅस बंद करावा. गरम भाताबरोबर हे भुजण सर्व्ह करावे.

तिसऱ्याची (शिंपले) भजी
साहित्य ः अर्धा किलो तिसरे, बेसन १ वाटी, तळण्यासाठी तेल, मीठ, हळद, मिरची पावडर, मीठ, कांदा १, कोथिंबीर
कृती ः अर्धा किलो तिसरे साफ करून वाफ आणावी. त्यातील मांस बाजूला काढून ठेवावे. त्याला मीठ व हळद लावून ठेवावे. वाफवलेले पाणी न टाकता त्या पाण्यात पीठ भिजवावे. पिठात एक कांदा बारीक कापून टाकावा. तिसऱ्याचं मांस थोडं थोडं घेऊन पिठात बुडवून भजी तळावी. गरमागरम भजी सर्व्ह करावीत.  ही भजी कोथिंबीरने सजवावीत.

सुके क्राड व पडवळाची भाजी
साहित्य ः सुकी क्राड (सुकी कोळंबी), पडवळ, भाजका मसाला, खोबरं, मीठ, तेल, कांदा
कृती ः प्रथम कढईत तेलात कांदा परतून, त्यात भाजका मसाला घालावा. त्यात बारीक चिरलेला पडवळ व कोळंबी टाकून परतून घ्यावे. थोडे पाणी घालून भाजी बनवून घ्यावी. नंतर मीठ, खोबरे व कोकम टाकून गॅस बंद करावा. तांदळाच्या भाकरीबरोबर गरम सर्व्ह करावे.

भरलं पापलेट
साहित्य ः अखंड पापलेट, कोळंबी, हळद, मीठ, कांदा, मिरची, तेल, मिरची पावडर, तांदळाचे पीठ
कृती ः प्रथम पापलेटला एका बाजूने चीर पाडून पॉकेट बनवून घ्यावे. कांदा एका भांड्यात तेलावर परतून द्यावा. त्यात ओली मिरची, हळद, मीठ घालून कोळंबी परतून भाजी बनवून द्यावी. हे सारण पापलेटमध्ये भरून पापलेटवरून दोऱ्याने शिवावे किंवा बांधावे. नंतर पापलेटला हळद, मीठ व मिरची पावडर लावून थोडा वेळ मॅरिनेट करून ठेवावे. मासा तांदळाच्या पिठामध्ये घोळवून मंद आचेवर खमंग फ्राय करावा. भाजलेले भरलं पापलेट डिशमध्ये ठेवून सॅलडने सजावट करावी.

गाभोळी फ्राय (माशाचे अंडे)
साहित्य ः गाभोळी, खोबरेल तेल, कोल्हापुरी मसाला, मीठ
कृती ः गाभोळी साफ करून घ्यावी. ती थोडी वाफवून पातळ स्लाईस करून घ्यावे. पॅनवर खोबरेल तेल घालून मंद आचेवर फ्राय करावी. त्यात मीठ व कोल्हापुरी मसाला भुरभुरून परत फ्राय करून गॅस बंद करावा. कुरकुरीत व खमंग गाभोळी सर्व्ह करावी.

कालवा फ्राय (Oyser Fry)
साहित्य व कृती ः कालवं, खोबरे, तेल, मीठ, कांदा व भाजका मसाला घालून परतावे. त्यात कालवं व खोबरे टाकून परतावे. थोडं फ्राय झाल्यावर त्यात २ कोकम टाकून गॅस बंद करावा. भाकरीबरोबर सर्व्ह करावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या