गरमागरम न्याहारी

स्नेहल कुलकर्णी, बदलापूर
शुक्रवार, 15 जून 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

लाल भोपळ्याचे पराठे
साहित्य : पाव किलो भोपळा, तिखट आवडीप्रमाणे, आले किसलेले १ चमचा, धने पावडर २ चमचे, जिरे पावडर अर्धा चमचा, सांबर मसाला ३ चमचे, दही २ चमचे, गव्हाचे पीठ बसेल इतके, मीठ, तेल, साजूक तूप आवश्‍यकतेनुसार. तांदळाचे पीठ १ चमचा.
कृती : भोपळा किसून घ्यावा. त्यात तिखट, धने व जिरे पावडर, आले किसून, सांबर मसाला, दही, मीठ, तेल घालून एकजीव करावे व त्यात बसेल इतके गव्हाचे पीठ व २ चमचा तांदूळ पीठ घालून चांगले मळून घ्यावे व छोटे गोळे घेऊन तांदुळपीठ व गव्हाचे पीठ एकत्र करून त्या पीठीवर लाटावे. तवा गरम करून छान दोन्ही बाजूंनी भाजावे. नंतर साजूक तूप सोडावे. खरपूस पौष्टिक पराठा तयार.

कोहळ्याचे मुटके
साहित्य : कोहळा किसलेला १ बाउल, मिरची पेस्ट १ चमचा, आलं पेस्ट २ चमचे, हळद १ छोटा चमचा, धने पावडर २ चमचे, जिरे पावडर १ चमचा, थोडा गरम मसाला, कोथिंबीर चिरलेली १ वाटी, तिखट, दही १ चमचा, खायचा सोडा, अर्धा टीस्पून ओवा, बडीशेप पावडर १ चमचा, थोडे तीळ, मीठ, तेल, अर्धा वाटी गव्हाचे पीठ, अर्धा वाटी रवा, अर्धा वाटी बेसन, पाव वाटी तांदुळपीठ, चाट मसाला अंदाजे, हिंग.
कृती : प्रथम किसलेला कोहळा पिळून त्यातील पाणी काढून टाकावे. त्यात अनुक्रमे मिरची पेस्ट, आले पेस्ट, तिखट, धने व जिरे पावडर, गरम मसाला, तीळ, ओवा व बडीशेप पावडर, हळद, चिरलेली कोथिंबीर, दही व खायचा सोडा व तेल सर्व एकत्र करावे. त्यात गव्हाचे पीठ, रवा, बेसन  व थोडे तांदुळपीठ घालून घ्यावे. नंतर घट्ट मळावे. पाणी न घालता मळावे व त्या अंदाजाने मीठ घालून त्याचे मुटके करून तेल लावलेल्या ताटलीत वाफ येण्यासाठी ठेवावे. गार झाल्यावर त्याच्या पातळ चकत्या करून कढईत तेल गरम करून त्यात मोहरी व हिंग टाकून त्या चकत्या परतून घ्याव्यात. फोडणीत तीळ घालावे. वरून त्यावर चाट मसाला घालून द्यावा. मस्त कुरकुरीत मुटके तयार.

ज्वारीचा डोसा
साहित्य : ज्वारीचे पीठ १ बाउल, अर्धा वाटी तांदुळपीठ, हळद, आलं, मिरची पेस्ट, सोडा पाव चमचा, लिंबूरस १ चमचा, दही किंवा ताक आंबट असलेले अंदाजे अर्धा वाटी, मीठ, तेल, हळद किंचित, कोथिंबीर, चिरलेला पालक १ वाटी, रवा.
चटणीसाठी साहित्य : खोवलेले खोबरे, दही, मिरची, लसूण, कोथिंबीर, पुदिना, मीठ.
कृती : ज्वारीचे पीठ व तांदळाचे पीठ एकत्र करून त्यात थोडी हळद, आलं, मिरची पेस्ट घालावी. दही किंवा आंबट ताक घालावे. कोथिंबीर चिरलेली, पालक चिरलेला, मीठ, तेल व पाणी अंदाजे घालून पातळ पीठ करावे. गुठळी होऊ न देता एकजीव करावे. सोडा घालून त्यावर लिंबूरस घालावा. खूप फेटून घेणे. अर्धा तास ठेवावे. मग निर्लेप तव्यावर तेल लावून व पाणी मारून छान तापवून घ्यावे. मग त्यावर पळीने ज्वारीचे मिश्रण त्यात, त्यात थोडा रवा घालून घ्यावा व ओतावे. अलगद तवा फिरवून पसरविणे. पातळ थर देणे. गॅस मध्यम ठेवून कडेने सुटू लागल्यावर तेल सोडून उलटवावे व खाण्यासाठी कुरकुरीत ज्वारीचा डोसा चटणीसोबत द्यावा.

फ्लॉवर सूप
साहित्य : फ्लॉवर १ बाउल चिरलेला, बटाटा पाव बाउल, लसूण, मिरी पावडर, लिंबूरस (सैंधव), काळे मीठ, थोडे साधे मीठ, क्रीम अंदाजे.
कृती : प्रथम चिरलेला फ्लॉवर, साल काढून चिरलेला बटाटा घ्यावा. एका कढईत फ्लॉवर, बटाटा एकत्र पाणी घालून व लसूण पाकळ्या घालून उकळविणे. वाफ आल्यावर थोडे शिजल्यावर ते थंड होण्यास ठेवावे. मग मिक्‍सरमधून काढून न गाळता पातेल्यात उकळण्यास ठेवावे. त्यात मिरी पावडर, मीठ, काळे मीठ घालून गरम करावे. शेवटी लिंबूरस टाकून हलवून पिण्यासाठी द्यावे. त्यावर हलकेसे क्रीम टाकून सजवावे.

मसालेदार बाजरी पराठा
साहित्य : बाजरीचे पीठ २ वाट्या, उकडलेला बटाटा १, भरताचे वांगे गर १ वाटी, मीठ, हळद, मिरची पेस्ट, लसूण पेस्ट, कांदा १, कोथिंबीर, धने पावडर १ चमचा, गरम मसाला स्वादानुसार, मीठ, तेल, लोणी.
कृती : बाजरीचे पीठ घेऊन त्यात उकडलेल्या बटाट्याचा गोळा त्यात घालावा. वांग्याचा गर (वांगी भाजून), बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर, मिरची, लसूण पेस्ट, मीठ, थोडा गरम मसाला हे सर्व एकत्र करून पीठ मळून घेणे व त्याचे छोटे छोटे पराठे लाटून तव्यावर खरपूस भाजून घ्यावे. बाजूने तेल किंवा तूप सोडावे. पराठ्यावर लोण्याचा गोळा ठेवून खाण्यास द्यावा. बरोबर दही त्यात मिरची वाटलेली टाकून मीठ त्याबरोबर द्यावे.

क्रिस्पी हरियाली पॅटिस
साहित्य : पालक, मेथी, कोथिंबीर, चवळी, मटार, चवळी (कडधान्य) अंदाजे जेवढे करायचे असेल त्याप्रमाणे प्रमाण कमी जास्त चालेल. कडधान्य चवळी अर्धा वाटी, मीठ, हिरवी मिरची अंदाजे, आलं, लसूण पेस्ट २ चमचे, चाट मसाला, आमचूर पावडर, धना पावडर २ चमचे, बेसन व तांदूळ पीठ व ज्वारीचे पीठ, मीठ, बारीक रवा, काळे मीठ, तेल.
कृती : पालक, मेथी चवळी, कोथिंबीर बारीक चिरून स्वच्छ धुऊन कोरडी करून घ्यावी. मटार मिक्‍सरमधून वाटून घ्यावे. चवळी कडधान्य रात्री भिजवून सकाळी कुकरमध्ये वाफवून घ्यावे. त्यातील पाणी निथळून हाताने कुस्करून घ्यावे. त्यात मिसळणे. मग हिरवी मिरची पेस्ट, आलं, लसूण पेस्ट घालावे. चाट मसाला, आमचूर पावडर, धना पावडर घालावे. सर्व एकत्र करून त्यात बसेल एवढे बेसन, तांदुळपीठ व ज्वारीचे पीठ घालावे. तांदूळ पीठ व ज्वारीचे पीठ थोडेच घालावे. मीठ घालून एकत्र मळावे. छोटे छोटे गोळे बनवून हवा तो आकार देऊन रवा व काळे मीठ एकत्र करून त्यावर हे पॅटीस घोळवून तव्यावर तेल सोडून त्यावर पॅटीस खरपूस क्रिस्पी होईपर्यंत शॅलो फ्राय करावा. पुदिन्याच्या चटणीबरोबर खाण्यासाठी द्यावा.

केळी-सफरचंद पॅनकेक
साहित्य : दोन केळी, सफरचंद १, पिठी साखर २ चमचे, राजगिरा व शिंगाडा पीठ आवश्‍यकतेनुसार, साजूक तूप, वेलची पावडर, काजू पावडर, दूध, मीठ, खायचा सोडा १ चिमूट.
कृती : केळी कुस्करून घ्यावीत. सफरचंदाचे साल काढून किसून घ्यावे. दोन्ही एकत्र करून त्यात पिठीसाखर घालावी. थोडे तूप व किंचित मीठ टाकावे. त्यात बसेल एवढे राजगिरा व शिंगाडा पीठ समप्रमाणात टाकून चांगले एकजीव करून घ्यावे. त्यात सोडा टाकून घ्यावा व पातळसर करण्याकरिता दूध टाकावे. मध्यम मिश्रण हवे. आता पॅन गरम करत ठेवावा. थोडे तूप लावून मग त्यावर हे मिश्रण पुरी एवढ्या आकारात पसरावे. बाजूने तूप सोडावे. एका वेळेस दोन ते तीन करू शकतो. झाकण ठेवून भाजणे. खरपूस लालसर झाल्यावर उलटावे. परत तूप सोडावे. छान फुगून येतात. डिशमध्ये काढून त्यावर पिठीसाखर भुरभुरुन पिस्ता बदामाचे काप टाकून सजवावे.

छोले राइस
साहित्य : एक वाटी काबुली चणे, १ वाटी तांदूळ, १ वाटी खोवलेले ओले खोबरे, लसूण, जिरे, कांदा १, आलं व लसूण पेस्ट २ चमचे, १ वाटी दही, धना पावडर १ चमचा, गरम मसाला १ चमचा, लिंबूरस १ लिंबाचा, हळद, मीठ, तेल, साजूक तूप २ चमचे, तिखट आवश्‍यकतेप्रमाणे, सजावटीकरता खोवलेले खोबरे व कोथिंबीर, तळून मिरची.
कृती : काबुली चणे रात्री हळद व मीठ घालून भिजवावे. सकाळी कुकरमध्ये उकडवून घ्यावे. कुकरमध्ये तेल गरम करून त्यात जिरे टाकावे. तडतडल्यावर बारीक चिरलेला कांदा परतावा. आलं, लसूणपेस्ट टाकून परतणे. कांदा तळल्यासारखा होईपर्यंत परतावे. हळद, तिखट, धने पावडर टाकून परतावे. मग वाफवलेले छोले टाकून परतावे. त्यावर खोवलेले खोबरे व लसूण मिक्‍सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. ते परतावे. तांदूळ टाकून त्यावर उकळलेले पाणी अडीच पट टाकावे. मीठ टाकून हलवावे. दही फेटून घ्यावे व हलवून घ्यावे. बाजूने साजूक तूप सोडावे. दोन शिट्या झाल्यावर उतरवावे. वरून खोवलेले व कोथिंबीर टाकून सजवावे. हिरवी मिरची तळून वर ठेवावी.

शिंगाड्याचा मिक्‍स्ड फ्रूट हलवा
साहित्य : शिंगाडा पीठ २ वाट्या, तूप २ वाटी, साखर दीड वाटी, दूध २ वाट्या, मिक्‍स ड्रायफ्रूट पावडर, वेलची पावडर, मिक्‍सफ्रुट (केळी, सफरचंद, चिक्कू, पपई, टरबूज) बारीक फोडी.
कृती : शिंगाडा पीठ तुपावर परतून घ्यावे. एकीकडे दूध उकळवत ठेवावे. खमंग भाजल्यावर त्यावर दूध टाकून वाफ आणावी. मग त्यात साखर टाकून परत हलवावे व चांगली वाफ आणावी. मिश्रण हलवत राहावे. बाजून तूप सोडावे. आता ड्रायफ्रूट पावडर टाकावी. छान घट्ट झाल्यावर त्यात फळांचे तुकडे टाकून हलवावे. एकजीव करावे व गॅसवरून उतरवावे. वरून बदाम पिस्ता टाकून शाही हलवा खाण्यासाठी तय्यार.

फोटो फीचर

संबंधित बातम्या