बंगाली शुक्तो, बिहारी ठेकवा

सुरेखा भिडे, पनवेल 
सोमवार, 10 फेब्रुवारी 2020

फूड पॉइंट
प्राताप्रांतानुसार पदार्थांची नावे बदलतात, तशाच त्या भाज्यांच्या रेसिपीजही बदलतात. आपण आपल्या प्रांतातील पदार्थ तर रोजच्या जेवणात करतच असतो, पण कधीतरी ‘फॉर अ चेंज’ म्हणून वेगवेगळ्या प्रांतातील पदार्थ करायला काय हरकत आहे. बंगाल आणि बिहारमधील काही खास पदार्थांच्या रेसिपीज... 

आलू पोस्तो 
साहित्य : पाच-सहा बटाटे, अर्धा चमचा कलौंजी (कांदा बी), २-३ हिरव्या मिरच्या,
३-४ चमचे पोस्तो (खसखस, जी ३-४ तास भिजवून ठेवावी), तेल आणि थोडी 
हळद. 
कृती : बटाटे स्वच्छ धुऊन साले काढून बारीक फोडी कराव्यात. पोस्तोमध्ये एक मिरची घालून पेस्ट करावी. मग कढईत तेल घालावे. तेल गरम झाले, की अर्धा चमचा कलौजी घालावी. त्यात बटाटे घालून परतावे. मग त्यात मीठ, हिरवी मिरची, तेल, पोस्तो पेस्ट घालून परतावे. हळद घालावी आणि पुन्हा परतावे. त्यात पाणी घालून बटाटे शिजवावे. तुम्हाला जेवढी रसदार भाजी हवी तेवढे पाणी ठेवावे. पराठे, पोळीबरोबर भाजी सर्व्ह करावी, छान लागते. तिकडे ही भाजी मोहरीच्या तेलात करतात. पण तुम्ही कोणतेही तेल वापरू शकता. 

मसालेदार भेंडी  
साहित्य : एक पाव भेंडी, १ मोठा कांदा, २ टोमॅटोंची पेस्ट, किचन किंग मसाला, हळद, तिखट, मीठ, तेल, चवीला साखर. 
कृती : एका भेंडीचे दोन असे सर्व भेंड्यांचे तुकडे करून घ्यावेत. ते सर्व तेलात तळून घ्यावे. म्हणजे तार सुटत नाही. मग चौकोनी चिरलेला कांदा तेलात परतावा. त्यात टोमॅटो पेस्ट घालावी आणि पुन्हा परतावे. २ चमचे दही घालून परतावे. त्यात तळलेली भेंडी घालून परतावे. नंतर त्यात हळद, तिखट, किचन किंग मसाला, मीठ, साखर घालून पुन्हा परतावे. आता जरा पाणी घालावे. कोथिंबीर घालून भाजी सर्व्ह करावी, खूप छान लागते.  

लिट्टी व चोखा 
साहित्य : एक टेबलस्पून ओवा, दीड कप गव्हाचे पीठ, थोडे तेल व मीठ. सर्व एकत्र करून पोळीसाठी भिजवतो तशी कणीक भिजवावी. जरा घट्ट भिजवावी. 
लिट्टीसाठी स्टफिंग : एक बारीक चिरलेला कांदा, १ कप फुटाण्याच्या डाळीचे पीठ, २ मिरच्या बारीक चिरून, ४-५ लसूण पाकळ्या व १ तुकडा बारीक कुटलेले आले, १ टीस्पून कलौंजी, कोथिंबीर बारीक चिरलेली, चवीपुरते मीठ व तेल. 
कृती : स्टफिंगचे सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिक्‍स करून घ्यावे. सारण जरा कोरडे असले, तर गोळा होईल. पाणी कमी घालावे (जरा कोरडेच पाहिजे). हे सारण कणकेच्या पारीत मळून घ्यावे व निखाऱ्यावर भाजावे. तुपात तळून काढले तरी चालेल. लिट्टीबरोबर चोखा खातात.

खट्टी-मिठी रस्सेदार भेंडी  
साहित्य : पाव किलो भेंडी, चिंचेच्या कोळात हळद, जिरेपूड व धनेपूड घालून ठेवावी, २ टोमॅटोंची प्युरी, कढीपत्ता, मीठ, तिखट, जिरे, मोहरी, मेथी, तेल, हिंग, धने, जिरेपूड, साखर. 
कृती : प्रत्येक भेंडीचे दोन तुकडे करून तळून घ्यावेत. तेलात मोहरी, हिंग, जिरे, मेथी घालावी. मग कांदा परतावा. टोमॅटो प्युरी घालून परतावे. मग चिंचेचा कोळ घालावा. चवीनुसार साखर घालावी. तिखट घालावे. मग तळलेली भेंडी घालून परतावे. मीठ घालावे. कढीपत्ता घालावा. पाणी घालावे. थोडी धने, जिरेपूड घालावी व झाकण ठेवून शिजवावे. जरा रसदारच ठेवावी. खट्टी-मिठी अशी भाजी छान लागते. पराठा किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावी. 

चोखा (भरीत) 
साहित्य : भरताचे वांगे, टोमॅटो, कांदा, आले, लसूण, हिरवी मिरची, मीठ, तेल, हळद, फोडणीचे साहित्य. 
कृती : आपण नेहमी वांग्याचे भरीत करतो त्याचप्रमाणे भरीत करावे. लिट्टीबरोबर सर्व्ह करावे. लिट्टी चोखा सर्व्ह करताना लिट्टी साजूक तुपाबरोबर फोडून खातात. 

दही बैंगन  
साहित्य : दोन-तीन जांभळी लांब वांगी, दही घट्टसर, धने-जिरेपूड, तिखट, साखर, मीठ चवीप्रमाणे, हळद, लाल सुकी मिरची, तेल, कोथिंबीर, कढीपत्ता, हिंग, तेल. 
कृती : वांग्याचे चौकोनी तुकडे करून तेलात तळून घ्यावे. मग घट्ट दही जरा घुसळून घ्यावे. त्यात धने-जिरेपूड, तिखट, मीठ, साखर घालावी. नंतर तळलेली वांगी घालावी. तेलात हिंग, जिरे, मोहरी, कढीपत्ता, लाल मिरची, हळद घालून फोडणी करावी. ती फोडणी दह्यात घालून मिक्‍स करावी. खिचडी किंवा साधा भात-कढीबरोबर सर्व्ह करावे.

पकोडे की सब्जी 
साहित्य : एक वाटी बेसन, मिरची पावडर, ओवा, हळद, मीठ, जिरे, तेल, कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट, कोथिंबीर, धने-जिरेपूड, गरम मसाला. 
कृती : बेसनामध्ये मीठ, हळद, ओवा, जिरे, लाल तिखट व थोडी कोथिंबीर घालून भज्याप्रमाणे पीठ भिजवून घ्यावे. त्या पिठाची छोटी छोटी भजी तेलात तळावीत. कढईत तेलात मोहरी, जिरे घालून फोडणी करावी. त्यात कांदा, टोमॅटो, आले-लसूण पेस्ट घालून परतावे. त्यात तिखट, हळद घालावी. धने-जिरेपूड, गरम मसाला घालून परतावे आणि पाणी घालावे. त्यात ही भजी टाकावीत. वरून कोथिंबीर घालून सर्व्ह करावे. भाताबरोबर गरम गरम पकोडे की सब्जी व दही मस्त लागते.  

 ठेकवा (ठेकुआ) 
साहित्य : तीन कप कणीक, २ टेबलस्पून सुके खोबरे (तुकडे केलेले), १ टेबलस्पून बडीशेप, दीड कप साखर, तेल, २-३ चमचे रवा. 
कृती : सर्व घटक एकत्र करून कणीक दुधात भिजवावी. तसेच १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे. मग त्याचे छोटे-छोटे गोळे करावे. जरा हातांनी दाबून घ्यावे व वर चाकूने चौकोनी डिझाइन करावे व तळून घ्यावे. हे ठेकवा खूपच छान लागतात. डिझाइन केलेले लाकडी साचे बिहारमध्ये मिळतात. त्याच्या मदतीने डिझाइन करतात. साचा नसेल तर चाकूने कुठल्या पण डिझाइनच्या वस्तूवर ठेवून प्रेस करावे व लालसर तळून घ्यावे. मस्त लागतात. 

आलू चोखा 
साहित्य : पाच-सहा बटाटे, ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, तेल व फोडणीचे साहित्य. 
कृती : बटाटे उकडून स्मॅश करावेत. त्यात मीठ घालावे. कोथिंबीर घालावी. नंतर तेलात मोहरी, मिरची, हळद, हिंग घालावे. स्मॅश केलेल्या बटाट्यांना वरून ही फोडणी द्यावी. मग सर्व एकत्र करावे. पराठा, पोळीबरोबर चोखा खायला द्यावा. बिहारमध्ये चोखा करण्यासाठी सरसोचे तेल वापरतात. तुम्ही तुमच्या आवडीचे तेल वापरू शकता.

शुक्तो  
साहित्य : दोन शेवग्याच्या शेंगा (२ इंचाचे तुकडे असावेत), एक कच्चे उकडलेले केळे, २-३ बटाटे, लाल भोपळा, एक वांगे, एक कारले, वरील सर्व भाज्या बारीक चौकोनी कापून घ्याव्या. दीड टेबलस्पून मोहरी पेस्ट, सरसो तेल, साखर चवीनुसार, १ टीस्पून गरम मसाला, मेथीदाणे, मीठ चवीनुसार. 
कृती : प्रथम कढईत तेल गरम करावे. त्यात मेथीदाणे घालावेत. लालसर झाले की भोपळा, वांगे, कारले, बटाटा, शेवग्याच्या शेंगांचे तुकडे घालावे व परतून घ्यावे. मग पाणी व मीठ घालावे. भाजी शिजू द्यावी. नंतर मोहरीची पेस्ट घालून मिक्‍स करावी व एक उकळी आली की चवीपुरती साखर, तूप व गरम मसाला घालावा. गरम गरम भाताबरोबर सर्व्ह करावी.

संबंधित बातम्या