फणसाचे नावीन्यपूर्ण पदार्थ

सुजाता नेरुरकर
गुरुवार, 3 मे 2018

फूड पॉइंट
फणस म्हटले, की कोकणाचा हिरवागार निसर्ग डोळ्यांसमोर येतो. कोकणामध्ये फणसाची भाजी वेगवेगळ्या प्रकारे बनवतात. तसेच फणसाचे गरे वाळवून त्याचे पीठ बनवून त्याची फणस पोळी बनवली जाते. फणस हे खूप गुणकारी फळ आहे. आपल्या शरीराला शक्ती व आरोग्य देणारे वायूदोष दूर करणारे आहे. पिकलेल्या व कच्च्या फणसापासून अनेक पदार्थ बनवले जातात. अशाच काही पदार्थांच्या पाककृती...

आठळ्यांची भाजी
आठळ्या म्हणजे फणसाच्या गऱ्यातील बिया.
साहित्य : फणसाच्या २० ते २५ आठळ्या, २ टेबल स्पून ताजा खवलेला नारळ, १ टेबल स्पून बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीपुरते मीठ, अर्धा टीस्पून साखर (ऐच्छिक)
फोडणीसाठी : १ टेबल स्पून तेल, २ चिमूट मोहोरी, २ चिमूट जिरे, पाव टीस्पून हिंग, अर्धा टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल तिखट
कृती : प्रथम आठळ्या कुकरमध्ये थोडेसे पाणी व मीठ घालून उकडून घ्याव्यात. आपण भातासाठी कुकर लावतो तेव्हा त्यावर बिया उकडल्या तरी चालतात. कुकर थंड झाल्यावर आठळ्या कुकरमधून बाहेर काढून  सोलून घेऊन बाजूला काढून मध्यम आकाराचे तुकडे चिरून घ्यावे. कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, हळद, लाल मिरची पावडर घालून फोडणी तडतडली, की चिरलेल्या आठळ्या घालून मिक्‍स करून पाच मिनिटे वाफ काढावी. भाजीला वाफ आली की त्यामध्ये खोवलेला नारळ, साखर, मीठ घालून मिक्‍स करून २-३ मिनिटे भाजी परतून घ्यावी. गरम गरम भाजी चपाती बरोबर सर्व्ह करावी.
फणसाची खीर 

पिकलेल्या फणसाची गोड खीर 
साहित्य : एक टेबल स्पून तूप, १ कप फणसाचे पिकलेले घट्ट गरे, अर्धा कप गूळ, अर्धा कप नारळाचे दूध, ५ काजू, ५ बदाम, २ टेबल स्पून बेदाणे, पाव टीस्पून वेलचीपूड 
कृती : फणसाच्या गऱ्यामधील बिया काढून त्याचे मध्यम आकाराचे तुकडे कापून घ्यावे. नारळाचे दूध काढून घ्यावे. एका जाड बुडाच्या भांड्यात तूप गरम करून त्यामध्ये फणसाचे कापलेले तुकडे घालून थोडेसे परतून झाकून ठेवावे व मंद विस्तवावर वाफा येऊ द्याव्यात. त्यामध्ये गूळ घालून मिक्‍स करून घ्यावे. गूळ पूर्ण विरघळून गेला की विस्तव बंद करावा. त्यामध्ये हळूहळू नारळाचे दूध घालून मिक्‍स करावे. नंतर मंद विस्तवावर दोन मिनिटे गरम करून घ्यावे. मधून मधून हलवत राहावे. खीर गरम झाली की वेलचीपूड, काजू, बदाम, बेदाणे घालून मिक्‍स करून गरम गरम सर्व्ह करावे.
टीप : खीर बनवताना नारळाचे दूध वापरले आहे म्हणून खीर फक्त थोडी गरम करायचे जर उकळी आली तर दूध फाटायची भीती असते.

कच्च्या फणसाच्या गऱ्यांची भाजी 
साहित्य : अर्धा किलो कच्चा फणस, ४ हिरव्या मिरच्या, पाव कप ओला खोवलेला नारळ, २ टेबल स्पून कोथिंबीर, मीठ चवीने 
फोडणीकरिता : एक टेबल स्पून तेल, पाव टीस्पून जिरे, ८ कढीपत्ता पाने 
कृती : फणसाची साले काढून त्याचे गरे काढून घेऊन बियांसकट मध्यम आकाराच्या फोडी कराव्यात. मग पाण्याने स्वच्छ धुऊन बाजूला ठेवावे. खोवलेला नारळ, हिरवी मिरची जाडसर वाटून घ्यावे. एका मध्यम आकाराच्या कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, कढीपत्ता घालून मीठ व चिरलेला फणस घालून मिक्‍स करून घ्यावे. कढईवर स्टीलची प्लेट ठेवून त्यामध्ये थोडे पाणी घालून मंद विस्तवावर ८-१० मिनिटे भाजी शिजवून घ्यावी. मग झाकण काढून वाटलेले खोबरे घालून मिक्‍स करून परत भाजी ५ मिनिटे मंद विस्तवावर ठेवावी. फणसाची भाजी झाल्यावर कोथिंबीर घालून गरम गरम तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे.

फणसाची फिटर
साहित्य : आठ फणसाचे गरे, अर्धा कप खोवलेला नारळ, ३ टेबल स्पून रवा, २  टेबल स्पून गूळ, २ हिरवी वेलची पावडर, तेल तळण्यासाठी 
कृती : फणसाचे गरे एका चाळणीमध्ये १५-२० मिनिटे ठेवावे.  त्याच्यामधील ओलेपणा थोडा कमी होईल. बिया काढून ठेवाव्यात. ओला नारळ मिक्‍सरमध्ये पाणी न घालता बारीक वाटून घ्यावा. वाटलेला नारळ एका बाऊलमध्ये काढून ठेवावा. मग फणसाचे गरे मिक्‍सरमध्ये थोडे वाटून घ्यावे. एका बाऊलमध्ये वाटलेला नारळ व फणस, गूळ, वेलची पावडर, रवा घालून मिक्‍स करून घ्यावे. कढईमधे तेल गरम करून छोटे-छोटे गोळे गरम तेलात सोडावे. ब्राऊन रंग येईपर्यंत छान तळून घ्यावे. सर्व्ह करताना वरतून थोडीशी पिठीसाखर भूर-भूरून गरम गरम सर्व्ह करावी.

फणस मोगलाई
मोगलाई फणसाची भाजी महाराष्ट्रीयन पद्धतीने बनवली आहे. 
साहित्य : पंधरा फणसाचे गरे, अर्धा कप दही, एक मोठ्या आकाराचा कांदा, सहा बदाम, अर्धा कप कोथिंबीर, मीठ चवीने 
ग्रेव्ही करिता : अर्धा कप बेसन, पाव कप तांदळाची पिठी, अर्धा टीस्पून धने पावडर, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लाल मिरची पावडर, छोटा कांदा बारीक चिरून, २ लसूण पाकळ्या 
मसाला ग्रेव्ही करिता : अर्धा कप खोवलेला नारळ, १ मोठा कांदा, १ टीस्पून धने, २ टीस्पून खसखस, १ छोटा तुकडा दालचिनी, २ लवंग, १ टीस्पून आलंपेस्ट, १ टीस्पून लाल मिरची पावडर मिक्‍स करून मसाला अगदी बारीक वाटून घ्यावा.
कृती : फणसाच्या बिया स्वच्छ धुऊन त्याचे दोन भाग कापून घ्यावे. मग बीच्या वरचे साल काढून  बीचा आतला भाग बाजूला ठेवावा. एका भांड्यात पाणी घेऊन त्यामध्ये मीठ व फणसाच्या बिया घालून पाच मिनिटे मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. एका भांड्यात बेसन, तांदळाचे पीठ, धने पावडर, हळद, लाल मिरची पावडर, चिरलेला कांदा, लसूण, मीठ चवीने व थोडे पाणी घालून एक मिश्रण बनवून घ्यावे. मग त्यामध्ये शिजवलेल्या फणसाच्या बिया घालाव्यात. एका कढईमध्ये तेल गरम करून फणसाच्या बिया छान ब्राऊन रंगावर तळून घ्याव्यात. अशा प्रकारे सर्व बिया तळून घ्याव्यात. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा घालून गुलाबी रंगावर परतून घेऊन त्यामध्ये दही घालून २-३ मिनिटे परतून घ्यावे. मग त्यामध्ये वाटलेला मसाला घालून २-३ मिनिटे परतून घेऊन  अडीच कप पाणी घालून ५ मिनिटे मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. मसाला शिजला की त्यामध्ये तळलेल्या बिया घालून कढईवर झाकण ठेवून ५-७ मिनिटे मंद विस्तवावर शिजू द्यावे. ग्रेव्ही सर्व्ह करताना बदामाची पेस्ट व कोथिंबीर घालून पराठ्याबरोबर सर्व्ह करावे.

फणसाच्या गऱ्यांची ग्रेव्ही
साहित्य : दोन कप फणसाच्या गऱ्याचे तुकडे, अर्धा कप हिरवे ताजे मटार, १ मध्यम आकाराचा टोमॅटो (चिरून),  २ टेबल स्पून तेल, पाव टीस्पून हळद, १ टीस्पून लाल मिरची पावडर, २ टेबल स्पून कोथिंबीर चिरून, मीठ चवीने
ग्रेव्हीसाठी : तीन मध्यम आकाराचे कांदे (उभे पातळ चिरून), ५ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ टीस्पून आले, १ टी स्पून जिरे, १ कप ओला नारळ (खोवून), ४ लवंग, ४ छोटे तुकडे दालचिनी, ७ काळे मिरे, १ टेबल स्पून तेल, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो (बारीक चिरून)  
कृती : एक पाणी गरम करायला ठेवून त्यामध्ये फणसाचे गऱ्याचे तुकडे व थोडेसे मीठ घालून पाच मिनिटे शिजवून घ्यावे. मटारसुद्धा थोडे शिजवून घ्यावे.
ग्रेव्हीसाठी मसाला : कढईमध्ये १ टेबल स्पून तेल गरम करून त्यामध्ये जिरे, लवंग दालचिनी, मिरे घालून थोडेसे परतून चिरलेला कांदा घालून एक मिनिटे परतून हिरवी मिरची, आले, नारळ घालून दोन मिनिटे मंद विस्तवावर परतून घ्यावे. विस्तव बंद करून मसाला थंड झाल्यावर वाटून घ्यावे. कढईमध्ये  टेबल स्पून तेल गरम करून त्यामध्ये वाटलेला मसाला घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मग त्यामध्ये चिरलेला टोमॅटो, लाल मिरची पावडर, हळद, घालून २ मिनिटे परतून घेऊन, शिजेलेले फणसाचे गरे, मटार, घालून एक कप पाणी व मीठ घालून मिक्‍स करून ग्रेव्ही घट्ट होईपर्यंत मंद विस्तवावर शिजवून घ्यावे. कोथिंबीर घालून गरम गरम तांदळाच्या भाकरी बरोबर सर्व्ह करावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या