गाजर स्पेशल

सुजाता नेरुरकर
मंगळवार, 5 जानेवारी 2021

सध्या गाजरांचा सीझन आहे. सॅलड म्हणून नुसते कच्चे खाण्यापासून ते हलवा किंवा अगदी भाजी करण्यापर्यंत गाजराचे अनेक पदार्थ करता येतात. अशा गाजर स्पेशल काही रेसिपीज...

गाजर कोशिंबीर - प्रकार १
साहित्य : अडीचशे ग्रॅम ताजी लाल गाजरे, २ मोठे टोमॅटो, १ मध्यम कांदा, २ टेबलस्पून शेंगदाणा कूट, पाव कप ओला नारळ (खोवून), पाव कप कोथिंबीर (चिरून), १ टेबलस्पून लिंबू रस, मीठ व साखर चवीनुसार.
फोडणीकरिता : एक टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, पाव टीस्पून हिंग, २ हिरव्या मिरच्या (तुकडे करून)
कृती : प्रथम गाजर धुऊन पुसून घ्यावे. त्याची साले काढून किसून घ्यावे. टोमॅटो बिया काढून चिरावा. कांदा बारीक चिरावा. एका मोठ्या आकाराच्या बोलमध्ये किसलेली गाजरे, चिरलेला टोमॅटो व कांदा एकत्र करावे. त्यामध्ये शेंगदाणा कूट, ओला नारळ, कोथिंबीर, लिंबू रस, मीठ व साखर घालून मिक्स करावे. फोडणीच्या कढईत तेल घालून गरम झाल्यावर मोहरी, हिंग व हिरव्या मिरचीचे तुकडे घालावेत. खमंग फोडणी गाजराच्या कोशिंबिरीवर घालून चांगले एकत्र करावे. कोशिंबीर सर्व्ह करताना वरून ओला नारळ व कोथिंबीर घालून सजवावे.

गाजर कोशिंबीर - प्रकार २
साहित्य : अडीचशे ग्रॅम ताजी लाल गाजरे, २ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून मोहरी (कुटून), १ कप घट्ट दही, पाव कप कोथिंबीर (चिरून), मीठ व साखर चवीनुसार.
फोडणीकरिता : एक टेबलस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग.
कृती : प्रथम गाजरे धुऊन पुसून घ्यावीत. त्याची साले काढून किसावीत. हिरवी मिरची व मोहरी कुठून घ्यावी. कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी. एका बोलमध्ये किसलेली गाजरे घेऊन त्यामध्ये कुटलेली हिरवी मिरची, मोहरी, कोथिंबीर, मीठ व साखर घालून मिक्स करावे. फोडणीची कढई गरम करून त्यामध्ये साजूक तूप गरम करावे. मग त्यामध्ये जिरे व हिंग घालून खमंग फोडणी करावी व ती गाजराच्या कोशिंबिरीवर घालून चांगले एकत्र करावे. 

गाजर सॅलड 
साहित्य : अडीचशे ग्रॅम केशरी अथवा लाल गाजरे, ६-७ खजूर (बिया काढून), अर्धा कप काळी द्राक्षे, १ टेबलस्पून लिंबू रस, १ टीस्पून मिरेपूड, मीठ व साखर चवीनुसार.
कृती : प्रथम गाजरे धुऊन पुसून घ्यावीत. मग त्याची साले काढून किसावीत. खजूर धुऊन बिया काढून चिरून घ्यावेत. काळी द्राक्षे चिरावीत. एका बोलमध्ये किसलेली गाजरे, चिरलेला खजूर व काळी द्राक्षे मिक्स करावीत. मग त्यामध्ये मिरेपूड, लिंबू रस, मीठ व साखर घालून मिश्रण एकत्र करावे. फ्रीजमध्ये थंड करून हे सॅलड सर्व्ह करावे, चवीला टेस्टी लागते.

गाजराची बर्फी 
साहित्य : अर्धी वाटी रवा, २ वाट्या ताज्या लाल रंगाच्या गाजरांचा कीस, २ टेबलस्पून तूप, अर्धी वाटी दूध, १ वाटी साखर, पाव टीस्पून वेलची पूड, २ टेबलस्पून मिल्क पावडर, ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी.
कृती : प्रथम गाजरे स्वच्छ धुऊन सोलून किसून घ्यावीत. नॉनस्टिक पॅनमध्ये रवा चांगला गुलाबी रंग येईपर्यंत भाजावा व बाजूला काढून ठेवावा. स्टीलच्या ट्रेला तूप लावून घ्यावे. मग त्याच पॅनमध्ये तूप गरम करून त्यामध्ये किसलेले गाजर घालून चांगले परतावे. गाजरातील पाण्याचा अंश गेला पाहिजे. नंतर त्यामध्ये दूध घालून दोन मिनिटे झाकण ठेवून वाफवून घ्यावे. झाकण काढून त्यामध्ये साखर घालावी. साखर पूर्ण विरघळू द्यावी. साखर विरघळल्यावर त्यामध्ये भाजलेला रवा घालून घट्ट होईपर्यंत आटवून घ्यावे. मिश्रण घट्ट झाले की तूप लावलेल्या ट्रेमध्ये मिश्रण काढावे. मिश्रण एकसारखे करून थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापून सर्व्ह कराव्यात.

गाजर मटार भाजी 
साहित्य : एक कप गाजर तुकडे, अर्धा कप मटार दाणे, अर्धा टीस्पून लाल मिरची पूड, अर्धा टीस्पून गरम मसाला, अर्धा टीस्पून धने-जिरे पूड, अर्धा टीस्पून आमचूर पावडर किंवा लिंबू रस, मीठ चवीनुसार, फोडणीकरिता १ टीस्पून तेल, अर्धा टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून हळद, सजावटीसाठी कोथिंबीर व ओला नारळ.
कृती : गाजर धुऊन, सोलून त्याच्या गोल गोल चकत्या कराव्यात. कोथिंबीर धुऊन चिरून घ्यावी. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरे, हळद, चिरलेले गाजर, मटार घालून तीन-चार मिनिटे मंद विस्तवावर शिजवावे. मग त्यामध्ये लाल मिरची पूड, गरम मसाला, धने-जिरे पूड व मीठ घालून मिक्स करून कढईवर झाकण ठेवावे. झाकणावर थोडेसे पाणी घालून चार-पाच मिनिटे मंद विस्तवावर भाजी शिजवावी. भाजी शिजल्यावर झाकण काढून लिंबू रस किंवा आमचूर पावडर घालावी. वरून कोथिंबीर व ओला नारळ घालून भाकरी किंवा पोळीबरोबर सर्व्ह करावे.

संबंधित बातम्या