पौष्टिक लाडू

सुजाता नेरुरकर
शुक्रवार, 16 मार्च 2018

फूड पॉइंट    
दहावी-बारावीच्या आणि शाळांच्याही परीक्षा लवकरच संपतील. सुट्यांचे वेध लागतील. सुटीच्या काळात मुलांना काय खाऊ देणार?  त्यांचा आवडता खाऊ - लाडवांच्या वैविध्यपूर्ण रेसिपीज...

तिळगुळाचे लाडू 
साहित्य : दोन कप तीळ (पांढरे), १ कप भाजलेले दाणे, पाव कप पंढरपुरी डाळ (भाजकी), पाव कप सुके खोबरे, १ कप चिकीचा गूळ, १ मोठा चमचा साजूक तूप
कृती : तीळ धुऊन वाळवून खमंग भाजून घ्यावेत. दाणे भाजून साले काढून दोन-दोन तुकडे करून घ्यावे. सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करून घ्यावे. पाहिजे असल्यास खोबऱ्याला किंचित हिरवा रंग लावावा. तीळ, दाणे व सुके खोबरे एकत्र करावे. कढईमध्ये गूळ व तूप घेऊन मंद विस्तवावर पाक करायला ठेवावा. पाक झारीतून खाली करताना धाग्यासारखा निघू लागला की पाक झाला असे समजावे. विस्तव बंद करून तिळाचे मिश्रण एकत्र करून गरम असतानाच लाडू वळावेत.

फुटाणा डाळीचे लाडू
साहित्य :  दोन कप फुटाणा डाळ, पाऊण कप गूळ, एक टीस्पून वेलचीपूड, १ टीस्पून तूप 
कृती : एका जाड बुडाच्या कढईमधे गूळ व एक टेबलस्पून पाणी घालून पाक करायला ठेवावा. गुळाचा पाक हा घट्ट झाला पाहिजे. मग त्यामध्ये तूप व फुटाणा डाळ घालून मिक्‍स करून ५ मिनिटे बाजूला थंड करायला ठेवावे. थोडे गरम असताना छोटे लाडू बनवून घट्ट झाकणाच्या डब्यात भरून ठेवावे. 

मलिद्याचा लाडू 
साहित्य : चार गव्हाच्या चपात्या, पाव कप गूळ, ४ बदाम, ४ काजू, १ टेबल स्पून साजूक तूप
कृती : गव्हाची चपाती २ तास अगोदर बनवून ठेवावी. मग तिचे तुकडे करून घ्यावे. चपाती मिक्‍सरमध्ये बारीक करताना त्यामध्ये काजू, बदाम घालावे थोडेसे मिक्‍सरमध्ये बारीक करावे. गूळ किसून घ्यावा. मग मिक्‍सरमध्ये काढलेली चपाती, गूळ व तूप मिक्‍स करून घेऊन परत थोडे थोडे मिश्रण मिक्‍सरमध्ये घालून बारीक करावे. सर्व मिश्रण एकदम मिक्‍सरमध्ये घालू नये. मग त्याचे एकसारखे लाडू बनवावे.

खजुराचे चॉकलेट
साहित्य : पंधरा खजूर, पंधरा बदाम (थोडे भाजून), १०० ग्रॅम चॉकलेट डार्क कंपाउंड
कृती :  खजूर धुऊन कोरडे करावे. बदाम थोडे गरम करून थंड करावे. खजुराच्या बिया काढून त्यामध्ये एक-एक बदाम ठेवावा. चॉकलेट कंपाउंड डबल बॉईल सिस्टीमने विरघळून घ्यावे. थोडे थंड झाल्यावर एक-एक खजूर त्यामध्ये डुबवून बटर पेपरवर ठेवावा व नंतर ५ मिनिटे फ्रिज मध्ये ठेवावा. घट्ट झाल्यावर सर्व्ह करावे.

चॉकलेट कोकोनट लाडू
साहित्य : दोनशे ग्रॅम कंडेन्स्ड मिल्क, ५० ग्रॅम डार्क चॉकलेट बेस, एक कप डेसिकेटेड कोकोनट 
कृती : डार्क चॉकलेट बेस घेऊन डबल बॉईल सिस्टीमनी चॉकलेट विरघळून घ्यावे. एका नॉनस्टिक भांड्यात कंडेन्स्ड मिल्क घेऊन मंद विस्तवावर २ मिनिटे गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट मिक्‍स करून दोन मिनिटे मंद विस्तवावर ठेवावे. मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागले की विस्तव बंद करून भांडे बाजूला ५ मिनिटे थंड करायला ठेवावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे लाडू बनवावे. डार्क चॉकलेट घेऊन त्यामध्ये एक-एक लाडू बुडवून मग बाजूला बटर पेपरवर ठेवावा. अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घेऊन फ्रीजमध्ये ५-७ मिनिटे सेट करायला ठेवावे. आपण यामध्ये अजून एक प्रकार बनवू शकतो. डार्क चॉकलेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट मिक्‍स करून घेऊन त्याचे लाडू बनवून घ्यावे. मग कंडेन्स्ड मिल्क व डेसिकेटेड कोकोनट मिक्‍स करून घेऊन त्याचे लाडू वळताना त्यामध्ये चॉकलेट लाडू घालून परत लाडू वळून घ्यावे. हे लाडूसुद्धा चवीला अप्रतिम लागतात. फक्त हे लाडू बनवताना डार्क चॉकलेट बेस जास्त घ्यावा.

गव्हाच्या पिठाचे लाडू
साहित्य : दोन कप गव्हाचे पीठ, दोन कप पिठीसाखर, अर्धा कप खायचा डिंक, दीड कप साजूक तूप, पाव कप खारीक पावडर, अर्धा कप सुके खोबरे (किसलेले), १ टीस्पून खसखस, अर्धा टीस्पून जायफळ, ५-६ बदाम, ५-६ काजू, ५-६ पिस्ता, १ टीस्पून वेलची पूड
कृती : कढईमध्ये निम्मे तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. डिंक तुपावर तळून घ्यावा.  त्याची पावडर करावी. किसलेले खोबरे थोडे भाजून घ्यावे व हाताने कुस्करून घ्यावे. खसखस भाजून घ्यावी. खारीक पावडर थोडी परतून घ्यावी. काजू,बदाम, पिस्ता थोडे कुटून घ्यावे. मग भाजलेल्या पिठात, डिंक, काजू-बदाम पावडर, खारीक पावडर, खस-खस, भाजलेले खोबरे, पिठीसाखर, जायफळ पावडर वेलचीपूड घालून मिक्‍स करावे. नंतर थोडे मिश्रण व थोडे तूप घालून चांगले मळून घ्यावे व त्याचे लाडू बनवावे. असे सर्व लाडू बनवून घ्यावे.

नाचणी-पोहे लाडू
साहित्य : दोन कप नाचणीचे पीठ, पाऊण कप पोहे, अर्धा कप सुके खोबरे (किसून), सव्वा कप पिठीसाखर, पाऊण कप साजूक तूप, पाव कप दूध, पाव कप काजूबदाम जाडसर पूड, १ टीस्पून वेलचीपूड
कृती : खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. पोहे मंद विस्तवावर थोडे भाजून घ्यावेत व थंड झाल्यावर थोडेसे कुस्करून घ्यावे. काजू बदाम जाडसर कुटून घ्यावेत. एका कढईमधे तूप गरम करून नाचणीचे पीठ घालून मिक्‍स करून १० मिनिटे मंद विस्तवावर भाजून घ्यावे. नाचणीचे पीठ भाजून झाल्यावर त्यामध्ये कोमट दूध हळूहळू घालून हलवत राहावे पीठ फुलून आले की विस्तव बंद करावा. नंतर भाजलेल्या पिठात भाजलेले खोबरे, पोहे, ड्रायफ्रूट, पिठीसाखर, वेलचीपूड घालून मिक्‍स करून घेऊन मध्यम आकाराचे लाडू बनवून घ्यावे. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवावे.

चॉकलेट-तिळाचे लाडू 
साहित्य : अडीचशे ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाउंड, १ कप तीळ, पाव कप डेसिकेटेड कोकोनट 
कृती : तीळ थोडे भाजून घ्यावे. डार्क चॉकलेट कंपाऊंडचे बारीक तुकडे करून घेऊन डबल बॉईल पद्धतीने विरघळून घ्यावे. चॉकलेट विरघळले की बाजूला ४-५ मिनिटे थंड करायला ठेवावे मग त्यामध्ये पाऊण कप भाजलेले तीळ व डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्‍स करून घ्यावे.  एका बाऊलमध्ये उरलेले तीळ व डेसिकेटेड कोकोनट मिक्‍स करून ठेवावे. तयार झालेल्या मिश्रणाचे एकसारखे छोटे लाडू बनवून बाउलमधील तिळामध्ये घोळून बाजूला ठेवावे. अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घ्यावे. चॉकलेट-तीळ लाडू तयार झाले की फ्रीजमध्ये ५ मिनिटे ठेवावे.

नाचणी-ओट्स लाडू
साहित्य : एक कप नाचणीचे पीठ, एक कप गव्हाचे पीठ, एक कप ओटस, सव्वा कप पिठीसाखर, १ टीस्पून वेलचीपूड, पाव कप काजू-बदाम तुकडे, पाऊण कप साजूक तूप, २ टेबलस्पून वनस्पती तूप
कृती : कढईमध्ये एक टेबल स्पून वनस्पती तूप गरम करून त्यामध्ये नाचणीचे पीठ चांगले भाजून घ्यावे. एका प्लेटमध्ये काढून ठेवावे. मग १ टेबल स्पून वनस्पती स्पून गरम करून गव्हाचे पीठ छान गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. बाजूला ठेवावे. ओट कढईमध्ये थोडेसे परतून घ्यावे. थंड झाल्यावर मिक्‍सरमध्ये थोडेसे एकदाच फिरवावे. भाजलेले नाचणीचे पीठ, गव्हाचे पीठ, ओट, पिठीसाखर व वेलचीपूड घालून मिक्‍स करावे. लाडू वळताना थोडे पीठ व थोडेसे तूप घालून मळून घेऊन त्याचे लाडू वळून घ्यावे. असे सर्व लाडू बनवून घ्यावे.

पंढरपुरी डाळीचे लाडू 
साहित्य : चार कप पंढरपुरी डाळीचे पीठ, ३ कप पिठी साखर, १ कप साजुक तूप, २ टीस्पून वेलचीपूड, किसमिस 
कृती :  पंढरपुरी डाळ मिक्‍सरमध्ये अगदी बारीक करून मग चाळून घ्यावी.  एका जाड बुडाच्या कढईमधे १ टेस्पून तूप गरम करून त्यामध्ये पंढरपुरी डाळीचे पीठ मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. भाजलेले पीठ परातीत काढून त्यामध्ये पिठीसाखर, किसमिस व वेलचीपूड घालून मिक्‍स करून घ्यावे. परातीत एका बाजूला थोडे मिक्‍स केलेले पीठ व थोडे तूप घालून चांगले मळून घेऊन मध्यम आकाराचे लाडू बनवावे. 
टीप : परातीत पंढरपुरी डाळीचे भाजलेले पीठ व सर्व तूप एकदम मिक्‍स करू नये. थोडे-थोडे मिक्‍स करून मग लाडू वळून घ्यावे. 

डिंकाचे लाडू
साहित्य : तीन कप खारीक पावडर, ३ कप सुके खोबरे कीस, २ कप डिंक, अर्धा कप खसखस, २ कप तूप, अर्धा कप काजू-बदाम कुटून, पाव किसमिस, अर्धा टीस्पून जायफळ, १ टीस्पून वेलचीपूड ४ कप गूळ किंवा ४ कप पिठीसाखर (किंवा आपल्याला जसे गोड कमी किंवा जास्त आवडत असेल तशी साखर अथवा गूळ वापरावा.
कृती :  खारीक पावडर थोडी भाजून घ्यावी. सुके खोबरे किसून गुलाबी रंगावर भाजून हातांनी कुस्करून घ्यावे. डिंक तळून त्याची मिक्‍सरमध्ये पूड करून घ्यावी. खसखस भाजून कुटून घ्यावी. तूप वितळून घ्यावे. गुल किसून घ्यावे. एका परातीत खारीक पावडर, सुके खोबरे, डिंक, खसखस, तूप, काजू-बदाम कूट, किसमिस, जायफळ, वेलची पूड , गूळ किंवा पिठीसाखर घालून चांगले मिक्‍स करून त्याचे लाडू वळावेत. सजावटीसाठी लाडू खोबऱ्याच्या किसात व तळलेल्या बारीक साबुदाण्यात घोळावेत म्हणजे अजून छान दिसतील.

फोटो फीचर

संबंधित बातम्या