खास सणावारांसाठी...!

सुजाता नेरूरकर
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

फूड पॉइंट
श्रावण महिना सुरू झाला, की आपल्याकडे सणवार सुरू होतात. प्रत्येक सणाच्या वैशिष्ट्यानुसार एक खास गोड पदार्थ ठरलेला असतो... आणि खवय्यांसाठी तर ही गोडधोड पदार्थांची मेजवानीच असते. श्रावणातील सणांसाठी अशाच काही खास रेसिपीज... 

काला जामून 
साहित्य : जामूनसाठी : एक कप खवा, पाव कप पनीर, पाव कप मैदा, एक चिमूट बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून साखर, वेलचीचे दाणे, तेल जामून तळण्यासाठी.
साखरेच्या पाकासाठी : पाऊण कप साखर, १ कप पाणी
कृती : जामूनसाठी : खवा, पनीर, मैदा, बेकिंग पावडर, साखर घालून चांगले मळून घ्यावे. मळून झाल्यावर त्याचे छोटेछोटे गोळे तयार करावे. गोळे तयार करताना प्रत्येक गोळ्यामध्ये दोन-दोन वेलचीचे दाणे ठेवावे व गोळा नीट बंद करावा. असे सर्व गोळे तयार करून घ्यावे.
पाकासाठी : एका जाड बुडाच्या पातेल्यात साखर व पाणी एकत्र करून विस्तवावर साखरेचा पाक करायला ठेवावा. पाक थोडा घट्ट झाला पाहिजे. 
    कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये तयार केलेले गोळे चॉकलेटी रंगावर तळून घ्यावेत. नंतर सगळे जामून पाकामध्ये घालून दोन मिनिटे मंद विस्तवावर गरम करून घ्यावे आणि १५ मिनिटांनंतर सगळे जामून पाकामधून काढून घेऊन थंड करायला ठेवावे.

गोपाळ काला 
साहित्य : एक कप पोहे, अर्धा कप चुरमुरे, अर्धी वाटी दही, पाव कप काकडी, २ टेबलस्पून कोथिंबीर, २ टेबलस्पून ओला नारळ (खोवून), साखर व मीठ चवीनुसार
फोडणीसाठी : एक टेबलस्पून साजूक तूप, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून आले (किसून), २ हिरव्या मिरच्या (चिरून)
कृती : प्रथम पोहे चांगले भिजवून घ्यावे (जसे आपण कांदा पोह्यांसाठी भिजवतो तसे). काकडी बारीक चिरून घ्यावी. कोथिंबीर व हिरव्या मिरच्या चिरून घ्याव्यात. एका बाऊलमध्ये भिजवलेले पोहे घेऊन त्यामध्ये चुरमुरे घालावे. नंतर चिरलेली काकडी, कोथिंबीर घालून, दही, ओला नारळ, साखर, मीठ घालून मिक्स करून घ्यावे. एका फोडणीच्या वाटीत तूप गरम करून त्यामध्ये जिरे, हिरवी मिरची, आले घालून छान खमंग फोडणी तयार करून पोह्यांवर घालावी. आपली गोपाल काला ही डिश तयार झाली. ही डिश गोकूळ अष्टमीला करतात, कारण श्री कृष्णाला गोपाल काला फार आवडतो.

पनीर गुलकंद खीर 
साहित्य : एक लीटर दूध, १२५ ग्रॅम होममेड पनीर, १ टेबलस्पून गुलकंद, पाव कप साखर, २ टेबलस्पून कॉर्नफ्लोअर, अर्धा टीस्पून वेलची पावडर, २-३ काजू, २-३ बदाम
कृती : प्रथम दूध तापवून घेऊन त्यामध्ये साखर घालून १०-१५ मिनिटे मंद विस्तवावर उकळून घ्यावे. मग त्यामध्ये कॉर्नफ्लोअर मिक्स करून २-३ मिनिटे उकळी येऊ द्यावी. मग दूध थंड करायला ठेवावे. पनीर किसून घ्यावे. काजू व बदामाचे बारीक तुकडे करावे. दूध थंड झाल्यावर त्यामध्ये किसलेले पनीर, गुलकंद, काजू-बदाम तुकडे, वेलची पावडर घालून फ्रीजमध्ये २-३ तास थंड करायला ठेवावे. पनीर गुलकंद खीर थंड सर्व्ह करावी. सर्व्ह करताना ड्राय फ्रुटने सजवावे.

रस घावन
साहित्य : रस करण्यासाठी : तीन कप नारळाचे दूध, १ टेबल स्पून गूळ, १ टेबल स्पून साखर, १ टीस्पून वेलचीपूड 
घावन करण्यासाठी : दोन कप तांदळाचे पीठ (आंबेमोहर तांदळाचे), १ टीस्पून मैदा, मीठ आणि तेल
कृती : रस करण्यासाठी : नारळाचे दूध काढून घ्यावे. नंतर त्यामध्ये किसलेला गूळ, साखर, वेलचीपूड घालून मिक्स करावे.
घावन करण्यासाठी : तांदळाचे पीठ, मैदा, मीठ घालून पीठ डोशासारखे भिजवून घ्यावे. नॉनस्टिक तवा तापवून त्यावर पातळ डोसा घालून कडेने थोडेसे तेल घालून तव्यावर झाकण ठेवावे. दोन मिनिटांत झाकण काढून डोसा उलट करून अर्धा मिनिट तव्यावर ठेवून काढावा. असे सर्व डोसे करून घ्यावेत. सर्व्ह करताना रस व घावन एकत्र द्यावे.

पाकातल्या पुऱ्या 
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, १ कप मैदा, १ टेबलस्पून लोणी अथवा बटर, १ टीस्पून बेकिंग पावडर, १ कप दूध, पाव टीस्पून ऑरेंज ईमलशन, मीठ चवीनुसार.
पाकासाठी : दोन कप साखर, १ कप पाणी, ड्रायफ्रुट्स, तूप पुऱ्या तळण्यासाठी.
कृती : एका जाड बुडाच्या भांड्यात पाणी व साखर मिक्स करून मंद विस्तवावर पाक करायला ठेवावा. पाक हा थोडासा घट्ट व चिकट झाला पाहिजे. मग त्यामध्ये २-३ थेंब ऑरेंज ईमलशन घालून मिक्स करून घ्यावा. परातीत गव्हाचे पीठ, मैदा, मीठ, बेकिंग पावडर मिक्स करून घ्यावे. पिठामध्ये २-३ थेंब ऑरेंज ईमलशन घालून दूध घालून चांगले पीठ मळून घ्यावे. मळलेल्या पिठाचे छोटेछोटे गोळे करावे किंवा पिठाचे तीन समान भाग करून घ्यावे. एक पिठाचा गोळा लाटून घेऊन छोट्या डब्याच्या झाकणाने छोट्या छोट्या पुऱ्या कापून घ्याव्यात. अशा सर्व पुऱ्या करून घ्याव्यात. कढईमध्ये तूप गरम करून मंद विस्तवावर पुऱ्या छान कुरकुरीत तळून घ्याव्यात. पुरी तळून झाली, की लगेच पाकामध्ये सोडावी व पाकामध्ये पुरी वर खाली करावी. दुसऱ्या पुऱ्या तळून झाल्या, की पहिल्या पाकात घातलेल्या पुऱ्या काढून ताटात निथळत ठेवाव्या व दुसऱ्या तळलेल्या पुऱ्या पाकामध्ये घालाव्यात. सर्व पुऱ्या अशा प्रकारे करून ताटात उभ्या करून ठेवाव्या म्हणजे जास्तीचा पाक निघून जातो. नंतर पुऱ्यांवर ड्रायफ्रुटने सजवावे. पुऱ्या थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवाव्यात.
टीप : पुऱ्या जर दोन दिवस ठेवायच्या असतील, तर लाटलेल्या पुरीवर सुरीने टोचे मारून मग तळाव्यात म्हणजे पुरी फुगणार नाही व छान कुरकुरीत तळली जाईल.

शक्रे पोंगल (खिरीचा दाक्षिणात्य प्रकार)  
साहित्य : दोन कप तांदूळ, अर्धा कप मुगाची डाळ, पाव कप चण्याची डाळ, दीड कप गूळ, १ नारळ, मीठ, वेलचीपूड, १ टेबलस्पून तूप.
कृती : मुगाची डाळ थोडी भाजून घ्यावी. चणाडाळ तांबूस रंगावर भाजून घ्यावी. नंतर तांदूळ, चणाडाळ, मूगडाळ व पुरेसे पाणी कुकरमध्ये घालून शिजवून घ्यावे. नारळ खोवून वाटून घ्यावा. तांदूळ व डाळी शिजल्यावर त्या घोटून घ्याव्यात. किंचित मीठ घालून व वाटलेला नारळ घालून त्यात आवडीप्रमाणे गूळ घालून परत शिजवून घ्यावे. शिजताना वेलचीपूड व तूप घालून मिक्स करून घ्यावे. गरम गरम शक्रे पोंगल सर्व्ह करताना वरून ड्रायफ्रुट्सने सजवावे.

सात कप्पे घावन 
साहित्य : चार कप तांदळाचे पीठ (आंबेमोहर), मीठ चवीनुसार
सारणासाठी : दोन कप खोवलेला नारळ, पाऊण कप गूळ, १ टीस्पून वेलचीपूड, तेल
कृती : नारळ व गूळ थोडा गरम करून त्यात वेलची पावडर टाकावी व सारण करून घ्यावे. तांदूळ धुऊन सावलीमध्ये वाळवून दळून आणावे. चाळून त्यामध्ये पाणी घालून पातळ भिजवावे (जसे आपण घावनासाठी भिजवतो तसे). विस्तवावर बिडाचा तवा (किंवा नॉनस्टिक) ठेवून तापवून त्याला तेल लावावे व त्यावर घावन घालून झाकण ठेवावे. नंतर झाकण काढून घावन उलटावे व अर्ध्या भागावर १ टेबलस्पून सारण पसरवून व दुसरा भाग त्यावर पसरवावा. नंतर उरलेल्या रिकाम्या जागेवर पीठ घालून जरावेळाने सारण घालावे व पहिला भाग त्यावर परतावा. असे पाच-सहा वेळा करावे मग घावन खाली काढावे. थंड झाल्यावर त्याचे आडवे तुकडे करून तुपाबरोबर खाण्यास द्यावे. हे खास नारळी पौर्णिमेसाठी केले जातात. 

पायसम 
साहित्य : पाचशे मिलिलीटर दूध, २ टेबलस्पून तांदूळ, पाव कप साखर, १ टीस्पून वेलचीपूड, ३ टेबलस्पून शहाळ्याचे ओले खोबरे (मलई).
कृती : एका जाड बुडाच्या पसरट भांड्यात दूध गरम करायला ठेवावे. मग त्यामध्ये धुतलेले तांदूळ घालून मंद विस्तवावर शिजत ठेवावे. तांदूळ चांगले शिजल्यावर त्यामध्ये साखर व वेलचीपूड घालून ५ मिनिटे मंद विस्तवावर ठेवावे. मग विस्तव बंद करून भांडे खाली उतरवून थंड करायला ठेवावे. शहाळ्याच्या मलईचे पातळ उभे तुकडे करून त्यामध्ये मिक्स करावे. पायसम थंड झाल्यावर ड्रायफ्रुट्सने सजवून सर्व्ह करावे.

शाही पुरणपोळी  
साहित्य : पुरणासाठी : दोन कप हरभरा डाळ, २ कप गूळ, पाव कप साखर, अर्धा कप खवा, २ टेबलस्पून काजू-बदाम पावडर, १ टीस्पून वेलचीपूड, पाव टीस्पून जायफळ पूड, मीठ चवीनुसार 
पोळीसाठी : दोन कप गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून मैदा, २ टेबलस्पून तेल, मीठ चवीनुसार, पोळी लाटायला तांदळाची पिठी
कृती : हरभरा डाळ निवडून, स्वच्छ धुऊन १५-२० मिनिटे भिजत ठेवावी. म्हणजे चांगली शिजते. मग कुकरमध्ये डाळ शिजवायची असेल, तर २ कप डाळीला ५ कप पाणी घालावे (पाणी थोडे जास्त घातले, की आपल्याला डाळीचा कट आमटी करायला काढता येतो). पाणी घातल्यावर कुकरचे झाकण बंद करून ४-५ शिट्या काढाव्यात. नंतर मंद विस्तवावर ५ मिनिटे डाळ शिजू द्यावी. कुकर उघडल्यावर डाळ चाळणीवर काढून जास्तीचे पाणी काढून घ्यावे, त्यालाच कट म्हणतात. कट काढल्यामुळे पुरणपोळी हलकी होते. कट काढून शिजलेली डाळ परत कुकरमध्ये घालून गूळ, साखर घालून चांगले घोटावे. गूळ, साखर घातल्यावर ते पातळ होईल, नंतर घट्ट होत जातील. घट्ट व्हायला लागल्यावर खवा, वेलचीपूड, जायफळाची पूड, काजू-बदामपूड घालून मिक्स करावे. पुरण चांगले घट्ट शिजवावे म्हणजे झारा मधे उभा राहील, पडणार नाही. मग गरमगरम पुरण पुरणयंत्रातून वाटून घ्यावे. गव्हाचे पीठ, मैदा चाळून घ्यावा व त्यामध्ये मीठ, तेल मिक्स करून दूध व पाणी मिक्स करून कणीक सैलसर मळावी. दीड ते दोन तास तशीच बाजूला ठेवावी. मग तेलाचा वापर करून परत चांगली मळून घ्यावी. कणीक जेवढी जास्त मळली जाईल, तेवढी पोळी सुंदर होईल. पिठाचे छोटे गोळे करून घ्यावेत. एक गोळा घेऊन पुरी सारखा लाटून घ्यावा व पिठाच्या गोळ्याच्या दुप्पट पुरण घेऊन लाटलेल्या पुरीवर ठेवावे व पुरी बंद करून लाटून घ्यावी. पोळी तांदळाच्या पिठीवर लाटून घ्यावी. म्हणजे पोळपाटाला चिकटणार नाही. तयार पोळी मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावी. गरमगरम पोळी साजूक तूप घालून सर्व्ह करावी.
टीप : हरभरा डाळ चांगली निवडून घ्यावी. पुरण अगदी चांगले शिजले पाहिजे. जर डाळ पूर्ण शिजली नाही, तर गूळ घातल्यावर डाळ कडक होते. पुरणामध्ये खवा घातल्यामुळे पोळीची चव फार सुंदर लागते. तसेच साखरेमुळेसुद्धा पोळीला चांगली चव येते. पुरण जर सैल झाले तर मलमलीच्या कापडात गुंडाळून ठेवावे म्हणजे कोरडे होईल.

संबंधित बातम्या