संक्रांत स्पेशल रेसिपीज

सुजाता नेरूरकर
गुरुवार, 23 जानेवारी 2020

फूड पॉइंट
संक्रांतीचा सण रथसप्तमीपर्यंत असतो. या दिवसांमध्ये महिला हळदी- कुंकवाचे कार्यक्रम करतात. या कार्यक्रमाला येणाऱ्या महिलांना तिळगूळ आणि काहीतरी भेट वस्तू दिली जाते. यावेळी मात्र फक्त तिळगूळ न देता एखाद्या छानशा भेटवस्तूबरोबर खास अशा पदार्थाने तोंड गोड करता येईल... त्यासाठीच या काही खास रेसिपीज.

गजक
पारंपरिक लोहडी किंवा मकरसंक्रांत स्पेशल तिळाचे गजक म्हणजे एक प्रकारची चिक्कीच आहे. फक्त चिक्की ही कडक असते व गजक हे छान खूशखुशीत असते. 
साहित्य : दोन कप तीळ, ४ कप गूळ, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप पाणी, १ टीस्पून वेलची पावडर 
कृती : कढई गरम करून घ्यावी. त्यामध्ये तीळ गोल्डन ब्राऊन रंगावर भाजून घ्यावे. तीळ भाजताना मंद विस्तव ठेवावा, म्हणजे तीळ करपट लागणार नाहीत व छान खमंग भाजले जातील. तीळ भाजल्यावर बाजूला काढून ठेवावे. थंड झाल्यावर पाहिजे असेल तर जाडसर ग्राईंड करावे किंवा तसेच ठेवावे. त्याच कढईमध्ये गूळ व पाणी मिक्स करून मंद विस्तवावर पाक होण्यासाठी ठेवावे. सारखे हालवत राहावे. गुळाचा पाक घट्ट झाल्यावर त्यामध्ये बेकिंग पावडर घालून परत सतत हालवत राहावे. बेकिंग पावडर घातल्यावर पाकाचा रंग लालसर होईल. पाक घट्टसर करायचा आहे. एका स्टीलच्या प्लेटला तुपाचा हात लावून त्यावर भाजून थंड झालेले तीळ ठेवावे. त्यावर गुळाचा पाक व वेलची पावडर घालून चांगले मिक्स करावे. सारखे हालवत राहावे. पाहिजे तर ताटात तीळ तसेच कूट घट्ट व्हायला लागल्यावर मिश्रण लगेच तूप लावलेल्या पोळपाटावर थापावे किंवा लाटून लगेच सुरीने लांबट आकाराच्या वड्या कापून घ्याव्यात. 

तीळ-कोकोनट-खजूर लाडू 
साहित्य : तीनशे ग्रॅम खजूर, १ कप साधे तीळ, पाव कप काजू, पाव कप डेसिकेटेड कोकाेनट, १ टीस्पून वेलची पावडर, १ टीस्पून साजूक तूप, सजावटीसाठी २ टेबलस्पून डेसिकेटेड कोकाेनट, २ टेबलस्पून तीळ (पॉलिशचे)
कृती : खजूर चांगले धुऊन पुसून घ्यावे. त्याच्या बिया काढून बारीक तुकडे करून घ्यावे. काजूचे बारीक तुकडे करून घ्यावे. एका कढईमध्ये तीळ छान खमंग भाजून घ्यावे. तीळ भाजताना मंद विस्तवावर गुलाबी रंगावर भाजून घ्यावे. तीळ चांगले गरम झाले की तडतडल्याचा आवाज येईल, मग विस्तव बंद करावा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर ग्राईंड करून घ्यावे. कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये खजूर घालून थोडेसे परतून घ्यावे. खजूर गरम झाले की मऊ होतील, मग विस्तव बंद करावा. मिक्सरच्या भांड्यात खजूर थोडे जाडसर ग्राईंड करून घ्यावे. नंतर मिक्सरच्या भांड्यात खजूर, तिळाची पावडर, वेलची पावडर घालून थोडेसे ग्राईंड करावे. हे मिश्रण परातीत काढून घ्यावे. त्यामध्ये डेसिकेटेड कोकानट व काजूचे तुकडे घालून परत चांगले मळून घ्यावे. मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून डेसिकेटेड कोकाेनटवर व तिळात घोळवून बाजूला ठेवावे. झाले लाडू तयार.

तीळ-हनी लाडू  
साहित्य : एक कप तीळ, पाऊण कप बदाम, १ टीस्पून वेलची पावडर, १ टीस्पून वनीला इसेन्स, अर्धा कप मध, १ टीस्पून लिंबाची साले (किसून), एक चिमूट मीठ 
कृती : कढई गरम करून घ्यावी. त्यामध्ये तीळ घालून मंद विस्तवावर खमंग भाजून थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. बदाम मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटून घ्यावे. एक ताजे लिंबू घेऊन त्याची साले किसणीने किसून घ्यावी. एका मध्यम आकाराच्या बोलमध्ये ग्राईंड केलेला तीळकूट, बदाम, लिंबू कीस, एक चिमूट मीठ घालून मिक्स करून घ्यावे. त्यामध्ये मध घालून चांगले मिक्स करून मळून घ्यावे. मळल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू करावेत. एक लाडू घेऊन पांढऱ्या तिळामध्ये घोळून करून घ्यावा. हे तीळ-हनी लाडू चवीला मस्त लागतात.

बर्फी 
साहित्य : दोन कप तीळ (पांढरे ), १ कप दाण्याचे कूट, १०० ग्रॅम खवा, २ मोठे चमचे सुक्या खोबऱ्याचा कीस, ३ कप साखर, अर्धा मोठा चमचा तूप, १ छोटा चमचा वेलची पावडर
कृती : तीळ खमंग भाजून घ्यावे व त्याची जाडसर पावडर करावी. दाणे भाजून त्याचा जाडसर कूट करावा (तीळ व दाण्याचा कूट एकत्र करावा). ताटाला तूप लावून ठेवावे. कढईमध्ये साखर व अर्धी वाटी पाणी घेऊन पाक करायला ठेवावा. पाक घट्ट झाल्यावर विस्तव बंद करावा व तिळाचे मिश्रण, वेलची पावडर व खवा घालून एकजीव करावे. नंतर तूप लावलेल्या ताटात मिश्रण एकसारखे थापावे. वरून किसलेले सुके खोबरे थापावे. थंड झाल्यावर शंकरपाळीसारख्या वड्या पाडाव्यात. या वड्या छान लागतात.

पौष्टिक काळे तीळ ओट्स लाडू 
साहित्य : अर्धा कप काळे तीळ, पाव कप ओट्स, पाव कप शेंगदाणे, ८-१० काजू, पाव कप गूळ, २ टेबलस्पून तूप, १ टीस्पून वेलची पावडर  
कृती : काळे तीळ निवडून घ्यावे. गूळ किसून घ्यावा. काजूचे तुकडे करून घ्यावे. एका कढईमध्ये काळे तीळ मंद विस्तवावर खमंग भाजून घ्यावे. ओट्स मंद विस्तवावर २-३ मिनिटे भाजून घ्यावे. शेंगदाणे भाजून साले काढून घ्यावे. मिक्सरच्या भांड्यात काळे तीळ ग्राईंड करून बाजूला ठेवावे. मग ओट्स थोडे जाडसर ग्राईंड करून घ्यावे. शेंगदाणेपण मिक्सरमध्ये ग्राईंड करून घ्यावे. एका स्टीलच्या प्लेटमध्ये ग्राईंड केलेले काळे तीळ, ओट्स, शेंगदाण्याचे कूट घालून मिक्स करून घ्यावे. मग त्यामध्ये किसलेला गूळ, काजू तुकडे व वेलची पावडर घालून मिक्स करून घ्यावे. मग शेवटी साजूक तूप पातळ करून घालावे व चांगले मिक्स करून घ्यावे. मिश्रण चांगले मळून त्याचे छोटे छोटे लाडू वळून घ्यावे.

तिळाची क्रंची रेवडी 
साहित्य : दोन कप तीळ, सव्वादोन कप गूळ, अर्धा टीस्पून साजूक तूप, २ टेबलस्पून पाणी, १ चिमूट सोडा, २-३ थेंब केवडा इसेन्स 
कृती : कढई गरम करून त्यामध्ये तीळ घालून मंद विस्तवावर खमंग भाजून बाजूला ठेवावे. गूळ चिरून घ्यावा. कढईमध्ये गूळ व पाणी घालून मंद विस्तवावर घट्ट पाक करून घ्यावा. वाटीमध्ये थोडेसे पाणी घेऊन त्यामध्ये थोडासा पाक घालून बघावा, पाक पाण्यात लगेच विरघळला नाही पाहिजे. मग पाकामध्ये सोडा घालून मिक्स करावे. मिक्स केल्यावर पाकाचा रंग लगेच बदलेल व थोडासा लाल रंग येईल. मग त्यामध्ये केवडा इसेन्स व भाजलेले तीळ घालून चांगले मिक्स करून घ्यावे. गरमगरम मिश्रण एका प्लॅस्टिक पेपरवर काढून पेपर त्यावर फोल्ड करत थोडे थंड करावे. मग हाताला तूप लावून परत थोडे मळून घ्यावे व छोटे छोटे चपटे गोळे करून थंड करायला ठेवावे. झाली तिळाची क्रंची रेवडी तयार.  

संबंधित बातम्या