चमचमीत मोदक

सुजाता नेरुरकर
सोमवार, 24 ऑगस्ट 2020

मोदक म्हटले, की तळणीचे किंवा उकडीचे गोड मोदकच डोळ्यांसमोर येतात. पण कधीतरी चमचमीत, चटपटीत मोदक करून बघायला काय हरकत आहे?

कॉलीफ्लॉवरचे मोदक 
साहित्य ः सारणासाठी : अडीचशे ग्रॅम कॉलीफ्लॉवर, १ मोठा कांदा, २-३ हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून लिंबू रस, पाव कप कोथिंबीर, मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी : अर्धा टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग, पाव टीस्पून हळद, ७-८ कढीपत्ता पाने. 
पारीसाठी : दोन कप बेसन, पाव कप मैदा, १ टेबलस्पून गरम तेल, पाव टीस्पून ओवा (कुटून), अर्धा टीस्पून तिखट, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी. 
कृती : बेसन, मैदा, तेलाचे मोहन, ओवा, तिखट, मीठ व पाणी घालून घट्ट पीठ माळून घ्यावे. कॉलीफ्लॉवर धुऊन बारीक चिरावा. कांदा चिरावा, हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे करावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, हिंग, कढीपत्ता व कांदा घालून थोडे परतून घ्यावे. नंतर त्यामध्ये हळद, मीठ व कॉलीफ्लॉवर घालून झाकण ठेवावे. झाकणीवर थोडे पाणी घालावे व मंद विस्तवावर भाजी शिजवावी. भाजी शिजल्यावर त्यामध्ये लिंबू व कोथिंबीर घालून भाजी थोडी कोरडी करावी.
बेसनाच्या पिठाचे छोटे गोळे करावेत. ते पुरीसारखे लाटून त्यामध्ये १ टेबलस्पून सारण भरावे, कडेने थोडे पाणी लावून पुरी बंद करावी. आपल्याला पाहिजे तो आकार द्यावा. कढईमध्ये तेल गरम करून मोदक ब्राऊन रंग येईपर्यंत तळावेत. हे मोदक खूप कुरकुरीत होतात.

कोथिंबिरीचे मोदक 
साहित्य ः सारणासाठी : एक कोथिंबिरीची छोटी जुडी, १ कप नारळ (खोवलेला), १ टीस्पून आले (बारीक चिरून), १ टीस्पून लसूण (बारीक चिरून), ३-४ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ टीस्पून खसखस (भाजून), अर्धा टीस्पून गरम मसाला, मीठ चवीनुसार. 
पारीसाठी : दोन कप मैदा, १ टेबलस्पून गरम तेल, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून धने-जिरे पूड, २ टेबलस्पून दूध, मीठ चवीनुसार, तेल तळण्यासाठी. 
कृती : कोथिंबीर धुऊन बारीक चिरून घ्यावी. नंतर त्यामध्ये खोवलेला नारळ, आले, लसूण, हिरव्या मिरच्या, खसखस, गरम मसाला व मीठ घालून मिश्रण तयार करावे. एका परातीत मैदा, तेलाचे कडकडीत मोहन, हळद, धने-जिरे पूड, २ टेबलस्पून दूध व मीठ घालून पीठ चांगले घट्ट माळून घ्यावे. दहा मिनिटांनी त्याचे लहान गोळे करावेत. पुरी लाटून त्यामध्ये १ टेबलस्पून मिश्रण ठेवून पुरी बंद करावी व त्याला मोदकाचा आकार द्यावा.
कढईमध्ये तेल गरम करून मोदक गुलाबी रंग येईपर्यंत मंद विस्तवावर तळावेत.

मटारचे खमंग मोदक 
साहित्य ः सारणासाठी : दोन कप मटार दाणे, ३-४ हिरव्या मिरच्या, १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, पाव कप कोथिंबीर, १ टीस्पून लिंबू रस, अर्धा टीस्पून गरम मसाला, २ टेबलस्पून पुदिना पाने (चिरून), मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी : दोन टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून हिंग. 
पारीसाठी : एक कप आटा, अर्धा कप मैदा, १ टेबल स्पून तेल (गरम), मीठ चवीनुसार, १ कप दूध, पाणी लागेल तसे, तेल तळण्यासाठी. 
कृती : आटा, मैदा, गरम तेल, मीठ एकत्र करावे. त्यात दूध घालून लागेल तेवढे पाणी घालावे व पीठ घट्ट मळावे. मटार ठेचून घ्यावेत. ठेचलेले मटार, मिरची, आले-लसूण व कोथिंबीर मिक्सरमधून बारीक करून घ्यावी. २ टेबलस्पून तेल गरम करून हिंग घालावे. त्यात मटार, हिरवी मिरची, आले-लसूण पेस्ट घालून मंद विस्तवावर १५ मिनिटे भाजावे. मिश्रण थोडे सुके झाले पाहिजे. नंतर त्यामध्ये मीठ, लिंबू रस, गरम मसाला, पुदिना घालून एकसारखे करून दोन मिनिटे परत परतावे.
पिठाचे लहान गोळे करावेत. त्यांच्या पुऱ्या लाटून त्यामध्ये मटारचे १ टेबलस्पून मिश्रण भरावे. परत पुरी बंद करून मोदकाचा आकार द्यावा किंवा याची पुरीही खूप खमंग लागते. कढईमध्ये तेल तापवून मोदक गुलाबी रंग येईपर्यंत तळावेत.

चणा डाळीचे मोदक 
साहित्य ः सारणासाठी : एक कप चणा डाळ (आधी ७-८ तास भिजवावी), १ छोटा कांदा, अर्धा टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, अर्धा टीस्पून तिखट, अर्धा टीस्पून धने-जिरे पूड, १ टेबलस्पून नारळ (खोवून), १ टेबलस्पून कोथिंबीर (चिरून), मीठ चवीनुसार, अर्धा टेबलस्पून तेल, अर्धा टीस्पून मोहरी, अर्धा टीस्पून जिरे, पाव टीस्पून हिंग.
आवरणासाठी : दोन कप थालीपीठ भाजणी, अर्धा टीस्पून लाल मिरची तिखट, १ टेबलस्पून गरम तेल, मीठ चवीनुसार. 
कृती : थालीपीठ भाजणीमध्ये तिखट, गरम तेल, मीठ व पाणी घालून घट्ट मळून घ्यावे. चणा डाळ शिजवावी. कढईमध्ये तेल गरम करून मोहरी, जिरे, हिंग, कांदा, आले-लसूण पेस्ट घालून थोडे परतावे. नंतर त्यामध्ये चणा डाळ, मिरची पूड, धने-जिरे पूड, मीठ व दोन टेबलस्पून पाणी घालून थोडे शिजवावे. नंतर कोथिंबीर, नारळ घालून सारण तयार करावे.
थालीपिठाच्या भाजणीचे मध्यम आकाराचे गोळे करावेत. गोळा लाटून त्याची पुरी करावी व त्याचे कापून दोन भाग करावेत. दोन्ही भागामध्ये एक-एक चमचा सारण भरून कडेने बंद करावे व त्रिकोणी आकार द्यावा. असे सर्व त्रिकोण करून झाल्यावर एका ओव्हन प्लेटमध्ये थोडेसे तेल लावून सर्व त्रिकोण ठेवावेत. प्रत्येक त्रिकोणाला थोडेसे तेल लावावे. ओव्हन गरम करून १०-१५ मिनिटे बेक करावे. बेक करायचे नसतील, तर तळावेत.

चीज-स्वीट कॉर्न मोदक
साहित्य ः सारणासाठी : दोन कप स्वीट कॉर्नचे दाणे, २ चीज क्युब (किसून), १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, ३ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ टेबलस्पून लिंबू रस, १ टेबलस्पून पुदिना पाने (बारीक चिरून), १ टेबलस्पून बटर, मीठ चवीनुसार. 
पारीसाठी : एक कप मैदा, १ कप गव्हाचे पीठ, १ टेबलस्पून गरम तेल, अर्धा टीस्पून मिरे पूड, मीठ चवीनुसार, १ चिमूट खायचा सोडा, तळण्यासाठी तेल. 
कृती : मैदा, गव्हाचे पीठ, तेलाचे मोहन, मिरे पूड, मीठ व खायचा सोडा एकत्र करून थोडे पाणी घालून पीठ घट्ट मळावे. १०-१५ मिनिटांनी त्याचे छोटे गोळे करावेत. स्वीट कॉर्नचे दाणे थोडे शिजवून व थोडेसे ठेचून घ्यावेत. एका कढईमध्ये बटर घालून आले-लसूण पेस्ट, हिरव्या मिरचीचे तुकडे घालून परतावे. नंतर त्यामध्ये ठेचलेले कॉर्नचे दाणे, लिंबू रस, पुदिना पाने, मीठ घालून थोडे परतावे. त्यामध्ये किसलेले चीज घालावे. 
पिठाच्या छोट्या गोळ्याची पुरी लाटावी. त्यामध्ये एक चमचा मिश्रण भरून पुरी बंद करावी व हवा तसा पुरीला आकार द्यावा व तळावे.

चायनीज मोदक 
साहित्य ः सारणासाठी : एक कप कॉलीफ्लॉवर (बारीक चिरून), पाव कप श्रावण घेवडा (बारीक चिरून), अर्धा कप लाल, पिवळी व हिरवी शिमला मिरची (बारीक चिरून), १ छोटे गाजर (उभे पातळ चिरून), १ छोटा कांदा (बारीक चिरून), अर्धा कप नूडल्स (शिजवून), अर्धा टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), १ टीस्पून सोया सॉस, १ टीस्पून व्हिनेगर, मीठ चवीनुसार, अर्धा टेबलस्पून तेल. 
पारीसाठी : एक कप मैदा, अर्धा कप तांदळाचे पीठ, १ टेबलस्पून गरम तेल, मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा टीस्पून मिरी पूड, तळण्यासाठी तेल.
कृती : मैदा, तांदळाचे पीठ, तेलाचे मोहन, मीठ, बेकिंग पावडर, मिरी पूड व कोमट पाणी घालून पीठ घट्ट मळावे. एका तासाने त्याचे लिंबाएवढे गोळे करावेत. एका कढईमध्ये तेल गरम करून कांदा, आले-लसूण व हिरवी मिरची घालून थोडे परतावे. मग त्यामध्ये कॉलीफ्लॉवर, श्रावण घेवडा, शिमला मिरची व गाजर घालून वाफेवर शिजवावे. नंतर नूडल्स, सोया सॉस, व्हिनेगर व मीठ घालून एक मिनिट परतावे. पिठाच्या गोळ्याची पुरी लाटून त्यामध्ये सारण भरावे. पुरी बंद करावी व त्याला बोटीसारखा आकार द्यावा. गुलाबी रंग येईपर्यंत तळावे. हा प्रकार लहान मुलांना खूप आवडतो.

पनीरचे उकडीचे मोदक
साहित्य ः सारणासाठी : दोन कप पनीरचे बारीक तुकडे, १ छोटा कांदा, अर्धा टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, २ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), पाव कप कोथिंबीर (चिरून), मीठ चवीनुसार, १ टेबलस्पून तेल, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून लिंबू रस. 
आवरणासाठी : दोन कप तांदळाचे पीठ (आंबेमोहर), २ कप पाणी, २ टेबलस्पून तेल, २ टेबलस्पून मैदा, मीठ चवीनुसार. 
कृती : एका कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हिंग, कांदा, आले-लसूण व हिरवी मिरची घालून थोडे परतावे. मग त्यामध्ये मीठ, पनीरचे तुकडे, कोथिंबीर व लिंबू रस घालून मिश्रण एकत्र करावे. पातेल्यामध्ये २ कप पाणी गरम करावे. गरम पाण्यात मीठ व तेल घालावे. नंतर त्यामध्ये तांदळाचे पीठ व मैदा घालून एकत्र करून त्यावर झाकण ठेवावे. चांगली वाफ आल्यावर पीठ परातीत काढावे. थंड पाण्याचा वापर करून पीठ खूप मळावे. नंतर त्याचे लिंबाएवढे गोळे करून हातावर थापून त्याची पुरी करावी व त्यामध्ये एक टेबलस्पून मिश्रण भरावे. पुरी बंद करून मोदकाचा आकार द्यावा. असे सर्व मोदक करून घ्यावेत.
मोदक पात्रामध्ये पाणी चांगले गरम करून त्यावर चाळणी ठेवून केळीचे पान ठेवावे. पानावर जेवढे मोदक बसतील तेवढे ठेवावेत. वर केळीचे पान ठेवावे व मोदक पात्राचे झाकण लावावे. दहा ते बारा मिनिटे मोदक उकडावेत व गरम गरम खायला द्यावेत.

संबंधित बातम्या