दुधीची मिठाई, शेवयांचे कटलेट

सुजाता नेरुरकर
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020

दिवाळी झाली, फराळ संपला.. आता काहीतरी वेगळे खायला हवेच ना! म्हणून या काही गोड काही तिखट पदार्थांच्या हटके रेसिपीज...

बॉम्बे कराची हलवा 
साहित्य : अर्धा कप गव्हाचे पीठ, अर्धा कप कॉर्नफ्लोअर, १ कप साखर, २ टेबलस्पून तूप, १ टीस्पून लिंबू रस, अर्धा टीस्पून वेलची पूड, १ टेबलस्पून मगज बी, २ टेबलस्पून ड्रायफ्रूट्स, २-३ थेंब हिरवा खायचा रंग.
कृती : प्रथम एका बोलमध्ये अर्धा कप गव्हाचे पीठ व दीड कप पाणी घालून एकत्र करावे व एक तास झाकून ठेवावे. एक तासानंतर गव्हाचे पीठ बोलमध्ये खाली राहील व पाणी वर येईल, तेव्हा हळुवारपणे पाणी काढून टाकावे व गव्हाचे पीठ तसेच बोलमध्ये राहू द्यावे. दुसऱ्‍या एका बोलमध्ये कॉर्नफ्लोअर व अर्धा कप पाणी घेऊन एकत्र करावे. एका पॅनमध्ये साखर व अर्धा कप पाणी घेऊन मंद विस्तवावर एक तारी पाक करावा, पाक तयार होत असताना लिंबू रस घालावा. पाक झाला की विस्तव बंद करावा. मग पॅनमधील पाकात भिजवलेले पीठ हळूहळू घालावे. कॉर्नफ्लोअरचे मिश्रण हलवून हळूहळू पॅनमधील पाकात ओतावे हलवत राहावे. मिश्रण चांगले ढवळून घ्यावे, गुठळी होता कामा नये. पॅन मंद विस्तवावर ठेवून मिश्रण घट्ट होईपर्यंत हलवावे. मिश्रण घट्ट होत आले की त्यामध्ये साजूक तूप घालावे. मग त्यामध्ये वेलची पूड, ड्रायफ्रूट्स, मगज बी व हिरवा रंग घालून मिक्स करावे. मिश्रण घट्ट झाले की विस्तव बंद करावा.
एका स्टीलच्या प्लेटला किंवा ट्रेला तूप लावून मिश्रण प्लेटमध्ये काढून एकसारखे करावे. वरून थोडे ड्रायफ्रूट्स घालून सजवून थंड करायला ठेवावे. थंड झाल्यावर मस्त चौकोनी वड्या कापाव्यात व डब्यात भराव्यात.

नारळ व मिल्क पावडर बर्फी 
साहित्य : एक वाटी गव्हाचे पीठ, २ टेबलस्पून तूप, पाऊण वाटी साखर, पाऊण वाटी पाणी, तीन टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, ३ टेबलस्पून मिल्क पावडर, अर्धा टीस्पून वेलची पूड, सजावटीसाठी काजू, बदाम (जाडसर वाटून).
कृती : एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये गव्हाचे पीठ घालून मंद विस्तवावर चार-पाच मिनिटे भाजावे व एका प्लेटमध्ये काढावे. मग त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट, मिल्क पावडर व वेलची पूड घालून एकत्र करावे. कढईमध्ये साखर व पाणी घेऊन एक तारी पाक करावा. मग त्यामध्ये भाजलेले गव्हाचे पीठ घालावे. एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून त्यामध्ये एकत्र केलेले मिश्रण घालून एकसारखे थापावे. वरून ड्रायफ्रूट्स घालून एकसारखे करावे. थोडे थंड झाल्यावर त्याच्या वड्या कापाव्यात.

इन्स्टंट रवा व्हेज हांडवो
हांडवो हा एक गुजराती पदार्थ आहे, पण तो सर्वत्र लोकप्रिय झाला आहे. 
साहित्य : पाऊण कप रवा, २ टेबलस्पून बेसन, ३ टेबलस्पून दही, अर्धा कप भात (शिजलेला), २ हिरव्या मिरच्या, पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून तिखट, २ टेबलस्पून शिमला मिरची (बारीक चिरून), २ टेबलस्पून गाजर (बारीक चिरून), २ टेबलस्पून कोबी (बारीक चिरून), १ टीस्पून आले (किसून), मीठ चवीनुसार, २ टेबलस्पून तेल, पाऊण टीस्पून बेकिंग पावडर.
फोडणीकरिता : एक टेबलस्पून तेल, १ टीस्पून मोहरी, १ टीस्पून जिरे, १ टेबलस्पून तीळ, ८-१० कढीपत्ता पाने.
कृती : प्रथम एका बोलमध्ये रवा, दही व पाव कप पाणी एकत्र करून १०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. शिमला मिरची, कोबी, गाजर बारीक चिरावे. मिक्सरच्या भांड्यात शिजवलेला भात व हिरवी मिरची वाटावी. मग भिजवलेल्या रव्यामध्ये वाटलेला भात, गाजर, शिमला मिरची, गाजर, मीठ, आले, हळद, तिखट, तेल घालून दोन-तीन टेबलस्पून पाणी घालून एकत्र करावे. मग त्यामध्ये बेकिंग पावडर घालावी. एका नॉनस्टिक पॅनमध्ये दोन टेबलस्पून तेल गरम करून त्यामध्ये मोहरी, जिरे, तीळ व कढीपत्ता घालावा. मग त्यामध्ये हळूहळू रव्याचे मिश्रण घालून एकसारखे करावे. त्यावर झाकण ठेवून १० मिनिटे शिजवावे. १० मिनिटे झाल्यावर झाकण काढून हांडवो एका प्लेटमध्ये काढावे. मग परत पॅनमध्ये एक टेबलस्पून तेल घालून परत हांडवो दुसऱ्या बाजूने चार-पाच मिनिटे  झाकण ठेवून बेक करावे. पॅनमधून इन्स्टंट रवा व्हेज हांडवो प्लेटमध्ये काढून टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

पौष्टिक कुरकुरीत व्हेज बॉम्ब 
साहित्य : एक कप गव्हाचे पीठ, अर्धा कप रवा, २ टेबलस्पून दही, २ टीस्पून तेल, १ छोटा कांदा (चिरून), २ हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आले, ६ लसूण पाकळ्या (पेस्ट करून), १ छोटा बटाटा (सोलून बारीक तुकडे करून), १ छोटी शिमला मिरची (चिरून), १ छोटेसे गाजर (चिरून), पाव टीस्पून हळद, अर्धा टीस्पून तिखट, १ टीस्पून लिंबू रस, २ टेबलस्पून कोथिंबीर (चिरून), मीठ चवीनुसार, अर्धा टीस्पून इनो, तेल.
कृती : कांदा बारीक चिरून घ्यावा. शिमला मिरची, गाजर चिरून घ्यावे. बटाटा सोलून बारीक चिरावा. आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट करावी. गव्हाचे पीठ, रवा, दही व थोडे पाणी एकत्र करून १०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. एका नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये कांदा घालून थोडा परतावा. मग त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट घालून बटाटे घालावेत. पॅनवर झाकण ठेवून दोन मिनिटे शिजवावे. झाकण काढून त्यामध्ये शिमला मिरची, गाजर घालून परत दोन मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे. झाकण काढून हळद, तिखट, लिंबू रस, मीठ व कोथिंबीर घालून एकत्र करून एक वाफ आणावी. वाफ आल्यावर विस्तव बंद करावा व मिश्रण थंड करायला ठेवावे.मग भिजवलेल्या गव्हाच्या पिठाच्या मिश्रणात भाज्यांचे मिश्रण घालावे, थोडे पाणी घालून व्यवस्थित एकत्र करावे. आता त्यामध्ये इनो व त्यावर दोन चमचे पाणी घालून मिश्रण हळुवारपणे एकत्र करावे. आप्पे पात्र गरम करून त्याला तेल लावावे. त्यामध्ये एक टेबलस्पून मिश्रण घालून बाजूने थोडे तेल सोडावे. त्यावर झाकण ठेवून पाच-सात मिनिटे मंद विस्तवावर ठेवावे. मग झाकण काढून व्हेज बॉम्ब उलटे करून दुसऱ्या बाजूनेसुद्धा थोडेसे तेल घालून फ्राय करावेत. गरम गरम व्हेज बॉम्ब टोमॅटो सॉस किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

बिना खव्याचे पेढे
साहित्य : एक कप दूध, १ कप डेसिकेटेड कोकोनट, १ कप मिल्क पावडर, ५-६ केशर काड्या, अर्धा कप पिठीसाखर, पिस्ते व डेसिकेटेड कोकोनट सजावटीकरिता.
कृती : एका नॉनस्टिक पॅनमध्ये दूध व केशर गरम करायला ठेवावे. दूध गरम झाले की त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट घालून एकत्र करावे. डेसिकेटेड कोकोनट मिक्स केल्यावर मिश्रण लगेच घट्ट व्हायला लागेल. मिश्रण घट्ट झाले की त्यामध्ये मिल्क पावडर घालावी. एक-दोन मिनिटे मिश्रण विस्तवावर तसेच ठेवावे. घट्ट झाले की विस्तव बंद करावा. मग मिश्रण एका बोलमध्ये काढावे. थंड झाल्यावर त्यामध्ये पिठीसाखर व वेलची पूड घालावी व लिंबाएवढे गोळे करून थोडे चपटे करावेत. एका बोलमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेऊन एकेक पेढा त्यात घोळवावा. प्रत्येक पेढ्याला वरून पिस्ता लावावा, त्यामुळे आपले पेढे अगदी आकर्षक दिसतील. पेढे तयार झाले की नैवेद्य जरूर दाखवावा.

दुधी भोपळ्याची मिठाई
साहित्य : सारणाकरिता : अर्धी वाटी साखर, अर्धी वाटी पाणी, अर्धी वाटी मिल्क पावडर, अर्धा टीस्पून वेलची पूड, २-३ थेंब केशरी रंग.
मिठाईकरिता : एक छोटा दुधी भोपळा, अर्धी वाटी साखर, २-३ थेंब हिरवा रंग, पाऊण वाटी पाणी.
सजावटीकरिता : पिस्ता, काजू, टुटी फ्रूटी, अर्धी वाटी डेसिकेटेड कोकोनट.
कृती : सारणाकरिता : एका पॅनमध्ये अर्धा कप साखर व अर्धा कप पाणी गरम करायला ठेवावे. साखर विरघळली की त्यामध्ये मिल्क पावडर घालून मंद विस्तवावर गरम करायला ठेवावे. मिश्रण थोडे घट्ट झाले की त्यामध्ये वेलची पूड घालून एकत्र करावे व विस्तव बंद करून मिश्रण थंड करायला ठेवावे.
मिठाईकरिता : दुधी भोपळा धुऊन घ्यावा. मग दुधी भोपळ्याची साल काढून भोपळ्याच्या गोल गोल अर्धा इंचाच्या चकत्या करून त्याचा मधील भाग काढून घ्यावा. मग एका भांड्यात तीन-चार ग्लास पाणी गरम करायला ठेवावे. पाणी गरम झाले की त्यामध्ये अर्धा टीस्पून बेकिंग पावडर व दोन चिमूट हिरवा रंग घालून एकत्र करून त्यामध्ये दुधी भोपळ्याच्या गोल चकत्या घालून झाकून आठ-दहा मिनिटे शिजवावे. मधून मधून चकत्या वरखाली कराव्यात. मग दहा मिनिटांनी विस्तव बंद करून चकत्या एका प्लेटमध्ये काढाव्यात.  दुसऱ्‍या एका भांड्यात अर्धा कप साखर व अर्धा कप पाणी घालून एक तारी पाक करावा. मग त्यामध्ये दुधी भोपळ्याच्या चकत्या घालून मंद विस्तवावर पाच-सात मिनिटे शिजवावे. पाच-सात मिनिटे झाल्यावर दुधी भोपळ्याच्या चकत्या काढून एका प्लेटमध्ये ठेवाव्यात. थंड झाल्यावर दुधी भोपळ्याच्या मधल्या पोकळ भागात मिल्क पावडरचे सारण भरावे. सजावटीसाठी : दुधी भोपळ्याच्या मधल्या भागात मिल्क पावडरचे सारण भरून झाल्यावर एका प्लेटमध्ये डेसिकेटेड कोकोनट घेऊन त्यामध्ये दुधी भोपळ्याची एक एक चकती रोल करावी. वरून ड्रायफ्रूट्स व टुटी फ्रूटीने सजवून सर्व्ह करावे.

रवा, शेवयांचे झटपट कटलेट 
साहित्य : एक कप रवा, ३ टेबलस्पून किंवा अर्धी वाटी दही, २ टेबलस्पून पाणी, एक कप शेवया (शिजवून), २ टेबलस्पून शिमला मिरची (चिरून), २ टेबलस्पून कांदा (चिरून), १ छोटे गाजर (चिरून), १ टेबलस्पून टोमॅटो (चिरून), पाव कप कोथिंबीर, १ टीस्पून चिली फ्लेक्स, पाव टीस्पून मिरे पूड, २ टेबलस्पून बेसन, १ टीस्पून लिंबू रस, मीठ चवीनुसार, सजावटीसाठी शेवया (कच्च्या), तेल.
कृती : एका बोलमध्ये रवा, दही व दोन टेबलस्पून पाणी घेऊन एकत्र करून १०-१५ मिनिटे झाकून ठेवावे. शेवया शिजवून घ्याव्यात. कांदा, शिमला मिरची, कोथिंबीर चिरून घ्यावी, गाजर किसून घ्यावे. मग भिजवलेल्या रव्यामध्ये शिजवलेल्या शेवया, चिरलेला कांदा, शिमला मिरची, गाजर, कोथिंबीर, चिली फ्लेक्स, मिरे पूड, बेसन, लिंबू रस, मीठ घालून चांगले एकत्र करावे.
एका बोलमध्ये शेवया घेऊन त्याचा चुरा करावा. मग मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करावेत. एकेक गोळा घेऊन थोडा चपटा करून शेवयांमध्ये घोळवावा. कढईमध्ये तेल गरम करावे. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये मध्यम विस्तवावर सोनेरी रंग येईपर्यंत गोळे तळावेत. अशा प्रकारे सर्व गोळे तळून पेपरवर ठेवावेत. गरम गरम रवा शेवयांचे कटलेट टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावेत.

संबंधित बातम्या