तीळगूळ घ्या गोड बोला

सुजाता नेरुरकर
सोमवार, 11 जानेवारी 2021

फूड पॉइंट

सोप्या तिळाच्या वड्या 
साहित्य : एक कप पांढरे तीळ, पाव कप शेंगदाणा कूट, अर्धा कप साखर, १ टेबलस्पून सुके खोबरे (किसून), १ टीस्पून वेलची पूड, अर्धा चमचा साजूक तूप. 
कृती : कढई गरम करून घ्यावी. त्यामध्ये तीळ घालून मंद विस्तवावर तीळ भाजावेत. त्यानंतर शेंगदाणे भाजून सोलून घ्यावेत. तीळ व शेंगदाणे मिक्सरमध्ये बारीक करावेत. सुके खोबरे किसावे. एका स्टीलच्या प्लेटला साजूक तूप लावावे. कढईमध्ये साखर व दोन टेबलस्पून पाणी घालून मंद विस्तवावर दोन तारी म्हणजे थोडासा चिकट पाक करावा. साखरेचा पाक झाला की त्यामध्ये तिळाची पूड, शेंगदाणे कूट व वेलची पूड घालून चांगले मिक्स करावे. मिक्स करून झाल्यावर मिश्रण तूप लावलेल्या स्टीलच्या प्लेटमध्ये ओतावे. वरून किसलेले खोबरे घालून प्लेटमध्ये एकसारखे थापावे. थंड झाल्यावर शंकरपाळीसारख्या वड्या पाडाव्या. या वड्या छान लागतात. कडक होत नाहीत.

पारंपरिक लोहडी किंवा तिळाचे गजक 
साहित्य : दोन कप तीळ, ४ कप गूळ, अर्धा टीस्पून बेकिंग पावडर, अर्धा कप पाणी, १ टीस्पून वेलची पूड. 
कृती : कढई गरम करून त्यामध्ये तीळ गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत भाजावेत. तीळ भाजताना विस्तव मंद ठेवावा म्हणजे तीळ करपणार नाहीत व छान खमंग भाजले जातील. तीळ भाजल्यावर बाजूला काढून ठेवावेत. थंड झाल्यावर पाहिजे असेल तर जाडसर ग्राइंड करावेत किंवा तसेच ठेवले तरी चालेल. त्याच कढईमध्ये गूळ व पाणी मिक्स करून मंद विस्तवावर पाक करायला ठेवावा. सारखे हलवावे. गुळाचा पाक घट्ट झाल्यावर त्यामध्ये बेकिंग पावडर घालून परत सतत हलवत राहावे. बेकिंग पावडर घातल्यावर पाकाचा रंग लालसर होईल. पाक आपल्याला घट्टसर करायचा आहे. 
एका स्टीलच्या प्लेटला तुपाचा हात लावून त्यावर भाजून थंड झालेले तीळ ठेवावेत. मग त्यावर गुळाचा पाक व वेलची पूड घालून चांगले मिक्स करावे. सारखे हलवत राहावे. हवे तर ताटात तीळ तसेच कुटावेत. मिश्रण घट्ट व्हायला लागल्यावर लगेच तूप लावलेल्या पोळपाटावर थापावे किंवा लाटून घेऊन लगेच सुरीने लांबट आकाराच्या वड्या कापाव्यात.  

तिळाची बर्फी  
साहित्य : दोन कप तीळ (पांढरे), १ कप दाण्याचे कूट, १०० ग्रॅम खवा, २ मोठे चमचे सुके खोबरे (किसून), ३ कप साखर, अर्धा मोठा चमचा तूप, १ छोटा चमचा वेलची पूड.
कृती : तीळ खमंग भाजून त्याची जाडसर पूड करावी. सुके खोबरे किसून ठेवावे. दाणे भाजून त्याचे जाडसर कूट करावे (तीळ व दाण्याचे कूट एकत्र करावे). ताटाला अर्धा चमचा तूप लावावे. कढईमध्ये साखर व अर्धी वाटी पाणी घेऊन पाक करायला ठेवावा. पाक घट्ट झाला की विस्तव बंद करावा व तिळाचे मिश्रण, वेलची पूड व खवा घालून एकजीव करावे. नंतर तूप लावलेल्या ताटात मिश्रण एकसारखे थापावे. वरून किसलेले सुके खोबरे थापावे. थंड झाल्यावर शंकरपाळीसारख्या वड्या पाडाव्यात. 

तीळ व गुळाचे लाडू
साहित्य : दोन कप तीळ (पांढरे), १ कप भाजलेले दाणे, पाव कप पंढरपुरी डाळ (भाजकी), पाव कप सुके खोबरे, १ कप चिक्कीचा गूळ, १ मोठा चमचा साजूक तूप.
कृती : तीळ धुऊन वाळवून खमंग भाजावेत. दाणे भाजून साले काढून दोन-दोन तुकडे करावेत. सुक्या खोबऱ्याचे बारीक तुकडे करावेत. पाहिजे असल्यास खोबऱ्याला किंचित हिरवा रंग लावावा. तीळ, दाणे, व सुके खोबरे एकत्र करावे. कढईमध्ये गूळ व तूप घेऊन मंद विस्तवावर पाक करायला ठेवावा. पाक झारीतून धाग्यासारखा निघू लागला की पाक झाला असे समजावे. विस्तव बंद करून तिळाचे मिश्रण एकत्र करावे व गरम असतानाच लाडू वळावेत. थंड झाल्यावर स्टीलच्या डब्यात भरून ठेवावेत. 

तीळ कोकोनट खजूर लाडू
साहित्य : तिनशे ग्रॅम खजूर, १ कप तीळ (साधे), पाव कप काजू, पाव कप डेसिकेटेड कोकोनट, १ टीस्पून वेलची पूड, १ टीस्पून साजूक तूप, सजावटीसाठी २ टेबलस्पून डेसिकेटेड कोकोनट, १ टेबलस्पून तीळ (पॉलिशचे).
कृती : खजूर चांगला धुऊन पुसून घ्यावा. मग त्याच्या बिया काढून त्याचे बारीक तुकडे करावेत. काजूचे बारीक तुकडे करावेत. एका कढईमध्ये तीळ छान खमंग भाजावेत. तीळ भाजताना मंद विस्तवावर गुलाबी रंग येईपर्यंत भाजावेत. तीळ चांगले गरम झाले की तडतडल्याचा आवाज येईल, मग विस्तव बंद करावा. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये जाडसर ग्राइंड करावे. 
कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये खजूर घालून थोडेसे परतावे. खजूर गरम झाले की मऊ होतील. खजूर मऊ झाले की विस्तव बंद करावा. मिक्सरच्या भांड्यात खजूर थोडे जाडसर ग्राइंड करावेत. मिक्सरच्या भांड्यात खजूर, तिळाची पूड, वेलची पूड घालून थोडेसे ग्राइंड करून मिश्रण परातीत काढावे. त्यामध्ये डेसिकेटेड कोकोनट व काजूचे तुकडे घालून परत चांगले मळावे. मळलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे करून डेसिकेटेड कोकोनट व तिळावर फिरवून बाजूला ठेवावेत. अशा प्रकारे सर्व लाडू करावेत.

तीळ मधाचे लाडू 
साहित्य : एक कप तीळ, पाऊण कप बदाम, १ टीस्पून वेलची पूड, १ टीस्पून व्हॅनिला इसेन्स, अर्धा कप मध, १ टीस्पून लिंबाची साले (किसून), १ चिमूट मीठ. 
कृती : कढई गरम करून त्यामध्ये तीळ घालून मंद विस्तवावर खमंग भाजावेत व थंड करायला ठेवावेत. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक वाटावेत. बदाम मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटावेत. एक ताजे लिंबू घेऊन त्याची साले किसणीने किसावीत. एका मध्यम आकाराच्या बोलमध्ये ग्राइंड केलेले तीळ कूट, बदाम, लिंबू कीस, एक चिमूट मीठ घालून मिक्स करावे. मग त्यामध्ये मध घालून चांगले मळावे. मळल्यावर त्याचे छोटे छोटे लाडू वळावेत. एकेक लाडू घेऊन पांढऱ्‍या तिळामध्ये घोळवावेत. 

तीळ ओट्स लाडू 
साहित्य : अर्धा कप काळे तीळ, पाव कप ओट्स, पाव कप शेंगदाणे, ८-१० काजू, पाव कप गूळ, २ टेबलस्पून तूप, १ टीस्पून वेलची पूड.  
कृती : काळे तीळ निवडून घ्यावेत. गूळ किसून घ्यावा. काजूचे तुकडे करावेत. एका कढईमध्ये काळे तीळ मंद विस्तवावर खमंग भाजावेत. ओट्स मंद विस्तवावर दोन-तीन मिनिटे भाजावेत. शेंगदाणे भाजून साले काढावीत. मिक्सरच्या भांड्यात काळे तीळ ग्राइंड करून बाजूला ठेवावेत. ओट्स थोडे जाडसर ग्राइंड करावेत. शेंगदाणे पण मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यावेत. एका स्टीलच्या प्लेटमध्ये ग्राइंड केलेले काळे तीळ, ओट्स, शेंगदाणे कूट घालून मिक्स करावे. त्यामध्ये किसलेला गूळ, काजू तुकडे व वेलची पूड घालावी. शेवटी साजूक तूप पातळ करून घालावे व चांगले मिक्स करावे. मिश्रण चांगले मळून त्याचे छोटे छोटे लाडू वळावेत. 

चॉकलेट तिळाचे लाडू 
साहित्य : अडीचशे ग्रॅम डार्क चॉकलेट कंपाऊंड, १ कप तीळ, पाव कप डेसिकेटेड कोकोनट.
कृती : कढई गरम करून त्यामध्ये तीळ थोडे भाजून घ्यावेत. डार्क चॉकलेट कंपाऊंडचे बारीक तुकडे करून घेऊन डबल बॉईल पद्धतीने विरघळवून घ्यावे. चॉकलेट विरघळले की बाजूला चार-पाच मिनिटे थंड करायला ठेवावे. मग त्यामध्ये पाऊण कप भाजलेले तीळ व डेसिकेटेड कोकोनट घालून मिक्स करावे. एका बोलमध्ये उरलेले तीळ व डेसिकेटेड कोकोनट ठेवावे. तयार झालेल्या मिश्रणाचे एकसारखे छोटे लाडू वळून बोलमधील तिळामध्ये व डेसिकेटेड कोकोनटमध्ये घोळवावेत. चॉकलेट-तीळ लाडू तयार झाले की पाच मिनिटे फ्रीजमध्ये ठेवावेत. 

संबंधित बातम्या