मटार स्पेशल

सुजाता नेरुरकर
सोमवार, 8 फेब्रुवारी 2021

फूड पॉइंट

सध्या बाजारामध्ये मटार भरपूर उपलब्ध आहे. फक्त मटारपासून करता येतील असे अनेक पदार्थ असतात. अशाच काही पदार्थांच्या रेसिपीज...

मटार पुरी
साहित्य : एक किलो मटार, ७-८ हिरव्या मिरच्या, दीड टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, पाव कप कोथिंबीर, १ टीस्पून लिंबू रस, अर्धा टीस्पून गरम मसाला, २ टेबलस्पून पुदिना पाने (चिरून), मीठ चवीनुसार.
फोडणीसाठी : दोन टेबलस्पून तेल, १ टीस्पून हिंग.
पुरीसाठी : दोन कप आटा, १ कप मैदा, २ टेबलस्पून तेल (गरम), मीठ चवीनुसार, १ कप दूध, पाणी लागेल तसे, पुऱ्या तळण्यासाठी तेल.
कृती : आटा, मैदा, गरम तेल, मीठ एकत्र करावे. त्यात दूध घालून लागेल तेवढे पाणी घालून पीठ घट्ट मळावे. मटार, मिरची, आले-लसूण व कोथिंबीर मिक्सरमध्ये वाटावी. दोन टेबलस्पून तेल गरम करून हिंग घालावे व मटारचे मिश्रण घालून मंद विस्तवावर १५ मिनिटे भाजावे. मिश्रण थोडे कोरडे झाले पाहिजे. नंतर त्यामध्ये मीठ, लिंबू रस, गरम मसाला, पुदिना घालून एकसारखे करून घ्यावे. पिठाचे लहान गोळे करून पुरी करून त्यामध्ये मटारचे एक टेबलस्पून मिश्रण भरावे. परत पुरी बंद करून थोडी लाटावी. कढईमध्ये तेल तापवून पुऱ्या गुलाबी रंग येईपर्यंत तळाव्यात. गरम गरम पुऱ्या टोमॅटो सॉसबरोबर खायला द्याव्यात.

मटार पॅन केक 

साहित्य : एक कप हिरवे ताजे मटार, दोन टेबलस्पून दही, ६-७ लसूण पाकळ्या, १ इंच आले, २ हिरव्या मिरच्या, अर्धा कप रवा, १ टेबलस्पून कांदा (बारीक चिरून), १ टेबलस्पून टोमॅटो (चिरून), १ टेबलस्पून गाजर (चिरून), १ टेबलस्पून शिमला मिरची (चिरून), १ टेबलस्पून कोथिंबीर (चिरून), १ टीस्पून मीठ (चवीनुसार), पाव टीस्पून इनो किंवा पाव टीस्पून बेकिंग सोडा, १ टीस्पून चिली फ्लेक्स, तेल.
कृती : प्रथम मटार सोलून धुवावेत. कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर धुऊन चिरावी. मिक्सरच्या भांड्यात मटार, दही, लसूण, आले, हिरवी मिरची व दोन टेबलस्पून पाणी घालून वाटून घ्यावे. वाटलेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यामध्ये रवा, कांदा, टोमॅटो, गाजर, शिमला मिरची, कोथिंबीर, मीठ व अर्धा कप पाणी घालून मिक्स करावे. मिश्रण झाकून १० मिनिटे बाजूला ठेवावे, म्हणजे रवा चांगला फुगेल. रवा चांगला मुरला की त्यामध्ये इनो घालून त्यावर एक चमचा पाणी घालून हलक्या हातांनी मिक्स करावे. मग त्यामध्ये चिली फ्लेस्क घालून पुन्हा मिक्स करावे. नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर तेल लावावे. एक मोठा डाव मिश्रण घालून थोडेसे जाडसर पसरावे, बाजूनी थोडेसे तेल घालावे. मग दोन्ही बाजूंनी छान भाजावे. मटारचे पॅन केक चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावेत.

टेस्टी मटार करंजी  

साहित्य : सारणासाठी: दोन कप सोललेले मटार दाणे, १ टीस्पून तेल, १ टीस्पून लिंबू रस, पाव कप ओला खोवलेला नारळ, २ टेबलस्पून कोथिंबीर (चिरून). आवरणासाठी : एक कप मैदा, अर्धा कप बारीक रवा, १ टेबलस्पून बेसन, १ टीस्पून ओवा, जिरे (भरडून), पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल मिरची पूड, २ टेबलस्पून तेल (कडकडीत), मीठ चवीनुसार, तेल मटारची करंजी तळण्यासाठी.
कृती : सारणासाठी: एका कढईमध्ये तेल गरम करून त्यात मटारचे सोललेले दाणे घालावेत. कढईवर झाकण ठेवून त्यावर पाणी घालावे. मटार शिजवून घ्यावेत. कढईमधून मटार काढून थोडेसे ठेचावेत. मग त्यामध्ये आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, लिंबू रस, मीठ व चवीला थोडीशी साखर, ओला खोवलेला नारळ, कोथिंबीर घालून मिक्स करावे. हे सारण तयार झाले. 
आवरणासाठी : मैदा, रवा, बेसन, मीठ, ओवा-जिरे पूड, हळद, लाल मिरची पूड मिक्स करावी. मग त्यामध्ये कडकडीत तेल घालून  मिक्स करावे व पीठ थोडे घट्ट मळावे. मळलेले पीठ १०-१५ मिनिटे बाजूला ठेवावे. मग त्याचे १५ एकसारखे गोळे करावेत. एकेक गोळा घेऊन पुरीच्या आकाराचा लाटावा. मग त्यामध्ये एक टीस्पून सारण भरून पुरी मुडपून घ्यावी. पुरी मुडपल्यावर त्याला करंजीचा आकार द्यावा. अशा सर्व करंज्या करून घ्याव्यात. एका कढईमध्ये तेल चांगले गरम करावे. गरम तेलामध्ये मटारच्या करंज्या गुलाबी रंग येईपर्यंत तळाव्यात. गरम गरम करंज्या टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह कराव्यात.
टीप : रवा, मैदा व बेसन वापरल्यामुळे करंज्या खूप छान व खुसखुशीत होतात. तसेच दिसायला पण खूप सुंदर दिसतात.

मुलांसाठी झटपट नाश्ता

साहित्य : आवरणासाठी : एक कप रवा, अर्धा कप दही, १ टीस्पून मीठ, अर्धा कप पाणी, पाव टीस्पून बेकिंग सोडा, अर्धा कप गाजर प्युरी.
सारणासाठी : एक कप मटार, १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून), ४-५ लसूण पाकळ्या, २ हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून लिंबू रस, मीठ चवीनुसार, १ चमचा तेल, पाव टीस्पून हळद, पाव टीस्पून लाल मिरची पूड, पाव टीस्पून गरम मसाला.
कृती : कांदा, लसूण व हिरवी मिरची चिरून घ्यावी. एका बाऊलमध्ये रवा, दही व मीठ मिक्स करून त्यामध्ये पाणी घालावे. मिक्स करून २५-३० मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. एक नॉनस्टिक पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये चिरलेला कांदा, लसूण, हिरवी मिरची घालून थोडेसे परतावे व मग मटार घालावेत. मग मिक्स करून एक-दोन मिनिटे परतावे. पॅनवर दोन-तीन मिनिटे झाकण ठेवून मंद विस्तवावर वाफवून घ्यावे. विस्तव बंद करून मटार थंड करावेत. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये थोडे जाडसर वाटावेत. एका कढईमध्ये गाजर घेऊन थोडे पाणी घालून दोन-तीन मिनिटे वाफवावे. थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटावे. रव्याच्या मिश्रणात पाव टीस्पून बेकिंग सोडा व अर्धा कप पाणी घालून हळुवारपणे मिक्स करावे. मिश्रणाचे दोन भाग करून एक भाग पंढराच ठेवावा. दुसऱ्या भागात गाजराची पेस्ट घालावी.नॉनस्टिक पॅन गरम करून त्यावर थोडे तेल लावावे. एका मध्यम आकाराच्या डावाने रव्याचे मिश्रण अगदी थोडेसे पसरावे. मग त्यावर मटारचे एक टेबलस्पून मिश्रण ठेवावे. त्यावर परत रव्याचे एक डाव मिश्रण घालून हळुवारपणे पसरावे. मटारचे मिश्रण झाकले गेले पाहिजे. बाजूने थोडेसे तेल घालून पॅनवर तीन-चार  मिनिटे झाकण ठेवून मंद विस्तवावर बेक करावे. मग झाकण काढून उलटावे. परत बाजूने थोडेसे तेल घालून दोन-तीन मिनिटे मंद विस्तवावर बेक करावे. गरम गरम नाश्ता टोमॅटो सॉसबरोबर किंवा चटणीबरोबर सर्व्ह करावा.

संबंधित बातम्या