आंब्याची मिठास

सुजाता नेरुरकर
सोमवार, 10 मे 2021

फूड पॉइंट

आंब्याचा गोडवा काही विशेषच असतो. त्यामुळे त्यापासून केलेले गोड पदार्थही खासच होतात. अशाच काही पदार्थांच्या या रेसिपीज...

फज 

साहित्य ः दोन कप ओला नारळ (खोवून), १ कप दूध, १ कप साखर, १ कप आंब्याचा रस, १ कप खवा, ड्रायफ्रूट्स तुकडे सजावटीसाठी.
कृत्री ः एका कढईमध्ये खोवलेला नारळ व दूध मिक्स करून पाच मिनिटे मिश्रण शिजवून घ्यावे. साखर घालून सात ते दहा मिनिटे मिश्रण शिजवून घ्यावे. मग त्यामध्ये आंब्याचा रस व खवा घालून मिक्स करून थोडे घट्ट होईपर्यंत शिजवावे. एका स्टीलच्या प्लेटला तूप लावून शिजवलेले मिश्रण प्लेटमध्ये ओतून एकसारखे पसरावे. त्यावर ड्रायफ्रूट्सचे तुकडे घालून सजवावे. प्लेट सजवल्यावर फ्रीजमध्ये दोन-तीन तास थंड करायला ठेवावे. आंब्याचा फज थंडच सर्व्ह करावा.

खीर
साहित्य ः अर्धा लिटर दूध, १ कप आंब्याचा रस, अर्धा कप शेवया, पाव कप साखर, पाव टीस्पून वेलची पूड, १ टेबलस्पून साजूक तूप, पाव कप ड्रायफ्रूट्स तुकडे (काजू, बदाम).
कृत्री ः दोन आंबे धुऊन त्याचा रस काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करून घ्यावा. एका कढईमध्ये तूप गरम करून त्यामध्ये शेवया दोन मिनिटे परताव्यात. मग त्यामध्ये दूध मिक्स करून एक उकळी आणावी. नंतर त्यामध्ये साखर घालून दोन-तीन मिनिटे गरम करावे व वेलची पूड घालून थंड करायला ठेवावे. खीर थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा ज्युस घालून मिक्स करून फ्रीझमध्ये दोन तास थंड करायला ठेवावे. आंब्याची खीर सर्व्ह करताना वरून ड्रायफ्रूट्सने सजवून थंड थंड खीर सर्व्ह करावी.

केशर मँगो मिल्क शेक
साहित्य ः दोन मोठे आंबे (हापूस/केसर), ३ कप दूध, २ टेबलस्पून फ्रेश क्रीम, पाव टीस्पून केशर, २ टेबलस्पून साखर, आईस क्यूब.
कृत्री ः आंबे धुऊन त्याचा रस काढावा. आंब्याचा रस व साखर मिक्सरमध्ये ब्लेंड करावी. मग त्यामध्ये दूध व केशर घालून परत ब्लेंड करावे. एका भांड्यात मिश्रण ओतून फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवावे. फ्रेश क्रीममध्ये एक टेबलस्पून दूध घालून चांगले फेटावे. थंड झालेला आंब्याचा मिल्कशेक चार ग्लासमध्ये ओतावा. वरून एक आईस क्यूब घालून फेटलेले फ्रेश क्रीम घालून सर्व्ह करावे.

इन्स्टन्ट मॅंगो फ्रुटी
इन्स्टन्ट मॅंगो फ्रुटी तयार करून लगेच संपवायची आहे. इन्स्टन्ट मॅंगो फ्रुटी अगदी सोपी व झटपट होणारी आहे. लहान मुलेसुद्धा करू शकतात.
कृत्री ः पाऊण कप मॅंगो पल्प, अर्धा टेबलस्पून पिठीसाखर, अर्धा टेबलस्पून लेमन ज्युस, एक कप पाणी, सजावटीसाठी मॅंगो स्लाइस, बर्फ.
कृत्री ः एका भांड्यात मॅंगो पल्प, पिठीसाखर, लेमन ज्युस, पाणी घालून चांगले मिक्स करून घ्यावे. मग एका काचेच्या ग्लासमध्ये मॅंगो ज्युस ओतून वरून मॅंगोच्या स्लाइस व आइस क्युब घालून थंडगार सर्व्ह करावे.

टिकाऊ मॅंगो फ्रुटी
ही मॅंगो फ्रुटी १०-१५ दिवस फ्रीजमध्ये छान राहते. ही करायला अगदी सोपी आहे व झटपट होणारा आहे.यात कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह न घालता करता येते.
साहित्य ः दोन मोठ्या आकाराचे पिकलेले आंबे, १ मध्यम आकाराची कैरी, पाऊण कप साखर, साडेचार कप पाणी, सजावटीसाठी मॅंगो स्लाइस, बर्फ.
कृत्री ः प्रथम आंबे व कैरी धुऊन पुसावी. मग त्याची साले काढून फोडी कापून घ्याव्यात. आंब्याच्या फोडी व कैरीच्या फोडी वेगवेगळ्या ठेवाव्यात. आंब्याच्या फोडी व कैरीच्या फोडी मिक्सरमध्ये ब्लेंड कराव्यात. एका जाड बुडाच्या कढईमध्ये आंब्याचा ब्लेंड केलेला ज्युस काढावा. त्यामध्ये कैरीचापण ज्यूस घालावा व मंद विस्तवावर गरम करायला ठेवावे. मिश्रण चांगले गरम होऊन उकळी यायला लागली की त्यामध्ये साखर घालून मिक्स करावे. मिश्रण आपल्याला अगदी पारदर्शक होईपर्यंत गरम करायचे आहे. मिश्रण पारदर्शक झाले की विस्तव बंद करून कढई खाली उतरवून थंड करायला ठेवावे. मिश्रण थंड झाले की गाळून घ्यावे. मग त्यामध्ये चार कप थंड पाणी घालून ग्लासमध्ये ओतावे. थंड थंड मॅंगो फ्रुटी सर्व्ह करावी. सर्व्ह करताना वरून बर्फ व आंब्याचे बारीक तुकडे घालावेत.

बेक्ड मँगो करंजी
सारणाकरिता : एक कप ओला नारळ (खोवून), १ कप दूध, १ कप हापूस आंब्याचा रस, अर्धा कप साखर, ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी.
आवरणासाठी : दोन कप मैदा, १ टीस्पून बेकिंग पावडर, २ टेबलस्पून आंब्याचा रस, अर्धा कप साजूक तूप किंवा बटर, मीठ चवीने, ३ टेबलस्पून दूध व पाणी (मिक्स).
कृत्री ः प्रथम आंब्याचा रस काढून मिक्सरमधून फिरवून घ्यावा. ओला नारळ खोवून घ्यावा. एका जाड बुडाच्या कढईमध्ये ओला नारळ व दूध घालावे. ते आटवून त्यामध्ये साखर व आंब्याचा रस घालावा व घट्ट होईपर्यंत आटवावे. मग त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालून मिक्स करावे व मिश्रण थंड करायला ठेवावे. मैदा व बेकिंग पावडर सपेटीच्या चाळणीने चाळून घ्यावी. मग एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये मैदा, तूप, आंब्याच्या रस, मीठ, पिठीसाखर घालून घट्ट मळावे. लागेल तेवढे दूध व पाणी हळूहळू घालून पीठ मळावे व मळून झाले की थोडावेळ बाजूला ठेवा. मळलेल्या पिठाचे एकसारखे भाग करावेत. एक भाग लाटून त्याच्या वाटीच्या साहाय्याने गोल गोल पुऱ्या कापून घ्याव्यात. एका पुरीवर एक टीस्पून सारण ठेवून पुरी मुडपून घ्यावी व त्याला करंजीचा आकार द्यावा. अशा प्रकारे सर्व करंज्या कराव्यात. एका बेकिंग ट्रेमध्ये जेवढ्या करंज्या बसतील तेवढ्या ठेवाव्यात. मायक्रोवेव्ह ओव्हन प्रीहीट करावा. त्यामध्ये बेकिंग डिश ठेवून १८० डिग्रीवर सेट करून २५-२८ मिनिट बेक करावे. अशा प्रकारे सर्व करंज्या बेक करून थंड झाल्यावर घट्ट झाकणाच्या डब्यात ठेवाव्यात.

गोड आप्पे
साहित्य ः एक कप रवा, अर्धा कप आंब्याचा पल्प, ६ टेबलस्पून साखर, पाऊण कप दूध, २ टेबलस्पून डेसिकेटेड कोकनट, अर्धा टीस्पून वेलची पूड, अर्धा टीस्पून इनो किंवा बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर, २ टेबलस्पून साजूक तूप, २ टेबलस्पून तेल आप्पे पात्राला लावण्यासाठी.
कृत्री ः आंब्याचा रस काढून मिक्सरमध्ये ब्लेंड करावा. एका मोठ्या आकाराच्या बाऊलमध्ये रवा, आंब्याचा पल्प, वेलची पूड, डेसिकेटेड कोकनट, साखर व निम्मे दूध घालून मिक्स करावे व १०-१५ मिनिटे झाकून बाजूला ठेवावे. तोपर्यंत आप्पे पात्राला तेल लावून घ्यावे. रवा भिजल्यामुळे मिश्रण थोडे घट्ट होते, मग बाकीचे राहिलेले दूध घालावे. मिश्रण एकसारखे करून त्यामध्ये इनो घालून हळुवारपणे मिश्रण मिक्स करावे. आप्पे पात्र गरम झाले की त्यात एक-एक टेबलस्पून मिश्रण घालावे. बाजूनी थोडे तेल सोडून आप्पे पात्रावर झाकण ठेवून मंद विस्तवावर ठेवावे. चार-पाच मिनिटे झाल्यावर झाकण काढून आप्प्यांवर थोडे-थोडे साजूक तूप सोडावे. परत दोन-तीन मिनिटे झाकण ठेवून मंद विस्तवावर ठेवावे. आता झाकण काढून आप्पे उलटे करावेत. एका बाजूने छान ब्राऊन कलर आला असेल. उलट करून तीन-चार मिनिटे मंद विस्तवावर ठेवावे. तयार आप्पे प्लेटमध्ये काढून घ्यावेत. आंब्याचे गरम गरम गोड आप्पे सर्व्ह करावेत.

कस्टर्ड
साहित्य ः दोन कप दूध, २ टेबलस्पून व्हॅनिला कस्टर्ड पावडर, २ टेबलस्पून साखर, १ कप हापूस आंब्याचा पल्प, २ टेबलस्पून फ्रेश क्रीम, ड्रायफ्रूट्स, द्राक्ष, डाळिंब दाणे व २ टेबलस्पून हापूस आंब्याच्या फोडी सजावटीसाठी.
कृत्री ः एका बाऊलमध्ये व्हॅनिला कस्टर्ड पावडर व अर्धा कप दूध घालून मिक्स करून घ्यावे. आंब्याचा रस मिक्सरमध्ये ब्लेंड करावा. एका जाड बुडाच्या भांड्यात बाकीचे राहिलेले दूध गरम करायला ठेवावे. दूध गरम झाल्यावर त्यामध्ये कस्टर्ड मिक्स केलेले दूध घालून मंद विस्तवावर पाच मिनिटे शिजवावे. कस्टर्ड शिजले की त्यामध्ये साखर घालून मिक्स करावे व थंड करायला ठेवावे. कस्टर्ड थंड झाल्यावर त्यामध्ये आंब्याचा पल्प व फ्रेश क्रीम घालून हँड मिक्सरने ब्लेंड करावे. डेकोरेटिव्ह ग्लासमध्ये कस्टर्ड घालून वरून आंब्याच्या फोडी, ड्रायफ्रूट्स, द्राक्ष व डाळिंब दाणे घालून सजवावे व फ्रीजमध्ये दोन तास थंड करायला ठेवावे. मँगो कस्टर्ड थंड झाल्यावर मग सर्व्ह करावे.

मँगो पुडिंग जार
साहित्य ः चार मोठ्या आकाराचे हापूस आंबे, केकचे ४ गोल तुकडे, १ टीस्पून साखर, ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी, १ मोठा आंबा सजावटीसाठी, बर्फाचे तुकडे.
कृत्री ः आंब्याचा रस काढून त्यामध्ये साखर घालावी व मिक्सरमधून फिरवून घ्यावे. केकचे उभे गोल तुकडे कापावेत. दुसऱ्या एका आंब्याचे पातळ उभे तुकडे सजावटीसाठी कापावेत. एक डेकोरेटिव्ह ग्लास घेऊन त्यामध्ये थोडा आंब्याचा पल्प घालावा. मग एक केकचा उभा तुकडा ठेवून परत आंब्याचा पल्प घालावा. बर्फाचे तुकडे घालावेत. मग वरती आंब्याचे पातळ उभे तुकडे ठेवून ड्रायफ्रूटच्या तुकड्यांनी सजवावे. आंब्याचे पुडिंग जार फ्रीजमध्ये दोन-तीस तास थंड करायला ठेवावे आणि मग सर्व्ह करावे.

मँगो फालूदा आईसक्रिम
साहित्य ः दोन कप दूध, २ टेबलस्पून साखर, २ मोठे हापूस आंबे रस काढून, २ टेबलस्पून सब्जा बी, २ टेबलस्पून शेवया, ४ स्कूप व्हॅनिला आइस्क्रीम, ड्रायफ्रूट्स, आंब्याचे तुकडे सजावटीसाठी.
कृत्री ः प्रथम अर्धी वाटी पाण्यात सब्जा बी भिजत ठेवावे. मग शेवया शिजवून चाळणीवर निथळत ठेवाव्यात. आंब्याचा रस मिक्सरमध्ये फिरवून घ्यावा. आंब्याचा रस, दूध व साखर मिक्सरमधून काढून त्याचा ज्युस करावा. काचेचे तीन आकर्षक ग्लास घेऊन त्यामध्ये प्रथम आंब्याचा मिल्क शेक, मग सब्जा बी व आंब्याच्या फोडी, मग शेवया घालून वरून व्हॅनिला आइस्क्रीम घालावे. ड्रायफ्रूट्स व आंब्याच्या फोडी घालून सजवावे व थंडगार सर्व्ह करावे. आपल्या आवडीनुसार ग्लास सजवता येईल.

संबंधित बातम्या