टिफीनचा मेन्यू

सुजाता नेरुरकर 
गुरुवार, 5 जुलै 2018

फूड पॉइंट
 

बटाट्याचा डोसा
साहित्य : दोन कप तांदूळ, ४-६ लाल मिरच्या, ४ मध्यम आकाराचे बटाटे (उकडून), छोटा आले तुकडा, २ छोटे कांदे (चिरून), मीठ चवीने, तेल डोसे भाजण्यासाठी
कृती : तांदूळ धुवून २ तास भिजत ठेवावे. कांदा चिरून घ्यावे. बटाटे उकडून किसून घ्यावे. मग भिजवलेले तांदूळ, लाल मिरची, आले, कांदा व मीठ घालून मिक्‍सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. मिश्रण जर घट्ट वाटले तर थोडे अजून पाणी घालून मिश्रण एक जीव करून घ्यावे. नॉन स्टीक तवा तापून घेवून त्यावर छान डोसे बनवून घ्यावे. गरम गरम डोसे पुदिना चटणी बरोबर सर्व्ह करावे.

इडली सँडविच
इडलीसाठी साहित्य : दोन कप साधा तांदूळ किंवा उकड्या तांदूळ, १ कप उडीद डाळ, पाव कप इडली रवा, २ टेबल स्पून तिळाचे तेल, मीठ चवीने, तेल इडली बनवण्यासाठी
चटणीकरिता : एक कप ओला नारळ, पाव कप कोथिंबीर (चिरून), पाव कप पुदिना पाने (चिरून), ७-८ लसूण पाकळ्या, ३ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून लिंबूरस, अर्धा टीस्पून साखर, मीठ चवीने, ३ मध्यम आकाराचे टोमॅटो, २ मध्यम आकाराच्या काकड्या, ३ चीज क्‍यूब (किसून किंवा पातळ स्लाईस करून)
कृती : इडली बनवण्यासाठी : तांदूळ व तूरडाळ धुऊन वेगवेगळी ७-८ तास पाण्यात भिजत ठेवावी. नंतर जास्तीचे पाणी काढून मिक्‍सरमध्ये थोडेसे जाडसर वाटून घ्यावे. तांदूळ व डाळ वाटून झाल्यावर इडलीचा रवा घालून चांगले मिक्‍स करून परत ७-८ तास तसेच झाकून ठेवावे. इडली बनवण्याच्या वेळी त्यामध्ये मीठ व तिळाचे तेल मिक्‍स करावे. इडलीचे मिश्रण खूप पातळ किंवा घट्ट नसावे. गरज पडल्यास थोडेसे पाणी वापरावे. कुकरमध्ये किंवा इडली पात्रात पाणी गरम करायला ठेवावे. इडलीच्या साचाला तेलाचा हात लावून इडलीचे मिश्रण डावाने घालावे. कुकरची शिट्टी काढून झाकण लावावे, १५ मिनिटे इडलीला वाफवून घ्यावे. मग इडली काढून घ्यावी.
चटणीकरिता : खोवलेला नारळ, कोथिंबीर, पुदिना, हिरव्या मिरच्या, लसूण, लिंबूरस, साखर, मीठ पाव कप पाणी घालून मिक्‍सरमध्ये बारीक वाटून घ्यावे. इडली थंड झाल्यावर इडलीला मध्ये चीर देऊन त्याचे दोन भाग करावे. दोन्ही भागाच्या आतल्या बाजूला चटणी लावून एका भागावर टोमॅटोची चकती, काकडीची चकती, चीज ठेवून इडलीचा दुसरा भाग त्यावर ठेवावा. अशा प्रकारे सर्व इडली सँडविच बनवून घ्यावे. मग सर्व्ह करावे.

ओट्‌स डोसा
साहित्य : एक कप ओट्‌स, अर्धा कप रवा, २ हिरव्या मिरच्या, अर्धा टीस्पून आले (किसून), १ टेबल स्पून कोथिंबीर, २ टेबल स्पून गाजर, मीठ चवीने, तेल डोसा फ्राय करण्यासाठी
कृती : ओट्‌स व रवा १०-१५ मिनिटे भिजत ठेवावे. मग मिक्‍सरमध्ये थोडेसे ग्राईड करावे. हिरवी मिरची पेस्ट करावी. म्हणजे लहान मुलांना तिखट लागणार नाही. आले व गाजर किसून घ्यावे. कोथिंबीर बारीक चिरून घ्यावी. वाटलेले ओट्‌स, हिरवी मिरची, आले, कोथिंबीर, गाजर, मीठ घालून मिक्‍स करावे. लागेल तसे पाणी घालावे. पण मिश्रण खूप पातळ नसावे आपण जसे डोसे बनवतो तसे भिजवावे. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडेसे तेल लावावे व डोसे करावेत. दोन्ही बाजूनी भाजून घ्यावे म्हणजे छान कुरकुरीत होतील. नारळाच्या चटणीबरोबर किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

कोबी-चीज टोस्ट
साहित्य : चारशे ग्रॅम ब्राऊन स्लाईस ब्रेड, पाचशे ग्रॅम कोबी, २ मोठे बटाटे (उकडून), ४ चीज क्‍यूब (किसून), ४ हिरव्या मिरच्या, १ टीस्पून मिरे पावडर, मीठ चवीने, बटर टोस्ट भाजण्यासाठी
कृती : कोबी धुवून किसून घ्यावा. बटाटे उकडून सोलून कुस्करून घ्यावेत. चीज किसून घ्यावे. हिरवी मिरची चिरून घ्यावी. किसलेला कोबी, कुस्करलेला बटाटा, किसलेले चीज, हिरवी मिरची, मिरे पावडर, मीठ घालून चांगले मिक्‍स करून घ्यावे. ब्रेडच्या स्लाईसला एका बाजूनी बटर लावून घ्यावे. एका ब्रेडची स्लाईस घेऊन त्यावर कोबीचे एक टेबल स्पून सारण ठेवून त्यावर दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवून नॉन स्टीक तवा गरम करून त्यावर ब्रेड भाजून घ्यावा. गरम गरम कोबी चीज टोस्ट टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

शेजवान इडली
साहित्य : दहा इडल्या, १ लहान कांदा, १ लहान गाजर, १ छोटी शिमला मिरची, पाव कप कोबी, २ टेबल स्पून मटार दाणे, २ श्रावण घेवडा, पाव कप कोथिंबीर, १ टेबल स्पून शेजवान सॉस, मीठ चवीने
कृती : शिमला मिरची, गाजर, कांदा, श्रावण घेवडा, कोबी लांबट उभ्या कापून घ्यावा. कोथिंबीर चिरून घ्यावी. इडलीचे मध्यम आकाराचे चौकोनी तुकडे करावे. कढईमध्ये तेल गरम करून कांदा, शिमला मिरची, गाजर, श्रावण घेवडा, कोबी, मटार घालून दोन मिनिटे मध्यम आचेवर परतून घ्यावे. मग त्यामध्ये थोडेसे मीठ व शेजवान सॉस घालून एक मिनिटं परतून घ्यावे. भाज्या परतून झाल्यावर त्यामध्ये इडलीचे तुकडे घालून दोन-तीन मिनिटे परतून घ्यावे. कोथिंबीर घालून मिक्‍स करावे. 
टीप : मीठ जरा कमीच घालावे, कारण की शेजवान सॉसमध्ये व इटलीमध्येसुद्धा मीठ असते.

नवलकोल थालिपीठ
साहित्य : दोन कप नवलकोल (किसलेला), पाऊण कप तांदळाचे पीठ, पाऊण कप गव्हाचे पीठ, पाऊण कप ज्वारीचे पीठ, पाऊण कप बाजरीचे पीठ, एक मोठा कांदा (बारीक चिरून), एक इंच आले (किसून), ५-६ हिरव्या मिरच्या (बारीक चिरून), २ कप कोथिंबीर (बारीक चिरून), १ कप नवलकोलची पाने (बारीक चिरून) मीठ चवीने, तेल थालिपीठ फ्राय करण्यासाठी
कृती : नवलकोल धुवून किसून घ्यावे. नवलकोलची पाने धुवून बारीक चिरून घ्यावीत. कांदा व कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. तांदळाचे पीठ, गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ, बाजरीचे पीठ, किसलेला नवलकोल, नवलकोलची चिरलेली पाने, कोथिंबीर, आले, हिरवी मिरची, मीठ घालून पाणी घालून पीठ थोडेसे सैलसर मळावे. पीठाचे एकसारखे आठ गोळे बनवावे. केळीच्या पानावर एक गोळा थापून घ्यावा. लोखंडी तवा गरम करून थोडेसे तेल लावून थालिपीठ तव्यावर घालून बाजूनी तेल सोडून छान खरपूस भाजून घ्यावे. गरम गरम थालिपीठ टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करावे.

पनीर सँडविच 
साहित्य : एक कप पनीर (किसून), १ टेबल स्पून दही, १ टेबल स्पून फ्रेश क्रीम, १ टेबल स्पून मोहरीच्या डाळीची पूड, १ हिरवी मिरची (चिरून), १ टीस्पून मिरे पावडर, मीठ व साखर चवीने १ मध्यम आकाराचा कांदा (चिरून), १ मध्यम आकाराचा टोमॅटो (चिरून), १ मध्यम आकाराची काकडी (चिरून), पाव कप डाळिंबाचे दाणे, १०-१२ बेदाणे (भिजवून), ३ टेबल स्पून चीज (किसून) १ टेबल स्पून कोथिंबीर (चिरून), ८-१० ब्रेड स्लाईस, पाव कप बटर
कृती : टोमॅटो काकडी धुऊन चिरून घ्यावे. कांदा व कोथिंबीर चिरून घ्यावे. चीज किसून घ्यावे. पनीर किसून घ्यावे. किसलेले पनीर, दही, फ्रेश क्रीम, मोहरी पूड, मिरे पावडर, मीठ व साखर चवीने, किसलेले चीज घालून मिक्‍सरमध्ये वाटून घ्यावे. चिरलेली काकडी, टोमॅटो, कांदा, डाळिंब दाणे, कोथिंबीर, मिक्‍स करून घ्यावे. ब्रेडचे स्लाईस घेऊन त्याला एका बाजूनी बटर लावून त्यावर एक टेबल स्पून पनीरचे मिश्रण लावून कांदा, टोमॅटो, काकडी घालून त्यावर दुसरी ब्रेडची स्लाईस ठेवून मध्ये कापून घ्यावे. अशा प्रकारे सर्व ह्याच कृतीने सॅन्डविच बनवून घ्यावे.

मेथी पनीर रोल 
साहित्य : आवरणासाठी : दोन कप गव्हाचे पीठ, १ टेबल स्पून बेसन, अर्धा कप मेथी (चिरून), १ टेबल स्पून आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, १ टेबल स्पून तेल, १ टीस्पून लाल मिरची पावडर, पाव टीस्पून हळद पाव टीस्पून हिंग, मीठ चवीने. सारणासाठी : दोनशे ग्रॅम पनीर, १ टेबल स्पून तेल, १ मध्यम आकाराचा कांदा, १ टीस्पून जिरे, अर्धा टीस्पून मेथी दाणे, २ हिरव्या मिरच्या (चिरून), १ टीस्पून आले (चिरून), १ टीस्पून लसूण (चिरून) पाव कप मेथी (चिरून), मीठ चवीने, तेल पराठे भाजण्यासाठी, २ चीज क्‍यूब, १ टीस्पून लाल मिरची पावडर
कृती : मेथीची पाने धुऊन चिरून घ्यावीत. कांदा उभा पातळ चिरून घ्यावा. आवरणासाठी : गव्हाचे पीठ, बेसन, आले-लसूण-हिरवी मिरची पेस्ट, चिरलेली मेथी, लाल मिरची पावडर, हळद, हिंग, गरम तेल व मीठ घालून मिक्‍स करून पीठ मळून घ्यावे. सारणासाठी : कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये जिरे, मेथी दाणे, कांदा, आले-लसूण-हिरवी मिरची मीठ घालून दोन मिनिटे परतून घेऊन त्यामध्ये चिरलेली मेथी व पनीर घालून मिक्‍स करून घ्यावे. रोलसाठी : मळलेल्या पीठाचे आठ भाग करावे. एक भाग घेऊन चपातीसारखा लाटून घ्यावा. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर मेथीचा पराठा भाजून घ्यावा. अशा प्रकारे सर्व पराठे बनवून घेऊन भाजून घ्यावे. मग एक पराठा घेऊन त्यावर एक टेबल स्पून पनीरचे सारण भरून पराठा गुंडाळून घ्यावा. सर्व पराठे भरून गुंडाळी करून घ्यावी. नॉन स्टीक तवा गरम करून सर्व रोल मंद विस्तवावर भाजून घ्यावे.

पनीर स्वीट कॉर्न रोल
साहित्य : सारणासाठी : एक कप दुधीभोपळा किसून, एक कप दोडका किसून, अर्धा कप स्वीट कॉर्न दाणे (उकडून), २०० ग्रॅम पनीर, १ मध्यम आकाराचा कांदा, १ मध्यम आकाराचा टोमॅटो, २ हिरव्या मिरच्या (चिरून),  १ टेबलस्पून आले-लसूण पेस्ट, १ टीस्पून लिंबूरस, मीठ चवीने, १ टेबल स्पून तेल. आवरणासाठी : २ कप गव्हाचे पीठ, २ टेबल स्पून बेसन, १ टेबल स्पून तेल, मीठ चवीने तूप रोल भाजण्यासाठी
कृती : आवरणासाठी : गव्हाचे पीठ, बेसन, तेल, मीठ व पाणी घालून घट्ट पीठ मळून घ्यावे. मळलेले पीठ ३० मिनिटे बाजूला ठेवून मग त्याचे आठ एकसारखे गोळे बनवावे. सारणासाठी : दुधीभोपळा व दोडका सोलून किसून घ्यावा. मक्‍याचे दाणे उकडून घ्यावे. पनीरचे लहान तुकडे कापून घ्यावे. कांदा, टोमॅटो बारीक चिरून घ्यावा. एका कढईमधे तेल गरम करून त्यामध्ये कांदा, टोमॅटो, आले-लसूण, हिरवी मिरची घालून एक मिनिटे मंद विस्तवावर परतून घ्यावे. मग त्यामध्ये किसलेला दुधीभोपळा, दोडका, मक्‍याचे दाणे घालून २-३ मिनिटे मंद विस्तवावर परतून घेऊन त्यामध्ये चिरलेले पनीर. मीठ, लिंबूरस घालून मिक्‍स करून विस्तवावरून खाली उतरवून घ्यावे. रोल बनवण्यासाठी : पिठाचा एक गोळा घेऊन चपातीच्या आकाराचा लाटून घ्यावा. नॉन स्टीक तवा गरम करून घेऊन चपाती दोन्ही बाजूनी भाजून घ्यावी. भाजलेल्या चपातीवर दोन टेबल स्पून पनीरचे मिश्रण ठेवून त्याचा गोल रोल बनवून घ्यावा. अशा पद्धतीने सर्व रोल बनवून घ्यावे. मग तूप वापरून सर्व रोल भाजून घ्यावे. गरम गरम पनीर-स्वीट कॉर्न रोल टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करावे.

न्यूट्रीशियस पिझ्झा
साहित्य : दोन कप इडलीचे किंवा डोसाचे तयार पीठ, १ छोटे लाल गाजर (किसून), पाव कप पत्ताकोबी (किसून), पाव कप शिमला मिर्च (लाल, हिरवी, पिवळी बारीक चिरून), १ हिरवी मिरची (बारीक चिरून), ३ चीज क्‍यूब (किसून), ३ टेबल स्पून टोमॅटो सॉस, चीज व कोथिंबीर सजविण्यासाठी मीठ चवीने, ३ टेबल स्पून बटर (पिझ्झा भाजण्यासाठी)
कृती : इडली किंवा डोसा बनवायचे तयार पीठ घ्यावे. गाजर किसून, पत्ताकोबी व शिमला मिरची बारीक चिरून), हिरवी मिरची बारीक चिरून, कोथिंबीर बारीक चिरून घ्यावे. चीज किसून घ्यावे. डोशाच्या तयार पिठामध्ये किसलेले गाजर, बारीक चिरलेला पत्ताकोबी, शिमला मिर्च, हिरवी मिरची व मीठ घालून मिक्‍स करून घ्यावे. नॉनस्टिक तवा गरम करून त्यावर थोडे बटर लावून एक डाव मिश्रण घेवून थोडेसे पसरावे. (जरा जाडसर) बाजूनी थोडे बटर घालून पिझ्झा वरती पाव टेबल स्पून टोमॅटो सॉस पसरवून त्यावर किसलेले चीज घालून झाकण ठेवावे.  मंद विस्तवावर ४-५ मिनिटे बेक करावे. झाकण काढून पिझ्झा उलट करून परत थोडे बटर घालून दोन मिनिटे बेक करून घ्यावे. गरम गरम पिझ्झा सर्व्ह करावा. सर्व्ह करताना वरतून किसलेले चीज व कोथिंबीर घालून सजवावे.

फोटो फीचर

संबंधित बातम्या