दाल पकवान, उंधियो, हांडवा

सुखदा शहा, गुलबर्गा
शुक्रवार, 18 मे 2018

फूड पॉइंट
‘सकाळ साप्ताहिक’मध्ये वाचकांना फूड पॉइंट या सदरासाठी रेसिपीज पाठविण्याचे आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनाला प्रतिसाद देताना वाचकांनी पाठविलेल्या पाककृती प्रसिद्ध करीत आहोत.

दाल पकवान
साहित्य सारणासाठी : दोन वाटी हरभऱ्याची डाळ, १ टेबल स्पून तेल, १ टीस्पून हिरवी मिरची कुटून, १ टीस्पून आले कुटून, २ तुकडे दालचिनी कुटून, २-३ लवंग पावडर, १ लहान चमचा तिखट, २ चमचे धना-जिरे पावडर, अर्धा टीस्पून गरम मसाला, २ बारीक चिरून टोमॅटो, कोथिंबीर, मीठ, हळद
सजावटीसाठी : चिंच गूळ चटणी, कोथिंबीर, बारीक शेव, १ वाटी बारीक चिरून कांदा
पुरीसाठी साहित्य : दोन वाटी मैदा, १ वाटी गव्हाचे पीठ, मीठ, मोहनासाठी १ मोठा चमचा तेल गरम करून व पाणी सर्व घट्ट बांधून एक तास ठेवावे व मध्यम आचेवर पुऱ्या करून टोचे मारून गुलाबी रंगावर तळून घ्याव्यात. आदल्या दिवशी पुऱ्या करून ठेवाव्यात.
कृती : दाळ थोडे पाणी घालून कुकरमध्ये बोटचेपी शिजवून घ्यावी. तेलाची फोडणी करून आले, मिरची वाटण, टोमॅटो घालून परतावे. मग दालचिनी, लवंग पूड, धनेजिरे पावडर, गरम मसाला, लाल तिखट व कोथिंबीर घालून परतून डाळ घालावी. मीठ घालून परतावे व गॅस बंद करावा. थंड झाल्यावर पुरीवर प्रथम हरभरा डाळीचे सारण पसरावे. कांदा, चिंचगूळ चटणी, कोथिंबीर व शेव घालून सर्व्ह करावे. पुरीचे चाकूने चार तुकडे करावे.

खाकऱ्याचा चिवडा
साहित्य : खाकरे घरी केलेले (पोळीचे) चुरा करून, फोडणीसाठी तेल, मोहरी, जिरे, कढीपत्ता, कोथिंबीर, भाजून सोललेले शेंगदाणे, थोडे दाले (चिवड्याचे) लाल तिखट, थोडी धना-जिरा पावडर, मीठ व पिठी साखर चवीपुरते हिंग हळद
कृती : आदल्या दिवशीच्या पोळ्यांचे तव्यावर कापडाने दाबून खाकरे करून ठेवावेत. साठवून त्याचा चुरा करून घ्यावा. तेलाच्या फोडणीत प्रथम मोहरी, जिरे, हिंग, हळद घालावी. मग कढीपत्ता व कोथिंबीर घालून परतावे. चांगले भाजल्यावर ते कोरडे होते. मग हळद, लाल तिखट व डाळे - शेंगदाणे घालावे. लगेच खाकऱ्याचा चुरा, मीठ व पिठीसाखर घालावे. थोडेसे परतून गॅस बंद करावा.

चटणी लावलेले दडपे पोहे
साहित्य : पातळ पोहे ३-४ वाट्या, १ वाटी कांदा बारीक चिरून, फोडणीसाठी तेल, दूध १ ते दीड वाटी, मीठ, कोथिंबीर, कैरी किंवा कैरीचे लोणचे, १ मोठे चमचे शेंगदाणे चटणी, मोठी साखर, शेंगदाणे भाजलेले (सोलून) अर्धी वाटी तिखट लाल, आवडीनुसार कढीपत्ता
कृती : एका टोपल्यात पातळ पोहे घेऊन त्यात मोकळी करून शेंगाची चटणी, पोहे भिजेल इतपत दूध, कोथिंबीर, साखर, मीठ व लोणचे/ कैरी घालवून व्यवस्थित मिसळावे. तिखट घालावे. शेंगदाणे घालावे. छोट्या छोट्या कढईत फोडणी करून मोहरी-जिरे-हिंग व कढीपत्ता घालावा. मग कांदा घालून परतावे. हे मिश्रण लावलेल्या पोह्यांमध्ये घालून चांगले मिसळावे. हवे असल्यास परत थोडे दूध शिंपडावे.

ओनियन सॅंडविच टोस्ट
साहित्य : ब्रेडचे पंधरा-वीस मध्यम आकाराचे स्लाईस, २-३ वाट्या बारीक चिरलेला कांदा, अर्धी वाटी घट्ट साय, बटर, ३-४ चमचे मिरपूड, मीठ, साखर, २ वाट्या कोथिंबीर बारीक चिरून
कृती :कढईत १ भाजीचा चमचा लोणी गरम करावे. लगेच त्यात कांदा घालून गुलाबीसर परतावे. मग कोथिंबीर घालून एकदाच परतून साय घालावी व गॅस बंद करावा. मिरपूड, मीठ, थोडी साखर (हवी असल्यास) घालून मिश्रण चांगले मिसळावे. ब्रेडच्या स्लाइसला बटर लावावे. त्यावर मिश्रण थोडेसे पसरावे. त्यावर बटरची बाजू येईल असा दुसरा स्लाईस ठेवून सॅंडविच टोस्टर किंवा तव्यावर गुलाबीसर भाजून टोस्ट करावे. सॉसबरोबर सर्व्ह करावे.

हांडवा
साहित्य : तीन वाट्या बॉम्बे रवा, दीड वाटी आंबट दही, अर्धी वाटी गाजराचा खिस, अर्धी वाटी दुधी भोपळ्याचा खिस, अर्धी वाटी कोबी खिसून, मीठ, तेल, तीळ २ चमचे, चिमूटभर सोडा, हिरवी मिरची, आल्याचे वाटण २ चमचे, कोथिंबीर, लाल तिखट १ चमचा
कृती : रवा थोडासा गरम करावा. त्यात दह्याचे पाणी घालून केलेले ताक घालून ५-६ तास भिजवावे. करताना त्यात भोपळा, गाजर, कोबी खिस, आले लसूण वाटण, कोथिंबीर, मीठ व लाल तिखट घालावे. छोट्या कढईत किंचित तेल गरम करून तीळ घालून फोडणी करावी. या मिश्रणात चिमूटभर सोडा घालून लगेच ही फोडणी त्यावर ओतावी. मग मिश्रण चांगले मिक्‍स करून गरम तव्यावर आमलेटसारखे जाड पसरावे. झाकण ठेवून हांडवा दोन्ही बाजूने भाजावा, टोमॅटो सॉस किंवा खोबऱ्याच्या चटणीबरोबर सर्व्ह करावा.

उंधियो
साहित्य : एक वाटी सुरती पापडी बारीक तुकडे, १ वाटी वालपापडीचे तुकडे, घेवडा १ वाटी बारीक तुकडे, ओले पावटे, तुरीचे ओले दाणे, हिरवे ओले वाटाणे, ओला हरभरा सर्व पाव पाव वाटी, गाजर ५-६ तुकडे करून उकडून, बटाटा, जाड बुझ्की गुजराती हिरवी मिरची थोडी उकडून तुकडे करून, हवे असल्यास सुरण, कच्चे केळे
मसाल्यासाठी : ओले खोबरे १ मोठा चमचा, हरभरा पीठ, १ मोठा चमचा शेंगदाणे कूट १ मोठा चमचा, तेल मोहरी, जिरे, हिंग, शहाजिरे २ चमचे, काळी मिरी पावडर, धना जिरा पावडर, तिखट, २ टोमॅटो बारीक चिरून
मेथीच्या भाजीसाठी (मुठिये)
साहित्य : दोन वाटी मेथी बारीक चिरून, त्यात १ भाजीचा चमचा दही, हरभरा पीठ १ चमचा, गव्हाचे पीठ पाव वाटी, मीठ, चिमूटभर साखर, २ चमचे धने-जिरे पावडर, हिरवी मिरची वाटण १ चमचा, तेल मिरी पावडर १ चमचा, चिमूटभर सोडा, हळद, लाल तिखट घालून १ चमचा मुठिये करून तळून घ्यावे
कृती : सर्व भाज्या बोटचेप्या वेगवेगळ्या शिजवून घ्याव्यात. मग मोठ्या कढीत थोड्या जास्त तेलात खोबरे मग हरभरा पीठ मग टोमॅटो घालून परतावे. हिरवी मिरची आले घालून परतावे. मग मेथी दाणे, शहाजिरे, गरम मसाला घालावा. मग हळद, तिखट, मिरी पावडर, धना जिरे पावडर, मीठ साखर व भाज्या कोथिंबीर घालून चांगले परतून मुठिये घालावे व वाफ येऊ द्यावी.

नानकटाई
साहित्य : दोन वाटी तूप (थोडे पातळ करून), २ वाटी पिठी साखर, १ वाटी चिरोटे रवा, १ वाटी हरभरा पीठ, ३ वाटी मैदा, अर्धा चमचा सोडा, अर्धा चमचा बे-पावडर, अर्धा टीस्पून व्हॅनिला इसेन्स
कृती : प्रथम तुपात पिठीसाखर मिसळावी. मग चिरोटे रवा व हरभरा पीठ व मैदा घालून त्यात इसेन्स, सोडा व बेकिंग पावडर घालावी. सर्व मिश्रण चांगले बांधावे. तुपाचा हात लावून पेढ्याएवढे गोळे करावे व १८० डिग्रीवर ओव्हनमध्ये १५-२० मिनिटे बेक करावे किंवा कुकरमध्ये बेक करावे.

मॅलेनटाईन मॉकटेल
साहित्य : दोन लहान खरबूज, ७-८ संत्री, २ शहाळ्यांचे पाणी (४-५ ग्लास), चिमूटभर मीट व ५-६ चमचे साखर (आवडीप्रमाणे)
कृती : एका भांड्यात संत्र्याचा ज्यूस काढून जरा मोठ्या गाळणीने गाळावा. मग मिक्‍सरमध्ये खरबुजाचा गर व थोडे-थोडे शहाळ्याचे पाणी घालून मोठ्या गाळणीने गाळून संत्र्याच्या रसात मिक्‍स करावे. सर्व ज्यूस एकत्र करून मीठ व साखर घालून मॉकटेल बर्फ घालून सर्व्ह करावे. चविष्ट व आरोग्यपूर्ण मॉकटेल तयार!

फोटो फीचर

संबंधित बातम्या