गाजराच्या चविष्ट रेसिपीज

सुमन याडकीकर, मुंबई
सोमवार, 15 जुलै 2019

फूड पॉइंट
गाजर ही फळभाजी निरोगी राहण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते. त्यामुळे कधी फळ म्हणून खावे तर कधी त्याची भाजी करून खावी. गाजराचा रोजच्या आहारात उपयोग करण्यासाठी त्यापासून केलेल्या चविष्ट रेसिपीज... 

हलवा
साहित्य : एक किलो लाल रंगाची गाजरे, खवा, तूप, पिस्ते, वेलदोडे बदाम, काजू व पाव किलो साखर.
कृती : गाजरे किसून घ्यावीत. पातेल्यात तूप घालून त्यावर गाजराचा कीस घालून मऊ होईपर्यंत शिजवून घ्यावा. मग साखर घालून चांगले मिक्‍स करून पुन्हा शिजवावा. सतत हलवत राहून घट्ट होईपर्यंत आटवावा. नंतर त्यात बदामाचे काप, काजूचे तुकडे, पिस्ते घालून घट्ट करावे. थंड झाल्यावर सर्व्ह करावा. फ्रीजमध्ये ठेवल्यास २-३ दिवस चांगला राहातो.

वड्या
साहित्य : दोन वाट्या गाजराचा कीस (लाल रंगाची गाजरे घ्यावीत व साल काढून टाकावी. म्हणजे गाजरे अधिक लाल दिसतात.), २ वाट्या साखर, पाऊण वाटी मावा, पाव वाटी तूप, बदाम, वेलदोडे, पिस्ते, काजू इत्यादी.
कृती : गाजराचा कीस तुपावर वाफवून घ्यावा. नंतर कीस व साखर एकत्र शिजत ठेवावे. शिजत आल्यावर त्यात मावा घालून पुन्हा शिजवावे. घट्ट झाल्यावर त्यात वेलदोड्याची पूड घालावी. ताटाला तुपाचा हात लावून त्यावर गोळा पसरून एक सारखा थापावा. हवे तसे काजू, बदामाचे काप त्यावर थापावेत. थंड झाल्यावर हव्या त्या आकाराच्या वड्या कापाव्यात. या वड्या ४-५ दिवस टिकतात.

थालीपीठ
साहित्य : ज्वारी, गहू, चणाडाळ यांची समप्रमाणात पिठे, गाजराचा कीस, हिंग, हळद, काळा मसाला किंवा धने-जिरेपूड, मीठ, तेल.  
कृती : ज्वारी, गहू व चणाडाळ यांची पिठे एकत्र करावीत. भाजणीचे पीठ असेल, तर ते घ्यावे. त्यात गाजराचा कीस, हिंग, हळद, काळा मसाला किंवा धने-जिरेपूड घालावी. चवीपुरते मीठ घालावे. सर्व साहित्य एकत्र करून त्यात दोन चमचे कडकडीत तेलाचे मोहन घालून ते पीठ पाणी घालून घट्ट शिजवावे. तव्यावर हव्या तेवढ्या आकाराचे थालीपीठ थापावे. मधे एक व बाजूने सहा अशी भोके पाडावीत. भोकामध्ये व बाजूने तेल सोडून मंद आचेवर किंचित गुलाबी डाग पडतील इतपत भाजावे. खायला देताना लोणी किंवा तूप, चटणी किंवा लोणचे द्यावे. ही थालीपिठे प्रवासात नेण्यासाठी अधिक उपयोगी आहेत.

कचोरी
साहित्य : दोन वाट्या मैदा, १ वाटी मुगाची डाळ, १ वाटी गाजर कीस, दाण्याचा जाडसर कूट, खसखस, तीळ, बडीशेप, धने, जिरेपूड, हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, आले, कोथिंबीर, तेल, ओले खोबरे.
कृती : मैद्यामध्ये तेलाचे मोहन व चवीपुरते मीठ घालून मैदा घट्ट भिजवून घ्यावा. भिजवलेली मुगाची डाळ गाजराचा कीस एकत्र करून थोडी शिजवून घ्यावी. चांगली वाफ आल्यावर त्यात तिखट, मीठ, हळद घालून सर्व मिश्रण परतून घ्यावे. खाली उतरवून त्यात धने, जिरेपूड, साखर, लिंबू, ओले खोबरे, दाण्याचा कूट, खसखस घालून सर्व मिश्रण एकत्र करून घ्यावे. भिजविलेल्या मैद्याचे पुरी एवढे गोळे करून त्यात सारण भरून मोदकासारखे गोल तयार करावेत. तेलात अगर तुपात मंद आचेवर लालसर होईपर्यंत तळाव्यात. ३-४ दिवस चांगल्या राहातात.

पोहे
साहित्य : अर्धा किलो पोहे, १ मोठे गाजर, ५-६ हिरव्या मिरच्या, मीठ, साखर, हळद, फोडणीचे साहित्य, लिंबू, कढीपत्ता, तेल.
कृती : जाड पोहे घेऊन धुऊन ठेवावेत. दहा मिनिटांनंतर गाजर किसून घ्यावे. हिरव्या मिरचीची फोडणी करून फोडणीत हळद घालावी व गाजराचा कीस मऊ करून घ्यावा. नंतर त्यात पोहे टाकून वाफ आणावी. चवीप्रमाणे मीठ व साखर घालून आवडत असेल, तर लिंबू पिळावे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर व खोबरे घालावे. गरम गरम छान लागतात.

कढी
साहित्य : चार वाट्या गोड ताक, ३ चमचे चण्याचे पीठ, १ चमचा मेथी, पाव चमचा जिरे, दालचिनीचा तुकडा, २ चमचे साखर, कढीपत्ता, कोथिंबीर, अर्धी वाटी गाजराचा कीस, हिंग, हळद, लवंग.
कृती : चण्याचे पीठ ताकात घालून चांगले घुसळून घ्यावे. जिरे, लवंगा, कढीपत्ता, हिंग टाकून फोडणी करून घ्यावी. फोडणी थंड झाल्यावर हळद घालावी व त्यात घुसळलेले ताक घालावे. कढीत मीठ, साखर घालून सारखी ढवळून घ्यावी व कढी उकळत असतानाच त्यात गाजराचा कीस घालावा. कढी ढवळत राहावे. गाजराचा कीस मऊ होतो व एकमेकांना चिकटत नाही. गाजराचा केशरी रंग कढीत खुलून दिसतो व कढी चवदार होते. गरम कढी भाताबरोबर छान लागते.

पराठे
साहित्य : दोन वाट्या गाजराचा कीस, ७-८ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, आले, १ चमचा जिरे, चवीपुरते मीठ, साखर, लिंबू, तेल, कणीक, तांदळाची पिठी, हळद.
कृती : गाजराच्या किसात धने, जिरे, मिरच्या, मीठ, कोथिंबीर वाटून घालावे. कणकेत किंचित तेल, मीठ, हळद घालून पीठ घट्ट भिजवावे. पुरणाच्या पोळीप्रमाणे दोन पुऱ्यांच्यामध्ये सारण घालून पाहिजे तेवढी मोठी पोळी लाटावी. लाटताना तांदळाची पिठी वापरावी किंवा कणीकसुद्धा चालेल. तव्यावर तेल टाकून खरपूस भाजावी. दोन्ही बाजूंना हाताने तेल लावावे, म्हणजे खमंगपणा येतो. गरमगरम खायला चविष्ट लागतात. पराठ्याबरोबर आवडीप्रमाणे तूप, लोणी, चटणी किंवा लोणचे घ्यावे.

पोळी
साहित्य : गाजर, चण्याच्या डाळीचे पीठ, कणीक, तांदळाची पिठी, धने, जिरेपूड, कोथिंबीर, मीठ, साखर, तेल.
कृती : गाजर किसून घ्यावे. चण्याच्या डाळीचे पीठ लावून त्यात धने, जिरेपूड घालून तिखट, मीठ, साखर घालून घट्ट गोळा मळून घ्यावा. कणकेत थोडे मोहन घालून, किंचित मीठ घालून घट्ट मळून घ्यावी. दोन पुऱ्या करून दोहोंच्यामध्ये गोळा घालून तांदळाच्या पिठीवर लाटावी. तव्यावरच तेलाचा हात लावून मंद आचेवर पोळी भाजावी. गुलाबी डाग पडू द्यावेत. रुचकर, खमंग पोळी गरम गरम तूप लावून खावयास द्यावी. आवडत असल्यास कोरडी चटणी किंवा लोणचे द्यावे.

खीर
साहित्य : एक लिटर दूध, अर्धा किलो गाजर, १ वाटी साखर, तांदळाची पिठी, कॉर्नफ्लोअर, किंचित मीठ, चारोळी, वेलदोडे. 
कृती : गाजर बारीक किसून तुपावर मऊ होईपर्यंत परतून घ्यावे. त्यात किंचित मीठ टाकून दूध घालून दुधात शिजवून घ्यावे. नंतर त्यात कॉर्नफ्लोअर घालून पुन्हा शिजवावे. साखर घालून मिक्‍स करावे. मग चारोळ्या, बदाम काप, काजू काप घालावेत. खीर गरम असताना चविष्ट लागते.

गोड घारगे
साहित्य : दोन वाट्या गाजराचा कीस, १ वाटी तांदळाचे पीठ, १ वाटी रवा, थोडी कणीक, २ वाट्या गूळ, तेल.
कृती : प्रथम गाजराचा कीस चांगला शिजवून घ्यावा. शिजत आल्यावर त्यात गूळ बारीक करून घालावा. त्याचवेळी तांदळाचे पीठ, रवा, कणीक घालून गार झाल्यावर चांगले मळून घ्यावे. कढईत तेल तापत ठेवावे. पिठाचे छोटे गोळे करून पुरी एवढे थापावे. त्याला मधे भोक पाडावे व तेलात तांबूस तळून काढावे. २-३ दिवस टिकतात. प्रवासात नेण्यासाठी उपयोगी पडतात.

कोशिंबीर
साहित्य : गाजराचा कीस, दाण्याचा कूट, साखर, मीठ, दही, कोथिंबीर, हिरव्या मिरच्या, जिरे, हिंग, मोहरी.
कृती : प्रथम गाजराचा कीस घ्यावा. त्यात भाजलेल्या शेंगदाण्याचे कूट, मीठ, साखर, दही घालून मिक्‍स करावे. वरून कोथिंबीर घालावी. हिरव्या मिरच्या व जिरे घालून वरून फोडणी द्यावी व लगेच वाढावी. भाजी कमी असेल त्यावेळी उपयोगी होते. 
पर्यायी सूचना : दह्याऐवजी लिंबू वापरूनही कोशिंबीर करता येते. त्याची चवही छान लागते.

संबंधित बातम्या